तापी : ताप्ती. सातपुडा पर्वताच्या दक्षिणेची मोठी पश्चिमवाहिनी नदी. लांबी ७०२ किमी., जलवाहनक्षेत्र सु. ६५,३०० चौ. किमी. पैकी महाराष्ट्रात हिचा मार्ग २०८ किमी. व जलवाहन क्षेत्र ३१,३६० चौ. किमी. आहे. भारताच्या दख्खन पठारावरून वाहणाऱ्या इतर सर्व मोठ्या नद्या पूर्ववाहिनी आहेत फक्त तापी आणि नर्मदा या मात्र खचदऱ्यांतून पश्चिमेकडे वाहतात. तापी मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या राज्यांतून वाहते. मध्य प्रदेशातील बेतूल जिल्ह्याच्या पठारी भागात मुलताई (मूळ तापी) येथील तलावातून तापी उगम पावते, असे मानतात. खरा उगम तेथून सुमारे ३ किमी. वर आहे. प्रथम सपाट प्रदेशातून काही अंतर गेल्यावर ती उत्तरेस कालीभीतचे डोंगर व दक्षिणेस गाविलगड–मेळघाट रांगेची शाखा यांमधील जंगलव्याप्त तीव्र उताराच्या खडकाळ निदरीत वेगाने उतरते. पश्चिमेकडे थोडे अंतर जाऊन ती नैर्ऋत्येस वळते व महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून ४८ किमी. वाहत जाते. ती तशीच पुढे मध्य प्रदेशाच्या खांडवा जिल्ह्यातून निमाड भागातून बऱ्हाणपूरला येते. येथे तिने ३२ किमी. रुंदीचे पूरमैदान बनविले आहे. मग महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यात शिरून ती भुसावळजवळ पुन्हा पश्चिमेकडे वाहू लागते. येथे रेल्वेपुलाच्या दोन्ही बाजूंस तिच्यावर दोन छोटे धबधबे आहेत. जळगाव व धुळे जिल्ह्यांच्या सुपीक प्रदेशातून जाऊन तापी नंदुरबार व तळोदे यांदरम्यानच्या गुजरातच्या चिंचोळ्या पट्ट्यात जाते व अरुंद, खडकाळ मार्गाने पठार उतरून सुरत जिल्ह्याच्या सपाट भागात येते. मांडवीवरून पुढे गेल्यावर वाघेच्या जवळ राजपीपला टेकड्याही दूर राहून ती वळणे घेत घेत सुरतेस येते. येथून सु. ८ किमी. वर ती खंबायतच्या आखातास मिळते. मुखापासून सु. ५० किमी. पर्यंत भरतीचे पाणी येते. तेथे लहान नौकांनी वाहतूक चालते परंतु बऱ्याच भागात गाळ साठल्यामुळे मोठी तारवे चालत नाहीत. अखेरच्या भागात तिच्या पात्रात काही बेटे बनलेली आहेत.
तापीच्या खोऱ्याचा उत्तरेकडील भाग अरुंद आणि सातपुड्याकडे एकदम चढत गेलेला असल्यामुळे तिला उत्तरेकडून मिळणाऱ्या नद्या लहान आहेत. तिच्या महत्त्वाच्या उपनद्या दक्षिणेकडून येणाऱ्या पूर्णा, वाघूर, गिरणा, बोरी, पांझरा या आहेत. पूर्णा ही सर्वांत महत्त्वाची उपनदी पूर्वेकडून गाविलगडच्या डोंगरातून निघून अमरावती, अकोला, बुलढाणा जिल्ह्यांतून जाऊन जळगाव जिल्ह्यात चांगदेव येथे तापीला मिळते. पुष्कळदा तापी–पूर्णा खोरे असा उल्लेख करतात. गिरणा, बोरी, पांझरा, बोराई या उपनद्या पश्चिमेकडून सह्याद्रीच्या उत्तर भागातून येतात. गुजरातेत राजपीपला टेकड्यांतून आलेली वारेली ही एकच महत्त्वाची उपनदी तापीला उजवीकडून मिळते.
तापीच्या खोऱ्यात जलोढाचा जाड थर आहे त्याचे तापीने व तिच्या उपनद्यांनी क्षरण केल्यामुळे प्रदेशाला उत्खातभूमीचे स्वरूप आलेले बऱ्याच ठिकाणी दिसते. नाळी, घळ्या, काठावरील उंचउंच दरडी सर्वत्र विशेषतः पूर्व भागात दिसतात. पश्चिमेकडे गाळाचा थर जास्त विस्तृत आहे. तथापी जलरेषा बरीच खोल व अनिश्चित असल्यामुळे ज्वारी, कापूस, तेलबिया, कडधान्ये इ. कोरडवाहू पिकेच मुख्यतः होतात. दक्षिणेकडील उपनद्यांच्या खोऱ्यात काळ्या मातीचा खोल थर असल्यामुळे खानदेश–वऱ्हाडचा प्रसिद्ध कापूस उत्पादक प्रदेश निर्माण झाला आहे. अधिक पश्चिमेकडे सह्याद्रीचे फाटे व पावसाचे अधिक प्रमाण यांमुळे भाताचे पीक येते. गुजरातेत पूर्वेकडील ६६ टक्के भाग कमी लागवडीचा, तर पश्चिमेकडील उरलेला प्रदेश सधन लागवडीचा आहे. या भागात तापीचे पात्र ५०० ते १,००० मी. रुंद होते व तिच्या तीरांवर २५ ते ५५ मी. उंचीच्या दरडी आहेत. त्यांत घट्ट, पिवळसर गाळमाती, चुनखडक व सु. एक मी. जाडीचा काळ्या मातीचा थर दिसतो.
तापी खोऱ्यातील जंगलात इमारती लाकूड, जळण, बांबू, डिंक, तेंडू इ. जंगली उत्पन्ने मिळतात. वाघ, हरिण, रानडुक्कर, तरस, कोल्हा इ. वन्यपशू व अनेक जातीचे पक्षी, सर्प वगैरे आढळतात. नद्यांत व समुद्रात मासे पुरेसे मिळतात. सुरतेचे बंदर गाळाने भरून आल्यामुळे आणि मुंबईचे महत्त्व वाढल्यामुळे सुरतेला पूर्वीचे महत्त्व राहिले नाही. तापीच्या खोऱ्यातून जाणारा सुरत–भुसावळ हा लोहमार्गही तितकासा महत्त्वाचा राहिलेला नाही. त्यापेक्षा मुंबई–नासिक–मनमाड–भुसावळ हा मार्ग अधिक रहदारीचा व उपयुक्त झाला आहे. त्याचा जळगावच्या पूर्वेचा काही भाग काही अंशी तापी–पूर्णा खोऱ्यातून जातो. तसेच तापी खोऱ्यातील धुळे, जळगाव, भुसावळ, अकोला, अमरावती इ. शहरांवरून राष्ट्रीय महामार्ग जातात.
तापी खोऱ्यात जलसिंचनाची आवश्यकता असल्यामुळे तापीच्या उपनद्यांवर अनेक सिंचन प्रकल्प झाले आहेत. गुजरातेत सुरतपासून ८० किमी. वर उकाई येथे तापीवर धरण बांधून जलसिंचन व जलविद्युत् उत्पादन केले आहे. उकाईच्या पश्चिमेस काक्रापारा येथे तापीला बांध घातला आहे.
तापीला धार्मिक महत्त्वही आहे. हिंदू पुराणांत तिचा उल्लेख ताप्ती, तापिका, तापिनी इ. नावांनी आढळतो. सूर्याने आपला दाह कमी करण्यासाठी ही नदी निर्माण केली आहे. अशी कथा आहे. तापीच्या काठी सु. १८० तीर्थक्षेत्रे आहेत. त्यांपैकी पूर्णा संगमाजवळचे चांगदेव व गुजरातेतील बोधान ही विशेष प्रसिद्ध आहेत. सुरत शहर, तेथील किल्ला, थाळनेरचा किल्ला यांस ऐतिहासिक महत्त्व आहे.
संदर्भ : 1. Deshpande, C. D. Geography of Maharashtra, New Delhi,1971.
2. Misra, S. D. Rivers of India, New Delhi, 1970.
क्षीरसागर, सुधा
“