ताइशान : चीनच्या शँटुंग द्वीपकल्पातील पवित्र पर्वत. हा ताइआन शहराच्या उत्तरेस व जीनानच्या दक्षिणेस सु. ५१ किमी. असून या पर्वतातील सर्वांत उंच शिखराची उंची फक्त १,५०० मी. आहे. या पर्वतात पुष्कळ गटविभंग आहेत. त्यापैकी बहुतेक पुरागत स्फटिकी खडकांचे व ग्रॅनाइटाचे असून काही प्राचीन चुनखडीचे आहेत. चीनमधील पाच पवित्र पर्वतांपैकी हा एक होय. याच्या माथ्यावर व माथ्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवर अनेक मंदिरे आहेत. पूर्वीपासून हे यात्रास्थान असून येथे भाविक लोकांची सतत वर्दळ असते. प्राचीन काळी अशी श्रद्धा होती की, हा पर्वत मानवाच्या नियतीचा सूत्रधार आहे. बौद्धधर्मीय व ताओ मताचे लोक ह्या पर्वतास पूज्य मानतात. ताओ मतासंबंधीच्या अनेक आख्यायिका आणि दंतकथा या पर्वताशी निगडित आहेत.

सुरुवातीला हा ताइ–त्सुंग किंवा ताइ–युह या नावांनी ओळखला जात असे. चिनी काळापासून (इ. स. पू. २२१–२०६) टुंग–युह (पूर्वेकडील पवित्र पर्वत) या नावाने ओळखला जाऊ लागला. चिनी भाषेत ताइशान म्हणजे मोठा पर्वत. पूर्वी येथे चिनी वर्षाच्या तिसऱ्या महिन्यात मोठा उत्सव भरत असे.

कांबळे, य. रा.