तँजिअर : मोरोक्कोचे जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीवरील बंदर व तँजिअर प्रांताचे ठाणे. लोकसंख्या १,८७,८९४ (१९७१). जिब्राल्टरच्या नैर्ऋत्येस सु. ६१ किमी. व स्पेनच्या दक्षिण टोकापासून २७ किमी. आणि सामुद्रधुनीच्या पश्चिम प्रवेशद्वाराशी, मोक्याच्या ठिकाणी असलेले हे बंदर दीर्घकाळ सागरी व्यापाराचे केंद्र आणि यूरोपीयांचे विश्रामस्थान होते. मोरोक्कोतील सुप्रसिद्ध मोरोक्को चामडे, धने, बदाम, कातडी इ. येथून निर्यात होतात. ही एक मोठी व्यापारी उतारपेठ आहे. पर्यटन, बांधकाम, डबाबंद मासे, कापड हे येथील उद्योग आहेत. शहर दोन टेकड्यांच्या उतारावर वसलेले असून पंधराव्या शतकातील जुन्या तटबंदी विभागात हल्ली मोरोक्को कलेचे कौतुकालय असलेला राजवाडा, मोठी मशीद, कसबा इ. असून दक्षिणेस आधुनिक वस्ती आहे. १९६२ पासून मोरोक्कोचा सुलतान उन्हाळ्यात येथे राहतो. १९७१ मध्ये येथे विद्यापीठ स्थापन झाले आहे. फेज, मेकनेस, राबात, कॅसाब्लांका इ. शहरांशी तँजिअर उत्तम रस्त्यांनी आणि लोहमार्गांनी जोडलेले असून येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. यूरोपशी जलमार्गाने सतत संपर्क असतोच.