तक्षशिला : प्राचीन भारतातील एक व्यापारी सुप्रसिद्ध शहर व विद्याकेंद्र. सध्या हे स्थान पाकिस्तानात असून रावळपिंडीच्या वायव्येस सु. ३५ किमी. वर आहे. प्राचीन बौद्ध अवशेषांव्यतिरिक्त येथे सध्या विशेष वस्ती आढळत नाही. प्राचीन वाङ्मयामध्ये विद्येचे केंद्र म्हणून हे प्रख्यात असले, तरी पुरातत्त्ववेत्त्यांना अद्यापि या प्राचीन विद्यापीठाचे उल्लेखनीय असे अवशेष वा नक्की स्थळ उपलब्ध झालेले नाही. बौद्ध जातकांत तक्षशिलेचा गांधार देशाची राजधानी म्हणून उल्लेख आढळतो. मौर्य काळात हे एक महत्त्वाचे प्रादेशिक केंद्र होते आणि युवराज अशोक येथे प्रांताधिपती होता. इ. स. च्या पाचव्या शतकामध्ये हूणांनी तक्षशिला नष्ट करीपर्यंत हे एक महत्त्वाचे प्रादेशिक व व्यापारी केंद्र होते. भारताचा मुख्यत: मध्य आशियाशी व्यापार तक्षशिलामार्गे होत असे.
या नगरीच्या समृद्धीची तसेच तेथील वस्तीची कल्पना तेथे १९१३–३४ व १९४४-४५ ह्या सालांत झालेल्या उत्खननांतून येते. उत्खननांमध्ये इ. स. पू. पाचवे शतक ते इ. स. चे दुसरे–तिसरे शतक या चार कालखंडांतील सांस्कृतिक जीवनाची माहिती मिळाली. पहिले उत्खनन सर जॉन मार्शल यांनी केले, तर नंतरची अमलानंद घोष यांनी केली.
सर्वांत प्राचीन वस्ती इ. स. पू. पाचवे ते इ. स. पू. दुसरे शतक या काळातील असून ती भीर टेकडामध्ये आढळली. या काळातील घरे दगडगोट्यांनी बांधलेली आढळून आली एक बाजू अर्धवर्तुळाकार असलेल्या काही वास्तू होत्या. सांडपाण्याकरिता तत्कालीन लोक मातीच्या कड्यांचे कूप बांधीत. त्यांच्या घरांची छपरे लाकडी वाश्यांवर उभी न करता एकावर एक दगड रचून केलेल्या खांबांवर टेकलेली असावीत असे दिसते. घरांची आखणी व बांधणी ओबडधोबड असली, तरीदेखील या काळातील लोक सुसंपन्न होते. ते भिन्न प्रकारचे दागिने वापरीत. विविध प्रकारचे दागिन्यांचे नमुने आढळले असून त्यांपैकी काही कलात्मक दृष्ट्या अप्रतिम आहेत. या वस्तीचा काळ काही आहेत नाणी तसेच अलेक्झांडर आणि फिलिप ॲरिडीअस यांची नाणी यांवरून निश्चित करता येतो.
यानंतरची दुसरी वस्ती सिर्काप येथे इ. स. पू. दुसरे–पहिले शतक ते इ. स. चे दुसरे शतक ह्या काळात झाली. ही वस्ती भीर टेकाडापासून अलग होती. या काळात शहराभोवती दगडी कोट होता. या कोटास चौकोनी बुरूज होते. या काळात या नगरीवर परकीय राजांचे राज्य होते. सिर्कापच्या विस्तृत उत्खननामध्ये समांतर व एकमेकांस काटकोनात छेदणारे रेखीव रस्ते आणि रस्त्यांच्या दोन्ही बाजूंस उत्कृष्ट घरे होती. अशा तऱ्हेची उत्कृष्ट नगररचना असल्याचा पुरावा मिळाला. वास्तूंच्या बांधणीत एकंदर सहा भिन्न क्रम उपलब्ध झाले. प्रत्येक घराच्या मधोमध एक मोकळा चौक व चारही बाजूंना खोल्या, अशी एकूण रचना होती. या शिवाय राजवाड्याचे अवशेषही सापडले. चौथऱ्यावर बांधलेला आणि एकापेक्षा एक निमुळत्या परिघांची वर्तुळे असलेला अंडाकृती स्तूप, मध्ये चौक आणि चारही बाजूंस व्हरांडा व खोल्या अशी बांधणी असलेले अनेक विहार येथे मिळाले. याशिवाय सोन्याचांदीचे दागिने, ग्रीक मद्यकुंभ, इंडो–ग्रीक, इंडो–सिथियन, इंडो–पार्थियन आणि कुशाणकालीन नाणी व दांडा असलेली मृत्पात्रे, विविध प्रकारची शिल्पे, खेळणी, धातूंची हत्यारे इ. विविध वस्तू मिळाल्या.
सिरसुख ही इ. स. दुसरे ते पाचवे शतक या काळातील तिसरी महत्त्वाची वस्ती. या वस्तीचे पूर्ण स्वरूप मर्यादित उत्खननामुळे पूर्णपणे ज्ञात झाले नाही परंतु या काळामध्ये तक्षशिलेभोवती दगडगोट्यांचा कोट व अर्धवर्तुळाकृती बुरूज होते, असे दिसते. हूणांनी इसवी सनाच्या पाचव्या शतकामध्ये या वस्तीचा नाश केला.
याशिवाय धर्मराजिक या नावाने ओळखला जाणारा स्तूप उत्खनित करण्यात आला. हा भीर टेकाडानजीक अशोकाने बांधला असावा, असा प्रवाद आहे. उंच चौथरा, स्तूपाच्या अनेक कोनाड्यांत बुद्ध व बोधिसत्वादिकांच्या मूर्ती आणि मूळ स्तूपाजवळ अनेक छोटे छोटे स्तूप या योजनेनुसार हा स्तूप कुशाणकालीन असावा असे अनेक पुरातत्त्ववेत्त्यांचे मत आहे. सिरसुखजवळ अशोकाचा मुलगा कुणाल याच्या काळातील स्तूप आणि विहार सापडला. जाऊलियन, मोहरा मोरादू येथे शिल्पे व विहार मिळाले. मोहरा मोरादू विहारातील खोल्यांमधून लहान-मोठे स्तूप आढळतात आणि त्यांवर सुरेख व लक्षणीय असे मूर्तिकाम व खोदकाम केलेले आहे. या विहारात अनेक खोल्या असून स्वतंत्र सभागृह, भोजनगृह व पाकगृहही होते. याशिवाय सिर्कापजवळ जांदिअल येथे ग्रीक पद्धतीने बांधलेल्या देवळाचे अवशेषही मिळाले आहेत.
तक्षशिलेच्या उत्खननांत बौद्ध धर्माशी संबद्ध असलेल्या अनेक वास्तू व गांधार शैलीतील शिल्पे सापडली. त्यावरून तेथे तत्कालीन परकीय संस्कृतींचा भारतीय जीवनावर कितपत व कसा प्रभाव पडला, याचेही प्रत्यंतर येते. ग्रीक, इराणी व भारतीय संस्कृतींचा संगम येथे दिसतो. भीर टेकडानजीक पुरातत्त्वीय संग्रहालय असून तिथे प्राचीन वस्तू ठेवल्या आहेत. (चित्रपट १५).
संदर्भ : 1. Marshall, John, A Guide to Taxila, Cambridge, 1960.
2. Marshall, John, Texila, 3 Vols., Cambridge, 1951.
देव, शां. भा.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..