तहान : शरीराला पाण्याची गरज लागली म्हणजे जी विशिष्ट संवेदना (घशाला कोरड पडणे) उत्पन्न होते, तिला तहान म्हणतात. सर्वसाधारणपणे पाणी व इतर द्रव पदार्थांची गरज सामाजिक रूढी व वैयक्तिक सवय यांवर अवलंबून असते. ७० किग्रॅ, वजनाच्या मानवी शरीरातील एकूण पाण्याची विभागणी सामान्यतः पुढीलप्रमाणे असते.
शरीरातील एकूण पाणी …. …. ४२ लि. कोशिकाबाह्य (पेशीबाह्य) पाणी …. १४ लि. कोशिकांतर्गत पाणी …. २८ लि.
एकूण कोशिकाबाह्य पाणी रक्तरसात ३ लि., कोशिकांच्या आजूबाजूस १०·५ लि. आणि इतरत्र ०·५० लि. असे विखुरलेले असते.
शरीरातील पाण्याचा सूक्ष्म समतोल ठेवण्याकरिता काही विशिष्ट यंत्रणा असते. ऊतकामधील (समान रचना आणि कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहामधील) कोशिका व त्यांच्या अवतीभोवती असणारा द्रव पदार्थ यांच्यामधील पाण्याच्या प्रमाणात बदल झाला म्हणजे तर्षण दाबात [→ तर्षण] फरक पडून पाणी कोशिकेतून बाहेर किंवा कोशिकेत जाऊन समतोल साधला जातो. या देवाण–घेवाणीमुळे शरीरातील पाण्याचे एकूण प्रमाण नेहमी कायम ठेवले जाते.
मानवी शरीराला दररोज २,५०० घ.सेंमी. पाणी लागते. त्यापैकी १,२०० घ.सेंमी. पाणी अन्नपदार्थांतून मिळते, सु. ३०० घ. सेंमी. पाणी अन्न पचन क्रियेत तयार होते (चयापचयात्मक म्हणजे शरीरात सतत होणाऱ्या भौतिक–रासायनिक घडामोडींद्वारे उत्पन्न होणारे पाणी) आणि उरलेले सु. १,००० घ. सेंमी. पाणी हे पाणी, दूध चहा, कॉफी इ. द्रव पदार्थांपासून मिळते.
एके काळी घशात किंवा तोंडास कोरड पडून तहानेची संवेदना उत्पन्न होते, अशी समजूत होती. आधुनिक मताप्रमाणे रक्तातील सोडियमाची संहती (एकक घनफळातील प्रमाण) जास्त झाली म्हणजे ही संवेदना उत्पन्न होते, असे मानले जाते. रक्तातील तर्षणता १% ने वाढली म्हणजे तहान लागते. ही संवेदना अधोथॅलॅमसात (मेंदूच्या विशिष्ट भागात) उत्पन्न होत असावी. भुकेची संवेदना व तिचे शमन झाल्यानंतर होणाऱ्या संवेदना यांचे केंद्रही मेंदूच्या याच भागात असावे. ही सर्व केंद्रे एकमेकांच्या जवळ असावीत.
तहान ही पुष्कळ वेळा कोशिकांच्या निर्जलीकरणाचा परिणाम असल्यामुळे प्रमाणापेक्षा पाण्याचे सेवन कमी झाल्यास किंवा प्रमाणापेक्षा मिठाचे सेवन जास्त झाल्यासही ती लागू शकते. कोणत्याही कारणामुळे शरीरातील एकूण पाणी कमी झाल्यासही तहान लागते. उदा., ⇨ अतिसार, ⇨ मधुमेह, ⇨ बहुमूत्रमेह इ. विकारांमुळे.
भीतीमुळे तोंडाला तात्पुरती कोरड पडते. तशीच कोरड परंतु कायम स्वरूपाची तोंडाने श्वासोच्छ्वास करणाऱ्यांमध्ये आणि नाकात अडथळा उत्पन्न झाल्यास पडते उदा., नासागिलायूंची (नाकाच्या पोकळीकडील घशातील टॉन्सिलांची) वाढ. अतिशय श्रमाचे काम करणाऱ्यांमध्ये व ताप आलेल्या रोग्यांमध्येही शरीरातील पाणी घटते. शुद्धीवर असणारा रोगीच तहान लागली असे सांगू शकतो म्हणून बेशुद्ध रोग्याच्या पाण्याच्या गरजेकडे विशेष लक्ष पुरवावे लागते. बहुधा शरीरातील सोडियम व पाणी एकाच वेळी कमी होतात. अशा वेळी योग्य प्रमाणात दोहोंचा पुरवठा करणे जरूर असते.
अतिशय घाम, उलट्या किंवा अतिसार यांमुळे सोडियमाचे प्रमाण पाण्यापेक्षा बरेच घटते आणि म्हणून या विकारांमध्ये तहान हे प्रमुख लक्षण नसते तर पायांच्या पिंडऱ्यांत गोळे येणे, मानसिक व शारीरिक दौर्बल्य, ग्लानी इ. लक्षणे प्रामुख्याने आढळतात. तोंडातून घेतलेल्या पाण्याचे अवशोषण अतिशय जलद होते परंतु कधीकधी नीलेतून किंवा त्वचेखाली पाणी किंवा लवण–शर्करा विद्रावाची (मीठ आणि ग्लुकोजाच्या विद्रावाची) अंतःक्षेपणे (इंजेक्शने) द्यावी लागतात.
पाणी पोटात गेल्यावर पुरेसे पाणी गेल्याची संवेदना कशी उत्पन्न होते, हे निश्चितपणे सांगता येत नाही. जठरात पाणी गेल्यावर जठर फुगते व तेथील तंत्रिकांच्या (मज्जांच्या) द्वारे अधोथॅलॅमसात संवेदना पोहोचतात आणि पाणी पिण्याची क्रिया बंद करण्याची इच्छा होते. पिण्यात आलेले पाणी रक्तात मिसळून तेथील तर्षण दाबावर परिणाम होण्यापूर्वीच पाणी पिण्याची क्रिया थांबते म्हणून जलाभिसरण दाबाचा आणि पाणी पिण्याची क्रिया थांबविण्याचा कार्यकारण संबंध नसावा असे मानतात [→ भूक].
ढमढेरे, वा. रा. भालेराव, य. त्र्यं.
पशूंतील तहान : मनुष्यमात्राप्रमाणे सर्व पाळीव व अन्य पशूंना थोड्याफार फरकाने पाण्याची गरज असते. त्यांना तहानेची संवेदनाही होत असावी कारण प्रयोगशाळेतील प्राणी मधून मधून पाण्याच्या बाटलीला लावलेल्या नळीने येणारे पाणी चोखून पितात. वन्य पशू ठराविक वेळी दर दिवशी उपलब्ध पाण्याच्या साठ्याकडे येतात, असे दिसून येते.
उंटाला तहान लागत नाही व तो आपल्या पोटात पाणी साठवून ठेवतो हा समज सर्वस्वी खरा नाही कारण पाणी मिळाल्यास तो इतर पाळीव प्राण्यांप्रमाणे रोज थोडे तरी पाणी पितोच परंतु कित्येक दिवस तो पाण्याशिवाय राहू शकतो. पंधरा–सतरा दिवस तो पाण्यावाचून जगल्याची उदाहरणे आहेत. या काळामध्ये त्याच्या पहिल्या पोटातील त्वचेच्या घड्यांतील साठलेले पाणी झिरपत आतड्याकडे जाते पण हे पाणी फारच थोड्या प्रमाणात असते. मुख्य म्हणजे त्याच्या मदारीमध्ये साठून राहिलेल्या वसेचे (चरबीचे) ऑक्सिडीकरण (ऑक्सिजनाशी संयोग) होऊन त्या क्रियेमध्ये उत्पन्न झालेल्या पाण्यावर तो जगतो. या काळात त्याचे वजन २५% कमी झाले, तरी त्याला अपाय पोहोचत नाही. पाणी मिळाल्यावर एका वेळी १०० ते १२५ लि. पर्यंत पाणी पिऊन घटलेले वजन १० मिनिटांच्या आत तो भरून काढतो.
दीक्षित, श्री. गं.
संदर्भ : 1. Best, C. H. Taylor, N. B. The Physiological Basis of Medical Practice, Baltimore, 1961.
2. Davidson, S. Passmore, R. Brock, J. F. Human Nutrition and Dietetics, Edinburg, 1973.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..