तलवार मासा : झिफिइडी या मत्स्यकुलातील मॅकेरेल माशांसारखा दिसणारा एक मासा. याचे शास्त्रीय नाव झिफिअस ग्लेडियस असे असून या कुलात ही एकच जाती आहे. ही उत्तर अटलांटिक महासागर आणि भूमध्य समुद्र यांत राहणारी असली, तरी पॅसिफिंक व हिंदी महासागर यांतही आढळते.
सर्वसाधारणपणे या माशाची लांबी १·८—३·१ मी. आणि वजन ४५·४–९१·०० किग्रॅ. असते पण ६·१ मी. लांबीचे आणि ५·८ क्विंटल वजनाचे मासेही आढळलेले आहेत. याचे शरीर जाड व दोन्ही बाजूंनी साधारणपणे दबलेले असते. स्नायू अतिशय मजबूत असतात. त्वचा उघडी आणि खरखरीत असते. मांसाचा रंग तांबडा असतो.वरचा जबडा पुढे आलेला, बराच लांब, टोकदार व दोन्ही बाजूंनी तलवारीच्या पात्यासारखा चपटा झालेला असतो. यामुळे या माशाला तलवार मासा हे नाव मिळालेले आहे. दात लहान पण तीक्ष्ण असतात. डोळे बाजूला असतात.
“