तराणा : उत्तर भारतीय शास्त्रीय संगीतातील एक गायनप्रकार. ‘दिर्दिर, ता नोम, यळली यल यल’ इ. अक्षरसमूहांच्या अर्थनिरपेक्ष उपयोगासहित अवतरणारी रागसंगीतातील रचना तराणा (तराना) म्हणून ओळखली जाते. मूलतः अमीर खुसरौने (१२५३–१३२५) हा प्रकार प्रचारात आणला व फार्सी इ. भाषांतील ईश्वरनिदर्शक शब्दांचे त्यात उपयोजन केले, असे म्हटले जाते. ‘अनंत हरि ओम्’ यांसारख्या शब्दांचे विघटित रूप तराण्याच्या शब्दांत दिसते, असेही एक मत आहे. फार पूर्वी तराण्यातील शब्द केवळ निरर्थक अक्षरसमूह नसतीलही पण अर्वाचीन काळात निरर्थक शब्दांची व चमत्कृतिपूर्ण ध्वनींची एक रागरचना म्हणूनच तराणे गायले जातात. ते मुख्यतः द्रुत लयीत गायले जात असले तरी विलंबित लयीतही तराणे आढळतात [⟶ ख्यालनामा], सतार, सरोद इ. वाद्यांसाठी बनणाऱ्या गती याही याच तऱ्हेच्या अक्षरसमूहांनी बांधलेल्या असतात, हे या संदर्भात लक्षात घेण्यासारखे आहे. या प्रकारांमध्ये शब्दार्थांना महत्त्व नसून अक्षरसमूहांच्या चमत्कृतिपूर्ण नादाकृतींना असते. निरर्थक शब्दांनी संगीतरचना बनण्याचा प्रकार संगीत रत्नाकरातही उल्लेखिलेला आहे. दक्षिण भारतीय संगीतातही ⇨तिल्लाना नावाचा याच पद्धतीचा प्रकार आढळतो. शब्दार्थांनी न अटकता लय व चमत्कृतिपूर्ण नादांचे अक्षरसमूह यांच्या आकर्षक संगीतरचना करण्याची सांगीतिक गरज तराण्याने पुरी होते, असे म्हणता येईल. उत्तर भारतीय संगीतातील ग्वाल्हेर घराण्यात हा प्रकार विशेष गायला जातो. निसार हुसेनखाँ, पं. विनायकबुवा पटवर्धन हे या प्रकारातील नामवंत गायक होत.
रानडे, अशोक