तमिळ साहित्य : तमिळ ही द्राविडी भाषांतील सर्वांत प्राचीन व समृद्ध भाषा आहे. तमिळ साहित्यही अत्यंत समृद्ध असून त्याला दीर्घकालीन परंपराही आहे. विवेचनाच्या सोयीसाठी तमिळ साहित्याचे स्थूलमानाने पुढील कालखंड पाडता येतील :  (१) संघम् काले, (२) मध्य काल, (३) उत्तर मध्य काल, (४) आधुनिक काल व (५) स्वातंत्र्योत्तर काल.

 

            इ.स.पू. ६०० च्या आधीपासूनच तमिळ भाषेत साहित्यनिर्मिती होत असावी, असे साधार मानले जाते. साहित्यनिर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी व निर्माण झालेले साहित्य वाङ्मयीन कसाेट्यांवर पारखून घेण्यासाठी पांड्य राजांच्या सूचनेनुसार एक कविमंडळ (संघम्) दक्षिण मदुरेत स्थापन झाले होते. हे कविमंडळ ‘तल्लैच्चंगम्‘ (प्रथम संघम्) ह्या नावाने ओळखले जाई. दुसऱ्या कविमंडळाची म्हणजे ‘इडैच्चंगम्’ची (दुसरे संघम्) स्थापना इ. स. पू. ४०० मध्ये झाली. इ.स.सु. दुसऱ्या शतकाच्या सुरुवातीस उत्तर मदुरेत तिसरे कविमंडळ स्थापन झाले. पहिल्या व दुसऱ्या संघम् काळातील जवळजवळ सर्वच रचना नष्ट झाली. दुसऱ्‍या संघम्‌मधील आज उपलब्ध असलेली एकमेव रचना म्हणजे ताेल्‌काप्पियम् नावाचा तमिळ व्याकरणग्रंथ होय.

 

            प्राचीन तमिळ साहित्यात इ. स. पू. सु. सहाव्या शतकापासूनच्या तमिळ समाजाचे आणि संस्कृतीचे प्रतिबिंब आढळते. ह्या आरंभीच्या काळातील सर्वच साहित्य हे लौकिक स्वरूपाचे आहे. त्यातील काही राजकारण, इतिहास, नागरी जीवन, युद्धे, सामाजिक क्रांती यांबाबत आहे. त्याचबरोबर प्रमेभावनेच्या अनेक सूक्ष्म छटांचे व त्याला पार्श्वभूमी म्हणून आलेल्या निसर्गाचे त्यात दर्शन घडते. कामभावनेबाबतही त्यात सुंदर व गौरवपूर्ण उल्लेख आढळतात. त्या वेळच्या काव्यातील आशय व त्याच्या अभिव्यक्तीसाठी उपयोजिलेले छंदवृत्तेही खास तमिळच आहेत. विशुद्ध शब्दकळा, विचारांची एकात्मता, अभिव्यक्तीतील रोखठोकपणा आणि भावनेची तीव्रता हे गुणविशेष ह्या सुरुवातीच्या काव्यात आढळतात. ह्या स्फटिकासारख्या स्वच्छ काव्योद्गारांत, मग ते काव्योद्गार, व्यावहारिक असोत की गूढार्थक असोत, मानवतेचे स्पष्ट प्रतिबिंब पडलेले दिसते. ह्या काळातील एकूण ४७३ कवींत अव्वैयार ह्या प्रख्यात कवयित्रीसहित ३० कवयित्रींचा तसेच सु. २५ राजकवींचाही समावेश आहे. त्या काळाच्या सांस्कृतिक विकासाचेच हे गमक म्हणावे लागेल.

 

            प्राचीन तमिळनाडूची संस्कृती ही त्या प्रदेशात कायम वास्तव्य असलेल्या लोकांचीच संस्कृती होती. त्या लोकांचा बाहेरच्या लोकांशी संपर्क येण्यापूर्वी त्या संस्कृतीचा जो विकास झाला, तो तेथील विशिष्ट भौतिक परिसराचा आणि भौगोलिक कारणांचाच परिपाक होय. त्या विकासात ऐतिहासिक, राजकीय गोष्टींचा प्रभाव नव्हता. तमिळनाडूची भूमी ही सुपीक असून ती नद्या-पर्वतांनी पठारांनी व मैदानांनी भरलेली आणि पूर्व, पश्चिम व दक्षिण बाजूंनी समुद्राने वेढलेली आहे. अशा ह्या नैसर्गिक परिसरातील मानवी जीवन व निसर्ग एकरूप असल्याने तेथील कल्पक भाटांना गाण्याची स्फूर्ती होणेही स्वाभाविकच आहे. म्हणूनच तमिळनाडूतील स्त्रीपुरुषांच्या भावभावनांचे तेथील निसर्गसौंदर्याशी असलेले अतूट नाते त्यांच्या गीतांत प्रत्ययास येते. ही गीते कधी गूढ, कधी सरळ वा स्फुट असली, तरी त्यांना तमिळ साहित्याच्या प्राचीन परंपरेत महत्त्वपूर्ण स्थान आहे.

 

            आज उपलब्ध असलेले सर्वांत प्राचीन तमिळ साहित्य ðसंघम् साहित्य ह्या नावाने ओळखले जाते आणि त्याचा कालखंड इ. स. पू. सु. ४०० ते इ. स. २०० हा आहे. हा संघम् काळातील साहित्यसंभार साहित्यप्रकारांच्या व रचनेच्या वैविध्याने नटलेला आहे. ह्या काळातील अनेक काव्यग्रंथ कालोदरात नष्ट झाले  कारण प्राचीन लोकांना ते जतन करून ठेवण्याची आवश्यकता वाटली नसावी. तथापि इ. स. तिसऱ्या व चौथ्या शतकांच्या सुमारास काही कवींना आणि आश्रयदात्यांना मात्र हे साहित्य जतन करून ठेवण्याची आवश्यकता वाटली आणि त्यांनी परंपरेने चालत आलेल्या व उपलब्ध असलेल्या काव्याचे संकलन केले तसेच नंतरच्या पिढीला देण्यायोग्य काव्याची निवड केली आणि स्वतंत्र, नवीन रचनाही केली. आज उपलब्ध असलेल्या प्राचीन साहित्यात ह्याच प्राचीन संकलनांचा अंतर्भाव आहे. ही संकलने आठ स्तबके व दहा गोपगीते म्हणून ओळखली जातात. एकूण २,३८१ पद्ये आज उपलब्ध असून त्यांत ३ ओळींच्या लहान भावगीतांपासून तो ७८२ ओळींच्या प्रदीर्घ गोपगीतांपर्यंतच्या लहानमोठ्या रचनांचा अंतर्भाव आहे. ह्या साहित्याचे ४७३ कवी त्यांच्या स्वतःच्या खऱ्या नावांनी अथवा त्याच्या काव्यात ओघाने आलेल्या नावांनी ज्ञात आहेत. १०२ पद्यांचे कवी मात्र अज्ञात आहेत.


 

            ह्या पद्यांचे दोन प्रमुख विभाग पाडले जातात : (१) अकम् व (२) पुरम्. अकम्‌मध्ये आदर्श प्रेम, तर पुरम्‌मध्ये युद्ध, राज्यकारभार आणि सदाचार (मॉरल्स) यांचा समावेश होतो. ह्या संघम् काळातील साहित्याइतके दुसऱ्या कुठल्याही कालखंडातील साहित्य पारंपरिक वाङ्मयीन संकेतांनी बद्ध असल्याचे दिसत नाही. ह्या काळातील कवींचे परंपरेशी अतूट नाते असून ते परंपरेचे सर्व संकेत काटेकोरपणे पाळतात. परंपरेनुसार तमिळनाडू प्रदेशाचे  पर्वत, वने, शेते, समुद्रकिनारा व वाळवंटे असे पाच विभाग आहेत तर प्रेमप्रसंगाच्या मीलन, संयम, उद्विग्नता, विलाप व वियोग अशा पाच अवस्था आहेत. ह्या पाच अवस्थांचे विशिष्ट प्रदेश, ऋतू व वेळ हेही ठरलेले आहेत. इतकेच नव्हे, तर प्रत्येक प्रदेशाचे खास वनस्पती-प्राणी, सवयी, चालीरीती, अन्नपदार्थ, संगीत इ. ठरलेले आहेत. प्रेमाच्या एखाद्या अवस्थेचे वर्णन करताना कवी तिच्याशी संबद्ध असलेल्या सर्व संकेतांनुसार तिचे वर्णन करतो.

 

            तोल्‌काप्पियम् ह्या प्राचीन तमिळ व्याकरणग्रंथात हे वाङ्मयीन संकेत दिलेले आढळतात. ह्या ग्रंथाचा काल इ. स. पू. सु. ३०० आहे. त्यात एकूण १,२७६ सूत्रे आहेत. त्याचा पहिला भाग शुद्धलेखनासंबंधी  आहे दुसरा रूपविचारासंबंधी व तिसरा वाङ्‌मयीन संकेत आणि वाङ्‌मयीन प्रयोग वा रीतीसंबंधी आहे. ह्या ग्रंथापूर्वीही काही शतके तमिळ भाषेत वाङ्‌मयनिर्मिती होत असावी. कारण ह्या ग्रंथात विविध वाङ्‌मयीन रचनांचे प्रकार आणि त्यांबाबतचे नियम विविध ग्रंथांच्या आधारे निर्दिष्ट केलेले आढळतात. हे आधारभूत ग्रंथ तेव्हा उपलब्ध असले पाहिजे, ही उघड आहे. तोल्‌काप्पियम्मध्ये इतर व्याकरणविषयक ग्रंथांचेही उल्लेख येतात.

 

            संघम् काल : (इ. स. पू. ४०० ते इ. स. २००). ह्या काळातील दहा ‘पत्तुप्पाट्‌टु’ (गीते) म्हणजे आठ वेगवेगळ्या कवींनी रचिलेल्या दहा गीतांचे संकलन आहे. ही अतिशय संपन्न व परिपक्व अशा अभिजात शैलीत लिहिलेली वर्णनात्मक काव्ये असून त्यांत मनोहर निसर्गचित्रणे आहेत. त्यांत एक अकृत्रिम सहजता आढळते. निसर्गसौंदर्याच्या सोबतच जीवनला खुमारी आणणाऱ्या जीवनमूल्यांचे संयमाने व न्यायदृष्टीने केलेल चित्रणही ह्या गीतांत आढळते. या गीतांतील सर्वांत लहान गीत १०३ ओळींचे आहे. नेडुनलवदै हे सातवे गीत प्रख्यात कवी नक्कीरर याने रचिलेले असून ते प्रातिनिधिक मानले जाते. त्यात पांड्यराजा नेडुनचेलियन याची प्रशंसा आढळते.

 

             तिरुक्कुरळ : दहा पत्तुप्पाट्‌टुंशिवाय विविध विषयांवरील अठरा ग्रंथ तमिळमध्ये आहेत. या अठरांतील अकरा बोधपर, एक युद्धविषयक व उर्वरित सहा प्रेमविषयक काव्ये होत. ह्यांतीलच विश्वविख्यात असा ðतिरुक्कुरळ हा तिरुवळ्ळुवर कवीचा एक काव्यग्रंथ होय. तमिळ साहित्यातील तसेच जगातील एक उत्कृष्ट नीतिग्रंथ म्हणून तो गौरविला जातो. तिरुवळ्ळुवरच्या ह्या ग्रंथात एकूण १,३३० द्विपद्या (दोन ओळींची पद्ये) असून त्यांत तमिळ भाषेचे सामर्थ्य व समृद्धी प्रत्ययास येते. त्यातील द्विपदी छंद सूत्ररूप अभिव्यक्तीस अत्यंत अनुकूल आहे. भारतातील व यूरोपातील सर्वच प्रमुख भाषांत त्याची भाषांतरेही झाली आहेत. नालडियार ही जैनमुनींनी केलेली महत्त्वपूर्ण रचना होय. ती नीतिपर असून ४०० श्लोक तिच्यात आहेत.

 

दोन महाकाव्ये: प्रत्यक्षात थोड्या नंतरच्या काळातील (इ.स.सु. दुसरे-तिसरे शतक) शिलप्पधिकारम् आणि मणिमेखलै ही दोन तमिळ महाकाव्ये सामान्यतः संघम् काळातीलच मानली जातात. शेंगुट्टवन ह्या चेर राजाचा धाकटा भाऊ शिलप्पधिकारम् ह्या महाकाव्याचा कर्ता होय. त्याने आपल्या तरुणपणीच संन्यास घेतला. त्यानंतर तो ðइळंगो अडिगळ ह्या नावाने ओळखला जाऊ लागला.‘इळंगी’ म्हणजे राजपुत्र व ‘अडिगळ’ म्हणजे पूज्यपाद. ह्या महाकाव्याच्या नावाचा अर्थ ‘नूपूराची गाथा’ असा होतो. ह्या काव्यात कण्णगीची करुण कथा असून कण्णगी ही महापतिव्रता व सती म्हणून देवतारूपाने श्रीलंका व तमिळनाडूत पूजिली जाते. हे महाकाव्य तीन विभागांत असून प्रत्येक विभाग तमिळनाडूतील तत्कालीन तीन महान राज्यांच्या राजधान्यांशी संबंधित आहेत. पांड्यराडधानी मदुराई, चोलराजधानी कावेरीपुंपट्टिनम् (कावेरीपटनम्) व चेरराजधानी वंजी (तुरुवंचिकुलम्) ह्या त्या तीन राजधान्या होत. तमिळनाडूतील १,८०० वर्षांपूर्वीच्या समाजजीवनाचे त्यात विस्तृत वर्णन आलेले आहे. ललित कलांचे, विशेषतः संगीत व नृत्य यांबाबतचे, कवीचे सखोल ज्ञान त्यात प्रतिबिंबित झालेले दिसते. कवीने विविध छंदांचाही त्यात कौशल्याने वापर केला आहे. नायक-नायिकांची व विविध प्रसंगांची साक्षात चित्रे उभी करणारी कवीची वर्णनशैली कौतुकास्पद आहे. तत्कालीन तमिळनाडूच्या माहितीचे ते एक ज्ञानभांडारच आहे. मानवी सद्‌गुणांचा पुरस्कार करणारे हे एक उदात्त महाकाव्य आहे.


 

            दुसरे महाकाव्य ðमणिमेखलै हे शित्तलै शात्तनार ह्या कवीने लिहिलेले आहे. त्यात मणिमेखलै आणि तिच्या संन्यस्त जीवनाची कथा आहे. ती कोवलन् ह्या शिलप्पधिकारम्‌च्या नायकाची कन्या होय. शात्तनार हा बौद्ध धर्मी असल्याने आपल्या काव्यात त्याने बौद्ध धर्मांची तत्त्वे विस्तृतपणे मांडलेली आहेत.

            मध्य काल : (६०० ते १२००). शिलप्पधिकारम्‌ आणि मणिमेखलै ह्या दोन महाकाव्यांनंतरच्या तीन-चार शतकांचा काळ हा तमिळ साहित्याचे अंधःकार युगच म्हणावा लागेल. त्यानंतर सहाव्या शतकापासून तमिळ साहित्याचा मध्ये काल सुरू होतो. सहाव्या शतकाच्या प्रारंभापासून शैव ðनायन्मारांची आणि वैष्णव ðआळवारांची भक्तिगीते निर्माण झाली. शैव व वैष्णव संतांचे हे भक्तिवाङ्मय निर्माण होण्याच्या वेळी तमिळनाडूत बौद्ध आणि जैन धर्मांच्या प्रभाव कळसास पोहोचलेला होता. स्वाभाविकपणेच हे दोन धर्म शैव आणि वैष्णव संतांचे प्रधान टीकालक्ष्य बनले. शैव व वैष्णवांच्या कडव्या प्रतिकारामुळे बौद्ध व जैन धर्म हळूहळू लोकमर्जीतून उतरले आणि त्यांचा प्रभाव क्षीण होत गेला तथापि ह्या धर्मांचे अनुयायी आपल्या लेखनाने व्यक्तिशः तमिळ साहित्याच्या विकासास हातभार लावीतच होते. त्यांनी काही काव्ये व व्याकरणग्रंथ लिहिले. त्यांचे धार्मिक संघ जरी निष्प्रभ झाले, तरी त्यांनी व्यक्तिशः लेखक व भाष्यकार म्हणून आपली प्रतिष्ठा टिकवून ठेवली.

 

            ह्या कालखंडातील दुसरा लक्षणीय बदल म्हणजे तमिळनाडूतील प्रसिद्ध प्राचीन राजघराण्यांचा र्‍हास आणि पल्लव घराण्यास दहाव्या शतकापर्यंत प्राप्त झालेली ऊर्जितावस्था. पल्लव वंशाचे राजे हे संस्कृत साहित्याचे आश्रयदाते होते. त्यामुळे स्वाभाविकपणेच अनेक संस्कृत ग्रंथांची तमिळमध्ये भाषांतरे होऊन तमिळ भाषेत संस्कृत शब्दांचे मिश्रण झाले तसेच संस्कृत ग्रंथांच्या तमिळ रूपांतरांनाही या काळात उत्तेजन मिळाले.

 

            भक्तिपर साहित्य :  तिरुज्ञानसंबंधर, तिरुनावुक्करसर, सुंदरर आणि माणिक्कवाचगर हे तमिळमधील शैव मताचे चार महान अध्वर्यू होत तसेच बारा आळवार संत हे तमिळमधील वैष्णव मताचे अध्वर्यू होत ह्या बारा आळवार संतांची नावे पुढीलप्रमाणे :  पोय्‌गै आळवार, भूतत्ताळवार, पेयाळवार, तिरुमळिशै आळवार, नम्माळवार, मधुरकवी आळवर, कुलशेखर आळवार, पॅरियाळवार, आंडाळ, तोंडरडिपॉडी आळवार, तिरुप्पाण आळवार आणि तिरुमंगै आळवार. हे सर्वच शैव व वैष्णव संत तमिळनाडूच्या कानाकोपऱ्यांतून तीर्थयात्रा करीत फरित आणि आपल्या उपास्य देवतेवर गूढगुंजनपर पदे व गुणगौरवपर गीते रचीत. भक्तीच्या परमानंदाने बेहोश होऊन त्यांनी हजारो पदे रचली. त्यांच्या ह्या भक्तिपर पदांत भावनेची खोली आणि आत्माविष्काराचा आनंद ह्या दोहोंचाही प्रकर्षाने प्रत्यय येतो. नंतर नंबियांडार नंबी याने शैव संतांच्या पदांचे संकलन करून त्यांची अकरा तिरूमुरैमध्ये विभागणी केली. संत नाथमुनीने याच पर्कारे वैष्णव संतांची पदे संकलित करून ती नालायिर-दिव्य-प्रबंधम् नावाने संगृहीत केली.

 

            शेक्किळार याच्या पेरियपुराणम् ह्या ग्रंथाची रचना दुसरा कुलोत्तुंग याच्या कारकीर्दीत (११३३–५०) झाली. हे एक उच्च प्रतीचे महाकाव्य असून ते त्यातील विशुद्ध शब्दकळा, उदात्त धार्मिक भावना आणि काव्यगुण या दृष्टीने लक्षणीय आहे. त्यात ह्या जमातीच्या व वर्गांच्या चालीरीती, आचारविचार, व्यवसाय, करमणूक, अलंकार इ. विषयीची माहिती आली आहे.

 

            महाकाव्ये : ह्या काळातील महाकाव्ये जीवक चिंतामणि, वळयापति, कुंडलकेशी, नीलकेशी, चूडामणि, उदयणन्, कदै, यशोधरकाव्यम् व नागकुमारकवियम् ही होत. जैन किंवा बोद्ध धर्मप्रचारार्थ ती रचलेली असली, तरी काही महाकाव्ये वाङ्मयीन गुणवत्तेमुळे सर्वच स्तरांतील आणि धर्मांतील लोक आवडीने वाचतात. यांतील शेवटचे महाकाव्य प्रत्यक्षात उपलब्ध नाही. वळयापति, कुंडलकेशी आणि यशोधरकाव्यम् ह्या काव्यांचा फक्त काहीच भाग आता उपलब्ध झाला आहे. जीवक चिंतामणि हे महाकाव्य उच्च प्रतीचे असून त्यांतील व्यक्तिरेखा व वर्णने उत्कृष्ट आहेत.


 

            ह्याच काळात संघम् काळाप्रमाणेच दुसरी एक अव्वैयार (सु. बारावे शतक) ही कवयित्री होऊन गेली. तिला राजांचा व सरदारांचा आश्रय लाभला होता. तिच्याबाबत अनेक आख्यायिका आहेत आणि त्यांतून तिच्या विभूतिमत्त्वाची कल्पना येतो. तिची ग्रंथरचना साधी पण व्यावहारिक शहाणपणाने भरलेली असल्यामुळे ती तमिळनाडूत अतिशय लोकप्रिय आहे. काही आख्यायिकांतून ती महाकवी ðकंवनची समकालीन होती आणि अनेक बाबतींत ती त्याच्यापेक्षा श्रेष्ठ होती, असे सांगितले जाते. आत्तिशूडि, कोन्‍रैवेन्दन, मुदुरै आणि नल्‌‍वळि हे तिचे महत्त्वाचे ग्रंथ होत. नीतिमत्ता आणि चातुर्य यांबाबतची मार्मिक आणि सूत्रबद्ध अभिव्यक्ती असलेले हे मालिकाग्रंथच होत. यांशिवाय अनेक स्फुट काव्येही तिच्या नावावर आढळतात.

 

             कंबन : कंब रामायण हे अक्षर महाकाव्य लिहिणारा कवी कंबन (सु. बारावे शतक) हा होय. मूळ वाल्मीकि रामायणाचे ते तमिळ रूपांतर असूनही त्यात रचनेची स्वतंत्रता आणि काव्यगुणांची मौलिकता आहे. कंबनचे भाषाप्रभुत्व त्यात दिसून येते. अलौकिक प्रतिभेचे वरदान या कवीला लाभलेले होते. त्याने आपल्या महाकाव्यासाठी ‘विरुत्तम्’ म्हणजे छंदांचा वापर केला असून आपली रचना नादमधुर करण्यात तो कमालीचा यशस्वी झाला आहे. काही विद्वानांच्या मते कंबन दहाव्या शतकात, तर इतर काहींच्या मते तो बाराव्या शतकाच्या सुरुवातीस होऊन गेला. त्याचा आश्रयदाता शडैयप्पवळ्‌ळल होता. या आश्रयदाच्याच्या प्रशंसापर काही पद्ये ह्या महाकाव्यात आली आहेत. त्याचे इतर ग्रंथ फारसे लोकप्रिय नाहीत. त्यांची नावे शठकोपर अंदादि, सरस्वती अंदादि, एर्-ऍळुपदु, शिलै-ऍळुफदु तिरुक्कै-विळक्कम् ही होत.

 

            जयंगोंडार : हा कलिंगत्तुप्परणी या प्रसिद्ध युद्धकाव्याचा कर्ता असून या काव्यात चोल राजा पहिला कुलोत्तुंग याने कलिंगावर मिळविलेल्या विजयाचे वर्णन आहे. उपमा, अतिशयोक्ती इ. अलंकार व कल्पनासौंदर्य यांनी हे काव्य नटलेले आहे. नादसौंदर्य आणि आशय यांचे चांगले संतुलन या काव्यात आढळते.

 

            उत्तर मध्य काल : (१२००–१७५०). ह्या काळात अनेक साधारण कवी तसेच शैव व वैष्णव आचार्य होऊन गेले. ह्या काळात जैन धर्म संपूर्णपणे निष्प्रभ होऊन शैव व वैष्णव संप्रदाय प्रभावी झाले. तमिळ शैव सिद्धांताचे तत्त्वज्ञान ह्या काळात शास्त्रशुद्ध पायावर उभे करण्यात आले. हे खास दक्षिणात्य शैवांचे तत्त्वज्ञान आहे. हे तत्त्वज्ञान निर्माण करणाऱ्या शैवानुयायांतील मेइगंडार हा प्रमुख असून त्याचा शिवज्ञान बोधम् हा ग्रंथ सांप्रदायिक धर्मग्रंथांत सर्वश्रेष्ठ मानला जातो. फक्त बारा सूत्रांत त्याने वेदांचा सारांश मोठ्या खुबीने त्यात सांगितला आहे. शिवज्ञान स्वामिगळ याने ह्या ग्रंथावर जे विस्तृत भाष्य लिलिहे, ते द्राविड महामाध्यम् म्हणून ओळखले जाते. इतर शैव सिद्धांनी लिहिलेले तेरा ग्रंथ असून शिवज्ञान बोधम् आणि हे तेरा ग्रंथ मिळून एकूण ‘चौदा शैव सिद्धांत शास्त्रे’ म्हणून प्रसिद्ध आहेत. वैष्णव संप्रदायातही अनेक आचार्यांची परंपरा प्रसिद्ध असून त्यांनी आळवार संतांच्या चार हजार पद्यांवर विस्तृत भाष्ये लिहिली. ती संस्कृत आणि तमिळ मिश्रित अशा ‘मणिप्रवाळ’ नावाने  ओळखल्या जाणाऱ्या शैलीत आहेत. असे असले, तरी चार हजार दिव्य पद्यांबाबतची आळवारांची कामगिरी ही अतिशय मोलाची व अनन्यसाधारण आहे.

 

            याव्यतिरिक्त तमिळ साहित्यात आणखी एक वर्ग असून तो ‘तमिळ सिद्ध’ म्हणून ओळखला जातो. हे सिद्ध गुढवादी असून वैद्यक व तत्त्वज्ञान जाणमारे होते. त्यांनी रचिलेली पद्ये अत्यंत सुबोध वाटत असली, तरी त्यांतील गूढार्थ विवरण करणे फारच कठीण आहे. त्यांच्या ह्या पद्यांत दैनंदिन व्यावहारिक जीवनातील भाषाही वापरलेली आढळते.

 

            याच काळात आणखीही एक साहित्यसंप्रदाय होता. तोल्‌काप्पियम्, तिरुक्कुरळ इ. प्राचीन अभिजात ग्रंथांवर भाष्ये लिहिणाऱ्यांचा हा संप्रदाय आहे. त्यांनी आपल्या भाष्यांद्वारे प्राचीन ग्रंथांतील संहितेचा सखोल अर्थ विशद केला. या संप्रदायाचे प्रणेते किंवा संस्थापक ð नक्कीररइळ्ळंबूरनर हे होत. नक्कीररने कळवियल (या ग्रंथाचे इरैयनार अगप्पोरुल असेही नाव आहे) ह्या ग्रंथावर, तर इळ्ळंबूरनर याने तोल्‌काप्पियम् ह्या ग्रंथावर भाष्य लिहिले आहे. यांच्यानंतर पेरसिरियर, सेनावरैयर, नच्चिनारक्किनियर, अडियारक्कुनल्लार, मयिल्लैनादर आणि इतर भाष्यकार एकापाठोपठ एक उदयास आले. यांतील प्रत्येक भाष्यकाराची स्वतंत्र शैली आणि गुणवैशिष्ट्ये आहेत. या सर्वच भाष्यकारांनी प्राचीन साहित्यग्रंथ जतन करून ते सुबोध व लोकप्रिय करण्यात मोठी मोलाची कामगिरी बजावली. त्यांचे पांडित्य, चिकिस्तक अभ्यास आणि सूक्ष्म अवलोकन हे गुण उल्लेखनीय आहेत. शिलप्पधिकारम्‌वरील अडियारक्कुनल्लार याच्या भाष्याचा येथे आवर्जून उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे  कारण आपल्या भाष्याचा ओंघात तो अनेक अधिकृत संदर्भ देतो व बरीच महत्त्वपूर्ण माहितीही पुरवितो. तिरुक्कुरळ ह्या ग्रंथावर अनेकांनी भाष्ये लिहिली असली, तरी त्यांतील परिमेलळगर याचे भाष्य त्यातील सूक्ष्मता आणि सारग्राही संक्षेपाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे आहे.


 

            याच काळात अनेक कवी होऊन गेले. त्यांतील काही कवी तर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे ह्या काळातील थोर कवी म्हणून मान्यता पावले. काही कवींनी संस्कृत ग्रंथांची तमिळ रूपांतरेही केली.

 

            शैव संप्रदायाचे मठ तमिळ शिक्षणाची, विशेषतः धर्म व तत्तवज्ञानाच्या शिक्षणाची, महत्त्वपूर्ण केंद्रे होती. तेथे वाङ्मयीन ग्रंथ शिकविले जात, ते जतन करून ठेवले जात व त्यानंतर त्यांवर भाष्येही लिहिली जात. कधी कधी अधिपती व मठांतील लायक विद्वान नवीन ग्रंथनिर्मितीही करीत. तिरुवावडुतुरै व धर्मपूरम् ह्या प्रसिद्ध मठांशी संबंधित असलेले अनेक विद्वान होते. तिरुवण्णामलै, तुरैमंगलम् ह्या वीरशैव संप्रदायाच्या मठांनीही तमिळ साहित्याच्या विकासास मोठा हातभार लावला.

 

            ह्या काळातील ðकुमरगुरुपरर (सोळावे शतक) व ð शिवप्पिरगाशर (सतरावे शतक) हे महत्त्वाचे कवी होत. कुमरगुरुपरर हा सोळाव्या शतकातील कवी असून धर्मपरम् मठात त्याने सर्वसंगपरित्याग करून शैव संप्रदायाची दीक्षा घेतली. लहानपणीच तोकवी म्हणून प्रसिद्धीस आला. तो उ. भारतातही गेला होता आणि त्याची व मोगल सम्राट अकबर यांची भेटही झाली होती. त्याने काशी येथे आपला एक मठ स्थापन केला. उ. भारतात असताना त्याने हिंदी व संस्कृत भाषा आत्मसात केल्या. तेथे कंब रामायणावर हिंदी भाषेत जी प्रवचने दिली, त्यामुळे तेथील अनेक विद्वानांना व भक्तांना स्फूर्ती मिळाली. कंदर कलिवेण्बा, पंडार मुम्मणिक् कोवै, मीनाक्षी अम्मै कुरम्, मीनाक्षी इरट्टै मणिमाळै आणि मदुरैक्कलंबगम् हे त्याचे महत्त्वाचे ग्रंथ होत. त्याने काशीवरही एक कलंबग हिंदी भाषेत जी प्रवचने दिली, त्यामुळे तेथील अनेक विद्वानांना व भक्तांना स्फूर्ती मिळाली. कंदर कलिवेण्बा, पंडार मुम्मणिक् कोवै, मीनाक्षी अम्मै कुरम्, मीनाक्षी इरट्टै मणिमाळै आणि मदुरैक्कलंबगम् हे त्याचे महत्त्वाचे ग्रंथ होत. त्याने काशीवरही एक कलंबगम्‌काव्य लिहिले असून ते काशी-सलंबगम् नावाने प्रसिद्ध आहे. ‘कलंबगम्’ हा १०० कडव्यांचा विविध विषयांवरील व विविध वृत्तांतील एक तमिळ काव्यपर्कार असून ‘कलंबगम्’ चा अर्थ मिश्रण असा आहे. नीतिनॅरिविळक्कम् हा त्याचा नीतिपर ग्रंथ असून त्यात १९२ कडवी आहेत. ‘सदाचार पथावरी मार्गदर्शक दीप’ किंवा ‘धर्ममार्गावरील दीप’ असा त्याच्या शीर्षकाचा अर्थ होतो.

 

            शिवप्पिरगाशर हा दुसरा महत्त्वाचा कवी असून तो तुरैमंगलम् ह्या वीरशैव मठाचा अनुयायी होता. करुणैप्पिरगाशर आणि वेळय्य देशीकर हे त्याचे दोघे कनिष्ठ बंधूही विद्वान व लेखक होते. शिवप्पिरगाशर याने एकूण तेवीस ग्रंथ रचिले.त्यांतील काही साहित्यविषयक तर काही धार्मिक स्वरूपाचे आहेत. त्यांतील प्रभुलिंगलीलै हा महाकाव्यसदृश महत्त्वाचा साहित्यग्रंथ होय. नालवर नान्मणि मालै या लोकप्रिय ग्रंथात तेवारम् आणि तिरुवाचगम् ग्रंथांचे कर्ते असलेल्या चार शैव अध्वर्यूची प्रशंसा आहे. नन्नेरी हा त्याचा ग्रंथ नीतिपर असून तो अभिजात शैली व सुंदर उपमांसाठी विशेष प्रसिद्ध आहे.

 

            आधुनिक काल :  (१७५०–१९४७). काव्य:  १७५० नंतरच्या कालखंडातील कवी केवळ पारंपरिक काव्याचे अंधानुकरण करणारे होते. ‘स्थलपुराणम्’ म्हणजे विशिष्ट देवस्थानाच्या देवतेविषयक आख्यायिकांवरील महाकाव्ये रचण्यात काही कवी मश्गूल होते, तर काही कवी आपल्या स्फुट कविता रचण्यात तसेच एखाद्या विशेष प्रसंगी आपल्या आश्रयदात्यांची प्रशंसापर काव्ये रचण्यात मग्न होते. यांशिवाय काही कवी आधीच्या ख्यातनाम काव्यग्रंथांचे अनुकरण करून पढिक विद्वत्ता प्रदर्शित करण्यासाठी आपली लेखणी झिजवीत होते. ह्यातील बहुतांश रचना आज विस्मृतीच्या खोल गर्तेत पडलेली आहे आणि तसे होणे स्वाभाविकही होते. तो काळच असा होता, की पद्य हे गद्याचेही काम करणारे एकमेव साधन होते परंतु छपाईच्या यंत्राचा शोध लागल्यावर आणि ग्रंथ प्रकाशनाचे नवे तंत्र प्रचारात आल्यावर मात्र गद्य लेखनामुळे वैचारिक व माहितीपर साहित्य प्रसृत होण्याचे उद्दिष्ट साध्य झाले व पद्याचा वापर केवळ काव्यात्म अभिव्यक्तीसाठी म्हणजे भावनिक आणि काल्पनिक सौंदर्याभिव्यक्तीसाठीच होऊ लागला. 


             रामलिंग स्वामिगळ, वेदनायकम् पिळ्ळै आणि कृष्ण पिळ्ळै हे एकोणिसाव्या शतकातील प्रतिभासंपन्न कवी. ð रामलिंग स्वामिगळ (१८२३–७४) हे भक्तिमार्गी संत असून त्यांनी आपल्या हजारो गीतांतून विश्वप्रेमाचा आणि भूतदयेचा उपदेश केला आहे. त्यांची गीते सुबोध व प्रवाही शैलीत लिहिलेली आहेत. त्यांनी अनेक लोकगीतांचे छंद आपल्या गीतांसाठी वापरले. त्यांची कविता समृद्ध व वैविध्याने नटलेली आहे. अरुट्स म्हणजे ‘कृपेच्या कविता’ ह्या नावाने त्यांच्या सर्व कविता संगृहीत आहेत.

मीनाक्षीसुंदरम् पिळ्ळै (१८२५–७६) हे ह्या काळातील विपूल लेखन करणारे कवी व ग्रंथकार होत. त्यांनी सोळा ‘स्थलपुराणे’ आणि बत्तीस इतर वाङ्मयीन ग्रंथ लिहिले आहेत. ते स्वतःच जणू एक साहित्यसंस्था होते आणि तमिळ साहित्य समृद्ध करण्यात त्यांनी आपल्या काव्यरचनेने व गद्यलेखनाने विशेष हातभार लावला. असे अनेक अनुयायीही त्यांना लाभले होते.

 

            वेदनायकम् पिळ्ळै (१८२६–८९) हेही मीनाक्षीसुंदरम्‌चे शिष्य होते. पेण्‌मतिमालै, नीतिनुलसर्वसमय किर्तनै हे त्यांचे मौलिक काव्यग्रंथ होत. यांतील गीते सुबोध असून उदात्त तत्त्वांचा तरुण स्त्रीपुरुषांच्या मनांवर सुसंस्कार करण्याचे सामर्थ्य असणारी सूत्रवचने त्यांच्या ह्या गीतांत आहेत.

 

            रक्षण्ययात्रिकम् हे एच्. ए. कृष्ण पिळ्ळै (१८२७–१९००) यांचे जॉन बन्यनच्या पिल्ग्रिम्स प्रोग्रेसचे रूपांतर आहे. त्यांची दुसरी रचना रक्षण्यमनोहरम् ही असून तिच्यात भक्तिगीते आहेत. ह्या गीतांत त्यांचे काही चरित्रपर तपशीलही आले आहेत.

 

            मुरुगदासस्वामी ऊर्फ दंडपाणिस्वामी (१८४०–९९) यांनी आपल्या पुलवरपुराणम्‌मध्ये काही तमिळ कवींची पद्यमय चरित्रे लिहिली आहेत. ह्या कवींसंबंधीच्या अनेक आख्यायिकाही त्यात आलेल्या आहेत. त्यांचे इतर काव्यग्रंथ तिरुवरंग-तिरुवायिरमेतिरुमगळ अंदादि हे होत. 

 

            सुब्रह्मण्य भारती : सुब्रह्मण्य भारती (१८८२–१९२१) यांनी आपल्या काव्यरचनेने तमिळ कवितेचे नवे युग सुरू केले. त्यांची उत्कट राष्ट्रभक्ती आणि देशबांधांबाबतचे प्रेम यांमुळे लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत व स्फूर्तिप्रद शैलीत काव्यलेखन करण्याची आवश्यकता पटली आणि त्यांनी त्यानुसार आपले काव्यलेखन केले. त्यांचा काळ राष्ट्रीय आंदोलनाचा व सामाजिक सुधारणांचा होता. स्वातंत्र्याच्या आंदोलनात आघाडीवर असलेल्या नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध होते आणि त्यामुळे त्यांना आधुनिक भारताच्या समस्या प्रकर्षाने जाणवल्या आणि आकलन झाल्या. त्यांचे बहुतेक समकालीन कवी मात्र प्राचीन पारंपरिक वळणाची कविता रचण्यात समाधान मानीत होते. तमिळमधील बालसाहित्याचेही ते जनक होते. त्यांचे पापापाटु हे काव्य शालेय मुलांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. पुदियआत्तिशूडीमध्ये प्राचीन अव्वैयार या कवयित्रीने लिहिलेल्या बोधवचनांचे अनुकरण करून लिहिलेली बोधपर सूत्रवचने आहेत. पांचाली शपथम् हे त्यांचे लघुमहाकाव्य असून त्यात महाभारतातील एकच प्रसंग चित्रित केलेला आहे. या काव्यात वर्तमानकालीन अनेक प्रवृत्तींचा भूतकालीन प्रवृत्तींशी समन्वय साधला आहे. त्यांची कण्णन् पाट्‌टुकुयिल  पाट्‌टु ही काव्येही लोकप्रिय आहेत. त्यांची कविता तसेच त्यांचे निबंध हे आशय, अर्थसघनता, कल्पकता आणि सूचकता या दृष्टीने अत्यंत संपन्न असून त्यांत अभिव्यक्तीचे सौंदर्यही आढळते. त्यांच्या दृष्टीने काव्य हे जगाला तारणारे आणि जगाची सेवा करण्यासाठी उपयोगी पडणारे उत्तम साधन आहे. प्रगतिशील नव्या काव्याला अनुकूल ठरणारी अभिरुचीही त्यांनी निर्माण केली.

 

            कविमणी देशिक विनायकम् पिळ्ळै (१८७६–१९५४) हे त्यांच्या हयातीतच कीर्ती व लोकप्रियता लाभलेले कवी होत. त्यांच्या कवितांतून कलात्मकतेचा प्रत्यय येतो. त्यांनी एडविन आर्नल्डच्या लाइट ऑफ एशिया (आसिय ज्योति) व फिट्‌सजेरल्डकृत उमर खय्यामच्या कवितांचे तमिळमध्ये उत्कृष्ट भाषांतर केले.

 

            सुब्रह्यण्य भारतींपासून स्फूर्ती घेऊन कविता लिहिणाऱ्या दोन कवींचा निर्देश आवश्यक आहे. त्यांची नावे ðभारतीदासन् (१८९९–१९६४) व नामक्कळ रामलिंगम् पिळ्ळै (१८८८–१९७३) ही होत. भारतीदासन् हे अत्यंत भावनाप्रधान कवी असून त्यांनी उत्कट प्रेमाची गीते गायिली आहेत. त्यांनी धार्मिक भावनेने जोपासलेल्या निर्घृण जातिसंस्थेवर कडाडून हल्ला चढविला. त्यांच्या विविधविषयस्पर्शी प्रतिभेचा प्रत्यय त्यांच्या काव्यातून येतो.


नामक्कळ रामलिंगम् पिळ्ळै हे गांधीवादी आदर्शांना अनुसरणारे कवी होत. राष्ट्रीय आंदोलनात त्यांनी म. गांधींची शिकवण आपल्या गीतांद्वारे लोकप्रिय करण्याची कामगिरी बजावली. राय चोक्कलिंगम् (१८९८–  ) हेही गांधीजींच्या जीवनावर आणि शिकवणीवर कविता लिहिणारे कवी होत. असलांबीगै अम्माळ यांनीही गांधीजींवर गांधी पुराणम् (२ खंड) काव्य लिहिले आहे. शुद्धानंद भारती (१८९७–  ) यांनी अनेक काव्ये रचून तमिळ काव्यात भर घातली आहे. त्यांतील भारत शक्ति महाकाव्यम् (१९४८) ही रचना सर्वोत्कृष्ट आहे.

 

तिरु वि. कल्याणसुंदरम् मुदलियार (१८८३–१९५३) आणि स्वामी विकलानंदर यांच्या कविता स्फूर्तिप्रद आहेत. एम्. डी. एस्. योगी हे उत्स्फूर्त कवी असून त्यांचे मरिया मग्दालिन आणि अगळीगै हे दोन काव्यसंग्रह महत्त्वाचे आहेत. पेरियस्वामी तूरन् (१९०८–  ) हे सोप्या आणि प्रवाही शैलीवर प्रभुत्व असलेले कवी होत. कि. वा. जगन्नाथन् (१९०६– ), वाणीदासन् (१९१५), कंबदासन्, कृष्णदासन्, मुदियरासन्, इळंतिरैयन्, तंगवेलन्, कुयिलन्, तुरैवन्, सुरबी, तमिळ, अळगन्, इलन्, कंबनप्रभृती, कवी आधुनिक विषयांवर काव्यलेखन करीत आहेत. अळ वल्लियप्पा हे बालगीतकार आहेत.

 

गद्य : पाश्चात्त्यांचे द. भारतातील आगमन व मुद्रण कलेची सुरुवात यांमुळे तमिळ गद्याची नवीन क्षितिजे विस्तारली. पूर्वी सर्वच काही पद्यात लिहिले जाई. भाष्यकार हेच सुरुवातीचे गद्यलेखक होत आणि त्यामुळे तमिळमध्ये गद्याला ‘उरै नडै’ म्हणजे ‘भाष्यशैली’ म्हटले जाते. एकोणिसाव्या शतकात, विशेषत: त्याच्या उत्तरार्धात, गद्यलेखनाची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आणि मासिकांतून, भाषांतरांतून, धार्मिक ग्रंथातून आणि पाठ्यपुस्तकांतून गद्यलेखनाचा सर्रास वापर केला जाऊ लागला. १८४० च्या सुरुवातीपासून मात्र मोठ्या प्रमाणावर गद्यग्रंथ निर्माण होऊ लागले. ह्या काळात साहित्य हे केवळ उच्च वर्गीयांची व बुद्धिजीवी वर्गाचीच मक्तेदारी न राहता, ते सर्वांच्या विशेषत: मध्यम-वर्गीयांच्या वाचनविषयक गरजा भागवू लागले गद्यशैली ही जटिल वाक्यरचनेपासून तसेच पांडित्य व विक्षिप्तपणा यांपासून अधिकाधिक मुक्त होत गेली. स्पष्टता आणि तार्किक शुद्धता हे चांगल्या गद्याचे गुणविशेष बनले आणि हळूहळू तमिळ गद्य हे विज्ञान, राज्यशास्त्रादी विषयांच्या काटेकोर अभिव्यक्तीचे साधन बनले.

 

आरुमुग नावलर (१८२२–७६) हे श्रीलंकेचे रहिवासी असून तमिळ गद्याला त्यांनी प्रासादिक व सुबोध रूप दिले. त्यांनी पेरियपुराणम् ह्या  शैव महाकाव्याचा गद्यानुवाद केला तसेच धार्मिक विषयांवरही अनेक गद्यग्रंथ लिहिले. तमिळमध्ये पाठ्यपुस्तकेही त्यांनीच सर्वप्रथम लिहिली.

 

वेदनायकम् पिळ्ळै ह्यांनी सोप्या शैलीत आपल्या कादंबऱ्या लिहिल्या. सी. डब्ल्यू. दामोदरम् पिळ्ळै (१८३२–९०) यांनी तोल्काप्पियम्, वीरचोलियम् आणि चूडामणि हे प्राचीन ग्रंथ संपादित करून त्यांना उत्कृष्ट टीपाटिप्पण्याही जोडल्या. व्ही.जी. सूर्यनारायणशास्त्री (१८७१–१९०३) यांनी मतिवाणन् (१९०२) नावाची कादंबरी पांडित्यपूर्ण गद्यशैलीत लिहिली.

 

काव्याप्रमाणेच गद्याचाही वेगाने विकास सुब्रह्मण्य भारतींच्या लेखनाने घडवून आणला. त्यांनी विविध विषयांवर केलेले निबंधलेखन माहितीपूर्ण व स्फूर्तिप्रद आहे. त्यांनी लघुकथाही लिहिल्या. त्यांच्या ज्ञानरथम् ह्या कलाविषयक ग्रंथात त्यांच्या अलौकिक कल्पनाशक्तीची झेप दिसून येते.

 

डॉ. स्वामिनाथ अय्यर (१८५५–१९४२) यांनी सुबोध व चमकदार गद्यशैलीत अनेक ग्रंथ लिहिले. त्यांनी आपले गुरू मीनाक्षीसुंदरम् पिळ्ळै यांचे चरित्र तसेच आत्मचरित्रही लिहिले. त्यांचे दोन्हीही ग्रंथ विशेष महत्त्वपूर्ण आहेत. त्यांनी तमिळमधील अनेक अभिजात ग्रंथ संशोधून व त्यांना अभ्यासपूर्ण प्रस्तावना जोडून ते प्रसिद्ध केले. त्यांच्या प्रस्तावना तमिळमधील प्रमाणभूत गद्याचा आदर्श मानल्या जातात. त्यांनी अनेक समीक्षापर लेख तसेच अनेक मजेदार चुटके लिहूनही तमिळ गद्य समृद्ध केले आहे. प्राचीन ग्रंथाचे परिश्रमपूर्वक संशोधन-संपादन करण्यात त्यांनी आपली उभी हयात वेचली.


स्वामी वेदाचलम् उर्फ मरैमलै अडिगळ (१८७५–१९५०) हे विशुद्ध तमिळ गद्याचे पुरस्कर्ते होते. ते स्वत: संस्कृतचे जाडे विद्वान असले, तरी त्यांना तमिळ गद्यात संस्कृत शब्दांचे मिश्रण करणे मान्य नव्हते. इंग्रजी भाषासाहित्याचा सखोल अभ्यास आणि चिकित्सक वृत्ती यांमुळे त्यांनी प्राचीन अभिजात तमिळ ग्रंथांची कीर्ती दिगंत केली. त्यांच्या सर्वच लेखनातून त्यांनी कमावलेल्या आल्हादक व स्वच्छ शैलीचे दर्शन घडते. संत माणिक्कवाचगर यांच्यावरील तसेच संस्कृत नाटक शाकुंतल यावरील त्यांचे समीक्षाग्रंथ त्यांच्या उत्तम गद्यशैलीचे नमुने होत. टी. सेलवकेशवराय मुदलियार (१८६४–१९२१) यांच्या कंबन व तिरुवळ्ळुवर यांच्यावरील समीक्षाग्रंथांचाही आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्यांच्या गद्यात अनेक म्हणी आकर्षकपणे व चपखलपणे विखुरलेल्या आढळतात.

 

तिरु वि. कल्याणसुंदरम् मुदलियार यांच्या लेखनातून, विशेषत: रसग्रहणपर लेखनातून, त्यांच्या सामर्थ्यशाली व सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते. त्यांनी तमिळ गद्यास तजेलदार व आकर्षक रूप दिले. त्यांचे तिरु वि. क. वाळ्क्कैरिप्पुक्कळ (१९४४) हे आत्मचरित्र वैशिष्टयपूर्ण आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनचा भारताचा इतिहास त्यात पुन्हा जिवंत झालेला दिसतो. अनेक चळवळी आणि आंदोलने वाचकांच्या मनात पुन्हा जशीच्या तशी उभी करण्यात ते यशस्वी झाले आहेत. ते एक उत्कृष्ट संपादक, राजकारणपटू व प्रभावी वक्ते होते. त्यांच्या काही गद्यग्रंथांत, विशेषत: विविध परिषदांत त्यांनी दिलेल्या व्याख्यानांच्या संग्रहांत, त्यांच्या जीवनातील समतोल दृष्टिकोनाचा व मर्मदृष्टीचा प्रत्यय येतो. पेण्णिन पेरुमै अल्लतु वाळकैत्तुणै (१९२७) म्हणजे ‘स्त्रियांचे थोरपण’ तसेच तिरुक्कुरळच्या सुरुवातीच्या काही प्रकरणांवरील विस्तृत भाष्य हे त्यांचे ग्रंथ सर्वोत्कृष्ट आहेत.

 

राजाजी (चक्रवर्ती  राजगोपालाचारी १८७९–१९७२) हे त्यांच्या साध्या व चमकदार शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. वृत्तीने ते शिक्षक असून त्यांच्या सर्वच लेखनात मौलिकता आहे. त्यांच्या निबंधांत आणि कथांमध्ये मार्मिक दृष्टी व तर्कशुद्धता आढळते. त्यांचे महाभारत आणि रामायण यांवरील ग्रंथ लोकप्रिय आहेत. त्यांनी आपल्या गद्याद्वारे सॉक्रेटिस आणि मार्कस ऑरेलियस यांचा तमिळ भाषिकांना परिचय करून दिला आहे.

 

आधुनिक काळातील अनेक लेखकांनी वृत्तपत्रकार म्हणून लेखनक्षेत्रात प्रवेश केला आणि हळूहळू ते निबंधकार, कादंबरीकार व लघुकथाकार म्हणून प्रसिद्धी पावले. अशा लेखकांत ‘कल्की’ (आर्. कृष्णमूर्ती १८९९–१९५४) यांचे स्थान वैशिष्टयपूर्ण आहे. त्यांचे लेखन त्यातील हळुवारता व विविधता तसेच स्पष्टता व जीवंतपणा यांमुळे लक्षणीय आहे. त्यांच्या ऐतिहासिक स्वरूपाच्या कादंबऱ्या शिवगामियिन् शपथम् (१९४६), पार्थिवन् कणवू (१९४६), मोगिनीत्तीवु (१९४८) आणि पाेन्नियिन शेलवन् ह्या असून त्यांत त्यांच्या प्रचंड व्यासंगाची प्रचीती येते. त्यांच्या लघुकथाही रंजक व आल्हादक आहेत. त्यांच्या शैलीत कृत्रिमता किंवा अलंकारिकता नाही. साधी, जीवंत व सरळ हृदयाला जाऊन भिडणारी त्यांची शैली आहे.

 

जगवीर पांडयन् (१८८६–  ) व शुद्धानंद भारती हे विपुल गद्यलेखन करणारे लेखक आहेत. नामक्कळ रामलिंगम् पिळ्ळै हे कवी असले, तरी त्यांनी काही गद्यग्रंथही लिहिलेले आहेत. त्यांचे आत्मचरित्र विशेष उल्लेखनीय आहे.

 

आर्. पी. सेतू पिळ्ळै (१८९६– ) यांचे शिलप्पधिकारम् तिरुक्कुरळ ह्या ग्रंथांवरील समीक्षापर लेखन ही तमिळ समीक्षेतील विशेष मोलाची भर म्हणावी लागेल. त्यांनी अनेक गद्यग्रंथ लिहिले असून ते बहुतांश वाड्:मयीन विषयांवर आहेत. हे ग्रंथ त्यांतील अलंकारिक व काव्यात्म शैलीमुळे विशेष लोकप्रिय आहेत. ए. श्रीनिवास राघवन् (१९०५– ), डॉ.ए.सी. चेट्टियार (१९०७– ), ए.एस्. ज्ञानसंबंधन् (१९१६– ), रघुनाथन्, टी.पी. मीनाक्षीसुंदरम् पिळ्ळै, कि. वा. जगन्नाथन्, भास्कर तोंडैमान (१९०४– ), एम्. वरदराजन्. (१९१२–७५) आणि अव्वै सु. दोरैस्वामी पिळ्ळै (१९०३– ) यांचा या संदर्भात अवश्य उल्लेख करावा लागेल. यांनी विविध विषयांवर दर्जेदार लेखन केले आहे.


 

विशिष्ट क्षेत्रातील तज्ञ म्हणूनही दर्जेदार लेखन करणारे काही लेखक तमिळमध्ये आहेत. ए.के. चेट्टियार (१९११– ) आणि एस्.एम्. लक्ष्मण चेट्टियार (१९२१– ), यांनी उत्तम प्रवासवर्णने लिहिली आहेत. एस्.एम्.लक्ष्मण चेट्टियार हे आधुनिक तमिळ गद्याचे चोखंदळ समीक्षकही असून त्यांनी आधुनिक गद्यलेखनाबाबतचा आढावा घेणारा समीक्षाग्रंथ लिहिला आहे. इतिहास, चरित्र, विज्ञान, मानसशास्त्र, कुक्कुटपालन, उद्यानविज्ञान, कृषी, शिवणकला, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सहकार, आरोग्य, शिक्षण इ. विषयांवर अनेक ग्रंथ तमिळमध्ये लिहिले गेले. ह्या विषयांवर लेखन करणाऱ्या प्रमुख व्यक्तींत व्ही. स्वामिनाथ शर्मा (१८९५– ), डॉ. राजमणिक्कम् पिळ्ळै (१९०७– ), एन्. एस्. कंदय्य पिळ्‌ळै (१८९८– ), के. अप्पादुरै पिळ्ळै (१९०७– ), ए.के. परंधामनार (१९०२– ), पी.एन्. अप्पुस्वामी (१८९१– ), टी.पी. नवनीतकृष्णन्, मु. अरुणाचलम् (१९०९– ), पेरियस्वामी तूरन् (१९०८– ), एम्. आर्. एम्. अब्दुल रहीम (१९२२– ), प्रभृतींचा उल्लेख करावा लागेल. यांच्यापैकी व्ही. स्वामिनाथ शर्मा हे बहुप्रसव लेखक असून त्यांची शैली उत्स्फूर्त व ओजस्वी आहे. त्यांचे प्लेटो, ॲरिस्टॉटल इ. विचारवंतांवरील तसेच काही राजकीय पुढाऱ्यांवरील ग्रंथ आकर्षक व लोकप्रिय आहेत. 

 

 कथा कादंबरी : तमिळमध्ये कादंबरीलेखनाची सुरुवात वेदनायकम् पिळ्ळै यांनी केली. प्रताप मुदलियार चरित्रम्‌ आणि सुगुण सुंदरी (१९५०) ह्या त्यांच्या कादंबऱ्या लोकप्रिय आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांत त्यांच्या समृद्ध जीवनानुभवाचे दर्शन घडते. ए. माधवैया (१८७०–१९२५) यांची पद्मावती (१९२८) व बी. आर्. राजम् अय्यर यांची कमलांबाळ यांत आकर्षक वर्णने व उत्कृष्ट व्यक्तिचित्रण आढळते. सरवण पिळ्ळै यांची मोहनांगि आणि सरसलोचन चेट्टियार यांची सरसांगी ह्याही उल्लेखनीय कादंबऱ्या होत. आर्णी कुप्पुसामी मुदलियार, वदुवूर दुरैसामी अय्यंगार आणि व्ही. एम्. कोदैनायगी यांनी विपुल कादंबरीलेखन केले. त्यांतील अनेक कादंबऱ्या रहस्यप्रधान आहेत. जगसिप्पियन् यांनी लिहिलेली पतिनिकोट्टम् शांडिल्यन् यांची ओरुकाेडियिल इर्‌मलर्‌कळ एल्. आर्. वि. यांची मुधुलरुम् वंडुम् ह्या ऐतिहासिक कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत.

 

सामाजिक विषयांवर कादंबरीलेखन करणाऱ्या तमिळ लेखकांचाही एक वर्ग असून त्यात वी. रामस्वामी अय्यंगार, सी.एन्. अण्णादुरै, लक्ष्मी, अकिलन् (पेरुंगळूर वैद्यलिंगम् पिळ्ळै), के. एन्. सुब्रह्मण्यम्, सोमू, रघुनाथन्, सुकी, विंधन्, अनुत्तमा, राधा मणालन्, एम्. वरदराजन्, जीव, पार्थसारथी आणि तिळ्ळै विल्ळालन् यांचा समावेश होतो. आधुनिक कादंबरी लिहिणाऱ्या स्त्री लेखिकांतही गोमती स्वामिनाथन् विशेष लोकप्रिय आहेत. महाकाव्य व नाटक यांवर परंपरेची आणि सांकेतिकतेची जी जाचक बंधने आहेत, त्या मानाने कादंबरी हा साहित्यप्रकार अधिक  मुक्त असल्यामुळे समाजातील चालीरीती, ध्येय-धाेरणे यांची चित्रण करण्यात कादंबरी खूपच यशस्वी झाली आहे. तथापि अनेक कादंबरीकार जीवनातील हीन अभिरुची आणि आदर्शबाबतची दिशांहीन प्रवृत्ती प्रकट करीत असल्याने त्यांच्या कादंबऱ्या कलात्मक पातळी गाठू शकल्या नाहीत.

 

कथा सांगणे आणि कथा लिहिणे हे साहित्याच्या इतर प्रकारांइतके प्राचीन असले, तरी खऱ्या अर्थाने लघुकथेचा एक स्वतंत्र साहित्यप्रकार म्हणून तमिळमध्ये या काळात विकास झाला. साप्ताहिके, मासिके इ. नियतकालिकांतून कथेला महत्त्वाचे आणि मानाचे स्थान लाभले असून ती आधुनिक साहित्यातील एक लोकप्रिय साहित्यप्रकार म्हणून प्रतिष्ठा पावली आहे.

 

मंगयारक्करसियिन कादल मुदलिय कथैगळ् हा व्ही. व्ही. एस्. अय्यर यांच्या कथांचा या शतकाच्या सुरुवातीलचा संग्रह आहे. माधवैया हे एका मासिकाचे संपादक असून त्यांनी अनेक कथा लिहिल्या. त्यांच्या कथा वास्तववादी असून त्यांतील कल्पना वैशिष्टयपूर्ण आहेत. त्यांच्या कथांतील व्यक्तिरेखा साध्या आणि गरीब वर्गातील असून ह्या व्यक्तींना पारंपरिक नीतिमूल्यांबाबत कमालीचा आदर आहे. पुदुमैप्पित्तन हे प्रतिभासंपन्न कथालेखक असून त्यांनी शंभरांवर लघुकथा लिहिल्या आहेत. त्यांतील अनेक कथा सामाजिक समस्यांवर असून, त्या लोकप्रियही आहेत. के.पी. राजगोपालन् (१९०२– ), ‘कल्की’ व रामैया (१९०५– ), हेही पट्टीचे कथालेखक आहेत. यांव्यतिरिक्त वैशिष्टयपूणै कथालेखन करणाऱ्यांमध्ये पुढील कथाकारांचा समावेश होतो : एन्. पिच्चैमूर्ती, देवन्, अरू रामनाथन्, ति. ज. रामनाथन्, विंधन्, राधा मणालन्, मायावी, जयकांतन्, अकिलन, कि.वा. जगन्नाथन्, यांनी विविध साहित्यप्रकारांत विपुल लेखन करून उत्तम कथाही लिहिल्या आहेत.


 

नाटक : तमिळनाडूच्या प्राचीन इतिहासात तमिळ राजांच्या आश्रयाखाली रंगभूमीचा व नाटयलेखनाचा चांगला विकास झाल्याचे दिसून येते तथापि तेराव्या-चौदाव्या शतकांपासून मात्र तमिळमधील सुशिक्षित वर्ग रंगभूमी ही भ्रष्ट समजून तिच्यापासून नेहमीच चार पावले दूर राहिला. प्रख्यात कवी व विद्वानांनी आपले लक्ष्य फक्त अभिजात साहित्यावरच केंद्रित केले आणि फक्त सामान्य दर्जाच्या लेखकांनीच तमिळ नाटयपरंपरा पुढे चालविली. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मात्र पाश्चातयांच्या संपर्कातून प्रतिभासंपन्न व्यक्तींनी स्फूर्ती घेतली व ते रंगभूमीचे पुनरुज्जीवन करण्यास उद्युक्त झाले.

 

तमिळ रंगभूमीचे पुनरुज्जीवन करण्यात पुढील चार व्यक्तींचे कार्य पायाभूत आणि विशेष महत्त्वपूर्ण आहे. शंकरदास स्वामिगळ (१८६७–१९२२), पोम्मल संबंद मुदलियार (१८७३– ), सुंदरम्. पिळ्ळै  व सूर्यनारायण शास्त्रियार (१८७०–१९०३) हे चार थोर अध्वर्यू होत. शंकरदास स्वामिगळ हे संन्यासी होते आणि सर्व भारतभर भ्रमण करून त्यांनी नाटयसंस्थांच्या संघटना उभारल्या, व्यावसायिक कलाकारांना उत्तेजन दिले व अनेक पदांनी भरलेली विविध संगीत नाटकेही लिहिली. पोम्मल संबंद मुदलियार यांनी हौशी नटांच्या सेवेत आपला बहुतांश काल व्यतीत केला आणि रंगभूमीला व नटांना ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी पाश्चात्त्य रंगभूमीच्या धर्तीवर तमिळ रंगभूमीचा विकास केला. त्यांनी सु. ८५ नाटके लिहिली असून त्यांमील काहींचे प्रयोग अतिशय लोकप्रयि ठरले. वाड्:मयीन दृष्टीने मात्र त्यांची नाटके फारशी मोलाची नाहीत. त्यांच्या नाटकांत सभापति (१९१८) हे सर्वोत्कृष्ट असून ते विनोदी आहे. मनोहरा (१९०७) हे त्यांचे नाटकही दर्जेदार आहे. सुंदरम् पिळ्ळै यांच्या मनोन्मणियम् (१८९१) ह्या नाटकास तमिळमध्ये अभिजात नाटकाचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यांनी शेक्सपिअरच्या नाटकांच्या धर्तीवर ते लिहिले आहे. त्यांचे हे नाटक वाचनीय असले तरी प्रयोगक्षम नाही. तरीही त्यांच्या ह्या नाटकाची अनेक रूपांतरे व प्रयोग झाले. सूर्यनारायण शास्त्रियार हे समीक्षक, कवी व नाटककार असून त्यांना तमिळ नाट्याची होत असलेली अवनती प्रकर्षाने जाणवली व त्यांनी तमिळ नाटक सुशिक्षित लोकांत लोकप्रिय करण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले. रूपवति (तिसरी आृ. १९३४), कलावति (१८९८) आणि माणविजयम् (पाचवी आवृ. १८५२) ही निर्यमक रचनेतील त्यांची पद्यनाट्ये फारशी लोकप्रिय नाहीत तथापि त्यांनी नाट्यकलेच्या पुष्ट्यर्थ कलेले समीक्षापर लेखन मात्र प्रेरक आहे. त्यांनी ‘नाटक इयल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कलेवर एक व्याकरणात्मक ग्रंथही लिहिला आहे. विळ नाटकम्‌रविवर्मा ही टी. लक्ष्मण पिळ्ळै यांनी लिहिलेली लोकप्रिय नाटके आहेत. त्यांनी तमिळ संगीतातही मोलाची भर घातली आहे.

 

आधुनिक नाटककारांत एस्. डी. सुंदरम् (१९२१– ), पी. कण्णन्, सी.एन्. अण्णादुरै (१९०८– ), कोत्तमंगलम् सुब्बू (१९१०– ), राधा मणालन्, मु करुणानिधी (१९२४– ), कु.सा. कृष्णमूती (१९१४– ), श्रीधर, ए.पी. नागराजन् इत्यादींचा अवश्य उल्लेख करावा लागेल. यांच्यापैकी अनेक नाटककार पुढे चित्रपटांसाठी लेखन करण्याकडे वळले. एस्. डी. सुंदरम् यांनी अनेक नाटके लिहिली असून त्यांतील कवियिन् कनवु (१९४६) हे स्वातंत्र्य आंदोलनाच्या वेळी लिहिलेले त्यांचे नाटक लोकप्रिय होते. सी.एन्. अण्णादुरै यांच्या नाटकांत नेहमीच सामाजिक समस्यांवर क्रांतिकारक दृष्टिकोनातून विशेष भर दिलेला आढळतो. सर्वसामान्यपणे आधुनिक नाटकांत कलेपेक्षा वैचारिकतेचे अधिक प्रमाण आढळते आणि काही नाटकांत तर ही अतिरेकी वैचारिकताच कलेला बाधक ठरते. पौराणिक विषयांवरील नाटके फारशी लोकप्रिय नाहीत तथापि सामाजिक विषयांवरील नाटके मात्र प्रेक्षकांना खेचून घेतात. पारंपरिक ठोकळेबाज नाटके आधुनिक काळात जवळजवळ नाहीशी झाली असून जुन्या दीर्घ, भावनावश संभाषणांची जागा आता अभिनयातील विरामांनी घेतलेली दिसते. आपल्या समकालीनांवर आपल्या लेखनाचा जो चटकन परिणाम घडून येतो त्यात, तसेच सामाजिक समस्यांना स्पर्श करून त्यांना वाचा फोडण्यात आधुनिक नाटककार समाधान मानताना दिसतात. त्यांच्या लेखनातून नि:संशयपणे आस्था, जोम, धडाडी आणि उद्‌बाेधन यांचा साक्षात्कार घडतो. असे असले, तरी त्यांच्या नाटकांत अधिक कलात्मकता व कल्पकता येणे आवश्यक आहे.

 

तमिळमध्ये इतर भाषांतील उत्कृष्ट कथा-कादंबऱ्या आणि नाटकांचे अनुवादही अनेक झालेले आहेत. बंगाली व मराठी भाषांतील अनेक कथा व कादंबऱ्यांचे तमिळमध्ये अनुवाद झालेले आहेत. आधुनिक तमिळ साहित्यात ह्या अनुवादांनी मोलाची भर घातली आहे. परकीय भाषांतील कृतींचे तमिळमध्ये अनुवाद करणाऱ्या लेखकांत का.श्री. श्रीनिवासाचार्य (१९१३– ), ता.ना. सुब्रह्मण्यम्, एम्. एल्. सबरीराजन्, ए.के. जयरामन् इत्यादींचा वाटा सिंहाचा आहे.


 

आधुनिक तमिळ सहित्यातील विविध प्रवाहांचे व प्रवृत्तींचे तसेच प्रख्यात आणि महत्त्वाच्या तमिळ लेखकांचेच उल्लेख या लेखात केले आहेत. इंग्रजीच्या अध्ययनाने आणि पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावाने तमिळ साहित्य प्रभावित होत आहे. आधुनिक तमिळ साहित्याच्या विकासास हे दोन घटक मुख्यत्वे कारणीभूत असल्याचे दिसते.

 

वरदराजन्, मु. (इं.) सुर्वे, भा.ग. (म.)

 

स्वातंत्र्योत्तर काल : स्वातंत्र्योत्तर काळातील तमिळ साहित्याचा काव्य, कथा-कादंबरी, नाटकादी साहित्यप्रकारांच्या द्वारे चांगला विकास झाल्याचे दिसून येते. स्वातंत्र्य, लोकशाही, मूल्ये व शिक्षणाची वाढप्रसार यांमुळे हळूहळू उच्च वर्गाचे, नंतर मध्यम वर्गाचे आणि त्यानंतर खालच्या वर्गाचे जीवन हे साहित्याचा विषय बनले. स्वातंत्र्योत्तर तमिळ साहित्याच्या विकासाचा आढावा नियतकालिकांच्या अनुरोधानेही घेता येईल. कारण साहित्यातील पारंपरिक जुनी चौकट मोडून नवे साहित्य निर्माण करण्यासाठी आणि ते उचलून धरण्यासाठी तसेच समीक्षकांना नव्या प्रवाहांची प्रेरणांची जाणीव करून देण्यासाठी नवी नियतकालिके निघणे अपरिहार्यच होते. कलैमंगल, मणिक्कोडि, शक्ति, सरस्वती, तामेरै, दीपम् इ. नियतकालिके या दृष्टीने महत्त्वपूर्ण होत. स्वातंत्र्योत्तर तमिळ साहित्याचा काव्य, कथा-कादंबरी, नाटक, प्रवासवर्णन, आत्मचरित्र, बालवाड्:मय इ. साहित्यप्रकारांच्या अनुरोधाने येथे आढावा घेतला आहे.

 

काव्य : सुब्रह्मण्य भारतींनी राष्ट्रीय व सामाजिक स्वरूपाची क्रांतिकारक कविता लिहून आधुनिक तमिळ काव्याचा पाया घातला. तिरु वि. कल्याणसुंदरम् हे उत्कृष्ट वक्ते आणि अष्टपैलू लेखक असून त्यांनी ‘अंगवल’ दंदात आपली काव्यरचना केली. त्यांच्याच परंपरेतील भारतीदासन् यांनी दलितांशी तादात्म्य पावून विविध छंदांत अनेक उत्स्फूर्त गीते रचली. भारतीदासन् यांची बरीच रचना स्वातंत्र्यपूर्व काळातील असली, तरी स्वातंत्र्योत्तर काळातील त्यांच्या काव्यरचनेतूनही जातीयता व इतर सामाजिक रूढी यांत क्रांतिकारक बदल घडवून आणून लोकशाही स्थिरस्थावर करण्याची तळमळ व्यक्त झाली आहे. या दृष्टीने त्यांचे कडल मेल कुमिळिगळ (१९५५) हे काव्य उल्लेखनीय आहे. राजाच्या मृत्यूनंतर लोकशाही स्थापन झाल्याचे त्यांनी आपल्या कुरिंजी-त्तिट्टुमध्येही दाखविले आहे. इरुंड वीडु (१९४४) मध्ये शिक्षणाची आवश्यकता व महत्त्व, तर कुडुंब विळक्कु (५ खंड, १९४३–५३) मध्ये शिक्षण, प्रेम व कर्तव्याची जाणीव यांचा त्यांनी पुरस्कार केला आहे. त्यांनी आपल्या गीतांतून कजूर, विणकर, कामगार यांची चित्रणे रेखाटून तमिळ काव्यात एक नवा वास्तववादी प्रवाह आणला.

 

ब्राह्मणेतर द्रविड लोकांची जी चळवळ तमिळनाडूत सुरू झाली तिचा प्रभाव भारतीदासन् यांच्यावरही पडला आणि त्यांच्या मनात ब्राह्मण व उत्तर भारतीय लोक यांच्या विषयीचा आकस निर्माण झाला. त्यांचे स्वातंत्र्योत्तर काळातील बहुतांश लेखन ह्या दृष्टीकोनाने प्रभावित झालेले आहे. भारतीदासन् यांनी आपल्या काव्यातून प्रेमाचा तसेच तमिळनाडूचा मुक्तकंठाने गौरव केला आहे. छंदांतील वैविध्य व संगीतमय रचना ही त्यांच्या संप्रदायाच्या कवितेची वैशिष्ट्ये होत.

 

भारतीदासन् यांच्या संप्रदायात वाणीदासन् यांचाही अंतर्भाव होतो. त्यांनी ‘शिंदू’ छंदात प्राचीन प्रेमकथांचा आधुनिक काळास अनुरूप असा आविष्कार केला. सुब्बू रत्नन् दासन् (सुरदा) हेही याच संप्रदायाचे कवी असून त्यांच्या काव्यात नव्या उपमा आढळतात. मुडी अरसन् यांनीही भारतीदासन् यांचेच अनुयायीत्व स्वीकारून प्राचीन मणिमेखलै ह्या महाकाव्यावर आधारित पूंगोडि हे नवे कथाकाव्य लिहिले तथापि ह्या काव्याची नायिका त्यांनी बौद्ध मतानुयायी न दाखविता तमिळ हाच आपला धर्म मानून त्यासाठी कार्य करणारी दाखविली आहे. वीर कावियम् हे त्यांचे काव्य मॅथ्यू आर्नल्ड यांनी केलेल्या फिर्दौसीच्या काव्याच्या इंग्रजी अनुवादाचे रूपांतर आहे. तमिळनाडू सरकारने साहित्यसेवेबद्दल त्यांना पुरस्कारही दिला आहे.

 

सुब्रह्मण्य भारतींच्या परंपरेतील कवी म्हणजे देशिकविनायकम् पिळ्ळै हे होत. त्यांनी काही गीतांची तसेच बालगीतांची तमिळ भाषांतरे केली असून ती मूळ रचनांइतकीच सरस आहेत. शुद्धानंद भारती हेही याच परंपरेतील कवी असून त्यांनी भारत महाशक्ति काव्यम् (१९४८) नावाचे बृहत् काव्य लिहिले. नामक्कळ कविज्ञर हे तमिळनाडूचे राजकवी आहेत पेरियस्वामी तूरन् यांनी नवी प्रायोगिक कविता लिहून सुनीतांसारखे पाश्चात्त्ये काव्यप्रकारही यशस्वीपणे हाताळले. त्यांच्या कवितेचे संगीताशी अतूट नाते आहे. प्राचीन पुराणकथांचा आधुनिक कल्पनांच्या प्रतीकात्मक अभिव्यक्तींसाठी त्यांनी कौशल्याने उपयोग करून घेतला. सोमू ऊर्फ एम्. पी. सोमसुंदरम् (१९२१– ) हे कवी, कादंबरीकार, कथाकार व प्रवासवर्णनकार असून त्यांच्या इळवेनिल ह्या काव्यसंग्रहास तमिळनाडू सरकारचा पुरस्कार लाभला. शुद्धानंद योगी यांची काव्यरचना दर्जेदार असून त्यांचा मनिदनैप्पादुवेन हा काव्यग्रंथस विशेष उल्लेखनीय आहे. नंतर चित्रपटांसाठी गीते लिहू लागले. तिरुल्लोक सीताराम यांनी कवितसंमेलनांतून तमिळ नवकाव्य लोकप्रिय केले. गंधर्व गणम् हे त्यांचे उत्कृष्ट काव्य असून त्यात सूचकता व अर्थपूर्णता हे विशेष जाणवतात. शालीवाहन यांच्यासारखे अनेक नवोदित कवी तमिळमध्ये आहेत. विविध नियतकालिकांतून त्यांची रचना प्रसिद्ध होते. कंबदासन् यांनी दलितांची व आधुनिक विज्ञानाची सुबोध-सुंदर गौरवगीते सुरुवातीस गायिली तथापि नंतरची त्यांची रचना दुर्बोध वाटते. सुरबी यांनीही अनेक साधी पण सरस गीते लिहिली. ‘सत्तिय सोदनै’ हे त्यांचे उत्कृष्ट गीत होय. कलैवाणन् हे गांधी युगातील कवी असून त्यांचा उदयन् हा प्रसिद्ध काव्यग्रंथ आहे. महाकाव्यशैलीत त्यांनी उदयन्मध्ये भारतमातेचे गुणगान केले आहे. कि. वा. जगन्नाथन् हे जुन्या व नव्या परंपरेच्या संक्रमण काळातील समन्वयवादी कवी होत.


 

तमिळ साहित्यातील नव्या प्रबोधनास इंग्रजीच्या प्राध्यापकांनी आपल्या लेखनाने चांगला हातभार लावला. के. स्वामीनाथन्, रा. श्री. देशिकन्, ए. श्रीनिवास राघवन् यांचा या संदर्भात अवश्य उल्लेख करावा लागेल. ए. श्रीनिवास राघवन् (१९०५– ) हे चांगले भाषांतरकार, समीक्षक, वक्ते व कवी आहेत. त्यांच्या वळ्ळैप्परावै ह्या काव्यसंग्रहास १९६८ मध्ये साहित्य अकादेमी पुरस्कार लाभला. क्षुल्लक विषयांवर साधी, प्रासादिक, पण सखोल व गूढार्थक अशी अनेक गीते त्यांनी रचिली आहेत.

 

आकाशवाणीनेही नव्या व तरुण तमिळ कवींचा एक गट निर्माण केला. ह्या गटातील तुरैवन् (कंदस्वामी १९२५– ) यांची रचना लक्षणीय आहे. सेंतामरै (के.पी.एस्. हमीद) ह्यांच्या गीतांत लोकगीतांची चांगली जाण दिसून येते. आर्. अय्यसामी यांनी सर्वधर्मसहिष्णू अशा भारतीय संस्कृतीचे आपल्या वेलांगण्णि मेरीत गुणगान केले आहे.

 

भारतीदासन् यांच्या परंपरेत द्र.मु.क. चळवळीचे कवी तर सुब्रह्मण्य भारतींच्या परंपरेत काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीचे कवी मोडतात. साम्यवादी विचारसरणीच्या कवींनीही आपला एक स्वतंत्र गट व परंपरा निर्माण केली असून ते आपल्या रचनेतून आपल्या विचारसरणीचा पुरस्कार करतात. ह्या साम्यवादी गटात जीव, रघुनाथन् (ऊर्फ तिरुच्चित्रंबलकविरायर १९२३– ), पटुकोडै कल्याणसुंदरम्‌, के. सी. अरुणाचलम् इ. कवींचा अंतर्भाव होतो. रघुनाथन् यांनी काही रशियन कविता तमिळमध्ये अनुवादित केल्या असून त्या सरस आहेत.

 

तमिळ ओली यांनी शिंदू छंदाच्या विविध प्रकारांचा विविध भाववृत्तींच्या अभिव्यक्तीसाठी यशस्वी वापर केला. त्यांनी गौतम बुद्धावर एक महाकाव्य लिहावयास घेतले होते पण त्यांच्या अकाली निधनाने ते पूर्ण होऊ शकले नाही. कण्णदासन् (१९२६– ) हे महत्त्वाचे कवी असून रचनाप्रभुत्व, गेयता व प्रसन्न लय ही त्यांच्या काव्याची वैशिष्टये होत. चित्रपटांसाठीही त्यांनी नादमधुर गीते लिहिली असून ती लोकप्रिय होत. मांगनिसारखी काही कथाकाव्येही त्यांनी लिहिली असली, तरी त्यांची श्रेष्ठता त्यांनी लिहिलेल्या आत्मनिष्ठ कवितेतच आहे. संघम् कालीन काही गीतांचेही त्यांनी आधुनिक तमिळमध्ये अनुवाद केले आहेत.

 

 मोठ्या अपेक्षा बाळगता येतील अशा नव्या दमाच्या कवींत सालै इलंतिरैयन हे दिल्लीनिवासी तरुण कवी होत. माणसावरील नितान्त विश्वासाने ते आपली कविता लिहित आहेत. राजेंद्रन् यांच्या रचनेस तमिळनाडू सरकारचा पुरस्कार लाभला. इळंपरिदी हे वैज्ञानिक असूनही दर्जेदार काव्यरचना करतात. शक्ति-क्कनल यांनी तूरन् यांचे अनुकरण करून आपली कविता लिहिली. एलिलमुदलवन् यांच्यावर सुब्बूंचा (सुरदा) प्रभाव आहे. सिर्पी यांनी आपल्या रचनेतून शिंदू छंदाचे अंत:सामर्थ्य शोधून त्याद्वारे अभिनव काव्याभिव्यक्ती केली. त्यांचे सिरित्त मुत्तुक्कळ हे कथाकाव्य विशेष उल्लेखनीय आहे.

 

उळूंदुरपेट शण्मुगम् यांनी अभिजात शैलीत व लोकगीतांतील विविध छंदांत आपली नादमधुर कविता लिहिली. त्यांनी संगीतरचनेसाठी काही गीते लिहिली तसेच चित्रपटांसाठीही गीतलेखन केले. कोत्तमंगलम् सुब्बू हे बोलभाषेत कथाकाव्ये लिहिण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची ‘विल्लुप्पाटु’ गीते प्रसिद्ध आहेत. गांधीमहान कदै हे त्यांचे काव्य या दृष्टीने उल्लेखनीय आहे. विंदन् हे कथा-कादंबरीकार असून ते महाभारतकथा शिंदू व इतर सोप्या छंदांत लिहीत आहेत.

 

तमिळमध्ये मवितसंमेलनांतून (कवि अरंगम्) कविता म्हणणाऱ्या कवींचाही एक वर्ग उदयाला आला व लोकप्रिय झाला. कि.वा.जगन्नाथन्, अमृतलिंगम्, पेरियन्नन्, एस्.एस्. एम्. सुंदरमप्रभृती कवींचा ह्या वर्गात समावेश होतो. ह्या कवींचे काही संग्रहही प्रसिद्ध झाले आहेत. तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांनी राजकीय प्रचारासाठी कविसंमेलनांतून कविता म्हणणाऱ्या कवींचा एक गट तयार केला होता. कविसंमेलनांत म्हटलेल्या त्यांच्या स्वत:च्या कविताही प्रसिद्ध झाल्या आहेत. अण्णादुरै यांच्या मृत्यूवर त्यांनी लिहिलेले शोकगीत परिणामकारक आहे.


मुक्तछंदास हळूहळू तमिळ काव्यात प्रतिष्ठा प्राप्त होत आहे. इतर भाषांच्या व जागतिक साहित्याच्या संपर्कातून तमिळ काव्यात नवे नवे प्रयोग होऊन परिवर्तन घडून येत आहे. सुब्रह्मण्य भारतींनी वेदांतील काही भाग तमिळमध्ये अनुवादित करताना मुक्तछंदाचा सर्वप्रथम वापर केला. तूरन् व इतर कवींनीही भारतींचे अनुकरण करून मुक्तछंदाचा वापर केला. पुदुमैप्पित्तन व कु.प. राजगोपालन् यांनी काव्यरचनेचे विविध प्रयोग केले. पिच्चेमूर्ती ऊर्फ ‘भिक्षु’ यांनीही मुक्तछंदाचा अवलंब केला. भिक्षूंच्या मुक्तछंदातील रचनेत प्रभावी आंतरिक लय आढळते. त्यांच्या कवितांचे काट्टु वाट्टुवळित्तुनै हे संग्रह उल्लेखनीय होत. टी.एस्. वेणुगोपालन् हे अभियंते असूनही कवी आहेत. त्यांनी आपल्या कोडैवयल ह्या संग्रहात मुक्तछंदाचा वापर केला आहे. वैदीश्वरन् यांच्या उदयनिळल संग्रहातील काही मुक्तछंदरचना सरस आहेत. पुदुक्कुरळगळ ह्या काव्यसंकलनात चोवीस कवींच्या त्रेसष्ट मुक्तछंदरचना आहेत. कुरुप्पु मलरगळ हा कामराजन् ह्या उदयाेन्मुख कवीचा मुक्तछंदरचनेतील कवितांचा चांगला संग्रह आहे. जयकांतन् यांच्या मुक्तछंदातील कवितेला वेधक लय आहे. मि.रा. (मि. राजेंद्रन्) यांच्या कनुवुगळ + करपनैगळ = काडितंगळ या संग्रहात विफल प्रेमाचा उत्कृष्ट काव्याविष्कार आढळतो. नवकाव्यातील उपमा वेधक, धक्कादायक आणि क्वचित प्रसंगी अश्लीलही आहेत. काही कवींवर अश्लीलतेबद्दल खटलेही भरले गेले. अर्थात अशा कविता फारच थोड्या व विस्ताराने लहानही आहेत.

 

कथा-कादंबरी : आधुनिक तमिळ लघुकथेची खरी सुरुवात व्ही.व्ही. एस्. अय्यर यांच्या कथांपासून झाल्याचे मानले जाते. त्यांच्या कथांना विनोदाचाही सूक्ष्म पदर आहे. कल्की हे कांदबरीकार म्हणून विशेष प्रसिद्ध असले, तरी लघुकथा लोकप्रिय करण्याचे व इतरांना प्रायोगिक कथा लिहिण्याची प्रेरणा देण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. राजाजींच्या कथांतून विशाल मानवतावाद दिसून येतो. त्यांनी दलितांच्या आणि गरीबांच्या जीवनाचे चित्रण आपल्या कथांतून केले. त्यांच्या कथा घाटाच्या दृष्टीनेही चांगल्या आहेत.

 

मणिक्कोडि ह्या नियतकालिकाने कलात्मक जाणिवेच्या नव्या कथाकारांचा गट पुढे आणला. ह्या गटाच्या गथांचे आधुनिक जीवनचित्रण, कथातंत्राची उत्तम जाण व प्रायोगिकता हे विशेष सांगता येतील. पुदुमैप्पित्तन् हे तमिळमधील एक श्रेष्ठ प्रायोगिक कथाकार होत. त्यांच्या कथातून तमिळ कथेचे विकसित रूप पहावयास मिळते. त्यांच्या कथांना कलात्मक पातळी लाभलेली असून कथेस आवश्यक असलेल्या वातावरणाची निर्मिती ते अत्यंत अलिप्ततेने करतात. त्यांची कथा अनेक वेळा भावकाव्याची उंची गाठते. त्यांचे लक्षणीय वाड्:मयीन कर्तृत्व स्वातंत्र्यपूर्व काळातीलच आहे.

 

स्वातंत्र्योत्तर काळात स्वातंत्र्यप्राप्तीसारखा दुसरा कोणताच महान आदर्श समाजापुढे नव्हता. द्र.मु.क. सारख्या चळवळींनी चित्रपट, कथा-कादंबरी इ. माध्यमांचा स्वमतप्रचारार्थ उपयोग करून घेतला. चिरंजिवी यांच्या पारंपरिक कथांत वैषयिकतेचे ढोबळ चित्रण आढळते. ह्या प्रकारच्या कथांना प्रतिक्रिया म्हणून प्रागतिक विचाराच्या कथाकारांचा वर्ग पुढे आला. त्यांनी आपल्या कथांतून कलात्मकतेस बाधा न येऊ देता सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला. सनातनी विचाराच्या कथाकारांनी याला विरोध म्हणून साहित्यातील विशुद्ध कलात्मकतेचा पुरस्कार केला. ह्या विविध मतांच्या आणि क्रिया-प्रतिक्रियात्मक दृष्टिकोनांच्या पुरस्करार्थ अनेक नियतकालिके तमिळमध्ये निघाली.

 

विंदन् हे स्वत: श्रमिक कथाकार असून त्यांनी आपल्या कथांतून नागर तसेच ग्रामीण समाजाचे अंतर्बाह्य जीवन समर्थपणे चित्रित केले आहे. त्याच्या कथांतील सामाजिक जाणीव व उपरोध झपाटणारा, अस्वस्थ करणारा आहे. चिदंबर सुब्रह्मण्यन्, सी. एस्. चेलप्पा, क.ना. सुब्रह्मण्यम्, पी. एस्. रामैया, रघुनाथन् आणि पिच्चेमूर्ती हे जुन्या मणिक्कोडिगटातील उल्लेखनीय कथाकार असून त्यांचे कथालेखन स्वातंत्र्योत्तर काळातही चालूच होते.

 

जी. अलगिरिसामी यांच्या अणबलिप्पु ह्या कथासंग्रहास १९७० मध्ये साहित्य अकादेमीपुस्कार मरणोत्तर लाभला. ते मणिक्कोडि गटातील सर्वश्रेष्ठ कथाकार होते. त्यांनी काही नाटकेही लिहिली आहेत. लहान मुलांविषयीची, प्राणिमात्रांविषयीची सहानुभूती तसेच मानवतावाद ही त्यांच्या साध्या पण वेधक कथांची वैशिष्टये होत. कि.वा. जगन्नाथन् हे कलैमंगलचे संपादक व कथाकार आहेत. ते जुन्या पिढीचे कथाकार असूनही नव्या पिढीच्या कथाकारांत त्यांना मानाचे स्थान आहे.


अकिलन् यांच्या कथाही दर्जेदार आहेत. लैंगिक संबंधातील भावनाटय सखोलपणे चित्रित करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. त्यांनी काही पद्यमयबोधकथा व रूपककथाही लि‍हिल्या आहेत. टी. जानकीरामन् यांचे कथातंत्र स्वतंत्र असून त्यात प्रथम-पुरुषी निवेदन आणि वास्तववादी चित्रण आढळते. ते सुस्पष्ट व्यक्तिचित्रे रेखाटतात. ‘वेयिल’ ही त्यांची एक उत्कृष्ट कथा होय. ल.स. राममदम् यांनी पुराणांच्या शैलीत आपल्या कथा उभ्या केलेल्या आहेत. मौनींनी फारच थोडया कथा लिहिल्या असून त्यांत दारुण मानवी दु:खाचे चित्रण आढळते. सुंदरम् रामस्वामी यांनी नागरकोइल ह्या बोलभाषेत आपल्या कथा लिहिल्या. त्यांच्या कथांत उपरोध तसेच अत्यंत सूक्ष्म अशा भावनांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आढळतो. टी. एन्. सुब्रह्मण्यम् यांनी ऐतिहासिक कथा लिहिल्या. आर्. चूडामणी ह्या तरुण कथालेखिका असून त्यांच्या कथांत विविध भावनिक अवस्थांचे वास्तववादी चित्रण आढळते. वल्ली-क्कण्णन हे विविध भाववृत्तींतून दीर्घकाल कथालेखन करीत आहेत. परांगुसम्, अशोकमित्रन्, नकुलन् इ. उदयोन्मुख, पिढीचे उल्लेखनीय कथाकार होत.

 

काही प्रागतिक विचारांच्या कथाकारांनी साहित्य हे सामाजिक परिवर्तनाचे साधन मानून आपल्या कथा लिहिल्या. अण्णादुरै हे तमिळनाडूचे दिवंगत मुख्यमंत्री व द्र.मु.क. चे नेते. जातिधर्मनिरपेक्ष समाज निर्माण करण्याच्या हेतूने साहित्य निर्माण केल्याचा त्यांनी दावा केला. त्यांच्या मते भारतातील सामाजिक दुरवस्था आर्य संस्कृतीतून आणि ब्राह्मणी कारस्थानातून आलेली आहे. त्यांच्या सर्वच साहित्यातून हा दृष्टिकोन आढळतो. त्यांनी कथांप्रमाणेच काही कादंबऱ्याही लिहिल्या आहेत. काही ऐतिहासिक घटनांवर त्यांनी लिहिलेल्या कथा उल्लेखनीय आहेत.

 

साम्यवादी लेखकांनीही प्रागतिक लेखनाची चळवळ संघटित केली. जयकांतन् हे सुरुवातीस साम्यवादी पक्षाचे होते पण नंतर त्यांनी पक्ष सोडला. साम्यवादी भूमिकेतून त्यांनी अनेक कथा लिहिल्या. ‘ओरु पिडीसोरु’, ‘ब्रह्मोपेदेसम्’, ‘विरुदुगळ’, ‘पॅरिसकु पो’ इ. त्यांच्या गाजलेल्या कथा असून त्या कलात्मकही आहेत. त्यांचे कथाविश्व व्यापक, सखोल व अर्थपूर्ण असून त्यांची शैली प्रवाही आहे.

 

तमिळ कादंबरीक्षेत्रात माधवैया यांच्यानंतर नटेशशास्त्री, पोन्नुसामी पिळ्ळै, पंडितै विशालाक्षी अम्माळ इ. नव्या दमाचे कादंबरीकार पुढे आले. बडुवूर दुरैसामी अयंगार, कोडैनायकी अम्माळ (१९०१– ), अरणी कुप्पुस्वामी मुदलियार प्रभृतींनी इतर भाषांतील अनेक कादंबऱ्यांचे अनुवार-रूपांतरे केली.

 

अनेक लेखक स्वातंत्र्यपूर्ण काळापासूनच कादंबरीलेखन करीत आहेत. नारण दुरैक्कण्णन् हे गेल्या पन्नास वर्षांपासून कादंबरीलेखन करीत आहेत. त्यांनी सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याच्या हेतूने आपले कादंबरीलेखन करून समाजातील ढोंग, राजकारणी व्यक्तींचा दंभ, स्त्रियांची दयनीय स्थिती यांचे आपल्या कादंबऱ्यांतून परिणामकारक चित्रण कले. तरंगिनी ही त्यांची अलीकडील वैशिष्टयपूर्ण राजकीय कादंबरी आहे. त्यांच्या उयिरोविअमसारख्या कादंबऱ्यांची नाटयरूपांतरेही झाली आहेत. कल्की हे तमिळमधील श्रेष्ठ कादंबरीकार व पत्रकार. कल्कींनी तमिळ साहित्यात मन्वंतर घडवून आणले आणि स्वातंत्र्याच्या आंदोलनातही सक्रिय भाग घेतला. तिरु वि. कल्याणसुंदरम् मुदलियार यांच्या प्रभावामुळे कल्कींनी सामान्य वाचकांस रुचेल अशी शैली आत्मसात केली. त्यांच्या लेखनात उपरोध, मार्मिक विनोद व व्यापक दृष्टिकोन आढळतो. आपल्या कल्किआनंद विकटन ह्या नियतकालिकांतून त्यांनी कथा-कादंबरीकारांचा एक नवा संप्रदाय निर्माण केला. कल्कींच्या ऐतिहासिक कादंबऱ्या फार लोकप्रिय आहेत. आपल्या प्राचीन गौरवशाली इतिहासाचे त्यांनी वाचकांना पुनर्दर्शन घडविले. ऐतिहासिक कादंबऱ्यांच्या कल्कींनी निर्माण केलेल्या मानदंडाचे सावट नंतरच्या ऐतिहासिक कादंबऱ्यांवरही पडलेले आढळते. शिवगामियिन शपथम् आणि पार्त्तीवन कणवु ह्या त्यांच्या कादंबऱ्या उत्कृष्ट रोमान्स म्हणून उल्लेखिल्या जातात. पोन्निइन सेलवन् हीदेखील विशेष महत्त्वपूर्ण अशी प्रदीर्घ कादंबरी आहे. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी लिहिलेल्या अलै ओसै ह्या कादंबरीस १९५६ मध्ये साहित्य अकादेमी पुरस्कार लाभला. अनेक खंडांत असलेल्या ह्या कादंबरीस भारताच्या स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील घटनांची पार्श्वभूमी लाभली आहे.


 

डॉ. एम्. वरदराजन् हे स्वातंत्र्यपूर्वकाळापासून लेखन करीत असलेले प्राध्यापक. त्यांनी आपल्या कादंबरीलेखनाने इतर प्राध्यापकांनाही कादंबरी लेखनाची स्फूर्ती देऊन कादंबरीकारांचा एक नवीन गट निर्माण केला. ह्या नव्या दमाच्या कादंबरीकारांत के. राजवेलू, पुन् कुंड्रन् इत्यादींचा अंतर्भाव होतो. वरदराजन् यांची शैली साधी, सुबोध आणि आकर्षक असून त्यांनी आपल्या कादंबऱ्यांत कथावस्तूच्या उभारणीसाठी दैनंदिनीचाही अवलंब केला. मध्यम वर्गाचे उत्कृष्ट चित्रण त्यांच्या कादंबऱ्यांत आढळते. त्यांच्या अगळ विळक्कु ह्या कादंबरीस १९६१ चा साहित्य अकादेमी पुरस्कार लाभला.

 

कल्कींच्याच परंपरेतील अकिलन् हे कादंबरीकारी असून त्यांनी ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या. त्यांतील वेंगैयिन मैंदन ह्या कादंबरीस १९६३ चा साहित्य अकादेमीपुरस्कार लाभला. त्यांची कथा विळी ही ऐतिहासिक कादंबरीही वैशिष्टयपूर्ण आहे. त्यांनी आधुनिक कौटुंबिक जीवनावरही काही कादंबऱ्या लिहिल्या आहेत. पाषै विळक्कु ही त्यांची कादंबरी लोकप्रिय असून तीत एका कथाकाराची गोष्ट मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून त्यांनी हाताळली आहे. स्त्रीमनाचे चित्रण करण्यात त्यांचा हातखंडा आहे. पुत्तीय वेळ्ळम् ह्या त्यांच्या कादंबरीत एका मजुराचे जीवनचित्रण आढळते. ते स्वत:स ‘गांधीयुगीन वास्तववादी’ म्हणवून घेतात. इतर भारतीय भाषांत व परकीय भाषांतही त्यांच्या काही कादंबऱ्या अनुवादित झाल्या आहेत. भारतीय ज्ञानपीठाचा १९७६ चा पुरस्कार त्यांना लाभला आहे.

 

कल्किपरंपरेतीलच ना. पार्थसारथी हेही कादंरीकार असून त्यांच्या समुदाय विदि ह्या कादंबरीस १९७१ चा साहित्य अकादेमीपुरस्कार लाभला. कुरिंजी मलार ही त्यांची कादंबरी विशेष उल्लेखनीय आहे. कबाडपुरम् इ. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या मात्र ऐतिहासिक म्हणण्याऐवजी ‘काल्पनिक’च म्हणाव्या लागतील. टी. जानकीरामन् हेही यशस्वी कादंबरीकार असून त्यांची मोह मूल ही विशेष गाजलेली कादंबरी आहे. सामाजिक बंधने, रूढी, सवयी, नीतिनियम यांनी जखडलेल्या स्त्रियांचे जीवन त्यांनी आपल्या कादंबऱ्यांत समर्थपणे चित्रित केले आहे. स्त्रियांचे सामाजिक व मानशास्त्रीय दृष्टिकोनातून केलेले उत्कृष्ट चित्रण त्यांच्या कदंबऱ्यांत आढळते. महर्षी यांच्या कादंबऱ्यांत सालेम विभागातील निसर्ग व जीवन यांचे चित्रण आणि प्राचीन जीवनमूल्यांचा आविष्कार आढळतो. चिदंबर सुब्रह्मण्यम् यांची इदय नादम् ही एक नितान्तसुंदर कादंबरी असून तीत नाद योगी ह्या संगीतज्ञाची कथा आहे. सी. एस्. चेलप्पा यांनी आपल्या जीवनांशम् मध्ये लक्ष्मी ह्या विधवेच्या बदलत्या मनोवृत्तींचे सुंदर चित्रण संज्ञाप्रवाहाचे तंत्र वापरून केले आहे.

 

का.ना. सुब्रह्मण्यम् हे एक चोखंदळ समीक्षक व कादंबरीकार आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्यांचे लेखन चालू आहे. ओरु नालमध्ये त्यांनी जॉईसप्रमाणे फक्त एका दिवसाच्या २४ तासांतील घटना आणि जीवन कलात्मकपणे चित्रित केले आहे, तर पुइत्तेकमध्ये त्यांनी मंदिरातील घंटेच्या प्रतीकाचा कलात्मक वापर केला आहे.

 

तमिळमध्ये देर्जेदार प्रादेशिक कादंबऱ्याही आढळतात. विशिष्ट प्रदेशाच्या पार्श्वभूमीवर तेथील लोकजीवन, निसर्ग, बोलभाषा इत्यादींचे चित्रण ह्या कादंबऱ्यांत केलेले आढळते. आर्. शण्मुग सुंदरम् यांनी कोईमतूर प्रदेशाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यपूर्व काळात लिहिलेली नागम्माळ ही एक उत्कृष्ट प्रादेशिक कादंबरी आहे. त्यांनी ह्या प्रकारच्या अनेक कादंबऱ्या लिहिल्या आणि त्यांत बोलभाषेचाही मुक्तपणे वापर केला. जेसुदासन् यांनी नागरकोईल भागातील ख्रिस्ती नाडरांच्या जीवनावर प्रभावी कादंबऱ्या लिहिल्या. त्यांच्या कादंबऱ्यांत गुन्हेगार वृत्तीचे नेटके चित्रण आढळते. नीलमपद्मनाभन् यांची तलैमुरैगळ ही वैशिष्टयपूर्ण कादंबरी असून तीत त्यांनी कन्याकुमारी जिल्ह्यातील इरनियल भागातील चेट्टियारांचे जीवन संज्ञाप्रवाह तंत्राचा वापर करून चित्रित केले आहे. सुंदरम् रामस्वामी यांनी आपल्या ओरु पुलियमरत्तिन् कदै ह्या कादंबरीत नागरकोईल भागातील बदलत्या राजकीय, सामाजिक व आर्थिक जीवनाचे कलात्मक चित्रण केले आहे. इतर प्रदेशांच्या पार्श्वभूमीवरही अनेक कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. राजम् कृष्णन् यांनी निलगिरीतील बडुगांच्या जीवनावर कुरिंजी-त्तेन आणि गोवामुक्ती आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वळै-क-करम् ह्या यशस्वी कादंबऱ्या लिहिल्या. राजम् ह्या एक श्रेष्ठ कादंबरीकर्त्र्या आहेत. लक्ष्मी, गौरी अम्माळ, आर्.चूडामणी इ. तमिळमधील उल्लेखनीय कादंबरीकर्त्या असून त्यांनी आपल्या कादंबऱ्यांतून स्त्रियांच्या आंतरिक भावभावना तसेच कौटुंबिक जीवन यांच्या मनोज्ञ आविष्कार घडविला आहे. पी.एम्. कण्णन् यांच्या पेण दैवम् आणि इतर कादंबऱ्यांतही कौटुंबिक जीवनाचे हृद्य चित्रण आढळते. अनुत्तमा आणि आर्वी यांच्याही कौटुंबिक जीवनावरील कादंबऱ्या उल्लेखनीय आहेत.


दलितांच्या जीवनाचे तसेच त्यातील सुप्त क्रांतिकारकतेचे, अमानुषतेचे आणि सुधारणाप्रियतेचे दर्शन रघुनाथन् यांच्या पनमुम् पसियुम् या विशेष गाजलेल्या कादंबरीत घडते. चेक तसेच इतर पूर्व यूरोपीय भाषांतही तिचे अनुवाद झाले आहेत. सेलवराज या साम्यवादी विचाराच्या लेखकाची मरमुम् सरगुम् ही कादंबरी कलात्मक आहे. शांडित्यन् यांनी अनेक प्रदीर्घ ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या. अरु रामनाथन् यांची वीर पांडियन् मनैवी (५ खंड) हीदेखील प्रदीर्घ आणि उल्लेखनीय अशी ऐतिहासिक कादंबरी आहे. या कादंबरीत त्यांनी कंब रामायणाला उलटसुलट करून उपरोध साधलेला आहे. विक्रमन् यांची नंदिपुस्तु नायकी ही कल्किपरंपरेतील कादंबरी असून तीत कारैकाल आदित्य चोल याच्या मृत्यूनंतरच्या घटना कलात्मकपणे चितारल्या आहेत. जगसिर्पियन् यांनी सामाजिक तसेच इतर प्रकारच्या कादंबऱ्या लिहिल्या. त्यांत शैलीवैचित्र्य आढळते. त्यांनी नंदिवर्मन् कादली ही ऐतिहासिक कादंबरी नंदि कलंबगम् चा आधार घेऊन लिहिली. नेडुमारन् हे इतिहासाचे अभ्यासक असून त्यांच्या पांडिमा देवीसारख्या ऐतिहासिक कादंबऱ्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

 

जयकांतन् यांनी काही कादंबरिका व कथा लिहिल्या असून त्यांची पॅरिसकु पो ही कादंबरिका उल्लेखनीय आहे. एका संगीतकाराचे जीवन तीत त्यांनी कलात्मकपणे चित्रित केले आहे. ओरु नडिकै नाडगम् पार्किराळ आणि सील मनिदरगल ह्याही त्यांच्या महत्त्वाच्या कादंबऱ्या असून यांतील दुसरीस १९७२ मध्ये साहित्य अकादेमीपुरस्कार लाभला. तमिळमध्ये कादंबरी हा साहित्यप्रकार अत्यंत लोकप्रिय आहे. त्यामुळे कादंबरीलेखनाचे विविध प्रयोग तेथे होत आहेत आणि ही गोष्ट विशेष आशादायक आहे.

 

नाटक : तमिळ नाटकांचे यश हे नाट्यसंहितेपेक्षा त्यांत भूमिका करणाऱ्या नटांवरच प्रामुख्याने अवलंबून असल्याचे दिसते. रामनाथन्‌कृत राजराजन्, शक्ती कृष्णस्वामीकृत कट्टेबोम्मन् ही नाटके तसेच शिवगामियिन् शपथमसारख्या कादंबऱ्यांची नाटयरूपांतरे तमिळमध्ये विशेष लाेकप्रिय आहेत.टी. के. शण्मुगम्‌, नवाब राजमाणिक्कम्‌ यांच्या तसेच मनोहरन्‌ यांच्या नाटक मंडळ्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. टी.के शण्मुगम् यांनी उयिरोवियम् इ. सामाजिक कादंबऱ्यांची उत्कृष्ट नाटयरूपांतर करून ती रंगभूमीवर आणली. ऐतिहासिक तसेच सर्वस्वी कलात्मक नाटकांसोबतच पौराणिक आणि ऐतिहासिक कथांनाही नवी नाटयरूपे देऊन ती नवाब राजमाणिक्कम् आणि मनोहरन् यांनी यशस्वीपणे रंगभूमीवर आणली.

 

सहस्त्रनामम् यांच्या ‘सेवा स्टेज’ नावाच्या नाटयसंस्थेने मणिक्कोडि संप्रदायाच्या पी.एस्. रामैया यांची तेरोट्टिइन् मगनसारखी नाटके रंगभूमीवर आणली. के. बालचंदर यांनी अनेक नाटके लिहून ती रंगभूमीवर यशस्वी केली. इतर नाटककारांची सर्वर सुंदरम्, मेजर चंद्रकांत इ. नाटके उल्लेखनीय आहेत. मेजर चंद्रकांतमध्ये तर एकही स्त्रीपात्र वा गाणे नाही. चो (रामस्वामी) यांनी आपली सुरुवातीची नाटके सामाजिक उपरोधिका म्हणून लिहिली असून अलीकडे मात्र ते राजकीय उपरोधिका लिहितात. राजकीय प्रचाराच्या हेतूने लिहिलेली दर्जेदार नाटकेही तमिळमध्ये आहेत. भारतीदासन् यांनी सर्वप्रथम निरइयन् (हिरण्य) याचे या दृष्टीने नाट्यरूपांतर सादर केले. आर्यांचे कपट हा त्याचा विषय. नंतर याच परंपरेत अण्णादुरै यांनीही आपली नाटके लिहिली. ओरि रवु हे त्यांचे वैशिष्टयपूर्ण नाटक होय. नीदि देवन मयक्कम् हे त्यांचे नाटक पुराणकथांवरील उपरोधिका आहे. स्वत: अण्णादुरैंनीही ह्या नाटकांतून भूमिका केल्या. त्यांच्या वेलैककरी व नल्ल तंबी या नाटकांतून सामाजिक परिवर्तन आणि समतेचा पुरस्कार आढळतो. एम्.आर्. राधा यांनी इतरांच्या नाटकांसोबतच स्वत: लिहिलेले रक्तक्कन्निर हे नाटकही रंगभूमीवर आणून त्यात स्वत: कामही केले. नाटकांतून भूमिका करताना उत्स्फूर्त भाषणे करून त्यांनी आपल्या मतांचा प्रचार केला. उत्स्फूर्त भाषणांचे तंत्र त्यांनीच प्रथम तमिळ नाटकांत सुरू केले.  डॉ. करुणानिधी यांचे कागितप्पू हे नाटक निवडणूक प्रचारासाठी लिहिलेले आहे. अत्यंत प्रक्षोभक पण काव्यमय व प्रभावी संवाद लिहिण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. अलीकडेच इंदिरा पार्थसारथी यांनी मळै हे सामाजिक नाटक लिहून रंगभूमीवर आणले. प्राध्यापक वर्गानेही अनेक नाटके लिहून ती रंगभूमीवर आणली. त्यांतील डॉ. ज्ञानमूर्ती यांची नाटके वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

 

तमिळमध्ये एकांकिकांचे संग्रह फारसे आढळत नाहीत. ए. श्रीनिवास राघवन् यांची विश्वरूपम् ही एकांकिका विशेष गाजली. तमिळमध्ये बरीच नभोनाटयेही लिहिली गेली. गोपाल, प्रा.ए.एस्. ज्ञानसंबंधम् यांची नभोनाट्ये संग्रहरूपात उपलब्ध आहेत.


 

समीक्षा : स्वातंत्र्योत्तर काळातील तमिळ साहित्यसमीक्षेत दिसून येणाऱ्या प्रमुख प्रवृत्ती-प्रवाहांचा मागोवा घेणे येथे अप्रस्तुत ठरू नये. पारंपरिक तमिळ समीक्षापद्धतीची बंधने या काळातील समीक्षेने संपूर्णपणे झुगारून दिल्याचे दिसते. पारंपरिक दंतकथांपेक्षा तीत ऐतिहासिक घटनांच्या पुराव्यावरही अधिक भर दिलेला दिसतो. कुठल्याही साहित्यकृतीची साक्षेपी चिकित्सा करून ती कृती समजावून घेण्याची व त्या अनुरोधाने तिच्यातील गुणदोष दाखविण्याची वाढती प्रवृत्तीही या समीक्षकांत दिसते. पाठचिकित्सेचाही ह्या कालखंडात चांगला विकास झाला. जागतिक साहित्याचा संदर्भही तमिळ समीक्षेत वापरला जात आहे. एखाद्या साहित्यकृतीच्या आधारेच तिच्या समीक्षेचे मानदंड वा मूल्ये प्रस्थापित करण्याचा समीक्षक प्रयत्न करताना दिसतात. परंपरेची पकड सैल होत असल्याचे व आधुनिक साहित्याबाबतची अभिरुची, हळूहळू का होईना, वाढत असल्याचे आशादायी चित्र या काळात दिसून येते. आकार वा आकृतिबंध व तंत्र यांबाबतचा वाढता विचार तसेच वाड्:मयीन प्रवाहांतील बदलांबाबतची नवी निर्लेप दृष्टी, बंडखोरी, वस्तुनिष्ट व भाषाशास्त्रीय समीक्षापद्धती, सामाजिक व ऐतिहासिक समीक्षेचे पुनरुज्जीवन आणि कधी कधी राजकीय प्रचारासारख्या वाड्मयबाह्य गोष्टींचा साहित्यावरील आणि समीक्षेवरील प्रभाव यांचे भान हे या काळातील समीक्षेत जाणवणारे विशेष होत.

 

स्वातंत्र्योत्तर तमिळ साहित्यसमीक्षेत व्ही.व्ही.एस्. अय्यर यांचे स्थान विशेष महत्त्वाचे मानले जाते. त्यांनी लघुकथेची पृथगात्म लक्षणे सांगून कंबनच्या थोरवीचे उत्कृष्ट विश्लेषण केले आणि तमिळ समीक्षेत नव्या युगाची सुरुवात केली. पुदुमैप्पित्तन् यांची नव्या कथा-कादंबरीच्या आकलनाची काही महत्त्वपूर्ण सूत्रे आपल्या समीक्षेत प्रतिपादन केली. मरैमळै अडिगळ यांनी प्राचीन भाष्यकारांच्या दास्याविरुद्ध बंडखोरी करून प्राचीन ग्रंथांच्या नव्या भाष्यांची व अर्थविवरणांची शक्यता प्रतिपादन केली. तिरु वि. क. यांच्या समीक्षेने सर्वमतसंग्राहक अशा उदार दृष्टिकोनातून तमिळ साहित्याकडे पाहण्याची दृष्टी प्रकट केली. त्यांनी तिरुवळ्ळुवरच्या कृतीचे केलेले नवे भाष्य या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहे. टी.के. शण्मुगम् यांनी काव्याच्या आकलनासाठी आवश्यक असलेली चोखंदळ संवेदनशीलता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. एस्. वैयापुरीप्पिळै यांनी ऐतिहासिक दृष्टिकोनातून तसेच जागतिक साहित्याचे भान ठेवून आपले समीक्षालेखन केले. त्यांनी प्राचीन ग्रंथांची कालनिश्चिती करून त्या ग्रंथांवर पडलेल्या बाह्य व आंतरिक प्रभावांचा आपल्या समीक्षेत मागोवा घेतला.

 

डॉ. आर्.पी.सेतू पिळ्ळै यांनी आकर्षक शैलीत कंबन, तिरुवळ्ळुवर व इळंगो अडिगळ यांचा सुंदर परिचय करून दिला. त्यांच्या तमिळ इन्बम् ह्या समीक्षाग्रंथास १९५५ मध्ये साहित्य अकादेमीपुरस्कारही लाभला. डॉ. नवलर सोमसुंदर भारती यांच्या तिरुवळ्ळुवर, कंबन, दशरथ आणि तोलकाप्पियम् यांवरील समीक्षापर लेखांतून नव्या दृष्टिकोनाचा आढळ होतो. आर्. राघव अयंगार यांच्या संघम् कालीन साहित्यावरील अभ्यासपूर्ण ग्रंथाने या काळातील साहित्यावर नवा प्रकाश टाकला. कि.वा. जगन्नाथन् यांनाही त्यांच्या वीरर उलगम् ह्या समीक्षाग्रंथासाठी १९६७ मध्ये साहित्य अकादेमीचा पुरस्कार लाभला. डॉ. एम्. वरदराजन् यांनी प्राचीन व मध्ययुगीन साहित्यातील वेच्यांचे एक संकलन स्पष्टीकरणांसह तयार करून त्याला अभ्यासपूर्ण प्रस्तावनाही जोडली आहे. त्यांच्या संकलनाचे नंतर अनेकांनी अनुकरण केले आहे. ओवच्चैदी हा त्यांचा अकनान्‌मधील एका गीतावर लिहिलेला विस्तृत व परिपूर्ण असा समीक्षाग्रंथ आहे.

 

डॉ.टी.पी.मीनाक्षीसुंदरम् यांचा प्रयत्न समीक्षापात्र साहित्यकृतीचे एकूण तमिळ साहित्यातील नेमके स्थान कोणते, हे ठरविण्याकडे असतो. इतर समीक्षकांची त्या कृतीबाबतची मते दूर सारून ते त्या कृतीमधूनच तिच्या समीक्षेचे निकष शोधतात आणि त्यांवर त्या कृतीचे मूल्यमापन करतात. हे सर्व करताना जागतिक दृष्टिकोनाचे भानही ते सुटू देत नाहीत.  शिलप्पधिकारम्, तिरुक्कुरळ, पेरियपुराणम् ह्या ग्रंथांवरील त्यांची समीक्षा या दृष्टीने लक्षणीय आहे. मार्ग बंधू शर्मा यांनी शिलप्पधिकारम् नव्या दृष्टिकोनातून टीका केली आहे. ए. श्रीनिवास राघवन् यांनी कंबनवर अभ्यासपूर्ण समीक्षाग्रंथ लिहिला. प्रा. रामकृष्णन् यांनी कंबन आणि मिल्टन यांचा तौलनिक अभ्यास करून एक दर्जेदार ग्रंथ लिहिला. र.श्री. देशिकन्‍यांच्या समीक्षेत जागतिक संदर्भाचा आढळ होतो. प्रा.ए.एस्. ज्ञानसंबंधम् यांनी कंब रामायणातील रावणादी व्यक्तिरेखांचा चिकित्सक अभ्यास करून एक ग्रंथ लिहिला. त्यांनी पेरियपुराणम् वरही नवा प्रकाश टाकला आहे. ए.एस्. ज्ञानसंबंधम्, एम्. वरदराजन् आणि रघुनाथन् यांनी कलासमीक्षेवरही महत्त्वपूर्ण ग्रंथलेखन केले आहे. क.ना. सुब्रह्मण्यम् यांच्या मीक्षेत आकार वा आकृतिबंध आणि तंत्र यांवर विशेष भर दिलेला दिसतो. त्यांनी आधुनिक साहित्यावर एक दर्जेदार समीक्षाग्रंथ लिहिला आहे.


 

तमिळमधील सर्वच समीक्षकांचा आणि समीक्षाग्रंथांचा निर्देश येथे करता येणे शक्य नसले, तरी त्यांतील काही उल्लेखनीय समीक्षकांचा व त्यांच्या समीक्षाग्रंथांचा निर्देश करणे आवश्यक ठरेल. मुनुशिवम् यांचा कंब रामायणावरील अशोक वनम् हा अभ्यासपूर्ण ग्रंथ आहे. डॉ. एम्. दुरै रंगस्वामी यांचा अन्बुनेरी, डॉ.व्ही. एस्. पी. मणिक्कम् यांचा तमिळ-कादरल, डॉ. गोविंदस्वामी आणि रामनाथन् यांचे भारतीदासन् यांच्यावरील अभ्यासपूर्ण ग्रंथ विशेष महत्त्वाचे होत. अण्णांचा कंबनच्या काव्यावरील कंबरसम्, टी के. शण्मुगम् यांचा तमिळ नाटकांवरील ग्रंथ, क. अप्पादुरै यांची तिरुक्कुरळवरील विस्तृत समीक्षा, के. काेदंडपाणी पिळ्ळै यांचा नेडुनल वादैवरील समीक्षाग्रंथ, डॉ. इळंतरयन् यांचे आधुनिक तमिळ काव्यावरील व लघुकथांवरील विवेचन, जयकांतन् यांनी विविध ग्रंथांना लिहिलेल्या अभ्यासपूर्ण प्रस्तावना यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. काही तमिळ नियतकालिकांनीही तमिळ समीक्षेचे क्षेत्र समृद्ध केले आहे. अशा नियतकालिकांत एन्. वानममलैसंपादित आर्यच्चीचे महत्त्व विशेष आहे. म. पो. शिवज्ञानम् यांच्या वल्ललार कंड ओरुमैप्पाडु या ग्रंथात संत

 

रामलिंग यांचे व्यक्तिमत्त्व, काल व कर्तृत्व यांचा सुंदर परामर्श असून १९६६ मध्ये प्रस्तुत ग्रंथास साहित्य अकादेमीचा पुरस्कारही लाभला. राजाजींचे तिरुक्कुरळ व तिरुमंतिरम् यांवरील अभ्यासपूर्ण ग्रंथही महत्त्वाचे होत.

 

प्रवासवर्णन, आत्मचरित्र, बालवाड्:मय इत्यादी : परदेशातील प्रवासाची वर्णने तमिळमध्ये अनेकांनी लिहिली असून त्यांत तिरु वि. क., ए.एम्. परमशिवानंदम्, ए.के. चेट्टियार, सोमले, शुद्धानंद भारती, कल्की, देवन्, एन्. डी. सुंदरवडिवेलू, मणियन्, टी.के. शुण्मुगम्‌प्रभृतींच्या प्रवासवर्णनांचा उल्लेख अवश्य करावा लागेल. मी. प. सोमसुंदरम् यांनी इंग्लंडच्या प्रवासवर्णनावर अक्करै चीमियिल हा उत्कृष्ट ग्रंथ लिहिला असून त्याला १९६२ चा साहित्य अकादेमीपुरस्कारही लाभला आहे. आर्. वेंकटरामन्‍यांनाही त्यांच्या रशियाच्या प्रवासवर्णनासाठी सोव्हिएत लँड पुरस्कार लाभला.

 

डॉ. यू.व्ही. स्वामिनाथ अय्यर यांचे एन्. चरितिरम्‍ आणि तिरु वि.क. यांचे वाल्कै-क्कुरिप्पुकल ही स्वातंत्र्यपूर्व काळातील उल्लेखनीय आत्मचरित्रे होत. डॉ. क. करुणानिधी यांचे आत्मचरित्र कुमुदम् ह्या नियतकालिकात क्रमश: प्रसिद्ध होत होते तथापि ते पूर्ण होऊ शकले नाही. तमिळमधील आणखी दोन महत्त्वपूर्ण आत्मचरित्र म्हणजे कविज्ञर कन्नदासन्यांचे वनवासम् आणि मनवासम् ही होत.

 

बालवाङ्‌मयक्षेत्रात मात्र तमिळमध्ये फारशी प्रगती झालेली दिसत नाही. तथापि अलीकडे बालकांसाठी काही खास नियतकालिके निघत असून त्यात दर्जेदार बालवाङ्‌मय प्रसिद्ध होत आहे. कण्णन्, पूंजोलै, करुंबू, गोकुलम्, अंबुलिमाम् इ. बालवाङ्‌मयास वाहिलेली महत्त्वपूर्ण तमिळ नियतकालिके होत. यांतून बोधकथा, परिकथा, पुराणकथा इ. प्रकारचे बालवाङ्‌मय प्रसिद्ध होते. वलिअप्पा हे मुलांचे आवडते कवी होत. देशिक विनायकम् पिळ्ळै हे मुलांचे थोर कवी असून त्यांनी वाघ, सायकल इ. विषयांवर उत्कृष्ट बालगीते लिहिली आहेत. भारतीदासन् यांच्या इलैंनर इळकिक्यम् या ग्रंथात त्यांनी मुलांसाठी विविध विषयांवर लिहिलेली गीते संगृहीत आहेत. तूर्, ती. ज. रघुनाथन्, सरस्वती रामनाथ, आर्वी, पूवन्नन्, वैगोविंदन्, चूडामणी, तंगमणी, तुविलन्, अळमवेलन्, राजम्, अ.ले.नटराजन्, तमिळवेनम्, वल्लिअप्पा, तंबी, श्रीनिवासन्‌प्रभृरतींनी मुलांसाठी उत्कृष्ट गोष्टी लिहिल्या. तमिळ अकादमीने मुलांसाठी विश्वकोश रचण्याचे कार्य हाती घेतले असून त्याचा एक खंडही प्रसिद्ध झाला आहे.

विविध संतांची व व्यक्तींची चरित्रेही अनेकांनी लिहिली असून ती दर्जेदार आहेत. मीरा, शारदामणी देवी यांची चरित्रे गणपती यांनी तसेच अरुणाचल महिमै आणि पूनित पयनम् हे बरणीधरन् यांनी लिहिलेले चरित्रग्रंथही उल्लेखनीय होत. श्री रामानुजर हे रामानुजांचे चरित्र पी.एस्. आचार्य यांनी लिहिले असून त्याला १९६५ चा साहित्य अकादेमीपुरस्कार लाभला. राजाजींचे व्यासर विरुंदु आणि चक्रवर्ति तिरुमंगन् हे ग्रंथ तसेच त्यांनी रामायण व महाभारताच्या काढलेल्या तमिळ गद्यआवृत्त्या विशेष उल्लेखनीय होत. यांतील चक्रर्ति तिरुमंगन् ह्या ग्रंथास १९५८ मध्ये साहित्य अकादेमीचा पुरस्कारही लाभला. त्यांच्या रामकृष्ण उपनिषदासही तमिळनाडू सरकारचा पुरस्कार लाभला. कृपानंद वारिय यांच्या ग्रंथात भक्तिसाहित्याचे विवरण आहे.


 

शेषाद्रिनाथन्, पी.एन्. अप्पुस्वामी, प्रा.ई. टी. राजेश्वरी, डॉ. सुब्बू रेड्डियार, प्रा. तिरुज्ञान संबंधम्, प्रा. माणिक्कम्, प्रा. विश्वनाथन् यांनी भौतिक विज्ञानांवर तमिळमध्ये उत्कृष्ट लेखन केले आहे. डॉ. टी.ई. शण्मुगम्, तूरन् आणि चूडामणी यांनी मानसशास्त्रावर डॉ. श्रीनिवासन् आणि इतरांनी वनस्पतिविज्ञानावर गणेशन् आणि इतरांनी अभियांत्रिकीवर डॉ. सुब्रह्मण्यम् आणि डॉ. वेंकटस्वामी यांनी वैद्यकावर दर्जेदार लेखन केले आहे. जी.आर्. दामोदरन् यांच्या संपादकत्वाखाली कलैक्कतिर हे विज्ञानास वाहिलेले दर्जेदार तमिळ नियतकालिक निघत आहे. तमिळमध्ये कोशरचनेचेही प्रयत्न अलीकडे होत असून एम्. सदाशिवन्, के. अप्पादुरै, कंदय्या पिळ्ळैप्रभृतींचा या संदर्भात आवर्जून उल्लेख करावा लागेल.

 

सुर्वे, भा.ग.

 

संदर्भ :   1. Ayyangar, T.P.Srinivasa, History of the Tamils, from the Earliest Time to 600 A.D., Madras, 1929.

2. Chengalaraya Pillai, V.S. History of the Tamil Prose Literature, Madras, 1904.

3. Dikshitar, V.R. Ramachandra, Studies in Tamil Literature and History, London, 1930.

4. Jesudasan, C, Jasudasan, H.A. History of Tamil  Literature, Calcutta, 1961.

5. Meenakshisundaram, P. History of Tamil Literature, Hyderabad, 1965.

6. Meenakshsundarm, T.P.A. History of Tamil Literature, Annamalainagar, 1965.

7. Ramaswami Sastri, K.S. A Primer of Tamil Literature, Madras, 1953.

8. Sadasiva, Pandarattar, A History of Tamil Literature, Annamalainagar, 1955.

9. Subramania Aiyar, A.V. Tamil Studies, Tirunelveli, 1970.

            10. Vaiyapuri Pillai, S. History of Tamil Language and Literature, Madras, 1956.