तंत्रज्ञशाही : समाजाचे शासन तंत्रज्ञांकडेच असावे, ही अमेरिकेतील तंत्रज्ञांनी १९३० च्या सुमारास मांडलेली उपपत्ती. न्यूयॉर्क शहरात १९३१–३२ मध्ये हौअर्ड स्कॉट या अनुभवी अभियंत्याच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या एका अभ्यासगटातूनच तंत्रज्ञशाहीचे आंदोलन उदयास आले. व्हेब्लेन (१८५७–१९२९) या अमेरिकातील अर्थशास्त्रज्ञाच्या विचारसरणीचा आधार घेऊन टंचाईच्या कल्पनेवर उभारलेले अर्थशास्त्रसिद्धांत समूळ चुकीचे आहेत, असे स्कॉटने प्रतिपादले. त्याच्या मते तंत्रविद्येचा उपयोग करून टंचाईच्या ऐवजी वैपुल्य साधणे शक्य असल्यामुळे तंत्रज्ञांकडेच समाजाचे शासन सोपवावे कारण तेच उत्पादनास योग्य ते वळण लावू शकतील. यापुढे जाऊन त्याने असेही भाकित केले, की तंत्रविद्येचा वापर करून विपुलता प्राप्त होत असल्यामुळे किंमतव्यवस्था मोडकळीस येईल व समाजावर तंत्रज्ञशाहीची अधिसत्ता प्रस्थापित होईल. १९३२ च्या महामंदीच्या तडाख्यात सापडलेल्या अमेरिकन व्यापाऱ्यांना व उद्योगपतींना स्कॉटचे हे आशावादी म्हणणे ताबडतोब पटणे साहजिक होते. परिणामी सर्व देशभर अनेक तंत्रज्ञसंस्था भराभर अस्तित्वात आल्या व तंत्रज्ञशाहीचा विचार करू लागल्या. स्कॉटच्या प्रतिपादनावर बरीच प्रतिकूल टीकाही झाली. तंत्रज्ञांची ही चळवळ जितक्या वेगाने पसरली, तितक्याच लवकर ती थंडावली कारण राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रूझवेल्टच्या नव्या आर्थिक कार्यक्रमास सुरूवात झाल्यावर रोजगारात वाढ होत जाऊन अमेरिकेवरील महामंदीची छाया ओसरू लागली व तंत्रज्ञशाहीला मिळालेला पाठिंबा कमी होत जाऊन ती चळवळ अल्पकाळातच नामशेष झाली.

धोंगडे, ए. रा.