ढबटऱ्यूवॉव्ह, न्यिकलाय : (६ फेब्रुवारी १८३६–३० नोव्हेंबर १८६१). रशियन समीक्षक व निबंधकार. निझ्निनॉव्हगोरॉड येथे जन्म. पीटर्झबर्ग येथील अध्यापनशास्त्रीय संस्थेत त्याचे शिक्षण झाले. ‘सबिस्येदनिक ल्युबीतिल्येइ रसीस्कव्ह स्लोवा’ (इं. शी. इंटरलॉक्यूटर ऑफ द लव्हर्स ऑफ रशियन वर्ड) हा त्याचा पहिला लेख सव्रेमेन्निक (इं. शी. कंटेंपररी) या नियतकालिकात १८५६ मध्ये प्रसिद्ध झाला. त्याच नियतकालिकाच्या संपादकमंडळात १८५७ पासून प्रमुख समीक्षक म्हणून त्याने काम केले. तो रशियन क्रांतिकारक लोकशाहीवाद्यांचा एक नेता होता व त्याची विचारसरणी भौतिकवादी होती. तो रशियातील एकोणिसाव्या शतकातील एक अग्रगण्य वास्तववादी समीक्षक मानला जातो. ‘च्तो ताकोए अब्लोमव्हश्चीना?’ (१८५९, इं. शी. व्हॉट इज अब्लोमव्हिझम?), ‘त्योमनये त्सारस्तवो’ (१८५९, इं. शी. द डार्क किंग्डम), ‘कगदा झे प्रिद्योत नास्तयाश्यी द्येन?’ (१८६०, इं. शी. व्हेन विल द रीअल डे कम?), ‘लूच स्वेता व्ह त्योमनम त्सारस्तवे’ (१८६०, इं. शी. अ रे ऑफ लाइट इन द डार्क किंग्डम) हे त्याचे काही उल्लेखनीय लेख होत. त्यांतून त्याने भूदासपद्धती, जुलूमशाही, निरंकुश सत्ता यांवर हल्ले चढविले आहेत, त्याचप्रमाणे अध्यापनशास्त्रातील समस्यांची चर्चाही केली आहे. त्याच्या समीक्षालेखांतून संबंधित साहित्यकृतींच्या गाभ्याचा वेध घेणारी भेदक मर्मदृष्टी आणि साहित्यातील वास्तववादाचे समर्थन यांचे दर्शन घडते. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील रशियन वाङ्मयाच्या जडणघडणीवर त्याचा फार मोठा प्रभाव दिसून येतो. इज्ब्रान्निये फिलोसोफ्स्किए स्चिनेनिया (२ खंड, १९४६ इं. भा. न्यिकलाय अल्यिक्सांद्रव्ह्यिच ढब्रल्यूबॉव्ह, सिलेक्टेड फिलॉसॉफिकल एसेज, १९४८) हा त्याचा तत्त्वज्ञानपर लेखसंग्रह प्रसिद्ध आहे. पीटर्झबर्ग येथे त्याचे निधन झाले.
पांडे, म. प. (इं.) इनामदार, श्री. दे. (म.)
“