ड्युसेलडॉर्फ : (ड्युसलडॉर्फ). पश्चिम जर्मनीच्या नॉर्थ ऱ्हाईन वेस्टफेलिया प्रांताची राजधानी. लोकसंख्या ६,३७,१०० (१९७२). हे ऱ्हाईनच्या उजव्या तीरावर कोलोनच्या उत्तर वायव्येस ३४ किमी. असून ऱ्हाईन-रुर पट्ट्यातील उद्योगसमूहांचे मोठे केंद्र आहे. बाराव्या–तेराव्या शतकांपासून ते ज्ञात आहे. १६०९ मध्ये हे शहर पॅलाटिनेटन्यूबर्ग ड्यूकांकडे गेले. तीस वर्षांचे युद्ध व स्पॅनिश वारसा युद्ध यांत ड्युसेलडॉर्फची वाताहत झाली योहान विल्हेल्म दुसरा याच्या कारकीर्दीत ते पुनश्च ऊर्जितावस्थेत आले. १८१३ मध्ये ते प्रशियाच्या ताब्यात गेले. १८७० पासून ड्युसेलडॉर्फमध्ये लोखंड आणि पोलाद उद्योगांची स्थापना झाल्यानंतर शहराचा व्यापारी व आर्थिक विकास द्रुतगतीने झाला.
ड्युसेलडॉर्फचा दुसऱ्या महायुद्धात भयंकर विनाश झाला. तथापि त्याची पुन्हा उभारणी करण्यात आली. दुतर्फा वृक्षांचा व बहुविध दुकानांनी सजलेला ‘कॉनिगझाले’ रस्ता, तेराव्या–चौदाव्या शतकांतील लँबर्टू चर्च, प्रबोधनकालीन भव्य नगरभवन, त्याच्यासमोरचा योहान विल्हेल्म दुसरा याचा अश्वारूढ पुतळा, राजपुत्रांच्या भस्मसात किल्ल्याचा उरलेला फक्त मनोरा, जागेरहॉफ किल्ल्यातील ऐतिहासिक कौतुकालय,निकोलस पिगेजचा बेनरात किल्ला आणि फ्रीड्रिख पहिला बार्बारॉसा ह्याचा राजवाडा ही ड्युसेलडॉर्फची गतवैभव स्मृतिचिन्हे आणि विल्हेल्म मार्क्स–हाउस ही देशातील पहिली गगनचुंबी इमारत, मृत्स्नाशिल्प संग्रहालय, राज्य संग्रहालय, येथेच जन्मलेल्या जर्मन कवी हाइन्रिख हाइनेचे ललित साहित्य असलेले वाचनालय, वैद्यकीय अकादमी, कला अकादमी (१७६७) ही प्रेक्षणीय असून आंतरराष्ट्रीय पर्यटकांची आकर्षणे आहेत.
ड्युसेलडॉर्फला ऱ्हाईनवर तीन बंदरे असून अत्यंत गजबजलेला विमानतळही आहे. ड्युसेलडॉर्फ बँकव्यवसाय, घाऊक व्यापार यांचेही केंद्र असून कित्येक सरकारी आणि खाजगी उद्योगांची कार्यालये येथेच आहेत. लोखंड–पोलाद निर्मितीच्या प्रमुख उद्योगाशिवाय येथे गंधकाम्ल व इतर रसायने, काच, कापड व वस्त्रे, विद्युत् उपकरणे, सूक्ष्म उपकरणे, मोटारी, कागद इत्यादींचे कारखाने आहेत. रुर प्रदेशातील सर्व शहरांमध्ये ड्युसेलडॉर्फ अधिक स्वच्छ व अधिक विशाल असून प्रशस्त चौक, रुंद रस्ते, प्रफुल्ल उद्याने यांनी शोभिवंत आहे.
ड्युसेलडॉर्फ कला अकादमीतून अनेक प्रख्यात निसर्गचित्रकार बाहेर पडले आहेत. त्यांचा ‘ड्युसेलडॉर्फ संप्रदाय’ म्हणजे एकोणिसाव्या शतकातील स्वच्छंदतावादी अभिजाततेचा मोठा अविष्कार मानतात. बेंडेमान व शाडो–गोडेनहाउस हे त्या शतकातील प्रसिद्ध चित्रकार त्याच संप्रदायाचे होत.
गद्रे, वि. रा.
“