न्यू हेब्रिडीझ बेटे : नैर्ऋत्य पॅसिफिकमधील बारा मोठ्या व महत्त्वाच्या आणि इतर लहान बेटांची साखळी. फ्रान्स व ग्रेट ब्रिटन यांच्या संयुक्त अंमलाखालील ही बेटे, ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेस सु. १,८०० किमी. व फिजी बेटांच्या पश्चिमेस ८०० किमी.वर वसली आहेत. दक्षिणोत्तर ६५० किमी. पसरलेल्या या ज्वालामुखीयुक्त बेटांचे क्षेत्रफळ १४,७६३ चौ.किमी. व लोकसंख्या ९७,४६८ (१९७६ अंदाज) आहे. एफाटी बेटावरील व्हीला ही राजधानी असून या समूहात बँक्स, ताना, एपी, आओबा, टॉरिझ, एस्पीरीतू सांतो, पेंटकॉस्ट, मालेकूला, अँब्रिम, एफाटी आणि एरोमांगा या प्रमुख बेटांशिवाय अन्य ६० बेटांचा समावेश होतो. एस्पीरीतू सांतो हे सर्वांत मोठे बेट १२२ किमी. लांब व ६४ किमी. रुंद असून मालेकूला हे बेटही तेवढेच मोठे आहे. एस्पीरीतू सांतो या बेटावरील ताब्वेमासाना हे शिखर सर्वांत उंच (१,८८८ मी.) आहे. ताना व अँब्रिम, या बेटांवर जागृत ज्वालामुखी आहेत. मोठी बेटे ज्वालामुखीजन्य असून टॉरिझ बेटाखेरीज इतरत्र प्रवाळ आढळत नाहीत मात्र वारंवार भूकंप होतात.

न्यू हेब्रिडीझ बेटांवरील ज्वालामुखी-उद्रेक

वार्षिक सरासरी तपमान २१·१° से. असून पर्जन्य २४१·३ सेंमी. आहे. मधूनमधून चक्री वादळे होतात व त्यामुळे नुकसान होते. सर्वत्र दाट जंगले आढळतात. त्यांत पँडानस, ताड, नारळ, चंदन हे प्रमुख उपयोगी वृक्ष आहेत. एकूण हवामान रोगट, मलेरियास पोषक असून जमीन मात्र सुपीक आहे. तीत केळी, नारळ, मका, कॉफी, कोको, सुरण, तारो, मॅनिऑक इ. पिके निघतात. गवताळ प्रदेश मुबलक असल्यामुळे गुरांची पैदास मोठ्या प्रमाणावर होते. मासेमारी महत्त्वाची असून मासे टिकविण्याचा कारखाना १९५७ पासून सुरू आहे.

त्रियोजनाने बेटांची प्रगती चालू आहे. खनिजांचा शोध आणि पक्क्या मालाचे कारखाने स्थापले असून एफाटी बेटावर मँगॅनीज सापडले आहे. १९६६ पासून दशमान नाणेपद्धती सुरू झाली आहे. पेद्रो फर्नेदीश दे कैरॉस याने प्रथम १६०६ मध्ये या बेटांचा शोध लावला. सुरुवातीला ही बेटे म्हणजे ऑस्ट्रेलियाच आहे, असा त्याचा समज झाला. १७७४ मध्ये कॅप्टन कुकने ही बेटे निश्चित करून त्यांस सध्याचे नाव दिले. फ्रान्सनेही या बेटांवर हक्क सांगितला व १८८७ साली करार होऊन ग्रेट ब्रिटन व फ्रान्स यांनी काही नौदल आपापल्या लोकांच्या संरक्षणास ठेवले व १९०६ मध्ये एका कराराने ही बेटे फ्रान्स व इंग्‍लंडच्या संयुक्त शासनाखाली आली आणि एफाटी बेटावरील व्हीला हे शहर राजधानीचे स्थळ ठरले. ऑस्ट्रेलिया, न्यू कॅलेडोनिया, हाँगकाँग, जपान यांबरोबर न्यू हेब्रिडीझचा व्यापार चालतो. स्थानिक लोक मेलानीशियन असून अनेक यूरोपीय तसेच चिनी, व्हिएटनामी लोक व्यापारानिमित्त या बेटांवर स्थायिक झाले आहेत. फ्रेंच व ब्रिटिश शासनांची स्वतंत्र न्यायालये, रुग्णालये आणि मिशन आहेत. स्थानिक लोकांना मोफत वैद्यकीय मदत दिली जाते. यूनेस्कोच्या जागतिक आरोग्य संघटनेद्वारे येथील हिवतापाविषयी संशोधन चालू असून अधिकाधिक वैद्यकीय मदत कशी उपलब्ध करता येईल, याविषयी विचारविनिमय चालू आहे. व्हीलाजवळ कावेनू शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय असून, बहुतेक सर्व मोठ्या बेटांवर वैद्यकीय औषधोपचार केंद्रे आहेत. जहाजे व विमाने यांच्या साहाय्याने ऑस्ट्रेलिया व शेजारील बेटे यांच्याशी वाहतूक चालते.

डिसूझा, आ. रे. देशपांडे, सु. र.