न्यू इंग्‍लंड : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील ईशान्येकडील मेन, न्यू हँपशर, व्हर्‌माँट, मॅसॅचूसेट्स, ऱ्होड आयलंड व कनेक्टिकट या सहा राज्यांचा मिळून झालेला विभागीय प्रदेश. क्षेत्रफळ १,७२,५१४ चौ. किमी. पैकी पाण्याखाली ८,९३२·८८ चौ. किमी. लोकसंख्या १,२१,९८,००० (१९७५ अंदाज). याच्या उत्तरेस कॅनडाचे क्वीबेक आणि न्यू ब्रन्सविक हे प्रांत, दक्षिणेस लाँग आयलंड साउंड, पश्चिमेस न्यूयॉर्क राज्य व पूर्वेस न्यू ब्रन्सविक आणि अटलांटिक महासागर हे आहेत.

भूरचनेच्या दृष्टीने याचे पूर्वेकडून पश्चिमेकडे न्यू इंग्‍लंडचा किनारी प्रदेश, न्यू इंग्‍लंड डोंगराळ भाग, व्हाईट मौंटन किंवा पूर्वेकडील पर्वतप्रदेश, कनेक्टिकट नदीचा मैदानी प्रदेश आणि ग्रीन मौंटन किंवा पश्चिमेकडील पर्वतप्रदेश असे पाच विभाग पडतात. व्हाइट मौंटनच्या प्रेसिडेंन्शल शाखेतील वॉशिंग्टन (१,९१७ मी.) व ग्रीन मौंटनमधील मॅन्सफील्ड (१,३३९ मी.) ही येथील उंच शिखरे असून, यांतील वॉशिंग्टन हे उत्तर अमेरिकेच्या ईशान्य भागातील सर्वांत उंच शिखर आहे. येथे अनेक लहान नद्या व ओहोळ आहेत परंतु महत्त्वपूर्ण व मोठ्या अशा नद्या केनेबेक, अँडस्कॉगिन, मेरिमॅक, पनॉबस्कॉ, सॉको व कनेक्टिकट या होत. तसेच शँप्लेन हे येथील मोठे सरोवर आहे. येथील हवामान थंड व दमट असून प्रदेशानुसार त्यात फरक होत जातो. उत्तर मेनमध्ये हिवाळे मोठे, तर उन्हाळे लहान व दमट असून धुकेमुक्त काळ हा ९० – १०० दिवसांचा आहे. वॉशिंग्टन शिखर व प्रेसिडेन्शल रांगेत हवामान उप-उत्तर ध्रुवीय आहे, तर याच्या तुलनेने इतर भागांत ते उबदार असते. न्यू इंग्लंडच्या पूर्व व उत्तर भागांत वर्षाला १०१·६ ते १२७ सेंमी. पर्यंत अवक्षेपण होते, तर इतर भागांत ७६·२ ते १०१·६ सेंमी. पर्यंत होत असून उंच पर्वतीय भागांत जास्त होते. याचा पुष्कळसा, विशेषतः उत्तरेकडील भाग, बर्च, मॅपल, हेमलॉक या वृक्षांनी व्यापला असून, मेन व उंच पर्वतीय भागांत फर, स्प्रूस, ओक, पाइन या वनस्पती आढळतात.

या प्रदेशास न्यू इंग्‍लंड हे नाव १६१४ मध्ये, याच्या किनाऱ्याचा शोध लावणाऱ्या जॉन स्मिथ याने दिले. न्यू इंग्लंड या प्रदेशात वसाहतीची स्थापना समृद्ध अशा जीवनाची इच्छा असलेल्या धार्मिक शरणार्थी (पिल्ग्रिमेज फादर) लोकांनी मॅसॅचूसेट्समधील प्लिमथ येथे केली. १६२० मध्ये सर फेर्दिनांदो जॉर्ज याच्या अध्यक्षतेखाली न्यू इंग्लंडसाठी विधिमंडळ स्थापले व त्याच्या आधिपत्याखाली सध्याचा न्यू इंग्लंडचा प्रदेश व इतरही काही भाग होता परंतु त्याचे आधिपत्य काही भाग, विशेषतः मॅसॅचूसेट्स बे, मानत नव्हता. मॅसॅचूसेट्स बे, प्लिमथ, कनेक्टिकट, न्यू हेवन या वसाहतवाल्यांनी इंडियनांपासून संरक्षण व सामाजिक हित यांसाठी १६४३ मध्ये न्यू इंग्‍लंड राज्यसंघाची स्थापना केली. १६८६ मध्ये ब्रिटिश सरकारने एडमंड अँड्रोस याच्या अंमलाखाली न्यू हँपशर, मॅसॅचसेट्स, ऱ्होड आयलंड, कनेक्टिकट या वसाहतींचा एक प्रांत बनविला. नंतर फ्रेंचांपासून संरक्षण व्हावे या उद्देशाने १६८८ मध्ये न्यूयॉर्क, न्यू जर्सी यांचा यात समावेश केला. १६८९ मध्ये अँड्रोसचे आधिपत्य झुगारून देऊन वसाहतींनी पुन्हा वेगळे असे अस्तित्व निर्मिले.

पिकांसाठी फारसे योग्य नसलेले हवामान, मृदा, भूरचना यांमुळे न्यू इंग्लंडचा प्रदेश मोठ्या प्रमाणात कृषिप्रधान नसला, तरी याचा काही भाग विशिष्ट पिकांसाठी प्रसिद्ध आहे : बटाटे – मेन राज्य तंबाखू, कांदे – कनेक्टिकट नदीखोरे. डोंगरउतारावर पशुपालन. तर किनारी भागात मोठ्या प्रमाणात मासेमारी चालते. हा प्रदेश औद्योगिक दृष्ट्या प्रगत असून याची ७५% लोकसंख्या शहरांत आहे. न्यू इंग्लंडमधील प्रमुख बंदर व शहर बॉस्टन, तर न्यू हेवन, प्रॉव्हिडन्स ही विविध प्रकारच्या साधनसामग्रीसाठी, वुस्टर हे सुती कापडगिरण्या आणि त्यांसाठी लागणारी यंत्रसामग्री, पादत्राणे, गालिचे अशा प्रकारच्या अनेकविध उत्पादनांसाठी ही शहरे प्रसिद्ध आहेत. काही शहरे विशिष्ट गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत. उदा., पीबॉडी – कातडी वस्तुनिर्मिती ब्रॉक्टन, हेव्हरिल, लिन – पादत्राणे न्यू बेडफर्ड, फॉल रिव्हर, लॉरेन्स, लोअल, हॉल्योक, पटकिट, वुन्सॉकिट, काँकर्ड, मँचेस्टर, नॅशवा, पोर्टलंड – सुती कापडगिरण्या वॉटरबरी – तांबे, ब्राँझ व लोखंडी सामान ब्रिजपोर्ट, हार्टफर्ड, स्प्रिंगफील्ड – बंदूकनिर्मिती ॲटलबर, वॉलथॅम, डॅनबरी व मेरिडन ही अनुक्रमे दागदागिने, घड्याळे, हॅट व कटलरी अँडस्कॉगिन खोऱ्यातील शहरे ही कागद कारखान्यासाठी प्रसिद्ध आहेत. यांवरून या प्रदेशातील औद्योगिक प्रगतीची कल्पना येते.

न्यू इंग्लंड हा प्रदेश शैक्षणिक संस्थांसाठी प्रसिद्ध आहे. समुद्रकिनाऱ्यावरच्या विविध पुळणी, बर्कशरच्या सुंदर गोलाकार टेकड्या, विच्छिन्न व्हाइट व ग्रीन मौंटनपासून सरोवरांनी युक्त असा मेनचा जंगलविभाग यांमुळे हा प्रदेश सौंदर्याने विनटलेला आहे. त्यामुळेच पर्यटन हाही येथील एक व्यवसाय बनला आहे.

लिमये, दि. ह.