न्याय रसायनशास्त्र : गुन्हा शोधून काढण्याकरिता तसेच न्यायदानास मदत करण्याकरिता रसायनशास्त्राचा उपयोग ज्या शास्त्र विभागात करतात त्यास ‘न्याय रसायनशास्त्र’ वा ‘विधिरसायनशास्त्र’ म्हणतात. विज्ञानाच्या इतर शाखांचाही न्यायदानास मदत करण्याकरिता उपयोग करतात. या संपूर्ण शास्त्राला ‘न्यायविज्ञान’ म्हणतात. न्याय रसायनशास्त्राप्रमाणेच वैद्यकशास्त्रातील  ज्ञानाचाही न्यायदानाकरिता मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. न्यायविज्ञानाच्या या विशिष्ट व स्वतंत्र शाखेला ⇨ न्यायवैद्यक म्हणतात. न्यायविज्ञानविषयक कामाकरिता भारतातील प्रमुख ठिकाणी न्यायसाहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा १९५६ पासून सुरू झालेल्या असून न्याय रसायनशास्त्राचे कार्यही तेथेच चालते [→ गुन्हाशोधविज्ञान]. महाराष्ट्रात मुंबई व नागपूर या ठिकाणी अशा प्रयोगशाळा आहेत.

कार्यक्षेत्र : न्याय रसायनशास्त्रावर आधारीत गोळा केलेली माहिती तांत्रिक पुरावा म्हणून न्यायालयात मांडण्यात येते. या शास्त्राच्या निश्चित मर्यादा अजून ठरविण्यात आलेल्या नाहीत, तसेच या विभागात हाताळण्यात येणारे विषयही केवळ रसायनशास्त्राशी संबंधित असतात, असेही नाही. न्याय रसायनशास्त्रज्ञाला फौजदारी किंवा दिवाणी गुन्ह्यासंबंधी शास्त्रीय तपासणी करून पुरावा उपलब्ध करून द्यावयाचा असतो. त्याला विषविज्ञानविषयक विश्लेषण, गुन्ह्यांच्या ठिकाणावरून पाठविलेल्या वस्तूंची तपासणी आणि कधीकधी रसायनशास्त्राशी संबंधित नसलेल्या गोष्टी तपासणे ही कामे करावी लागतात. यांपैकी बहुतांश भाग विषविज्ञानाशी निगडित असल्यामुळे अपमृत्यूच्या संदर्भात विषपरीक्षण करणे हेच न्याय रसायनशास्त्राचे प्रमुख कार्य बनते.

तपासण्यात येणारे पदार्थ व द्रव्ये : न्याय रसायनशास्त्रीय प्रयोगशाळेकडे प्रामुख्याने पुढील पदार्थ व द्रव्ये तपासणीसाठी पाठवितात (१) मृत शरीरातील अंतस्त्ये (जठर, यकृताचा भाग, प्लीहा, मूत्रपिंड वगैरे) आणि शरीर द्रव्ये विषपरीक्षणाकरिता पाठवितात. रक्त, मूत्र, इ. द्रव्ये कधीकधी त्यामधील अल्कोहॉलाच्या प्रमाणाच्या तपासणीकरिताच पाठवितात. (२) मादक पदार्थ. उदा., मॉर्फिन, अफू वगैरे. (३) रक्त, केस, वीर्याचे डाग ओळखण्याकरिता. उदा., रक्त मानवाचेच का इतर प्राण्यांचे? डाग वीर्याचेच का इतर द्रव्यांचे? (४) दारू (मद्य) सरकारमान्य दुकानातील किंवा बेकायदेशीर भट्टीत मिळालेली, तीमधील अल्कोहॉलाचे प्रमाण ठरविण्याकरिता. (५) काचेचे तुकडे. अपघात, घरफोडी इ. गुन्ह्यांच्या ठिकाणी मिळालेले किंवा संशयित गुन्हेगाराच्या अंगावरील कपड्यात मिळालेले सूक्ष्म तुकडे. (६) विणलेल्या कपड्यांचे धागे. सुती, रेशमी, संश्लेषित (कृत्रीम) वगैरे. उदा., हल्ला करणाऱ्या व्यक्तीच्या अंगावरील कपड्यातून निसटलेला एखादा लहान धागा किंवा तुकडा, दोरखंडाचे धागे. (७) रंगलेपाच्या बारीकसारीक खपल्या किंवा एखाद्या वस्तूवरील रंगलेपाचा डाग. (८) माती. गुन्हेगाराच्या कपड्यावर किंवा पादत्राणावर मिळालेली माती, गुन्ह्याच्या ठिकाणची माती. (९) कागदपत्रांवरील शाई. ज्यावर खाडाखोड करण्याचा प्रयन्त केलेला आहे असे मूळ लिखाण रासायनिक द्रव्ये वापरून पुन्हा दृश्यरूप करणे. उदा., चेकवरील रक्कम, तारीख वगैरे बदलण्याचे प्रयत्न. (१०) विक्रीकरिता ठेवलेल्या वस्तूंच्या लेबलावर दिलेल्या माहितीप्रमाणे घटक पदार्थ आहेत वा नाहीत याची तपासणी करणे. उदा., औषधे, अन्नपदार्थ, वगैरे. वरील यादीतील पदार्थ वा द्रव्यांशिवाय न्याय रसायनशास्त्राकडे इतर अनेक निरनिराळे पदार्थ अथवा वस्तू तपासण्याकरिता येतात. त्यांमध्ये निरनिराळ्या प्रकारची आवेष्टने, स्त्रिया ओठ रंगविण्याकरिता वापरतात त्या रंगकांड्या (ओष्ठशलाका लिपस्टिक), तंबाखू आणि तंबाखूची राख, स्फोटक दारू किंवा तिचे उरलेले अवशेष, ज्वालाग्राही पदार्थ, बंदुकीच्या, पिस्तुलाच्या गोळ्या यांसारख्या विविध पदार्थांचा किंवा वस्तूंचा समावेश असतो.

न्याय रसायनशास्त्रज्ञ हा बहुधा एक हरहुन्नरी रासायनिक विश्लेषणज्ञ आणि सूक्ष्मदर्शकतज्ञ तर असतोच, पण त्याशिवाय त्याला विविध आधुनिक औद्योगिक पदार्थांचे व इतर विविध वस्तूंचे ज्ञान असावे लागते. आधुनिक न्याय रसायनशास्त्रज्ञाला विषपरीक्षणाची माहिती देताना पूर्वीप्रमाणे विषाचे नाव किंवा त्याचे ढोबळ प्रमाण एवढेच सांगून भागत नाही. ⇨ वर्णलेखन, जंबुपार शोषण वर्णपट प्रकाशमापन, अवरक्त शोषण वर्णपट प्रकाशमापन [→ प्रकाशमापन] इ. आधुनिक तंत्रांचा वापर करून मृत शरीरातील अंतस्त्यांमध्ये कोणते विष होते व त्याचे नक्की प्रमाण किती होते, हे खात्रीपूर्वक सांगावे लागते. खून किंवा आत्महत्या प्रकरणी प्रेताची विल्हेवाट लावण्याकरिता किंवा भाजून मरण्याकरिता जर केरोसिनासारखा ज्वालाग्राही पदार्थ वापराला असेल, तर गुन्ह्याच्या ठिकाणी मिळालेल्या वस्तूंवरून न्याय रसायनशास्त्रज्ञाला तो कोणता पदार्थ होता हे सांगता आले पाहिजे. नवे बांधकाम कोसळल्यास त्या कामाकरिता वापरलेले सिमेंट आणि वाळू यांचे मिश्रण ठराविक प्रमाणात होते किंवा कसे इ. प्रश्नांची योग्य उत्तरे शोधण्याच्या दृष्टीने त्याला तपासणी करावी लागते.

न्याय रसायनशास्त्रज्ञाकडे पाठविण्याच्या सर्व वस्तूंची विशेष काळजी घ्यावी लागते. गुन्ह्याच्या ठिकाणी कोणतीही चीजवस्तू हलविण्यापूर्वी न्याय रसायनशास्त्रज्ञाने स्वतः भेट देऊन योग्य त्या वस्तू किंवा नमुने घेणे हितावह असले, तरी ते सामान्यतः अशक्य असते. पाश्चात्त्य देशांतून या कामाकरिता खास फिरती पथके नेमलेली असतात. ज्या ठिकाणी अशी भेट देणे शक्य असते तेथील न्याय रसायनशास्त्रज्ञाने स्वतः केलेली टिपणे आणि प्रत्येक वस्तू कोठे व कशी होती याबद्दलचे त्याने प्रत्यक्ष बघून केलेले वर्णन, अनेक वेळा पुढे न्यायालयात उपयुक्त आणि महत्त्वाचे ठरते. पुष्कळ वेळा या विषयाचे प्रशिक्षण न घेतलेल्या व्यक्तींना गुन्ह्याच्या ठिकाणचे नमुने वगैरे गोळा करावे लागतात. याकरिता बहुतेक न्यायविज्ञान प्रयोगशाळांकडून नमुने कसे गोळा करावेत, ते पाठविताना कोणती काळजी घ्यावी वगैरे सूचना देणारी छापील परिपत्रके देण्यात येतात. शक्य असल्यास काही व्यक्तींना (पोलीस शिपाई व अधिकारी) यासंबंधीचे प्रशिक्षण देणे हितावह असते. योग्य वेळी योग्य असे साहित्य गोळा न केल्यास पुराव्याच्या अभावी गुन्हा सिद्ध करणे अशक्य होते.

प्रयोगशाळेत अशी वस्तू किंवा नमुने येताच नोंदवहीत तारीख, मिळण्याची वेळ, पाठविणाऱ्याचे नाव व हुद्दा, कोठून पाठविले, टपालाने किंवा खास निरोप्याबरोबर, वस्तू किंवा नमुन्याचे प्रकार आणि वर्णन वगैरे माहिती लिहून ठेवतात. प्रत्येक वस्तूला स्वतंत्र नोंद अनुक्रमांक देतात. वस्तू किंवा नमुना ज्या वेष्टनातून (उदा. फडके, कागद, डबा इ.) आला असेल त्या सर्व वस्तू जरूर पडल्यास न्यायालयात हजर करण्याच्या दृष्टीने जपून ठेवतात. पाठविणाऱ्याने आपल्या खास सील व सही-शिक्क्याने सीलबंद करून वस्तू वा नमुने पाठविले आहेत वा नाहीत हे तपासून पाहून सर्व पार्सले घ्यावयाची असतात. पाठविणारा बहुधा पोलीस अंमलदार असतो. वरील साहित्याबरोबरच त्याने गुन्ह्यासंबंधीची संपूर्ण माहिती, मृत्यूपूर्व तपासणीचा वैद्यकीय अहवाल, शवविच्छेदनानंतरचा तपासणी अहवाल इ. विशिष्ट तक्त्यात काळजीपूर्वक भरून पाठविणे जरूर असते. रक्त, मूत्र यांसारख्या नाशवंत द्रव्यांखेरीज इतर सर्व वस्तू वा द्रव्ये जतन करून ठेवणे जरूर असते. कारण आवश्यकतेनुसार त्या न्यायालयात दाखल कराव्या लागतात.

तपासणीच्या पद्धती व उपकरणे : प्रयोगशाळेत न्याय रसायनशास्त्रज्ञ वापरीत असलेल्या सर्व पद्धतींचे येथे वर्णन करणे अशक्य आहे. प्रयोगशाळेतील तपासणीमागे पुढील दोनपैकी कोणता तरी एक हेतू निश्चित असतो : (१) वस्तू ओळखणे, तिचे मापन करणे वगैरे. उदा., अंतस्त्यांमध्ये कोणते विष होते हे ओळखणे व त्याचे मापन करणे आणि (२) आलेले दोन नमुने तुलनात्मक दृष्ट्या तपासून एकमेकांचे भाग आहेत किंवा नाहीत हे ठरविणे. उदा., गुन्ह्याच्या जागी मिळालेले रंगलेपाचे तुकडे विशिष्ट मोटारीच्या रंगलेपाचे भाग होते किंवा कसे हे ठरविणे. अशा तपासणीत काही अडचणी असतात. एकच वस्तू जेव्हा फार मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध असते तेव्हा अशा वस्तूपासून मिळालेला नमुना अमुकच वस्तूचा आहे हे सांगणे कठीण बनते. तसेच नमुना अत्यल्प असला, तरीही तुलनात्मक परीक्षा अवघड बनते. जेव्हा एकापेक्षा अधिक चाचणी परीक्षा दोन्ही पदार्थांत सारख्याच मिळतात तेव्हा दोन्ही पदार्थ एकच असल्याची पुष्कळशी खात्री देता येते.


जेव्हा नमुना अत्यल्प असतो तेव्हा अधिक माहिती मिळविण्याच्या दृष्टीने कोणती परीक्षा जास्त उपयुक्त ठरेल या विषयाचे तारतम्य ज्ञान न्याय रसायनशास्त्रज्ञास, असावे लागते. ज्या परीक्षांत तपासणीच्या वस्तूचा नाश होत नाही त्या फार महत्त्वाच्या असतात. त्यांमध्ये काही भौतिक गुणधर्मांचे मापन उदा., घनतामापन, सूक्ष्मदर्शकीय तपासणी, क्ष-किरण विवर्तन वापरून केलेले विश्लेषण आणि अनुस्फुरित क्ष-किरण वर्णपटमापन [→ क्ष-किरण] यांचा समावेश असतो.

प्रयोगशाळेतील विशेष महत्त्वाच्या उपकरणांमध्ये प्रकाशीय वर्णपटलेखक, अनुस्फुरित क्ष-किरण वर्णपटलेखक, क्ष-किरण विवर्तन उपकरण, सूक्ष्मदर्शक, सूक्ष्मछेदक (सूक्ष्मदर्शकाखाली तपासण्यासाठी वस्तूचे पातळ काप तयार करणारे उपकरण) आणि वर्णपट प्रकाशमापक यांचा समावेश होतो. यांपैकी सर्वांत महत्त्वाचे उपकरण प्रकाशीय वर्णपटलेखक हे असून ते वापरून सोपा वर्णपट असलेल्या सर्व वस्तू तपासता येतात. उदा., काचेचा तुकडा. या उपकरणामुळे जवळजवळ ७० मूलद्रव्ये ओळखता येतात. या उपकरणापेक्षा अनुस्फुरित क्ष-किरण वर्णपटलेखक कमी संवेदनक्षम असून तो पूरक म्हणून वापरतात आणि म्हणूनच त्याचा नमुन्यात लेशमात्र प्रमाणात असलेल्या मूल्यद्रव्याच्या तपासणीकरिता उपयोग करीत नाहीत परंतु क्ष-किरण विश्लेषणाने मूळ नमुना बहुधा तसाच राहतो व वस्तूवरील डागांची तपासणी ते न खरवडता करता येते.

क्ष-किरण विवर्तन तंत्राचा उपयोग साधी संयुगे किंवा स्फटिकीय पदार्थांच्या रेणवीय संरचनेच्या अभ्यासाकरिता करतात. विषविज्ञानविषयक विश्लेषणात या तंत्राचा उपयोग विशिष्ट विषे आणि औषधे ओळण्याकरिता होतो. यांशिवाय दोन आवेष्टन पदार्थांची तुलनात्मक परीक्षा करण्याकरिता या तंत्राचा उपयोग होतो.

सूक्ष्मदर्शकांपैकी जैव सूक्ष्मदर्शकापेक्षा ध्रुवण सूक्ष्मदर्शक [→ सूक्ष्मदर्शक] अधिक उपयुक्त असतो. पारदर्शक स्फटिकीय पदार्थांच्या प्रकाशीय स्थिरांकांचे मापन ध्रुवण सूक्ष्मदर्शकाने करता येते. हे स्थिरांक पदार्थ ओळखण्यास मदत करतात आणि दोन पदार्थांची तुलनात्मक परीक्षा करण्यासही त्यांची मदत होते. विष किंवा इतर अकार्बनी पदार्थ काचपट्टीवर ठेवून सूक्ष्मदर्शकाखाली विशिष्ट पद्धतीने तपासल्यास ते ओळखता येतात. अतिसूक्ष्मरचना तसेच विषमांगता सूक्ष्मदर्शकीय तपासणीत स्पष्ट दिसतात. धाग्यांच्या तंतूंवर विशिष्ट अभिरंजकांच्या प्रक्रिया करून ते सूक्ष्मदर्शकाखाली तपासल्यास ते ओळखता येतात. तौलनिक सूक्ष्मदर्शकाखाली दोन वस्तू एकाच वेळी ठेवून त्यांचे एकाच वेळी निरीक्षण करून त्यांमधील साम्य आजमावता येते. उदा., पुष्कळ थर असलेल्या रंगलेपाच्या दोन खपल्या या उपकरणाने साम्याकरिता तपासता येतात. मिश्रधातूच्या दोन तुकड्यांच्या तुटलेल्या कडा सूक्ष्मदर्शकाखाली तपासून एकमेकींशी जुळतात किंवा नाही हे ठरविता येते. चोरलेल्या सायकली, स्कूटर्स, मोटारींची एंजिने, पिस्तुले वगैरेंवरील घालविलेले अनुक्रमांक विशिष्ट प्रक्रिया करून पुन्हा दृश्य करता येतात.

जंबुपार व दृश्य शोषण वर्णपटमापन ही तंत्रे औषधे व विशिष्ट विषे (उदा., बार्बिच्युरेटे) ओळखण्याकरिता आणि त्यांचे मापन करण्याकरिता वापरतात. तपासणी करावयाच्या पदार्थावर योग्य त्या रासायनिक प्रक्रिया अगोदर करून घ्याव्या लागतात. ओष्ठशलाकांच्या दोन नमुन्यांमधील रंगांचे शोषण वर्णपट त्यांच्यामधील साम्य अगर विषमता दर्शवितात.

वरील विवेचनावरून न्याय रसायनशास्त्र केवळ विविध उपकरणांच्या वापरावरच भर देते असा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे परंतु त्यांमध्ये अनेक सोप्या वा क्लिष्ट अशा रासायनिक प्रक्रियांचाही नित्य उपयोग करावा लागतो. यांपैकी काही तात्काळ व गुन्ह्याच्या प्रत्यक्ष जागेवर करण्याजोग्या परीक्षांचाही सर्रास उपयोग करावा लागतो. उदा., रक्त ओळखण्याची बेंझिडीन परीक्षा. हीमध्ये ३ मिलि. बेंझिडिनाचा ग्‍लेशियल ॲसिटिक अम्‍लातील विद्राव आणि १ मिलि. हायड्रोजन पेरॉक्साइडाच्या मिश्रणात १ मिलि. परीक्षणार्थी द्रव घालतात. या मिश्रणाचा रंग निळा किंवा हिरवा झाल्यास, परीक्षणार्थी द्रव रक्त होते हे निश्चित समजतात. बेंझिडीन कर्करोगोत्पादक असल्याचे समजल्यामुळे त्याऐवजी आता ऑर्थो-टोलिडीन किंवा ग्वायकम वापरतात.

रूढ आणि आधुनिक अशा सर्व प्रकारच्या तंत्रांचा उपयोग न्याय रसायनशास्त्रात केला जातो. सूक्ष्मरासायनिक विश्लेषण तंत्राचा फार उपयोग होतो. कारण तपासणीकरिता येणारे नमुने परिस्थितीवर अवलंबून असतात, म्हणजेच त्यांचे आकारमान पूर्वनियोजित कधीच नसते.

नव्या तंत्राचे विशेष उदाहरण म्हणजे मातीसारख्या बहुजिनसी भुकटीच्या तपासणीकरिता उपयुक्त ठरलेल्या तंत्राचे देता येईल. या तंत्रामध्ये काचनलिकेत निरनिराळी घनता असलेले द्रव अनेक थरांच्या रूपात घेऊन तीमध्ये परीक्षणार्थी भुकटी टाकतात. भुकटीच्या विसरणाबरोबरच (रेणू एकमेकांत मिसळणाच्या क्रियेबरोबच) भुकटीतील घटक पदार्थ आपापल्या घनेतप्रमाणे विखुरले जातात. तयार होणारा घनता आकृतिबंध भुकटीची तुलनात्मक ओळख पटविण्यास मदत करतो.

विषवैज्ञानिक विश्लेषण : हा न्याय रसायनशास्त्राचा प्रमुख विभाग असून न्याय रसायनशास्त्रज्ञाला विष अलग करणे, ते ओळखणे आणि त्याचे मापन करणे ही महत्त्वाची कार्ये करावी लागतात [→ विषविज्ञान]. त्याच्याकडे या कामाकरिता येणारे नमुने बहुतकरून शवविच्छेदनानंतर काढून ठेवण्यात आलेली अंतस्त्ये वगैरे जैव पदार्थ असतात. त्यांमध्ये मेंदू, यकृत, रक्त, मूत्र, वृक्क (मूत्रपिंड), फुप्फुस ऊतक (पेशीसमूह), जठर व त्यातील पदार्थ यांचा समावेश असतो. ऊतकापासून निष्कर्षणाने (अलग करण्याच्या क्रियेने) कार्बनी विषे मिळविण्याकरिता क्लोरोफॉर्म किंवा ईथर विद्रावक (विरघळविणारा पदार्थ) म्हणून वापरतात. अलीकडे या विद्रावकांऐवजी काही विशिष्ट रेझिने या कामात उपयुक्त ठरली आहेत. एक्सएडी – २ या नावाचे रेझीन द्रव पदार्थातील, विशेषेकरून मूत्रातील, कार्बनी रेणू मिळविण्याकरिता फार उपयुक्त ठरले आहे. मृत शरीरातील वर उल्लेखिलेल्या भागांशिवाय न्याय रसायनशास्त्रज्ञाकडे जिवंत माणसाच्या शरीरातील रक्त, मूत्र, मेरुदेव (मेरुरज्जूच्या मधल्या नालीत असणारा द्रव) आणि जठर धुऊन मिळालेला द्रव तपासणीकरिता पाठवितात.

वर उल्लेखिलेले साहित्य बहुधा वैद्यकीय अधिकाऱ्याने न्यायसाहाय्यक प्रयोगशाळेकडे पाठवावयाचे असते. ते वेगवेगळ्या बाटल्यांतून भरून पाठविण्याची जरूरी असते. बादलीची स्वच्छता, तीवरील लेबल आणि ती सीलबंद करणे या गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे लागते. अंतस्त्ये खराब होऊ नयेत म्हणून ती मिठाच्या संहत (कमाल प्रमाण विरघळलेले असलेल्या) विद्रावात ठेवून पाठवावी लागतात. कधीकधी मिठाऐवजी रेक्टिफाइड स्पिरिटही (ज्यात एथिल अल्कोहॉलाचे प्रमाण घनफळाच्या ९० ते ९५% व बाकीचे पाणी असते असे मिश्रणही) वापरतात.


परिरक्षक म्हणून वापरलेल्या विद्रावाची एक सीलबंद बाटली या साहित्याबरोबर निराळी पाठवणे जरूर असते. विशिष्ट छापील तक्त्यात माहिती भरून त्यासोबत पाठवणेही आवश्यक असते. सर्व साहित्य खास बनविलेल्या पेटीत सीलबंद करून पोलीस अधिकाऱ्यामार्फत पोलिस शिपायाबरोबरच थेट प्रयोगशाळेत पोहोचवितात. पाश्चात्त्य देशांतून या सर्व साहित्याबद्दल योग्य नोंदी केल्यानंतर न्याय रसायनशास्त्रज्ञ त्यांपैकी काही भाग न्यायालयाच्या कामाकरिता लागल्यास किंवा दुसऱ्या एखाद्या प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठवावा लागल्यास काढून ठेवतात.

काही विषे शरीरावर विशिष्ट लक्षणे उत्पन्न करतात व ती विकृतिवैज्ञानिक असलेल्या शवविच्छेदकास सहज ओळखू येतात. काही वेळा मृत शरीराजवळ विषाचा उरलेला भाग सापडतो. मृतास झोपेच्या गोळ्या किंवा इतर औषधे घेण्याची सवय असल्याची माहिती पोलिस तपासात निष्पन्न होण्याची शक्यता असते.

या सर्व माहितीचा उपयोग न्याय रसायनशास्त्रज्ञास होतो. कारण त्याअनुषंगाने कोणते विष असू शकेल याचा त्याला अंदाज करता येऊन त्याचे पुढील विश्लेषण कार्य सुलभ बनते. ज्या वेळी अशी कोणतीही माहिती उपलब्ध नसते त्या वेळी अज्ञात विषाचा शोध घेण्याकरिता दीर्घकालीन स्वरूपाची विश्लेषणे करावी लागतात. अशा प्रसंगीदेखील सर्वसाधारणपणे नेहमी आढणाऱ्या विषांचाच उदा., कार्बन मोनॉक्साइड, सायनाइड, एथिल अल्कोहॉल, बार्बिच्युरेट इत्यादींचा प्रथम विचार करतात.

विश्लेषण दृष्ट्या विषांचे पुढील पाच गट पाडता येतात : (१) बाष्पनशील विषे : ही विषे ऊतकातून बाष्प-ऊर्ध्वपातन (पाण्याच्या वाफेबरोबर बाष्परूपाने मिळवून नंतर थंड झाल्यावर पदार्थ अलग मिळविण्याची क्रिया) करून अलग मिळविता येतात. उदा., अल्कोहॉले, निकोटीन, हायड्रोसायानिक अम्‍ल, कार्बन टेट्राक्लोराइड वगैरे. (२) वायुरूप विषे : कार्बन मोनॉक्साइडासारखा (उदा., मोटारीच्या एंजिनातून निष्कासित होणारा–बाहेर टाकला जाणारा–वायू) विषारी वायू श्वसनमार्गातून फुप्फुसात जाऊन विषबाधा होते. या गटातील विषे ओळखण्याकरिता वायुवर्णलेखन [→ वर्णलेखन] उपयुक्त असते. (३) कार्बनी विषे : या प्रकारच्या विषांचे ऊतकातून निष्कर्षण करण्याकरिता निरनिराळे विद्रावक वापरतात. अलीकडे याकरिता रेझिनांचा विशेष उपयोग करण्यात येत आहे. हा सर्वांत मोठा गट असून त्यात अनेक संश्लेषित औषधांचा समावेश होतो. उदा., बार्बिच्युरेटे, ग्‍लायकोसाइडे, काही कीटकनाशके वगैरे. (४) अकार्बनी विषे : सर्व विषारी धातू, अधातू व त्यांची संयुगे (उदा., आर्सेनिक व त्याची संयुगे). (५) इतर विषे : वरील चार गटांकरिता ज्या विश्लेषण पद्धती अवलंबितात त्या वापरून अलग न करता येणारी विषे न्याय रसायनशास्त्रामध्ये अलीकडे स्वयंचलित यंत्रे वापरण्यावर अधिक भर दिला जात आहे. या विषयाच्या प्रयोगशाळांकडे येणाऱ्या कामाच्या प्रमाणातही वाढ होत आहे. स्वयंचलित यंत्रांच्या मदतीने मूत्राचे विश्लेषण दर ताशी वीस नमुने इतक्या वेगाने तपासून करता येते आणि त्याकरिता मूत्राचे प्रमाणही फक्त चार ते आठ मिलि. एवढेच पुरते. किरणोत्सर्गी मार्गण मूलद्रव्ये [→ अणुऊर्जेचे शांततामय उपयोग] वापरून विश्लेषण करण्याचे तंत्र अधिक संवेदनक्षम बनविण्यात आले आहे.

मद्यग्रस्ततात व न्याय रसायनशास्त्र : मद्याचा आणि न्यायवैद्यकाचा फार जवळ संचाबंध आहे. तीव्र मद्यविषबाधा, चिरकारी (दीर्घकालीन) मद्यविषबाधा किंवा मद्यासक्ती व मद्यग्रस्तता हे विषय न्यायवैद्यकाच्या आणि न्याय रसायनशास्त्राच्या कक्षेत येणारे विषय आहेत. येथे फक्त मद्यग्रस्ततेसंबंधी माहिती दिली आहे. रक्त, मूत्र आणि लाळ तपासण्याच्या प्रमाणभूत रासायनिक विश्लेषण पद्धती अनेक वर्षांपासून प्रचलित आहेत. न्याय रसायनशास्त्रज्ञाला या पदार्थांमधील अल्कोहॉलाचे प्रमाण विश्लेषणाने काढावयाचे असते. अलीकडे मद्यग्रस्त व्यक्तीची उच्छ्‍वसित हवा तपासून अल्कोहॉलाचे प्रमाण काढण्याची पद्धत अधिक रूढ होत आहे. कारण ती सोपी व सुलभ असून प्रमाणभूत रासायनिक विश्लेषण पद्धतीशी तुलना करून पाहता तेवढीच बिनचूक असल्याचे आढळले आहे. रबरी फुगा फुगवावयास देऊन उच्छ्‍वसित हवा गोळा करतात. या हवेच्या विश्लेषणाकरिता विविध प्रकारची उपकरणे (उदा., ड्रंकोमीटर, इंटॉक्सिमीटर, ब्रेथलायझ्‌नर इ.) उपलब्ध आहेत. या उपकरणांमध्ये काही तपशील व वापरण्याची सुलभता या दृष्टीने थोडेफार फरक आहेत. काही उपकरणे बेशुद्ध मद्यग्रस्तांची उच्छ्‍वसित हवा गोळा करू शकतात. रक्तातील अल्कोहॉल आणि फुप्फुसातील वायुकोशांमधली हवेतील अल्कोहॉल यांचे एकमेकांशी ठराविक गुणोत्तर असते. उच्छ्‍वसित हवेतील अल्कोहॉलाचे मापन करून त्यावरून रक्तातील अल्कोहॉलाचे प्रमाण काढता येते.

संदर्भ : 1. Gee, D. J. Lecture Notes on Forensic Medicine, Oxford, 1975.

  2. Keithmant, A., Ed. Modern Trends in Forensic Medicine, Glasgow, 1975.

  3. Lundquist, F. Curry, A. S., Eds. Methods of Forensic Science, 4 Vols., New York, 1962–65.

  4. Modi, N. J., Ed. Modi’s Textbook of Medical Jurisprudence and Toxicology, Bombay, 1977.

  5. Parikh, C. K. Parikh’s Simplified Textbook of Medical Jurisprudence and Toxicology, Bombay, 1976.

भालेराव, य. त्र्यं. जोगळेकर, व. दा.