नोंदणी : (रजिस्ट्रेशन). अधिकृत नोंद. अशा नोंदींची वही अधिकृतपणे ठेवण्यात येते. व्यवहारात अगर सार्वजनिक क्षेत्रात लेखी आधार अगर पुरावा म्हणून अशी नोंदवही साधारणपणे ग्राह्य समजली जाते. देशातील नागरिकांच्या अगर परदेशीय व्यक्तींच्या खाजगी मालमत्तेच्या व इतर महत्त्वाच्या हक्कांची अधिकृत अगर विश्वासार्ह नोंद करण्याची सार्वजनिक क्षेत्रात व्यवस्था केलेली असते. तसेच सार्वजनिक व प्रशासकीय क्षेत्रात परिणामकारक अंमलबजावणी, अधिकृत आणि विश्वसनीय माहिती, तसेच शासनाचे नियंत्रण यांकरिता निरनिराळ्या प्रकारचे नोंदणी अधिनियम प्रत्येक देशात अस्तित्वात असतात. अशा प्रकारच्या नोंदणी अधिनियमात त्या त्या विशिष्ट विषयांतील कार्यपद्धती, त्यासाठी असलेली आस्थापना आणि तिचे अधिकार, अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन केल्यास होणारे शासन अगर दंड, त्या अधिनियमांची व्याप्ती इ. गोष्टींचा समावेश असतो. नागरी जीवनाच्या अनेक क्षेत्रांत नोंदणीपद्धत अंमलात असून तीवरून सांख्यिकीय माहिती गोळा करता येते. उदा., जन्म-मृत्यू नोंदणी, कारखाने नोंदणी, आयकरासाठी उत्पन्न नोंदणी, वाहन नोंदणी, जमा-खर्च नोंदणी, वेश्या नोंदणी, परदेशीय व्यक्ती नोंदणी, वैद्यकीय व्यावसायिक नोंदणी, परवाना व एकस्व नोंदणी, संस्था नोंदणी, पुस्तक प्रसिद्धी नोंदणी, वर्तमानपत्र व नियतकालिके नोंदणी, धर्मार्थ संस्था नोंदणी, विश्वस्तनिधी नोंदणी, आकाशवाणी व दूरध्वनियंत्र नोंदणी, खानावळ व पानगृह नोंदणी, गुन्हा नोंदणी, दावे नोंदणी, विवाह नोंदणी, परदेशगमन परवाना नोंदणी इत्यादी. या प्रत्येक प्रकारच्या नोंदणीबाबत निरनिराळे नियम व अधिनियम करण्यात येतात आणि ते सर्व राज्यघटनेने दिलेल्या अधिकारक्षेत्राप्रमाणे केंद्र व राज्य सरकार यांनी केलेले असतात. तसेच योग्य अधिकार प्रदान केलेल्या काही निमसरकारी संस्थाही संबंधित कार्यक्षेत्रापुरते नोंदणीचे कार्य करतात. जितक्या प्रमाणात नोंदणीचे क्षेत्र विविध, व्यापक आणि परिणामकारक असेल, तितक्या प्रमाणात त्या राज्याच्या वा संस्थेच्या प्रशासनाची कार्यक्षमता वाढविण्यास त्याचप्रमाणे शासकीय व लोककल्याणकारी विश्वसनीय आराखडे तयार करण्यास मदत होते.
स्वतंत्र भारतामध्ये अशा प्रकरच्या अनेक नोंदणी अधिनियमांमध्ये केंद्रसरकारचा भारतीय नोंदणी अधिनियम सामान्य व्यक्तीच्या हिताच्या व उपयोगाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा आहे. हा अधिनियम प्रथम १८६४ मध्ये अंमलात आला. १९०८ मध्ये त्याचे पाचवे संस्करण करण्यात आले व तेच सध्या प्रचलित नोंदणी अधिनियम म्हणून अस्तित्वात आहे. हा अधिनियम भारतातील नागरिक व परदेशीय व्यक्ती यांच्या बाबतीत समान असून, तो त्या व्यक्तींच्या स्थावर, जंगम इ. दृश्य मालमत्ता व तीसंबंधीचे हक्क अगर वहिवाट तसेच इतर अदृश्य कायदेशीर हक्क यांच्याशी निगडित आहे. न्यायालयीन कामकाज व बहुजन समाजाचे कल्याण या दृष्टींनीही त्यास आगळे महत्त्व आहे. नोंदणी खात्याचे अभिलेख हे सार्वजनिक क्षेत्रातील अभिलेख मानण्यात येतात. निर्धारित शुल्क देऊन ते पाहता येतात. त्यांच्या अधिकृत खऱ्या अगर छायाचित्रित नकला मिळण्याचीही व्यवस्था केलेली असते. हा अधिनियम लिखित दस्तऐवजास लागू असतो. अशा लिखित दस्तऐवजांचे (१) नोंदणीपात्र व मृत्युपत्रीय आणि (२) ऐच्छिक अगर वैकल्पिक मृत्युपत्रीयेतर असे दोन प्रकारचे मुख्य वर्ग केलेले आहेत. नोंदणीपात्र प्रथम वर्गीय दस्तऐवज नोंदणी केल्याशिवाय कोर्टकचेरीत अगर दैंनदिन व्यवहारात ग्राह्य अगर प्रमाणभूत मानले जात नाहीत. दुसऱ्या ऐच्छिक वर्गातील दस्तऐवजांसंबंधीसुद्धा एकाच मिळकतीचा योग्य नोंदणी केलेला दस्तऐवज त्याच मिळकतीच्या नोंदणी न केलेल्या दुसऱ्या कोणत्याही दस्तऐवजांपेक्षा अधिक ग्राह्य व न्यायालयात पुरावा म्हणून मान्यतापात्र समजला जातो.
इ. स. १९०८ च्या या केंद्रीय अधिनियमानुसार राज्यनिहाय नोंदणी आस्थापनेची तरतूद असून, प्रत्येक राज्यात नोंदणी महानिरीक्षक हा खातेप्रमुख असतो. त्याच्या हाताखाली नोंदणी निरीक्षक, जिल्हा-निबंधक, निबंधक, दुय्यम निबंधक व सहदुय्यम निबंधक नेमलेले असतात. प्रत्येक जिल्हा-नोंदणीक्षेत्रात एकाहून अधिक नोंदणी-उपविभाग असतात. प्रत्येक उपविभागाचे क्षेत्र ठरविण्यात आलेले असते. निंबधक व दुय्यम निबंधक यांना नोंदणी कामामध्ये मोहोरमुद्रांचा वापर करण्याचा अधिकार असतो.
केंद्रीय कायद्याप्रमाणे प्रत्येक राज्यास प्रादेशिक परिस्थितीप्रमाणे नियम प्रसिद्ध करून स्थानिक स्वरूपाचे किरकोळ फेरफार करण्याचे अधिकार दिलेले आहेत. अशा प्रकारचे नियम साधारणपणे नोंदणी शुल्क आकारणी, नोंदणीस्थळ व वेळा, नोंदणीसाठी दस्तऐवजाची भाषा व ते रुजू करण्याची पद्धती व त्यांची सार्वजनिक अभिलेख पुस्तकात नोंद करण्याची कार्यपद्धती, नोंदणी अभिलेखाची सालवार जतनपद्धती व निर्धारित शुल्क घेऊन पाहणी करू देणे अगर खऱ्या अगर छायाचित्रित नकला देण्याची कार्यपद्धती इ. बाबींसंबंधी असतात. अशा प्रकारे वरील केंद्रीय अधिनियमाची कलमे २२ व ६९ यांप्रमाणे पूर्वीच्या मुंबई राज्याने जे नियम प्रसिद्ध केलेले आहेत, ते महाराष्ट्र राज्यास लागू आहेत. तसेच त्याच अधिनियमाची कलमे १७ व १९ मध्ये अनुक्रमे नोंदणीपात्र आणि ऐच्छिक नोंदणीपात्र दस्तऐवजांसंबंधीचे तपशील संकलित केलेले आहेत.
स्थूलमानाने नोंदणीपात्र दस्तऐवजात दृश्य स्थावराचे हक्क तसेच कोणताही अदृश्य हक्क संपादन करणे, हक्क नष्ट करणे, हक्कात फेरफार करणे, हक्कवितरण अगर हस्तांतर करणे, यांसंबंधीचे कागदपत्र तसेच मृत्युपत्र, दत्तकविधानासंबंधी हक्कपत्र, करारपत्र, वाटणीपत्र, भागीदारी करारपत्र, बक्षिसपत्र, दानपत्र, मरणोत्तर हक्कवितरण अगर हस्तांतरण, न्यायालयीन निकालपत्र अगर हुकूमनामा इ. महत्त्वाच्या कागदपत्रांचाही समावेश होतो.
ऐच्छिक अगर स्वेच्छा नोंदणीप्रकारात १०० रुपयांच्या आतील स्थावराचे दस्तऐवज, एक वर्षापेक्षा कमी मुदतीचे पट्टे, कबुलायती, भाडेपट्टा व मृत्युपत्रीयेतर कमी महत्त्वाचे व कमी किंमतीचे हक्क अंतर्भूत असलेले दस्तऐवज इत्यादींचा समावेश असतो व त्यात नोंदणी शुल्काची बचत हा हेतू असतो. नोंदणी पूर्ण झालेल्या दिनांकापासून दस्तऐवज अंमलात येतो.
वर निर्दिष्ट केलेल्या केंद्रीय अधिनियमाप्रमाणे केलेली नोंदणी ही राज्यनिहाय महसुली खात्याच्या (म्हणजे ग्रामीण भागातील शेतजमीन हक्क नोंदणी व शहर अगर गावठाण भागातील नागरी मिळकतींची नोंदणी) नोंदणीपेक्षा उच्चस्तरीय, अधिक विश्वासार्ह आणि प्रतिष्ठापात्र समजण्यात येते.
मृत्युपत्रे सुरक्षिततेसाठी नोंदणी अधिकाऱ्याकडे न्यास म्हणून ठेवता येतात. मृत्युपत्रे अशा प्रकारे सुरक्षित ठेवण्यासाठी नोंदणी कार्यालयात एक सुरक्षापेटी ठेवण्यात आलेली असते. ती त्या कार्यालय प्रमुखाच्या अभिरक्षणाखाली असते. नोंदणी अधिकाऱ्याविरूद्ध खात्यामार्फत अगर योग्य न्यायालयात दाद मागता येते.
आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे स्थावराच्या बाबतीत दृश्य मिळकत ज्या देशात अस्तित्वात असते, त्या देशाचे कायदे लागू होतात. इतर दृश्य अगर अदृश्य हक्कांच्या बाबतींत, ते हक्क ज्या देशाच्या न्यायालयात बजावणीसाठी रुजू करण्यात येतात, त्या देशाचे कायदे लागू होतात.
ब्रिटिश राष्ट्रकुल देशांतील वरिष्ठ न्यायालयांची निकालपत्रे व हुकूमनामे यांची कायदेशीर नोंदणी राष्ट्रकुल देशांमध्ये करण्याची प्रथा असून, त्या प्रथेला आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे मान्यता व प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे.
संदर्भ : Dhurandhur, J. R., Ed. Mulla on The Indian Registration Act, XVI, 1908, Bombay, 1963.
थिटे, अ. म. खोडवे, अच्युत