नैवेद्य : देवाला निवेदन करण्यास म्हणजे अर्पण करण्यास योग्य अशा द्रव्यास नैवेद्य म्हणतात. पूजेच्या षोडशोपचार विधींपैकी नैवेद्य हा एक होय. नैवेद्यासाठी तयार केलेले पदार्थ षड्‌रसांनी युक्त असावेत. भक्ष्य, भोज्य, लेह्य, पेय व चोष्य असे पाच प्रकारचे पदार्थ नैवेद्यात असावेत, असे तंत्रसारादी ग्रंथांत म्हटले आहे. नैवेद्य देवासमोर ठेवून तो सर्मपण करतात. सुवर्ण, रूपे, तांबे इ. धातूंचे पात्र नैवेद्य ठेवण्यासाठी घेतात. पळसाचे, केळीचे किंवा कमळाचे पान, लाकडी पात्र इ. वस्तूही नैवेद्य ठेवण्यास घेतल्या तरी चालतात. नैवेद्य नेहमी देवतेच्या उजव्या हाताला ठेवावा, असे सांगितले आहे. देवाला समर्पण केलेला नैवेद्य सामान्यतः ⇨ प्रसाद म्हणून ग्रहण करतात. शिवाचा नैवेद्य पूजकाने स्वीकारण्यास मात्र निषेध आहे. सर्व प्रकारच्या अन्नपदार्थांनी युक्त अशा नैवेद्यास महानैवेद्य म्हणतात. दूध, साखर, गूळखोबरे इ. पदार्थांचाही नैवेद्य दाखवितात. काही व्रतांत त्या त्या देवतेला विशेष प्रकारचा नैवेद्य सांगितलेला असतो.

भिडे, वि. वि.