नेमर्टिनिया : (नेमर्टिना). एक प्रकारच्या अखंड कृमींचा संघ, ⇨ टर्बेलॅरिया वर्गातील प्राण्यांचे हे संबंधी आहेत, असा समज असल्यामुळे यांचा पूर्वी टर्बेलॅरिया वर्गात समावेश करण्यात येत असे. पण काही बाबतींत त्यांची रचना टर्बेलॅरियन प्राण्यांपेक्षा वरच्या प्रतीची असल्यामुळे त्यांचा स्वतंत्र संघ करण्यात आला आहे.

या संघातील प्राण्यांची विशिष्ट लक्षणे पुढे दिल्याप्रमाणे आहेत : शरीर सडपातळ, मऊ आणि अतिशय संकोचशील असून द्विपार्श्व सममित (ज्याचे एका पातळीने दोन सारखे भाग होतात असे) असते आद्यस्तर तीन असतात. एक उद्वर्त्य शुंड (पुढे काढता येणारा किंवा आतील बाजू बाहेर येणारा सोंडेसारखा भाग) असतो आहारनाल (अन्नमार्ग) सरळ आणि पूर्ण असतो देहगुहा (आतडी हृदय इ. अवयव ज्यात असतात अशी शरीरातील पोकळी) नसते व शरीरातील मोकळ्या जागा मृदूतकाने (मऊ स्पंजासारख्या उतकाने म्हणजे समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या–पेशींच्या समूहाने) भरलेल्या असतात श्वसनेंद्रिये नसतात शाखा असलेले दोन पार्श्व (बाजूचे) उत्सर्गी नाल (निरुपयोगी द्रव्ये शरीराबाहेर टाकणाऱ्या नलिका) असून ज्वालाकोशिका (एक प्रकारच्या पोकळ, टोकावर असलेल्या आणि ज्यांच्यात सतत हालत असणाऱ्या केसांसारख्या वाढींचा म्हणजे पक्ष्माभिकांचा समूह असतो अशा उत्सर्गी कोशिका) असतात तीन अनुदैर्घ्य (उभ्या) रक्तवाहिन्या असताततंत्रिका तंत्र (मज्जासंस्था) हे अग्र गुच्छिकांची (ज्यांच्यापासून तंत्रिका तंतू निघतात. अशा तंत्रिका-कोशिकांच्या समूहांची) एक जोडी (मेंदू) आणि दोन पार्श्व अनुदैर्घ्य तंत्रिका यांचे बनलेले असते. लिंगे भिन्न असतात व जनन ग्रंथींच्या पुष्कळ जोड्या असतात विकास सरळ अथवा पायलिडियम डिंभाच्या (भ्रूणानंतरच्या स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणाऱ्या व प्रौढाशी साम्य नसणाऱ्या सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्थेच्या) द्वारे होतो.

नेमर्टिनियन कृमींचे शरीर मृदू व सपाट असून त्यांचे खंड पडलेले नसतात. शरीर खूप लांब किंवा आकुंचित करता येते. काहींची लांबी केवळ ५ मिमी. असते, तर पुष्कळांची कित्येक सेंमी. असते. एका जातीचे प्राणी आपले शरीर ताणून २५ मी. लांब करू शकतात. यांच्या सु. ५०० जाती असून त्या विविध रंगांच्या असतात. बहुतेक नेमर्टिनियन समुद्रात राहणारे आहेत काही थोडे जमिनीवर अथवा गोड्या पाण्यात राहणारे आहेत ते दगडांखाली, शैवलांच्या आसऱ्याला वा बिळांत राहतात परंतु काही खोल पाण्यात राहणारेही आहेत. प्रोस्टोमा वंशाच्या जाती गोड्या पाण्यात राहणाऱ्या आहेत. जिऑनेमर्टीस या उष्ण प्रदेशातील वंशाच्या जाती ओलसर मातीत राहतात.

नेमर्टिनियनांची अंतर्गत संरचना : (१) शुंड, (२) मेंदू, (३) मुख, (४) उत्सर्जनांग, (५) अनुदैर्घ्य तंत्रिका रज्जू, (६) अंडाशय, (७) गुदद्वार.

बाह्यत्वचा मऊ असून स्तंभाकार कोशिकांची बनलेली असते. यांपैकी पुष्कळ कोशिका पक्ष्माभिकायुक्त असतात काही श्लेष्म-कोशिका (बुळबुळीत द्रव्य स्त्रवणाऱ्या कोशिका) व काही संवेदी कोशिका असतात. बाह्यत्वचेच्या खाली वर्तुळ व अनुदैर्घ्य स्नायू असतात. या प्राण्यांचे चलन बाह्यत्वचीय पक्ष्माभिका आणि स्नायू यांच्यामुळे होते. पुढच्या टोकाशी मुखाच्या वर एक द्वार असते, त्यातून शुंड खूप लांब बाहेर काढता येतो किंवा पूर्णपणे आत ओढून घेता येतो. बाहेर काढताना शुंडाची आतली बाजू बाहेर येते. शुंड शरीरात एका आवरणात असतो. काही जातींत शुंडावर सुया किंवा काटे असतात. त्यावरून त्याचा उपयोग आक्रमणाकरिता वा स्वसंरक्षणाकरिता होत असावा, असे दिसते. आहारनाल मुखापासून गुदद्वारापर्यंत सरळ गेलेला असतो. कधीकधी आंत्रापासून (आतड्यापासून) युग्मित (जोडी असलेले) पार्श्व अंधवर्ध (बाहेरच्या टोकाशी बंद असणाऱ्या नळ्या वा पिशव्या) निघालेले असतात. जिवंत आणि मेलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या इतर प्राण्यांवर हे उपजिविका करतात. परिवहन तंत्र (रक्ताभिसरण संस्था) दोन अनुदैर्घ्य पार्श्व रक्तवाहिन्या आणि सामान्यतः एक मध्यपृष्ठीय वाहिनी यांचे बनलेले असते. पार्श्व वाहिन्या पृष्ठीय वाहिनीला शीर्ष आणि आंत्र भागात आडव्या वाहिन्यांनी जोडलेल्या असतात. रक्त तांबडे वा रंगहीन असते आणि शरीराच्या हालचालींमुळे त्याचे मागे व पुढे अभिसरण होते. देहभित्तीमधून होणाऱ्या विसरणामुळे (वायुरेणू एकमेकांत मिसळण्याच्या क्रियेने) श्वसन होते. उत्सर्जन तंत्रामध्ये दोन पार्श्व नालांचा समावेश होतो. या नालांना पुष्कळ शाखा असून त्यांपैकी काहींना ज्वालाकोशिका जोडलेल्या असतात. ज्वालाकोशिका रक्तवाहिन्यांना लागून असतात. खरी देहगुहा नसते. देहभित्ती आणि आंतरिक अंगे यांच्यामध्ये असणाऱ्या जागा श्लेषी (जेलीसारख्या पातळसर द्रवाने युक्त असलेल्या) मृदूतकाने भरलेल्या असतात. शीर्ष प्रदेशात दोन मोठ्या प्रमस्तिष्क गुच्छिका (मेंदूच्या पुढच्या भागातील गुच्छिका) असून त्या आडव्या संयोजकांनी जोडलेल्या असतात. त्यांच्यापासून पुढच्या बाजूला विशेषतः शुंडाला तंत्रिका गेलेल्या असतात. शरीराच्या प्रत्येक बाजूला एक मोठी पार्श्व तंत्रिका रज्जू (मज्जारज्जू) मेंदूपासून निघून पश्च टोकापर्यंत गेलेली असते. काही जातींमध्ये याखेरीज एक मध्य पृष्ठीय व एक मध्य अधर अनुदैर्घ्य तंत्रिका असतात. अक्षिका (साधे डोळे) आणि ग्राहक (संवेदना ग्रहण करणारे घटक) हीच काय ती ज्ञानेंद्रिये असतात. अक्षिका थोड्या किंवा पुष्कळ असून त्या शीर्ष प्रदेशात मेंदूच्या पुढे असतात. ग्राहक शरीराच्या दोन्ही बाजूंवरील त्वचेत असतात.

लिंगे बहुधा भिन्न असतात पण काही जाती उभयलिंगी (नर व मादी यांची जननेंद्रिये एकाच प्राण्यात असलेल्या) असतात, अंडाशय (स्त्री-जननेंद्रिय) आणि वृषण (पुं-जननेंद्रिय) यांच्या जोड्या आंत्रावरील अंधवर्धाच्या मधील जागेत असतात. जनन ग्रंथी पिशवीसारखी असून तिच्या आतील अस्तराच्या कोशिकांपासून अंडाणू (स्त्री-जनन कोशिका) किंवा शुक्राणू (पुं-जनन कोशिका) उत्पन्न होतात. ते परिपक्व झाल्यानंतर प्रत्येक पिशवी अथवा कोश एका लहान वाहिनीने उत्तर पृष्ठावर व क्वचित अधर पृष्ठावर उघडतो. काही नेमर्टिनियनांमध्ये डिंभावस्था असते व या डिंभाच्या रूपांतरणाने (प्रौढावस्था प्राप्त होताना रूप व संरचना यांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे) प्रौढ प्राणी उत्पन्न होतो. इतर नेमर्टिनियनांमध्ये विकास सरळ असतो. काही नेमर्टिनियन पिल्लांना जन्म देतात.

प्रौढ नेमर्टिनियनांच्या अंगी ⇨ पुनर्जननाची शक्ती फार मोठ्या प्रमाणात असते. उन्हाळ्यात काही जाती शरीराच्या विखंडनाने (तुकडे होऊन) नियमितपणे प्रजोत्पादन करतात शरीराच्या प्रत्येक तुकड्याची वाढ होऊन नवीन पूर्ण कृमी तयार होतो.

कर्वे, ज. नी.