नेपल्स : (इटा. नेपोली प्राचीन नेआपॉलिस ‘नवे शहर’). दक्षिण इटलीच्या कॅंपेन्या विभागाची व नेपल्स प्रांताची राजधानी. लोकसंख्या १२,२०,७३२ (१९७५). दक्षिण इटलीचे हे जेनोआनंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे बंदर. हे जगप्रसिद्ध शहर अर्धचंद्राकृती नेपल्स उपसागरावर, रोमच्या आग्नेयेस सु. १९३ किमी.वर व्हीस्यूव्हिअस व कांपी फ्लेग्रेई या ज्वालामुखी पर्वतविभागांदरम्यान वसले आहे.

पार्थेनपी या प्राचीन शहराच्या जागी इ. स. पू. ६०० मध्ये ग्रीकांनी हे नवे शहर वसविले. इ. स. पू. ३२६ मध्ये रोमनांनी ते घेतल्यावर तेथे देवालये, विद्यालये, स्नानगृहे, जलसेतू, आखाडे, घोड्यांच्या आणि रथांच्या शर्यतींची मैदाने इत्यादींची उभारणी होऊन नेपल्सची भरभराट झाली. पाचव्या शतकात रोमनांचा पाडाव होऊन येथे एकामागोमाग ऑस्ट्रोगॉथ, लाँबर्डी व बायझंटिन यांच्या सत्ता आल्या. बाराव्या शतकात ते सिसिलीच्या राज्यात समाविष्ट होऊन त्याची राजधानी बनले. १४८५ मध्ये फ्रान्सने नेपल्स घेतले व पुढे ते स्पेनकडे गेले. १७१३ च्या उत्रेक्तच्या तहाने ते ऑस्ट्रियाकडे आले परंतु १७३४ मध्ये ते परत स्पेनच्या बूर्‌बाँ राजवटीत गेले. नेपोलिनच्या युद्धात १८०६–१५ पर्यंत नेपल्स फ्रान्सकडे होते नंतर व्हिएन्ना काँग्रेसने ते पुन्हा बूर्‌बाँ राजवटीस दिले. १८६० मध्ये इटलीचा देशभक्त गॅरिबॉल्डी याने ते घेतले व १८६१ मध्ये ते इटलीच्या संयुक्त राज्यात विलीन झाले. त्यानंतर त्याची औद्योगिक व व्यापारी वाढ वेगाने झाली. दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांच्या विमानहल्ल्यांमुळे व माघार घेताना जर्मनांनी केलेल्या नासधुशीमुळे नेपल्स बंदर व तेथील अनेक इमारती उद्‌ध्वस्त झाल्या आणि अनेक ऐतिहासिक वास्तूंचे व कलासंग्रहांचे अपरिमित नुकसान झाले. १८६५ व १८८४ च्या पटकीच्या साथीनेही या शहरात खूप प्राणहानी झाली होती. आता शहराची पुनर्रचना झाली आहे. विसाव्या शतकात औद्योगिकीकरण व नागरीकरण मोठ्या प्रमाणावर झाले असले, तरी प्राचीन वैभवाची साक्ष देणाऱ्या वास्तू अजून वेगळेपण राखून आहेत. नेपल्स हे दक्षिण इटलीचे मोठे औद्योगिक आणि व्यापारी केंद्र आहे. रेल्वे एंजिने, काचसामान, यंत्रे, मद्ये, हातमोजे, कापडचोपड, चीज, मॅकरोनी व अन्य खाद्यपदार्थ, ऑलिव्ह तेल इत्यादींची येथून निर्यात होते. एंजिने व अन्य यंत्रे, अन्नप्रक्रिया, जहाजबांधणी, पोलाद, तेलशुद्धीकरण यांचे मोठमोठे कारखाने येथे असून शिवाय सुती, रेयॉन व तागाचे कापड, कातडी व रबरी वस्तू, औषधे, रसायने इ. विविध मालाचे उत्पादन येथे होते. उत्तम नैसर्गिक बंदरात आता आधुनिक सोयी झाल्यामुळे येथे मोठी सागरी जहाजे व्यापारासाठी येऊ शकतात.

नेपल्सची ख्याती ते इटलीचे महत्त्वाचे शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र म्हणून आणि एक जागतिक महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणूनही विशेष आहे. व्हर्जिल, गटे, शेली यांसारखे विद्वान व कवी येथील निसर्गसौंदर्याने व उत्साहवर्धक हवापाण्याने आकर्षित झाले होते. सतराव्या-अठराव्या शतकांपासून स्कार्लाट्टी, पाईझ्येल्लो, चीमारॉझा, पेर्गोलेसी इ. संगीतकारांमुळे नेपल्सचे नाव झाले. १२२४ मध्ये स्थापन झालेल्या नेपल्स विद्यापीठामुळे ते विद्येचे केंद्र बनले. राष्ट्रीय ग्रंथालय, राष्ट्रीय उद्यान व तेथील सागरी प्राणिसंग्रह व तद्विषयक शिक्षणसंस्था, राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयात पाँपेई व हर्क्युलेनियम येथील अभिजात शिल्प व अनमोल वस्तू, राष्ट्रीय कलावीथीतील चित्रसंग्रह, ऐतिहासिक वस्तुसंग्रह तसेच येथील मध्ययुगीन चर्च, किल्ले, राजवाडे, नाट्यगृहे इ. सांस्कृतिक आभूषणांमुळे नेपल्सचे वैभव डोळ्यात भरते. अनेक सण व उत्सव, नाट्यगायन, वादन, संगीतिका यांचे समारंभ येथे वर्षभर चालू असतात. नेपल्सच्या विविधस्तरीय सांस्कृतिक वारशाचे जटिल स्वरूप तेथील रस्ते, वास्तू, सामाजिक प्रवृत्ती व चालीरीती यांतून प्रतीत होते.

औद्योगिकीकरणाने नेपल्सला आधुनिकतेच्या वस्त्राभरणाबरोबरच ओंगळ गलिच्छतेची लक्तरेही नेसविली आहेत. सुंदर राजरस्ते व विहारस्थळे यांना लागूनच अरुंद, गलिच्छ गल्ल्या व बोळ सुंदर, सुवासिक फुलांच्या दुकानांशेजारीच घाणेरडी वस्त्रे उघड्यावर वाळविणारी बेडौल घरे, आधुनिकतम मोटारगाड्यांबरोबरच प्रशस्त राजरस्त्यांवरून रखडत जाणारे मोडके खटारे, मूर्तिमंत वैभवाशेजारीच मूर्तिमंत दारिद्र्याचे प्रदर्शन, फसवणूक, चोऱ्यामाऱ्या इ. फुटकळ गुन्हेगारी प्रवृत्ती या सर्व विरोधमय जीवनसंग्रामात संगीत व धर्मश्रद्धा यांनीच येथील सत्प्रवृत्त लोकांस तगवून धरले आहे.

अर्धचंद्राकृती उपसागर, त्याच्या तोंडाजवळची काप्री व इस्किया ही रम्य द्वीपे, पार्श्वभूमीवरील व्हीस्यूव्हिअस ज्वालामुखी, किनाऱ्यापासून चढत गेलेल्या टेकड्या, दाट वनश्री व प्राचीन आणि अर्वाचीन सुंदर वास्तूंनी खच्चून भरलेले शहर, तेथील कलात्मक आकर्षणे पिझ्झा, पास्ता व इतर चविष्ट आणि खास इटालियन खाद्यपदार्थांची दुकाने, कष्टाची व दारिद्र्याची पर्वा न करता ठिकठिकाणी जमून नाचगाण्यांत व विनोदांत रमून जाणारे लोकांचे घोळके यांमुळे नेपल्स हे हौशी प्रवाशांना आकर्षित करणारे यूरोपातील एक मोठे व महत्त्वाचे पर्यटन केंद्र बनले आहे. पर्यटन व्यवस्था हे शहराचे एक मोठे प्राप्तिसाधन आहे.

ओक, द. ह.