नीटेलीझ : (उंबळी गण). प्रकटबीज वनस्पतींपैकी एका आधुनिक व फार प्रगत वनस्पतींच्या गणाचे हे नाव आहे. या वनस्पतींची काही लक्षणे आवृतबीज वनस्पतींसारखी (फुलझाडांसारखी) असल्याने त्यांचा समावेश प्रारंभिक गण म्हणून याच गटात करावा असे काही तज्ञ म्हणतात, तसेच दोन्ही प्रकारच्या बीजी वनस्पतींना सांधणारा नीटेलीझ हा एक दुवा आहे असेही सुचविले जाते. आवृत्तबीजी क्रिटेशस (सु. १४–९ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळात जीवाश्मरूपात (शिळारूप अवशेषांच्या रूपात) भरपूर आढळतात. त्या काळापूर्वीच्या खडकांत नीटेलीझ गणाचे जीवाश्म आढळत नाहीत. त्यामुळे तो गण आवृत्तबीजींचा पूर्वज असण्याचा संभव वाटत नाही. कदाचित नीटेलीझ गण आणि आवृत्तबीजी हे दोन्ही गट समान पूर्वजापासून स्वतंत्रपणे विकास पावले असावेत, तसेच हे पूर्वज इतर प्रकटबीजींच्या पूर्वजांबरोबरच समान पूर्वजांपासून अवतरले असावेत हे शक्य दिसते. नीटेलीझ गणाची अनेक लक्षणे ⇨कॉनिफेरेलीझ गणाप्रमाणे (शंकुमंत गणाप्रमाणे) आहेत.

सध्या पूर्व व पश्चिम गोलार्धांत ह्या गणातील ६७–७० जाती आढळतात. मात्र एफेड्रा, वेल्‌विशिया नीटम अशा यातील तीन वंशांपैकी वेल्‌‍विशिया (तुंबोआ) या वंशातील एकमेव जाती फक्त नैर्ऋत्य आफ्रिकेतील मरुप्रदेशात आढळते. एफेड्राच्या ३२ जाती रुक्ष क्षारीय (अल्कलाइन) जमिनीत जगातील खडकाळ व कोरड्या प्रदेशांत सापडतात. यांपैकी ४ जाती (अस्मानिया) भारतात दक्षिण पंजाब, राजस्थान, हिमालयात काश्मीर ते सिक्कीम, पांगी, कुलू, जौंसर व लाहूल येथे आणि पाकिस्तानात सिंधमध्ये आढळतात. नीटमच्या सु. ३४ जातींपैकी ६ विषुववृत्तीय अमेरिकेत, २ पश्चिम अमेरिकेच्या उष्ण भागात आणि उरलेल्या आशियाच्या उष्ण भागात, विशेषतः मलेशियात व आफ्रिकेत पण सर्वत्र दाट जंगलात आढळतात. भारतातील (कुन्नूर, क्विलॉन, निलगिरी, नागा टेकड्या, आसाम, खासी, बंगाल, अंदमान व निकोबार बेटे इ.) पाच जातींपैकी नीटम उला (नीटम स्कॅडेन्स, म. कुंबळ, उंबळी) पूर्व व पश्चिम घाटांतील गर्द जंगलात सु. १,३५० मी. उंचीपर्यंत व ओरिसा आणि छोटा नागपूर येथे सापडते.

वर्गीकरण : नीटेलीझ गणाच्या वर्गीकरणाबद्दल मतभेद आहेत. वर सांगितलेले तीन वंश एकाच कुलात समाविष्ट करून नीटेसी (उंबळी कुल) या नावाचे कुल आतापर्यंत ओळखले जात असे, पण अलीकडे या तीन वंशांतील लक्षणांबाबत आढळलेले महत्त्वाचे फरक लक्षात घेऊन प्रत्येक वंशाचा समावेश स्वतंत्र कुलात केला जातो व त्या सर्वांचा एक गण (नीटेलीझ) मानला जातो (ए. बी. फॉस्टर आणि ई. एम्. गिफर्ड) काही शास्त्रज्ञ (आर्. फ्लोरीन व ए. जे. इम्स) तर यापुढे जाऊन यांपैकी प्रत्येक कुलाला स्वतंत्र गणाचा दर्जा देतात. सार्कोपस ॲबरँस या इंडोचायनातील नवीन जातीचा शोध १९४६ मध्ये एफ्. गॅग्नपेन यांनी लावला. या वनस्पतीला द्विलिंगी फुले असून त्यात एकाकी उघडे बीजक आढळते. या चौथ्या वंशाचा अंतर्भाव स्वतंत्र कुलात (सार्कोपेडिएसी) केला गेला आहे. ही जाती सर्वप्रगत समजतात. पहिल्या तीन वंशांचा तपशीलवार अभ्यास झाला असून त्यानुसार या नीटेलीझ गणाची प्रमुख लक्षणे सारांशरूपाने पुढे दिली आहेत.

या वनस्पती काष्ठयुक्त, थोड्याफार शाखायुक्त (अपवाद वेल्‌विशिया) व द्विभक्तलिंगी (नर व मादी अशी स्वतंत्र) आहेत. यांची पाने साधी, समोरासमोर असून यांच्या संयुक्त शंकूंमध्ये (फुलोऱ्यांत) २–४ परिदलासारखी उपांगे असलेली ‘फुले’ (फुलझाडांतील फुलांहून काही बाबतींत भिन्न अशी इंद्रिये) आढळतात. बियांत दोन दलिका व पुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश) भरपूर असते. द्वितीयक प्रकाष्ठात (जलीय विद्राव वाहून नेणाऱ्या व वनस्पतीला आधार देणाऱ्या भागात) वाहिन्या आणि लिग्निन (काष्ठीर) नावाचा पदार्थ असून रेझीन-नलिका नसतात. पुं-पुष्पात २–८ केसरदले (लघुबीजुकपर्णे), स्त्री -पुष्पात एक सरळ बीजक (गुरुबीजुककोश) व त्याला एक किंवा दोन आवरणे असून आतील आवरण लांब नळीसारखे वाढून बाहेर आलेले असते [→ फूल]. परागण ( परागाचा किंजल्काशी संपर्क) बहुधा वाऱ्याकडून होते. पराग (लघुबीजुक) या नळीच्या तोंडावर (बीजुकरंध्रावर) पडतात. रेतुके [चलनशील पुं-जनन पेशी (कोशिका)] नसतात. या गणातील वनस्पतींचे जीवाश्म अत्यल्पच आहेत. एफेड्रा, वेल्‌विशियानीटम या तीन वंशांच्या लक्षणांचा तपशील थोडक्यात पुढे दिला आहे.

आ.१. एफेड्रा : (अ) पुं-शंकुयुक्त शाखा (आ) छदयुक्त पुं-पुष्प, अक्षावर लघुबीजुककोश (परागकोश) (इ) स्त्री-शंकुयुक्त शाखा (ई) स्त्री-शंकु (उ) स्त्री-शंकूचा उभा छेद : (१) परिदल, (२) अंतरावरण, (३) छदे, (४) बीजक (ऊ) रंदुकविकास : (१) आलंबक कोशिका, (२) गर्भकोशिका (ए) बीजाचा छेद : (१) बीजरंध्र, (२) दलिका, (३) पुष्क, (४) परिपुष्क, (५) परिदलापासून बनलेले बीजावरण, (६) बीजकतल.एफेड्रा वंशातील कित्येक जाती लहान (आ. १) व काही मोठी क्षुपे (झुडपे) आहेत. एक भारतीय जाती (ए. फोलिएटा ) ६·२५ मी.उंचीची वेल आहे. द. पंजाब व राजस्थान येथील मैदानी प्रदेशात ती आढळते. तिची फळे खाद्य आहेत. खोड व फांद्या हिरव्या, सांधेदार व रेषांकित असून प्रत्येक पेऱ्यावर समोरासमोर (किंवा मंडलित), बारीक खवल्यासारखी, समांतर शिरांची व तळास जुळलेली पाने असतात. नीटमच्या (आ. २) बहुतेक जाती वेली आणि काही क्षुपे व लहान वृक्ष आहेत. वेल्‌विशियाची (आ. ३) एकमेव आणि फार क्वचित आढळणारी जाती (वे. मिरॅबिलिस ) एक विलक्षण क्षुप असून वार्षिक सरासरी १–३ सेंमी. पावसाच्या प्रदेशात सापडते. खोड ग्रंथील (जाडजूड व मांसल) आणि एखाद्या प्रचंड गाजरासारखे असून काही भाग जमिनीत वर्षानुवर्षे वाढत राहतो, तुंबोआ हे त्याचे आफ्रिकी नाव आहे.


या तिन्ही वंशांतील जातींच्या खोडांच्या टोकांतील ऊतकांची (कोशिकांच्या समूहांची) मांडणी [अग्रस्थ → विभज्या] आणि पानांचा उगम जवळजवळ सारखाच असतो. नीटम एफेड्रा यांचे याबाबत आवृतबीजींशी अधिक साम्य आढळते. नीटमची पाने समोरासमोर, लंबगोल व चिवट असतात. ऱ्हस्व प्ररोह व दीर्घ प्ररोह अशा दोन प्रकारच्या फांद्या असून आरोही जातीत मोठी पाने फक्त मर्यादित (ऱ्हस्व) व लहान खवल्यासारखी पाने दीर्घ फांद्यांपासून उगवतात [→ गिंकोएलीझ]. यातील शिरांची मांडणी द्विदलिकित वनस्पतींच्या पानांप्रमाणे जाळीदार असते. वेल्‌विशियाची केवळ दोनच लांबट पाने आयुर्मानाच्या बाबतीत सर्व वनस्पतींत पहिल्या क्रमांकाची ठरतात. ती खोडाच्या माथ्यावर परिघाजवळ दोन अर्धवर्तुळाकृती खाचांतून तळात प्रारंभापासून सतत वाढत राहतात व टोकाचा भाग जसजसा जून होईल तसतसा तो फाटत जाऊन त्याच्या अनेक पट्ट्या जमिनीवर लोळत पडतात. पानाची लांबी सु. १·८५ मी. व रुंदी ६० सेंमी. असून ती ताठर असतात. तळातून अनेक समांतर शिरा निघून टोकाकडे जातात व त्यांचा परस्परसंबंध लहान, सांधणाऱ्या, आडव्या शिरांमुळे सतत चालू राहतो.

या गणातील सर्व वनस्पतींना द्विदलिकितांप्रमाणे एक सोटमूळ (प्रधानमूळ) असते.

आ. २. नीटम : (अ) पुं-शंकुधारी शाखा (आ) पुं-शंकूचा भाग (इ) पुं-पुष्प, तळाशी केसांचा झुबका : (१) परिदलमंडळ, (२) केसरदल व लघुबीजुककोश (ई) स्त्री-शंकू (उ) स्त्री-पुष्पमंडल (ऊ) स्त्री-पुष्पाचा छेद : (१) परिदलमंडळ, (२) बाह्यावरण, (३) अंतरावरण (इ) बीज (ऐ) बीजाचा छेद : (१) पुष्क, (२) परिदलाचे आवरण, (३) बीजाचे बाह्यावरण, (४) बीजाचे अंतरावरण.प्रजोत्पादन: नीटेलीझमध्ये दोन प्रकारची बीजुके (लघू व गुरू) बहुधा दोन भिन्न झाडांवर शंकूसारख्या पुष्पबंधात येतात. तथापि एका प्रकारच्या शंकूत दुसऱ्या प्रकारची बीजुके उत्पन्न करणारी इंद्रिये वंध्य (वांझ) स्थितीत कधीकधी दिसतात. शंकू संयुक्त असतात. एफेड्राच्या जातीत ते २, ३ किंवा ४ च्या झुबक्यांनी स्वतंत्र फांद्यांवर येतात ते कणिशासारखे  [→ पुष्पबंध] असतात. प्रत्येक स्त्री-शंकूत छदांच्या चार जोड्या (पैकी एक परिदल) असून त्या तळाशी जुळून पेल्याप्रमाणे दिसतात. तळापासून टोकाकडे ही छदे मोठी होत जातात. सर्वांत वरच्यात दोन (क्वचित एक) बीजके असतात. नीटममध्ये व वेल्‌विशियात स्त्री-शंकू अधिक लांबट असून त्यांवर छदांच्या बगलेत अनेक बीजके असतात. एफेड्रा व नीटमच्या बीजकातील दोन आवरणांपैकी आतील (अंतरावरण) वरच्या बाजूस नळीप्रमाणे वाढून डोकावते. त्याच्या टोकास बीजकरंध्र असते. नीटमच्या बीजकावरच्या बाह्यावरणाचे दोन भाग होतात. आतील कठीण आणि बाहेरचा मऊ व मांसल (परिदल) असतो. वेल्‌विशियातही एक आवरण असे नळीसारखे असते. प्रदेह (बीजकातील प्रमुख भाग) सर्वांतच स्पष्ट असतो. एफेड्रात याच्या टोकास परागसंपुट (लहान खोलगट खाच) असते. नीटममध्ये ही खाच उथळ असते परंतु वेल्‌विशियात ती मुळीच नसते.

बीजके व स्त्री गंतुकधारी : एफेड्रा वंशात बीजकात प्रदेहाच्या वरच्या टोकाखाली प्रथम बीजुकजनक कोशिकांची व नंतर त्यांपासून प्रत्येकी तीन एकगुणित गुरुबीजुकांची (फुलझाडांतील गर्भकोशासारख्या कोशिकांची) निर्मिती होते. त्यांपैकी फक्त एकच गुरुबीजुक विकास पावते व त्यामध्ये नंतर अनेक कोशिकायुक्त स्त्री-गंतुकधारी (प्रजोत्पादक स्त्री-कोशिका निर्मिणारी पिढी) बनतो. त्यात दोन अंदुककलश (स्त्री-गंतुक असलेला अवयव) असतात. त्यांची ग्रीवा (नळीसारखा मार्ग) लांब असून उदर-मार्ग कोशिका (अंदुकाजवळचा भाग) दीर्घकाल टिकते. नीटममध्ये गुरुबीजुकजनक कोशिकांमध्ये अर्धसूत्रण [→ कोशिका] होताना कोशिका विभाजन न होता चार प्रकलयुक्त (केंद्रासारखे पुंज असलेले) गुरुबीजुक बनते. हा प्रकार इतर कोणत्याही प्रकटबीजीत होत नाही मात्र काही आवृतबीजींत आढळतो. पुढे या चार प्रकलांपासून अनेक प्रकल बनतात व त्या सर्वांचा मिळून स्त्री-गंतुकधारी बनतो. प्रत्येक प्रकल भावी अंदुक (स्त्री-गंतुक) असते अंदुककलश नसतात. वेल्‌विशियात गुरुबीजुक एफेड्राप्रमाणे बनते व त्यात प्रथम अनेक मुक्त प्रकले (सुटी प्रकले) असतात. नंतर त्यांची वाटणी अनेक कोशिकांत होते व त्या प्रत्येकीत अनेक प्रकल असतात. हा स्त्री-गंतुकधारी असून बीजकाच्या वरच्या भागाकडे असलेल्या गंतुकधारी कोशिकांत प्रकल फार कमी असून त्यांचे वर्तन अंदुकाप्रमाणे असते. खालच्या भागातील कोशिकांत प्रकल विपुल असून ते परस्परांशी संयोग पावतात व पुष्क तयार होते.

पुं-शंकू: नीटेलीझ गणातील पुं-शंकूत छदांच्या अनेक जोड्या असून फक्त वरच्या छदांच्या बगलेत लघुबीजुकधारी (परागकोशासारखे अवयव धारण करणारे) अक्ष असतात. प्रत्येकावर १–८ लघुबीजुककोश असून त्यांची निर्मिती ⇨ कॉनिफेरेलीझप्रमाणे होते. वेल्‌विशियाखेरीज इतर वंशांत वायुपरागण (वाऱ्याच्या साहाय्याने परागसिंचन होणे) असते. पराग बीजकरंध्रावर पडून आत शिरतात व परागसंपुटावर रुजून प्रदेहात परागनलिका वाढतात. वेल्‌विशियाचे परागण एका कीटकाकरवी (ओडोंटोपस) होते. परागातील दोन पुं-गंतुकांखेरीज इतर प्रकलांची किंवा कोशिकांची (पुं-गंतुकधारी) संख्या एफेड्रात फारच थोडी (कॉनिफेरेलीझप्रमाणे) पण नीटमवेल्‌विशियात आणखीच कमी असते. येथे आवृतबीजींशीही थोडेफार साम्य आढळते. एफेड्रात परागनलिकेतील एक प्रकल अंदुकाशी संयोग पावून रंदुक बनते. काहींच्या मते दुसरा प्रकल उदरमार्गातील प्रकलाशी एकरूप होतो. म्हणजे येथे आवृतबीजींतल्याप्रमाणे द्विफलन असते. नीटममध्ये अंदुककलशाच्या अभावी परागनलिकेतील एक प्रकल गुरुबीजुकातील वरच्या बाजूस असलेल्या अनेक अंदुकप्रकलांपैकी एकाशी संयोग पावतो. क्वचित नलिकेतील दुसरा प्रकल दुसऱ्या अंदुकप्रकलाशी संयोग पावून द्विफलन घडून येते. वेल्‌विशियात परागनलिका प्रदेहात येतात. येथे गुरुबीजुकातून बाहेर वाढून आलेल्या नलिकांशी त्यांचा संबंध येतो. पुं-प्रकल व स्त्री-प्रकल यांचा संयोग होऊन अनेक रंदुके बनतात.

आ.३. वेल्‌विशिया : (१) स्त्री-शंकूसह संपूर्ण वनस्पती (२) स्त्री-शंकू (३) पुं-पुष्प, छेद व मध्यभागी केसरदले (४) केसरदल (५) वंध्य बीजक (६) सपक्ष परिदलासह बीज.

फलनानंतर एफेड्राच्या जातीत रंदुकातील द्विगुणित प्रकलाची मुक्त विभागणी होऊन आठ प्रकल बनतात व त्यांच्यासह आठ स्वतंत्र आद्यगर्भ-कोशिका बनतात परंतु यांचा गर्भनिर्मितीचा विकास सुरू असताना एका दोघांतच प्रगती होऊन पूर्णत्व लाभते. कॉनिफेरेलीझप्रमाणे येथे आलंबक कोशिका प्रथम वाढून त्यांच्या टोकास प्रथम गर्भ-कोशिका व नंतर गर्भ निर्माण होतात. नीटमवेल्‌विशिया यांमध्ये अनेक रंदुकांपासून आलंबक कोशिकांसह आद्यगर्भनिर्मिती होते परंतु शेवटी एकाच गर्भाचा समावेश बीजात होतो. कॉनिफेरेलीझप्रमाणे या गणातही बहुगर्भत्व आढळते. या दोन्ही वंशांत रंदुकामध्ये मुक्त प्रकल-विभाजन नसते. या बाबतीत त्यांचे आवृतबीजींशी साम्य दिसून येते.

एफेड्राच्या बीजाला परिदलाचे कवच, बीजावरण व आत द्विदलिकित गर्भाभोवती पुष्काचा जाड व परिपुष्काचा पातळ थर असतो. ते कधी सपक्ष तर कधी मृदुफळाप्रमाणे व बहुधा लाल रंगाचे असते. अंकुरणात त्याच्या दोन दलिका जमिनीवर येतात. वेल्‌विशियाच्या बियांभोवती परिदलापासून दोन रुंद व मोठे पंख बनतात.

एफेड्राच्या काही जातींपासून एफेड्रीन हे औषधी द्रव्य [→ अल्कलॉइडे] काढले असून ते सर्दी, दमा व खोकला इ. विकारांवर गुणकारी ठरले आहे. नीटमचे (नी. नेमॉन) कोवळे पल्लव, फुलोरे, नारिंगी वा लाल फळे व बीजे भाजून किंवा शिजवून खातात. सालीपासून काढलेला धागा कागदाकरिता लगदा, दोर व कोळ्यांची जाळी बनविण्यास वापरतात. लाकूड किरकोळ उपयोगाचे असते. नीटम माँटॅनम ह्या उत्तर भारतातील जातीचा उपयोग मासेमारीकरिता करतात. दक्षिण भारतीय नीटम उलाच्या (उंबळीच्या) बियांतील तेल स्वयंपाकात, दिव्याकरिता आणि संधिवातावर मर्दनास वापरतात. अनामात (व्हिएटनाम) मुळे व खोड पाळीच्या तापावर देतात. भारतीय यज्ञकर्मात ‘सोम’ ह्या वनस्पतीचा उल्लेख आढळतो, ती वनस्पती एफेड्रा व्हल्गॅरिस असावी असे काहींचे मत आहे.

पहा : अस्मानिया कॉनिफेरेलीझ टॅक्सेलीझ वनस्पति, आवृतबीज उपविभाग वनस्पति, प्रकटबीज उपविभाग सोमलता.

संदर्भ : 1. Datta, S. C. An Introduction to Gymnosperms, Bombay, 1966.

           2. Maheshwari, P. Vasil, V. Gnetum, New Delhi, 1961.

           3. Mukherji, H. Ganguli, A. K. Plant Groups, Calcutta, 1964.

           4. Pearson, H. H. W. Gnetales, London, 1929.

           5. Rendle, A. B. Classfication of Flowering Plants, Vol. II, Cambridge, 1963.

परांडेकर, शं. आ.