नीकॉल, शार्ल झ्यूल आंरी :(२१ सप्टेंबर १८६६–२८ फेब्रुवारी १९३६). फ्रेंच वैद्य व सूक्ष्मजंतुवैज्ञानिक. १९०९ मध्ये मानवाच्या अंगावरील पेडिक्यूलस ह्युमॅनस प्रकार कॉर्पोरिस नावाच्या उवा ⇨ प्रलापक सन्निपात ज्वर (टायफस ज्वर) फैलावण्यास कारणीभूत असतात, हे शोधून काढल्याबद्दल त्यांना शरीरक्रियाविज्ञान किंवा वैद्यक या विषयाचे १९२८ चे नोबेल पारितोषिक देण्यात आले.

त्यांचा जन्म रूआन, फ्रान्स येथे झाला. रूआन व पॅरिस येथे शिक्षण घेऊन त्यांनी १८९३ मध्ये एम्. डी. ही पदवी मिळविली. रूआन वैद्यकीय विद्यापीठात सूक्ष्मजीवविज्ञानाचे प्राध्यापक असताना त्यांच्या कार्याचे महत्त्व फ्रेंच सरकारच्या लक्षात आले. ट्युनिशियामधील सरकारी आरोग्य सेवा संस्थांचे उद्घाटन यांच्या हस्ते १९०३ मध्ये करण्यात आले. ट्युनिस येथील पाश्चर इन्स्टिट्यूटच्या एका शाखेचे प्रमुखपदही त्यांना देण्यात आले. या संस्थेचे संचालकपद त्यांनी १९३२ पर्यंत भूषविले. या काळात त्यांनी संसर्गजन्य रोगांवरील इलाजाकरिता प्रतिबंधक लस व रक्तरस तयार केले. शिवाय त्यांच्या कारकीर्दीत या संस्थेने सूक्ष्मजंतुविज्ञानविषयक संशोधनकार्याची अग्रगण्य संस्था म्हणून जागतिक कीर्ती मिळविली. १९२८ मध्ये त्यांनी या संस्थेच्या संचालकपदाची २५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल एक खास सुवर्ण पदक काढण्यात आलेले होते.

मानवाला प्रलापक सान्निपात ज्वर उवा व पिसवा या दोन निरनिराळ्या रोगवाहकांमुळे होतो, हे त्यांनीच सिद्ध केले. बुळकांड्या, ब्रूसेलोसिस (प्राण्यांद्वारे मानवात फैलावणारा व ब्रूसेला सूक्ष्मजंतूंपासून होणारा, ज्वर येणारा रोग), गोवर, घटसर्प, लोहितांग ज्वर (स्कार्लेट ज्वर) व क्षयरोग या रोगांबद्दलच्या ज्ञानात त्यांनी मौलिक भर घातली. त्यांची १९३२ मध्ये कॉलेज द फ्रान्समध्ये एका अध्यासनावर निवड झाली. शास्त्रीय ज्ञानाशिवाय तत्त्ववेत्ते म्हणूनही ते नावाजले होते. ते ट्युनिस येथे मरण पावले.

कानिटकर, बा. मो. भालेराव, य. त्र्यं.