निसर्गचित्रण : (लँडस्केप पेंटींग). ज्या चित्रात निसर्गपरिसर व त्याच्याशी संबंधित असलेल्या गोष्टी रंगविलेल्या असतात, त्यास सर्वसाधारणपणे निसर्गचित्र आणि त्याच्या निर्मितिप्रक्रियेस निसर्गचित्रण असे म्हणता येईल. विविध प्रकारचा भूप्रदेश, दऱ्या, खोरी, जंगले, सागर व त्याचबरोबर निसर्गाच्या पार्श्वभूमीवर वसलेली शहरे यांचा निसर्गचित्रणात अंतर्भाव होतो. अशा चित्रांत कैकदा मनुष्याकृतीही असतात पण त्यांना प्राधान्य दिले जात नाही.

इसवी सनाच्या पहिल्या शतकात रंगविलेल्या पाँपेई येथील भित्तिचित्रांत निसर्गचित्रणाची सुरुवात आढळते. शिवाय ख्रिस्ती व बायझंटिन कलांमध्येही पार्श्वभूमी म्हणून निसर्गचित्रणाचा उपयोग केलेला दिसतो. तथापि हे चित्रण बहुतांशी आलंकारिक पद्धतीचे आहे. चौदाव्या शतकातील इटालियन चित्रकार जॉत्तो (सु. १२६७–१३३७) याच्या चित्रांतील पार्श्वभूमीमध्ये निसर्गचित्रणाचा अभ्यासपूर्ण आविष्कार दिसून येतो. त्याच काळातील चित्रकार सीमोने मार्मीनी (सु. १२८४–१३४४) व आंब्रॉजो लोरेंत्सेत्ती (सु. १३००–४८) यांनी मात्र स्वतंत्रपणे शहरांची चित्रे रंगविली. सोळाव्या शतकाच्या प्रारंभीचा फ्लेमिश चित्रकार जोआकिम पातिनीर (सु. १४८५–१५२४) हा पहिला महत्त्वपूर्ण निसर्गचित्रकार मानला जातो. त्याचप्रमाणे थोरला पीटर ब्रगेल (सु. १५२५–६९) हाही त्याकाळचा एक प्रख्यात चित्रकार असून त्याच्या चित्रांतून निसर्गदृश्यांचा सखोल अभ्यास दिसून येतो.

पंधराव्या शतकात इटलीमध्ये यथादर्शन तत्त्वाच्या सखोल अभ्यासानंतर अवकाशाची एक वेगळीच जाणीव चित्रकारांना झाली. परिणामतः तत्कालीन इटालियन निसर्गचित्राणात बऱ्याच अंशी गणिती विश्लेषण आढळते. लिओनार्दो दा व्हींचीच्या (१४५२–१५१९) चित्रांत तर भूगर्भशास्त्रीय अवलोकनाचा भास होतो.

निसर्गचित्रणाचे खरे सुवर्णयुग म्हणजे सतरावे शतक. त्या काळापर्यंत यूरोपभर या चित्रपद्धतीचा प्रसार झाला. विशेषतः प्रख्यात डच चित्रकार यान व्हरमेर (१६३२–७५) याने रंगविलेली शहरांची चित्रे अक्षरशः अजोड आहेत. त्याचप्रमाणे याकॉप व्हान रॉइस डाल (१६२८–८२) याच्या निसर्गचित्रांतील जंगले, पठारे, जलाशये इ. गोष्टी जिवंतपणाचा आभास निर्माण करतात. अठराव्या शतकात व्हेनिशियन चित्रकारांनीही अनेक निसर्गचित्रे रंगविली. त्यांत कानालेत्तो (१६९७–१७६८) व फ्रांचेस्को ग्वार्दी (१७१२–९३) यांची चित्रे श्रेष्ठ मानली जातात. याच सुमारास इंग्लंडमध्येही निसर्गचित्रणाला बहर आला. तथापि हे निसर्गचित्रण विशेषत्त्वाने व्यक्तिचित्राच्या पार्श्वभूमीदाखल केले जात असे. गेन्झबर (१७२७–८८) व विल्यम होगार्थ (१६९७–१७६४) यांच्या व्यक्तिचित्रांतील पार्श्वभूमी या दृष्टीने अभ्यसनीय आहे.

अठराव्या शतकाच्या अखेरीस व एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात इंग्लंडमध्ये निसर्गचित्रणास विशेष महत्त्व प्राप्त झाले. इंग्लिश चित्रात सर्वसामान्यतः आढळणारे करडे (ग्रे) आणि मातकट तपकिरी (ब्राउन) रंग कमी होऊ लागले व अधिक शुद्ध व तजेलदार रंगांचा आविष्कार दिसू लागला. त्या काळातील पॉल सँडबी (१७२५–१८०९), टॉमस गर्टिन (१७७५–१८०२), जॉन सेल कॉट्म (१७८२–१८४२) यांच्या निसर्गचित्रांत अधिक जिवंतपणा निर्माण झाला. पुढे ⇨ टर्नर (१७७५–१८५१) व ⇨ कॉन्स्टेबल (१७७६–१८३७) यांनी तर निसर्गचित्रणामध्ये अलौकिक चित्रनिर्मिती केली. टर्नरच्या चित्रांतील संवेदनक्षमतेने वातावरणाचा निर्माण केलेला आभास व कॉन्स्टेबलच्या चित्रांतील घनता व भावदर्शन ही वैशिष्ट्ये कलेच्या इतिहासात चिरंतन ठरली आहेत. विसाव्या शतकात पहिल्या महायुद्धानंतर इंग्लिश निसर्गचित्रणात मोठी परिवर्तने घडून आली आणि १९३०–४० च्या दरम्यान निसर्गचित्रणाच्या अनेक शैली प्रसृत झाल्या. या काळातील महत्त्वाचे चित्रकार म्हणजे पॉल नॅश (१८८९–१९४६), ग्रॅहॅम सदरलँड (१९०३ –  ), जॉन पायपर (१९०३ –   ), व्हीक्टर पासमोर (१९०८ –  ), इत्यादी.

इंग्लंडप्रमाणे फ्रान्समध्येही एकोणिसाव्या शतकापासून निसर्गचित्रणाला विशेष प्राधान्य मिळाले. गुस्ताव्ह कूर्बे (१८१९–७७) याने फ्रेंच चित्रांतील भावविवशता टाळून निसर्गचित्रणाला रंगांचा रसरशीतपणा प्राप्त करून दिला. त्यानंतर एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात एका नव्या चित्रकारपिढीचा उदय झाला व त्यातील चित्रकारांनी निसर्गचित्रणाचा दृष्टिकोणच बदलून टाकला. निसर्गात क्षणोक्षणी होणारे बदल व प्रकाशाची विविध रूपे या गोष्टींचा त्यांनी सखोल अभ्यास केला व त्यायोगे निसर्गचित्रणाची एक आधुनिक शैली उदयास आली. ती कलेतिहासात ⇨ दृक्‌प्रत्ययवाद या नावाने ओळखली जाते. ही शैली निर्माण करणारे प्रमुख चित्रकार म्हणजे मॉने (१८४०–१९२६), माने (१८३२–८३), सिसले (१८३९–९९), पीसारो (१८३०–१९०३) आणि रन्वार (१८४१–१९१९). त्याचप्रमाणे पुढे सरा (१८५९–९१) व सेझान (१८३९–१९०६) यांनीही आपापल्या स्वतंत्र चित्रशैली निर्माण केल्या. सेझानच्या शैलीतूनच पुढे घनवादाच्या आधुनिक संप्रदायाला प्रेरणा लाभली.

विसाव्या शतकात फ्रान्समध्ये व अन्य देशांतही निसर्गचित्रणाचे विविध प्रकार हाताळले जाऊ लागले. रंगभारवाद, अभिव्यक्तिवाद, अतिवास्तववाद इ. अनेक प्रकारच्या आधुनिक कलाप्रणालींतून निसर्गचित्रणाला नवनवी रूपे लाभत गेली. पुढेपुढे तर वस्तूचे प्रतिरूप चित्रांतून अदृश्य होत जाऊन, अगदी साध्यासुध्या आकाररचनेतून निसर्गाचे दर्शन घडवले जाऊ लागले. किंबहुना चित्रनिर्मितीला स्फूर्ती देण्याइतपतच निसर्गावलोकनाचे महत्त्व शिल्लक राहिले. अशा वेगवेगळ्या शैलीतून निसर्गचित्रण करणारे प्रख्यात आधुनिक चित्रकार म्हणजे आंद्रे दरँ (१८८०–१९५४), ऑस्कर कोकोश्का (१८८६ – ), एडव्हार्ट मुंक (१८६३–१९४४), प्येअर बॉनार (१८६७ –१९४७), राउल द्युफी (१८७७–१९५३), साल्वादोर दाली (१९०४ – ), नीकोला द स्ताल (१९१४–५५) इत्यादी.

भारतामध्ये निसर्गचित्रणाची खास अशी पद्धती अस्तित्त्वात नसली, तरी मोगल व राजपूत लघुचित्रांमधून निसर्गाचे सूक्ष्म चित्रण व वेगवेगळे भाव जाणवतात. तथापि त्या निसर्गचित्रणात आलंकारिकताही प्रकर्षाने जाणवते.

भारतात यूरोपीय धाटणीचे निसर्गचित्रण इंग्रजांच्या अंमलापासून सामान्यपणे झाले. त्यांनी स्थापन केलेल्या कलाविद्यालयांतून सु. १८५० नंतर यूरोपीय निसर्गचित्रणपद्धती शिकविली जाऊ लागली. भारतात खास निसर्गचित्रकार म्हणून सुरुवातीच्या काळात प्रसिद्धीस आलेले चित्रकार म्हणजे आबालाल रहिमान, ठाकूरसिंग, राय चौधरी, त्रिंदाद, परांडेकर, हळदणकर इ. होत. उत्तरकालीन निसर्गचित्रकारांमध्ये डी. जे. जोशी, बेंद्रे, धोंड, पॉलराज, नायक हे होत. आधुनिक चित्रकारांत निसर्गदृश्यांचा आधार घेऊन चित्रनिर्मिती करणारे कलावंत रझा, पद्मसी, साबवाला, हर क्रिशनलाल इ. होत.

सडवेलकर, बाबुराव


'ला ग्रनुईयेर' (१८६९) -क्लोद मॉने.'सन राइझिंग थ्रू व्हेपर' (१८०१) -टर्नर.'लँडस्केप ऑफ पोर्ट लिगात' (१९५०) -साल्वादोर दाली.'सॉल्झबरी कॅथीड्रल फ्रॉम द बिशप्स गार्डन' (१८२३) -कॉन्स्टेबल.


'रावणेश्वर' (सु. १९२४) -आबालाल रहिमान.'डलिज कॉलेज' (१८७१) -कामीय पीसारो'दहिसर पूल' (१९४३) -सा. ल. हळदणकर.'व्ह्यू ऑफ डेल्फ्ट ' (सु. १६५८) -थानव्हरमेर