निवेश-उत्पाद विश्लेषण : अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिकाचा विजेता प्राध्यापक लेआँटिएफ याने उत्पादनाचे अनुभवाधिष्ठित पृथक्करण करताना अर्थव्यवस्थेच्या सार्वत्रिक समतोलाच्या घटना विचारात घेण्याचा जो प्रयत्न केला, त्याला ‘निवेश-उत्पाद विश्लेषण’ असे नाव आहे. हे विश्लेषण केवळ उत्पादनाविषयी असून त्यामध्ये मागणी-सिद्धांताचा विचार केलेला नाही. शिवाय ते प्रत्यक्ष अनुभवावर अधिष्ठित असून अर्थव्यवस्थेतील विविध उद्योग आपापल्या योजना व कार्यक्रमांसाठी परस्परांवर कसे अवलंबून आहेत, हे दाखविण्याचा या विश्लेषणपद्धतीत प्रयत्न केला आहे. एखाद्या उद्योगासाठी लागणारा कच्चा माल हा अन्य उद्योगांच्या उत्पादनातूनच उपलब्ध होतो व म्हणूनच ते परस्परावलंबी असतात. उदा., पोलादापासून रेल्वे वाघिणी तयार होतात व त्या वाघिणींचाच उपयोग पोलादाची व पोलादासाठी लागणारा कोळसा आणि कच्चे लोखंड यांची वाहतूक करण्यासाठी होत असतो. यातून मुख्य प्रश्न उद्भवतो तो हा की, अखेर उपभोक्त्यांसाठी उत्पादातील किती निव्वळ उत्पादन शिल्लक राहू शकेल व ते शिल्लक राहावे म्हणून उत्पादन कार्यक्रमासाठी प्रत्येक वस्तूच्या उत्पादापैकी किती भाग खर्च करावा लागेल. ही समस्या सुलभ करणाऱ्या काही गृहीतकृत्यांचा अवलंब करून एखाद्या अर्थव्यवस्थेत अखेर उपयोगासाठी विशिष्ट परिमाणात वस्तू उपलब्ध होण्यासाठी त्या त्या वस्तूंचे उत्पादन किती प्रमाणावर केले पाहिजे, याचा अंदाज करता येतो. विविध वस्तूंच्या मागणीचे प्रमाण माहीत झाल्यास भविष्यकाळात त्यांचे उत्पादन किती केले असता अर्थव्यवस्थेचा सार्वत्रिक समतोल साधता येईल, हे निवेश–उत्पाद–विश्लेषणपद्धतीचावापर करून काढता येते. साहजिकच हे विश्लेषण राष्ट्रीय विकासाच्या आर्थिक नियोजनासाठी व राष्ट्रीय उत्पन्न लेखांकनासाठी अतिशय उपयोगी पडते.
निवेश–उत्पाद विश्लेशणासाठी सामान्यतः निवेश–उत्पाद तक्ता तयार करावा लागतो. या तक्त्याची प्रत्येक आडवी ओळ त्या उद्योगाचा उत्पाद निरनिराळ्या उद्योगांच्या उत्पादन प्रक्रियांसाठी व अंतिम उपभोगांसाठी कसकसा वापरला जातो, हे आकड्यांनिशी दर्शविते. तक्त्याचा प्रत्येक उभा स्तंभ प्रत्येक उद्योगाने उत्पादनासाठी वापरलेल्या विविध उत्पादक साधनांचे प्रमाण आकडेवारीने दर्शवितो. असा निवेश–उत्पाद तक्ता समग्र अर्थव्यवस्थेसाठी एकाद्या कालखंडापुरता (उदा., वर्षासाठी) तयार करता येतो व त्यावरून अर्थव्यवस्थेतील विविध विभागांमधील वस्तू व सेवा यांचा प्रवाह कसा वाहतो, हे समजते. एका त्रिविभागीय अर्थव्यवस्थेच्या निवेश–उत्पाद तक्त्याचे उदाहरण पुढे दिले आहे :
निवेश–उत्पाद तक्ता [आकडे प्रत्यक्ष (फिजिकल) एककांत] |
||||
विभाग १ विभाग २ विभाग३ |
||||
कृषी |
निर्मिती उद्योग |
घरगुती |
एकूण उत्पादन |
|
विभाग १–कृषी |
३० |
१५ |
५५ |
१०० क्वि. गहू |
विभाग २–निर्मितीउद्योग |
११० |
७० |
२२० |
४०० मी. कापड |
विभाग ३–घरगुती |
६० |
१९० |
५० |
३०० कामगार-वर्ष श्रमशक्ती |
कृषी, निर्मितीउद्योग व घरगुती हे कल्पित अर्थव्यवस्थेचे तीन विभाग असून त्यांचे एकूण उत्पादन अनुक्रमे १०० क्विंटल गहू, ४०० मी. कापड व ३०० कामगार–वर्ष श्रमशक्ती असे आहे. तक्त्यामधील नऊ आकडे आंतरविभागीय प्रवाह दर्शवितात. उदा., कृषीउद्योगाच्या एकूण १०० क्विंटल गव्हाच्या उत्पादापैकी ३० क्विंटल कृषी विभागातच वापरण्यात आले आहे. १५ क्विंटलचा उपयोग निर्मितीउद्योग विभागाने कच्चा माल म्हणून केला व ५५ क्विंटल गहू घरगुती विभागामध्ये वापरण्यात आला. तसेच कृषी विभागाने संबंधित कालखंडात ३० क्विंटल गहू, ११० मी. कापड व ६० कामगार-वर्ष श्रमशक्ती या साधनांचा वापर केला, असे वरील तक्त्यांमधील आकड्यांचा पहिला स्तंभ दर्शवतो. असा तक्ता प्रत्यक्ष एककांऐवजी त्यांचे रुपयांत मूल्य दाखवूनही करता येतो. अशा तक्त्यांचा वापर करून विवक्षित प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी एकसमयावच्छेदी समीकरणे उपलब्ध होतात व ती सोडवून अर्थव्यवस्थेत सार्वत्रिक समतोलसाधण्यासाठी विविध विभागांचे उत्पादन किती प्रमाणात असावे, हे ठरविता येते.
निवेश–उत्पाद तक्ते सबंध अर्थव्यवस्थेसाठी बनविता येतात, तसेच अर्थव्यवस्थेच्या उपांगांसाठीदेखील तयार करता येतात. निरनिराळ्या उद्योगांना विशिष्ट उपभोगाची मागणी पुरी करता यावी, म्हणून आपल्या उत्पादनकार्यक्रमाच्या योजना आखण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. अर्थशास्त्रात या तक्त्यांचा वापर मुख्यत्वे राष्ट्राच्या किंवा त्यातील विशिष्ट प्रदेशाच्या मागणीचे, उत्पादनाचे, रोजगाराचे व विनियोगाचे आराखडे तयार करण्यासाठी केला जातो. तंत्रविद्याविषयक फेरफारांच्या उत्पादकतेवरील परिणामांचे तसेच वेतन, नफा व कर यांमधील बदलांमुळे होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण आणि आंतरराष्ट्रीय आणि आंतरविभागीय अर्थसंबंधांचा अभ्यास करताना असे तक्ते उपयोगी पडतात. साहजिकच नियोजित अर्थव्यवस्थेत व विकसनशील राष्ट्रांमध्ये या तक्त्यांचा व विश्लेषणपद्धतीचा उपयोग अलीकडे योजनाकार वाढत्या प्रमाणावर करू लागले आहेत.
संदर्भ : Baumol, W. J. Economic Theory and Operations Analysis, New Delhi, 1963.
धोंगडे, ए. रा.
“