निवगूर :(मारांदी हिं. हर्कुकांत, हरकुच काटा क. होळेचुळ्ळी सं. हरिकुस इं. सी-हॉली लॅ. ॲकँथस इलिसिफोलियस कुल-ॲकँथेसी). हे सदापर्णी झुडूप समुद्रकिनारी खारट चिखलात वाढते. याचा प्रसार भारत, श्रीलंका, मलेशिया, फिलिपीन्स, ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका इ. देशांत आहे. याची अनेक गोलसर जाड खोडे सरळ वाढतात. पाने ७·५–१५ X ५·८ सेंमी., संमुख (समोरासमोर), साधी, जाड, चिवट, गुळगुळीत, दातेरी, काटेरी, नागमोडी व काहीशी खंडित असतात तळाशी दोन उपपर्णी काटे असतात. फुले अवृंत (बिनदेठाची), मोठी, निळी, जोडीने समोरासमोर व एप्रिल ते मेमध्ये येतात. बोंड (फळ) २·५ सेंमी. लांब, पिंगट, लंबगोल, गुळगुळीत व चकचकीत असून बी चपटे, वाटोळे व बीजावरण सुटे असते. सामान्य शारीरिक लक्षणे⇨ॲकॅंथेसी कुलात (वासक कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. याची पाने संधिवात व तंत्रिकाशूलावर (मज्जातंतूच्या तीव्र वेदनांवर) शेकण्यास उपयुक्त सूजेवर पाने वाटून बांधतात. काढा अग्निमांध्यावर (भूक मंद झाल्यावर) देतात. पानांचा रस कफप्रधान रोगात व दम्यात गुणकारी असतो. पाला गुरे, शेळ्या व मेंढ्या यांना खाऊ घालतात.
पहा : लवण वनस्पति.
नवलकर, भो. सुं.