निर्वस्तुभ्रम : (हॅलूसिनेशन). वेदक नसांचे कोणत्याही प्रकारच्या उद्दीपकाने उद्दीपन झालेले नसताना संवेदनदृश्य प्रत्यय येणे, म्हणजे निर्वस्तुभ्रम होय. असे प्रत्यय केवळ मानसप्रतिमांच्या स्वरूपाचे असतात. निर्वस्तुभ्रमात्मक प्रत्यय हा प्रकार अर्थातच मिथ्या ज्ञानात मोडतो.
निर्वस्तुभ्रम हे दृक् संवेदन, श्रवण संवेदन, स्पर्श संवेदन, रुचिसंवेदन, गंधसंवेदन तसेच शरीरावयवांच्या गतीचे संवेदन अशा सर्व प्रकारचे असू शकतात. उदा., नसलेल्या वस्तू, व्यक्ती वा प्रसंग दिसू लागणे होत नसलेले आवाज ऐकू येणे सुगंधाचे वा दुर्गंधाचे निराधार संवेदन होणे प्रत्यक्षात कशाचाही स्पर्श झालेला नसताही स्पर्शाचे संवेदन होणे शरीर प्रत्यक्षात पूर्णपणे निश्चल असताना एखादा अवयव हलल्याचे संवेदन होणे वगैरे.
भ्रम (इलूझन) हा प्रकारही मिथ्या ज्ञानातच मोडतो तथापि ⇨ भ्रमात व निर्वस्तुभ्रमात महत्त्वाचा फरक आहे. भ्रमाला काहीतरी प्रत्यक्ष आलंबन असते. वेदक इंद्रियांचे कशामुळे तरी उद्दीपन झालेले असते तथापि त्याविषयी झालेला ग्रह वा अर्थबोध मात्र चुकीचा असतो. निर्वस्तुभ्रमांचा वेदक इंद्रिय नसांच्या उद्दीपनाशी काहीच संबंध नसून मेंदूतील वेदक क्षेत्रातील केंद्रांशीच त्यांचा संबंध असतो. ती कद्रे कृत्रिम रीत्या उद्दीपित केली, तर निरनिराळे निर्वस्तुभ्रम होऊ लागतात, यावरून ही गोष्ट स्पष्ट होते.
निर्वस्तुभ्रम आणि संभ्रम (डिलूझन) या दोहोंतही भेद आहे. निर्वस्तुभ्रम हे संवेदनसदृश असतात, तर संभ्रम हे केवळ एखादा समज दृढमूल होऊन बसलेल्या चुकीच्या किंवा भ्रामक कल्पनाच असतात. उदा., ‘मी ईश्वराचा खास दूत आहे’, ‘लोक माझ्याविरुद्ध कारस्थाने करताहेत’ वगैरे कल्पना.
निर्वस्तुभ्रम सामान्य माणसांना होऊ शकत नाहीत असे नाही परंतु ते क्वचितच होतात तसेच काही विशिष्ट परिस्थितीतच त्यांना ते होण्याचा संभव असतो. अतिशय थकवा आला असताना तसेच खूप ताप चढून वात अथवा मुग्धभ्रांती (डिलिरिअम) झाली असताना विविध भ्रम होण्याचा संभव असतो. निःशब्द, कोंदट, अंधारमय अशा बंद खोलीमध्ये पूर्णपणे निश्चल स्थितीत खूप वेळ बसले असताना, म्हणजेच एकूणएक वेदक इंद्रिये अनुद्दीपित अवस्थेत बराच वेळ राहिली, तरीसुद्धा नाना प्रकारचे निर्वस्तुभ्रम होतात, असा योगसाधना करणाऱ्यांचा अनुभव आहे व मुद्दाम केलेल्या प्रयोगान्तीही हे सिद्ध झालेले आहे.
हशीश, गांजा, भांग, चरस इ. मादक द्रव्यांचे सेवन केले, तरीही विविध निर्वस्तुभ्रम होऊ लागतात. मेंदूला विशिष्ट स्वरूपाची इजा पोहोचल्यासही निर्वस्तुभ्रम होण्याचा संभव असतो. मद्यासक्त व्यक्ती तसेच मादक पदार्थांचे व्यसन जडलेल्या व्यक्तींच्या मेंदूत बिघाड होऊन त्यामुळे त्यांनाही निर्वस्तुभ्रम होत असतात.
गंभीर स्वरूपाच्या मनोविकृतींमध्येही निर्वस्तुभ्रम होतात. किंबहुना निर्वस्तुभ्रम हे मनोविकृती गंभीर असल्याचे द्योतक मानण्यात आले आहे. ⇨ छिन्नमानस, ⇨ उद्दीपन–अवसाद चित्तविकृती, प्रणालित संभ्रमविकृती (पॅरनोइया) ह्या मनोविकृती जडलेल्या रुग्णांना स्वतःसमोर कुणी उभे आहे, बोलते आहे, दूषण देते आहे, आदेश देते आहे, स्पर्श करून हलवते आहे, अंगावरून तसेच मेंदूतून वा पोटातून मुंग्या, मधमाशा चालल्या आहेत इ. मिथ्या संवेदने होतात. त्यांच्या विचारप्रक्रियेचे होऊन बसलेले संकोचन त्यांच्या बलवत्तर गरजा, प्रेरणा, वासनांचा त्यांच्या कल्पनांवर व विचारप्रक्रियेवर असलेला प्रभाव प्रेरणांच्या बाबतीत त्यांच्या अंतरंगातील संघर्ष, प्रक्षेपणाची प्रक्रिया इत्यादींचा त्यांच्या ह्या निर्वस्तुभ्रमांशी संबंध असतो.
अकोलकर, व. वि.