निमित्स, चेस्टर विल्यम : (२४ फेब्रुवारी १८८५–२० फेब्रुवारी १९६६). अमेरिकेच्या नौसेनेचे फ्लीट ॲड्‌मिरल. टेक्सस राज्यात फ्रेड्रिक्सबर्ग येथे जन्म. ॲन्नापोलिस येथील नाविक अकादमीचे ते पदवीधर होते. पहिल्या महायुद्धात अमेरिकेच्या पाणबुडी दलाच्या कर्मचारी प्रशासनाचे मुख्य. दुसऱ्या महायुद्धात डिसेंबर १९४१ मध्ये पर्ल हार्बरवरील जपानी हल्ल्यानंतर पॅसिफिक आरमाराचे सरसेनापती. पॅसिफिक महासागरावरील जपानी लष्करी सत्तेचा बीमोड करण्यात जनरल डग्लस मॅक्ऑर्थर त्यांनी साहाय्य केले. जपानी नाविक युद्धतंत्रावरून धडा घेऊन त्यांनी विमानवाहक युद्धनौका आणि त्यांवरील विमाने यांचा वापर करून जपानी आरमार कुचकामी केले. पॅसिफिक महासागरातील जपानव्याप्त मिडवे, मार्शल, मेरियाना, फिलिपीन्स, ईवोजीम व ओकिनावा ही बेटे १९४२ ते १९४५ च्या दरम्यान टप्प्याटप्प्याने काबीज करून त्यांनी खुद्द जपानवरील हल्ल्याची सिद्धता केली. २ सप्टेंबर १९४५ रोजी ‘मिसुरी’ या त्यांच्याच ध्वजयुद्धनौकेवर त्यांनी जपानची शरणागती स्वीकारली. डिसेंबर १९४४ मध्ये त्यांस फ्लीट ॲड्‌मिरल हा अत्युच्च श्रेणीचा नाविक हुद्दा मिळाला. युद्धानंतर दोन वर्षे ते नौसेनाध्यक्ष होते. २१ मार्च १९४९ ते २९ जुलै १९४९ या काळात त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघातर्फे काश्मीर सार्वमत कार्यक्रमांचे व्यवस्थापक म्हणून काम केले. १९५१ मध्ये त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षितता व वैयक्तिक हक्क या चौकशी-

आयोगाचा अध्यक्ष म्हणून काम केले. ई. बी. पॉटर यांच्या सहकार्याने त्यांनी सी पॉवर : ए नेव्हल हिस्टरी (१९६०) हा ग्रंथ संपादून प्रसिद्ध केला. सॅनफ्रॅन्सिस्को येथे त्यांचे निधन झाले.

बोराटे, सुधीर