निप्पुर : इराकमधील प्राचीन अवशेषांचे प्रसिद्ध स्थळ. प्राचीन बॅबिलन शहराच्या आग्नेयीस सु. ७२ किमी. वर युफ्रेटीस नदीकाठी ते वसले होते. त्याचे आधुनिक नाव निफ्फर (नफ्फर) असून बगदादच्या आग्नेयीस सु. १६० किमी. अंतरावर हे स्थळ आहे. निप्पुर हे नगर जरी राजधानीचे स्थळ नव्हते, तरी एनलिल या देवतेमुळे धार्मिक दृष्ट्या त्यास त्यावेळी महत्त्व प्राप्त झाले. लॉफ्टस व चर्चिल यांनी १८४९ मध्ये हे नगर प्रथम उजेडात आणले. १८५१ पासून १९५८ पर्यंतच्या काळात येथे अनेक तज्ञांनी व संशोधन संस्थांनी उत्खनन केले. या उत्खननांवरून निप्पुरची बांधणी आणि फेरबांधणी इ. स. पू. ३००० ते इसवी सनाचे तिसरे शतक या काळात अनेक वेळा झाल्याचे आढळले. एनलिल या सुप्रसिद्ध सुमेरियन देवतेचे मंदिर, झिगुरात व इ. स. पू. दुसऱ्या सहस्रातील अनेक देवळांचे अवशेष येथील उत्खननांत उजेडात आले. सर्वांत महत्त्वाचा शोध म्हणजे क्यूनिफॉर्म लिपीतील सु. ऐंशी हजार मृण्मुद्रा येथे सापडल्या. यांवरून प्राचीन सुमेरियन ग्रंथ, अभ्यासाची क्रमिक पुस्तके आणि एका व्यापारी पेढीचा पत्रव्यवहार कळून आला. प्राचीन स्थापत्य विशारदांनी काढलेला निप्पुर नगरीचा आराखडा हा एक येथील अद्वितीय अवशेष आहे. उत्खननात मिळणाऱ्या वास्तू अवशेषांची यथार्थ कल्पना येण्यास हा आलेख अत्यंत उपयुक्त ठरला आहे.
देव, शां. भा.
“