सेनँकरिबच्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारावरील द्वारपाल

निनेव्ह : प्राचीन अवशेषांचे प्रसिद्ध स्थळ व ॲसिरियन साम्राज्याच्या राजधानींपैकी एक शहर. ते उत्तर इराकमध्ये टायग्रिसच्या पूर्व किनाऱ्यावर आधुनिक मोसूलच्या विरुद्ध बाजूस वसले होते. त्याचे अवशेष कुयुंजिक व नबी यूनिस या दोन टेकाडांमध्ये आढळले. याचा शोध प्रथम १८२० मध्ये सी. जे. रिच या संशोधकाने लावला. १८४२ मध्ये पॉल एमिल बोट्टा याने प्रथम उत्खनन केले. त्यानंतर ऑस्टिन लेअर्ड (१८४५–५१), एच्. रास्साम (१८५२), कॅम्बेल टॉमसन (१९२९–३२) इ. पुरातत्त्वज्ञांनी उत्खनन केले. येथे प्रागैतिहासिक काळापर्यंतचे अनेक अवशेष अद्यापि सापडतात. प्रागैतिहासिक काळातील संस्कृती मेसोपोटेमिया आणि सिरिया येथील संस्कृतींशी अनेक बाबतींत संपर्क दर्शविते. निनेव्ह इ. स. पू. अठराव्या शतकामध्ये ॲसिरियाची राजधानी झाले, तरी येथील महत्त्वाचे उपलब्ध अवशेष इ. स. पू. सातव्या शतकातीलच आहेत. यांत सेनॅकरिब (इ. स. पू. ७०४–६८१) व असुरबनिपाल (इ. स. पू. ६६९–६३०) या राजांच्या भव्य प्रासादांचे अवशेष व क्यूनिफॉर्म लिपीतील अनेक मृण्मुद्रा सापडल्या. सेनॅकरिबने निनेव्हचे महत्त्व वाढवून आपला राजवाडा गुलामांकरवी बांधून घेतला. हा विस्तृत आणि समृद्ध होता. यातील कलापूर्ण वास्तुशिल्प, अपोत्थित शिल्पे आणि क्यूनिफॉर्म लिपीतील लेख उल्लेखनीय आहेत. त्यात सापडलेल्या लेखांनुसार या राजाने नगररचना, पाणीपुरवठा, कापसाची व वनस्पतींची लागवड यांबाबतीत केलेल्या व्यवस्थेची माहिती मिळते. असुरबनिपालच्या प्रासादात अनेक खोल्या व सभागृहे असून त्यांच्या भिंतीवर राजाचे दैनंदिन जीवन दर्शविणारी अनेक शिल्पे आहेत. हे दोन्ही राजांचे प्रासाद इतके विस्तृत आहेत, की अनेक वर्षे चाललेल्या उत्खननांत अद्याप संपूर्णपणे एकही राजवाडा पूर्णतः उत्खनित करता आलेला नाही. याशिवाय इश्तार व नाबु या देवतांची मंदिरेही येथे सापडली. सुरुवातीची चौथ्या-तिसऱ्या सहस्त्रकांतील वस्ती वैशिष्ट्यपूर्ण नव्हती. इ. स. पू. पहिल्या सहस्त्रकात असुर आणि निमरूद यांच्या बरोबरीने निनेव्ह राजधानीचे शहर बनले.

संदर्भ : 1. Layard, A. H. Nineveh and Its Remains, 2 Vols., London, 1850.

           2. Parrot, Andre, Nineveh and Babylon, London, 1961.

           3. Thompson, R. C. Hutchinson, R. W. A Century of Exploration of Nineveh, London, 1929.

देव, शां. भा.