निद्रापस्मार : (नार्कोलेप्सी).एकाएकी आणि राहून राहून, अनिवार्य आणि अल्पकाळ टिकणारे झोपेचे झटके येणाऱ्या विकृतीस ‘निद्रापस्मार’ म्हणतात. जे. बी. ई. झेलिनो या फ्रेंच वैद्यांनी या रोगाचे प्रथम वर्णन केल्यामुळे या रोगास ‘झेलिनो रोग किंवा लक्षणसमूह’ असेही म्हणतात. वैशिष्ट्य म्हणजे या झोपेतून रोगी चटकन जागा करता येतो. हे झटके तो काम करीत असतानाही येतात आणि दिवसातून अनेक वेळा येतात.
या विकृतीबरोबरच बहुधा पुढील तीन लक्षणेही आढळतात. (१) स्तब्धी : अकस्मात उद्भवलेल्या भावनाविवशतेमुळे (आनंद, राग, काळजी वगैरे) हातापायातील स्नांयूचा शक्तिऱ्हास होऊन स्तब्ध होणे (स्नायु-
अतानता). (२) निद्रा अंगघात : जाग येताच किंवा झोपेत मन पूर्ण जागृत असताना शरीराची सर्व हालचाल बंद पडणे. (३) निराधार भ्रम अवस्था : झोप लागण्याच्या सुमारास स्पष्ट आणि भीतिदायक असा निराधार भ्रम उत्पन्न होणे.
रोगाची सुरुवात बहुधा झोप आणणाऱ्या नेहमीच्या कारणाशी निगडित असते, उदा., जेवणानंतर, सार्वजनिक वाहनातून प्रवास करताना किंवा कंटाळवाणे काम करीत असताना वगैरे. झोप लागण्यापूर्वी रोगी झापडीने ग्रासला जातो व प्रयत्न करूनही झोप आवरता येत नाही. झोपेतून जागे होताच स्तब्धी व निद्रा अंगघात उद्भवतात. निद्रापस्मार व स्तब्धी बहुधा एकाच रोग्यात आढळतात. कधीकधी यांपैकी एकच लक्षण असलेलेही रोगी आढळतात. निद्रापस्मारात संपूर्ण शरीर तपासणीत कोणतीही विकृती न आढळल्यास त्याला ‘अज्ञानहेतुक निद्रापस्मार’ म्हणतात. पुरुष आणि स्त्री या दोघांनाही होणाऱ्या या रोगाचे प्रमाण पुरुषांत अधिक असून पुष्कळ वेळा तो १० ते ३० वर्षे वयोमानात सुरू होतो व जन्मभर टिकतो. रोग्यास दिवसा झोपेचे झटके येऊनही रात्रीच्या झोपेत विशेष बिघाड होत नाही. हा रोग प्राणघातक नसतो.
क्वचित वेळा हा रोग मेंदूतील अधोथॅलॅमसाच्या (प्रमस्तिष्क विवराच्या तळाशी असणाऱ्या करड्या रंगाच्या पुंजाच्या) विकृतीशी, तिसऱ्या मस्तिष्क विवरातील (मेंदूतील पोकळीमधील) अर्बुदाशी पेशींच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण झालेल्या गाठीशी) किंवा तंद्रोत्पादक मस्तिष्कशोथाशी (अज्ञात कारणामुळे मेंदू व मस्तिष्कावरणात उत्पन्न होणारी दाहयुक्त सूज आणि झापड ही प्रमुख लक्षणे असणाऱ्या विकृतीशी) निगडित असतो.
या रोगावर डेक्सॅम्फेटामीन हे उत्तम औषध आहे व ते ५ ते १० मिग्रॅ. मात्रेत दररोज ४० मिग्रॅ. तोंडाने देतात. शेवटची मात्रा रोजच्या झोपेच्या पाच तास अगोदर द्यावी. या औषधाच्या खास बनविलेल्या १५ मिग्रॅ. मात्रा असलेल्या ‘स्पॅन्सूल्स’ मिळतात. यामुळे एकाच वेळी मोठी मात्रा घेऊनही औषधाचे अवशोषण मात्र हळूहळू आणि योग्य प्रमाणात होते. इतर औषधांमध्ये मिथिल ॲम्फेटामीन गटाची फेनिडेट हायड्रोक्लोराइड यांचा समावेश होतो. ॲम्फेटामीन गटाची औषधे आसक्ती उत्पन्न करणारी असतात, तसेच ती मद्यपी व्यक्तीला उपलब्ध होता कामा नयेत, हे लक्षात घेणे आवश्यक ठरते.
ढमढेरे, वा. रा. भालेराव, य. त्र्यं.