लेनिन अँव्हेन्यू, निझ्नितागिल.

निझ्नितागिल : रशियाच्या स्व्हर्डलॉफ्स्क प्रांतातील एक औद्योगिक शहर. लोकसंख्या ३,९०,००० (१९७५). हे उरल पर्वताच्या पूर्व पायथ्याशी तागिल नदीकाठी, स्व्हर्डलॉफ्स्क शहराच्या ईशान्येस सु. १२९ किमी. वर वसले आहे. स्व्हर्डलॉफ्स्क प्रांतातील हे सर्वांत जुने प्रगलन केंद्र असून, १७२५ मध्ये येथे पहिली ओतशाला सुरू झाली. लोह व पोलाद अभियांत्रिकी व धातुकर्म हे येथील महत्त्वाचे उद्योग होत. यांशिवाय रेल्वेचे डबे, विमाने, पोलाद, तांबे, यंत्रे व त्यांचे सुटे भाग, कृषियंत्रे, रसायने, कापड, अन्नप्रक्रिया, चिनी मातीची भांडी वगैरेंचे कारखाने येथे आहेत. शहराच्या आसमंतात लोखंड, मँगनीज, तांबे, सोने, मॅग्नेटाइट इत्यादींच्या विपुल खाणी आहेत. अध्यापनशास्त्र संस्था, तंत्रनिकेतन संस्था, खनिकर्म, यंत्रनिर्मिती, व्यापार यांची दुय्यम विद्यालये तसेच नाट्यगृहे, प्रेक्षागृहे आणि दोन वस्तुसंग्रहालयेही आहेत. १९१७ मध्ये याचे शहरात रूपांतर होऊन दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ह्या शहराचा बराच विस्तार झाला. सध्या लोकसंख्येच्या बाबतीत प्रांतात याचा दुसरा क्रमांक लागतो.

लिमये, दि. ह.