निज्जुत्ति : जैन आगमांवरल आर्या छंदात लिहिलेल्या व्याख्यात्मक प्राकृत गाथा ‘निज्जुती’ ह्या नावाने ओळखल्या जातात. ‘निर्युक्ती’ हे निज्जुत्तीचे संस्कृत रूप. हा विवक्षित प्रकार जैन साहित्यात आढळतो. इसवी सनाच्या पाचव्या-सहाव्या शतकांपूर्वीच निज्जुत्ती लिहिल्या जाऊ लागल्या होत्या, असे दिसते. आयारंग, सूयगडंग, सूरपन्नत्ति, ववहार, कप्प, दसाओ, उत्तरज्झयण, आवस्सय, दसवेयालिय आणि ऋषिभाषित ह्या दहा जैन आगमांवर निज्जुती लिहिल्या गेल्या असल्याचा उल्लेख आवस्ययनिज्जुत्तीत आढळते. श्रुतकेवली भद्राबाहू हेच ह्या निज्जुत्तींचे कर्ते होत, असा परंपरेचा निर्वाळा आहे. तथापि मुनी पुण्यविजयजी ह्यांच्या मते ह्या निज्जुत्तींना सध्याचे रूप सहाव्या शतकात होऊन गेलेल्या द्वितीय भद्रबाहूंनी दिले. सूरपन्नत्ति आणि ऋषिभाषित ह्यांच्यावरील निज्जुती आज उपलब्ध नाहीत. उपर्युक्त दहा निज्जुत्तींखेरीज ओघनिज्जुत्ती, पिंडनिज्जुत्ती आणि संसत्तनिज्जुत्ती अशा आणखी तीन निज्जुत्ती आहेत. जैन भाष्यांत आणि चुण्णींत गोविंदनिज्जुत्तीचाही उल्लेख येतो. संसत्तनिज्जुत्ति आणि गोविंदनिज्जुत्ति ह्या स्वतंत्र, म्हणजे कोणत्याही आगमावर न लिहिलेल्या अशा निज्जुत्ती होत. स्थविर आर्य गोविंदाने गोविंदनिज्जुत्ति रचिली. ही आज अनुपलब्ध आहे.
निज्जुत्ती संक्षिप्त आणि पद्यमय असल्यामुळे त्या पाठ करून स्मरणात ठेवणे सोपे असे परंतु ह्या संक्षिप्तपणामुळेच निज्जुत्तींचे पूर्ण आकलन होण्यासाठी त्यांवर भाष्ये लिहिण्याची आवश्यकता निर्माण झाली आणि तीनुसार अशी भाष्ये लिहिलीही गेली. निज्जुत्तींच्या पूर्वी आगमग्रंथांवर विस्तृत, गद्यात्मक व्याख्या होत्या निज्जुत्ती म्हणजे ह्या व्याख्यांचे सारांश होत, असे डॉ. शारपांत्ये ह्यांचे मत आहे परंतु अशा विस्तृत गद्यात्मक व्याख्यांच्या अस्तित्वाचा कोणताच पुरावा आज उपलब्ध नाही.
जैन सिद्धान्त, जैनांचे परंपरागत आचार-विचार, ऐतिहासिक, अंशत: ऐतिहासिक, तसेच पौराणिक परंपरा निज्जुत्तींत प्रतिबिंबित झालेल्या दिसतात.
ज्या आगमांवर भाष्ये-महाभाष्ये रचिली गेली त्यांच्यात निज्जुत्ती आणि भाष्य ह्यांतील गाथा परस्परांत मिसळून गेलेल्या असल्यामुळे, आज ह्यांतील निज्जुत्तिगाथा आणि भाष्यगाथा वेगवेगळ्या काढून दाखविणे कठिण झाले आहे.
कुलकर्णी, वा. म.