निचिरनपंथ : जपानमधील एक धार्मिक-राजकीय पंथ. या पंथाचे मूळचे नाव ‘होक्के′ (विनयपद्म) पंथ असे आहे परंतु निचिरन (१२२२–८२) या भिक्षूने या पंथाचा अत्यंत जोरदार आणि कडवा प्रचार केल्यामुळे तो ‘निचिरन’ पंथ या नावाने ओळखला जातो. हा पंथ ‘जोदो’ या संप्रदायाची एक शाखा असला, तरी जोदो संप्रदायात ‘आमिदा’(अमिताभ बुद्ध) याचे जे महत्त्व आहे ते निचिरन पंथात नाही. त्याऐवजी सद्‌धर्मपुंडरीक सूत्र या ग्रंथाचे पारायण केल्यानेच मुक्ती मिळते, अशी या पंथाची शिकवण आहे.

निचिरन पंथाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचा इतर पंथांशी असलेला अत्यंत कडवा विरोध. इतर सर्व पंथांचे जपानमधून समूळ उच्चाटन झाले पाहिजे, नाही तर जपानी धर्माचा आणि राष्ट्राचा नाश होईल, असे निचिरनचे म्हणणे होते. या अर्थाने निचिरन हा एक राजकारणी भिक्षू ठरला. जपानी धर्म आणि राष्ट्रवाद यांची त्याने आपल्या पंथात सांगड घातली.

निचिरनने भाकित केल्याप्रमाणे जपानवर मंगोल साम्राज्याने आक्रमण केले आणि त्यामुळे निचिरन पंथावर लोकांचा विश्वास बसून इतर सर्व पंथ हळूहळू लोप पावले. ज्या पंथांनी निचिरन पंथाशी टक्कर देण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर निचिरन व त्याचे अनुयायी यांनी हल्ला करून त्यांचा बीमोड केला. निचिरनने आपल्या पंथात प्रवेश अगदी सुलभ केला होता. फक्त ‘नामु म्योहो-रेंगे-क्यो’ या मंत्राचा जप केल्याने मुक्ती मिळते, अशी त्याची शिकवण होती. निचिरनने आपल्या अनुयायांना लग्न करण्याची परवानगी दिली आणि त्यांना गल्लोगल्ली फिरून आपल्या पंथाचा प्रसार करण्याचा आदेश दिला.

निचिरन पंथाने सुरुवातीपासूनच राजकारणात भाग घेतल्याने त्याची एक राजकीय संघटना निर्माण झाली आणि या संघटनेच्या रक्षणासाठी या पंथाने आपली वेगळी लष्करी संघटनाही उभी केली. अशा तऱ्हेने हा पंथ अत्यंत प्रबळ झाल्यामुळे राजकीय शासनाचा त्याला विरोध असूनही तो टिकून राहिला.

निचिरन पंथाने वेगवेगळ्या काळात वेगवेगळी नावे घेतली. सध्या तो ‘सोका गाक्काइ’ या नावाने ओळखला जातो. सध्या जपानमध्ये या पंथाचे सु. ७० लाख सभासद आहेत. या पंथाने ‘कोमेतो’ नावाचा एक राजकीय पक्ष स्थापन केला आहे व तो बराच लोकप्रियही आहे.

देशिंगकर, गि. द.