निकोबारी भाषा : निकोबार ही ऑस्ट्रिक भाषासमूहातील बंगालच्या उपसागरातील निकोबार बेटसमूहातल्या मूळ रहिवाशांकडून बोलली जाणारी भाषा आहे. एकूण प्रमुख बेटे १९ असून ती उत्तर अक्षांश ६° ते १०° आणि पूर्व रेखांश ९२° ४०′ ते ९४° यांच्या दरम्यान पसरलेली आहेत. त्यांतील काही निर्जन आहेत. १९६१ च्या जनगणनेप्रमाणे निकोबारी भाषिकांची संख्या १३,९३६ होती.
वैशिष्ट्ये : नामांना कोणताही विकार होत नाही, अनेकवचन संख्याविशेषण वापरून किंवा नामाची द्विरुक्ती करून दाखवले जाते.
लिंगाने फक्त प्राण्यांचा स्त्रीपुरुषभेद दाखविला जातो. जरूर तेथे नामाला एंकोइन्या ‘नर’ व एंकाना ‘मादी’ हे प्रत्यय लावून प्राणिवाचकांचे लिंग व्यक्त होते.
विभक्ती ही नामाचे वाक्यातील स्थान, सहायक शब्दांचा उपयोग इत्यादींनी दर्शविली जाते.
विशेषांना कोणताही विकार होत नाही. विशेषण नामापूर्वी किंवा नंतर येऊ शकते. पण नंतर आले तर त्यापूर्वी ता हा उपसर्ग लावावा लागतो.
सर्वनामांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यात द्विवचन आहे.
ए. व. |
द्वि. व. |
अ. व. |
|
प्र. पु. |
च ‘मी’ |
चअइ |
चिअइ |
द्वि. पु. |
मे‘तू’ |
इना |
इफे |
तृ. पु. |
न‘तो’, ‘ती’,‘ते’ |
एना |
ओफे |
सर्वनामाचेच रूप त्याचे स्वामित्वदर्शक विशेषण दाखविते : च ‘मी’ किंवा ‘माझा’ इत्यादी. हे विशेषण मात्र नेहमी नामानंतर येते आणि ता हा उपसर्ग त्याला विकल्पाने लागतो.
क्रियापदे सिद्ध, साधित किंवा मिश्र असतात. क्रियापदाच्या रूपावरून लिंग, वचन, पुरुष व्यक्त होत नाही. काही प्रत्यय लावून त्यांची कालदर्शक रूपे नक्की होतात.
क्रियाविशेषणांचा स्वतंत्र वर्ग नाही. काही विशेषणे किंवा उपसर्ग त्यांचे काम करतात. उभयान्वयी अव्यये थोडीच आहेत. ‘आणि’ चा उपयोग क्वचितच होतो.
संख्यावाचके ‘एक’ व ‘दोन’ हीच आहेत. त्यांचा इतर शब्दांशी संयोग करून मोठ्या संख्या व्यक्त होतात.
संदर्भ : 1. Government of India, Census of India 1961, Vol. I, Part II.C (ii). Language Tables, Delhi, 1964.
2. Man, Edward Horace, A Dictonary of Central Nicobarese Language, 1889.
कालेलकर, ना. गो.
“