निकाराग्वा सरोवर : (स्पॅनिश-लॅगो दे निकाराग्वा). मध्य अमेरिकेतील सर्वांत मोठे गोड्या पाण्याचे सरोवर. निकाराग्वातील हे सरोवर स. स. पासून ३२ मी. उंचीवर असून १५२२ मध्ये हील गाँथालेथ दे आव्हिला याने हे शोधून काढले. याची लांबी १७७ किमी., जास्तीत जास्त रुंदी ७२ किमी. व खोली ७० मी. असून याने ८,२६२ चौ. किमी क्षेत्र व्यापले आहे. यास मानाग्वा सरोवरातून उगम पावणारी तीपितापा नदी मिळते. पॅसिफिक महासागराला हे सरोवर जवळ असल्याने व निकाराग्वा सरोवरातून उगम पावणारी सॅन वॉन नदी कॅरिबियन समुद्रास मिळत असल्याने निकाराग्वातून पॅसिफिक आणि कॅरिबियन समुद्रास मिळत असल्याने निकाराग्वातून पॅसिफिक आणि कॅरिबियन समुद्रास जोडणारा कालवा काढण्याच्या प्रकल्पात या सरोवरचा विचार मुख्य होता. यामध्ये मासे व मगरी भरपूर असून सापातेरा, ओमेतेपे ही मोठी बेटे आहेत. या सरोवरचा उपयोग जलवाहतुकीसाठी होत असून याच्या काठी ग्रानाडा, सान हाँर्हे, प्वेर्तो दीआस, मॉरितो इ. बंदरे आहेत.
शहाणे, मो. ज्ञा.