निकटतम नरतुरंगीय : (प्रॉक्झिमा सेंटॉरी). नरतुरंग या द. खगोलातील तारकासमूहातील आल्फा तारा (मित्र) हा वस्तुत: तारका-त्रिकूट आहे. या तीनपैकी सर्वांत अंधुक तारा म्हणजे निकटतम नरतुरंगीय हा होय. हा सूर्यकुलाला सर्वांत जवळचा तारा असल्याने त्याला निकटतम म्हणतात. १९१५ पर्यंत मित्र हाच सर्वांत जवळचा समजला जाई परंतु त्या वर्षी आर्. टी. ए. इनिस यांनी केलेल्या मापनावरून निकटतम नरतुरंगीय हा तिघांत ०·१ प्रकाशवर्षाने जवळचा ठरला. मित्र तारा आणि त्रिकूटापैकी आणखी एक हे एकमेकांभोवती ८० वर्षांत फिरतात आणि या जोडीपासून २°·२ कोनीय अंतरावर असलेला हा तिसरा सहचर या जोडीभोवती फिरत असून त्याचा आवर्तकाल (एका फेरीस लागणारा काळ) लाखो वर्षांचा असावा. हा सूर्यापासून ४·३ प्रकाशवर्षे (सु. १·३ पार्सेक) दूर असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. फिरताना तो कधीकधी मित्र ताऱ्यापेक्षा सूर्याच्या अधिक जवळ येतो. हा MS वर्णपटीय प्रकारचा [⟶ तारा] तांबडा लघुतारा आहे. त्याची निजगती (निरक्षकाच्या दृष्टिरेषेशी लंब दिशेत असणारा ताऱ्याच्या स्वत:च्या गतीचा घटक) वर्षाला ३″·७ असून भासमान प्रत ११·३ व निरपेक्ष प्रत १५·७ आहे [⟶ प्रत]. त्याची दीप्ती सूर्याच्या दीप्तीच्या ०·००००६ इतकी आहे. त्यातून सूर्याच्या मानाने १/ १२५००० इतकाच प्रकाश बाहेर टाकला जातो. हा नुसत्या डोळ्यांनी कधीच दिसणार नाही तो मोठ्या दुर्बिणीतूनच पाहावा लागतो. पृथ्वीवरच्या ३० उत्तर अक्षांशाच्या उत्तरेकडील भागात हा कधी दिसत नाही.
पहा : नरतुरंग.
ठाकूर, अ. ना.