नॉर्थ बेंगॉल विद्यापीठ : पश्चिम बंगाल राज्यातील एक विद्यापीठ. दार्जिलिंग जिल्ह्यात राजा राममोहनपूर येथे १९६२ मध्ये ते स्थापन झाले. विद्यापीठाचे स्वरूप संलग्नक व अध्यापनात्मक असून त्याच्या कक्षेत कुचबिहार, दार्जिलिंग, जलपैगुरी, माल्डा व पश्चिम दिनाजपूर या महसुली जिल्ह्यांतील महाविद्यालये अंतर्भूत होतात. विद्यापीठाच्या कक्षेत दोन घटक महाविद्यालये चार विद्यापीठीय महाविद्यालये असून २७ महाविद्यालये संलग्न केलेली होती (१९७३–७४). विद्यापीठाच्या ग्रंथालयात सु. ४०,६९४ ग्रंथ व ५८६ नियतकालिके होती

(१९७३–७४). विद्यापीठात सूक्ष्मपट प्रपाठक असे एक वेगळे पद सूक्ष्मपटांना ग्रंथालयात उपयोग व्हावा म्हणून खास निर्माण केले आहे. संरक्षक दलाच्या सेवकांना बहि:स्थ विद्यार्थी म्हणून विद्यापीठाच्या परीक्षांना बसण्याची खास सोय या विद्यापीठात आहे. विद्यापीठाचे संविधान इतर विद्यापीठांप्रमाणेच असून कुलगुरू व कुलसचिव हे सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी असतात. विद्यापीठात मानव्यविद्या, विज्ञान, अभियांत्रिकी व तंत्रविद्या आणि वैद्यक या विषयांच्या विद्याशाखा असून शिक्षणाचे माध्यम इंग्रजी भाषा आहे. विद्यापीठाच्या कक्षेत राहणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांस मोफत वैद्यकीय मदत मिळते. विद्यापीठाचा १९७३–७४ चा अर्थसंकल्प ५१ लाख रुपयांचा होता. त्यापैकी सु. ४१ लाख रुपयांची मदत पश्चिम बंगाल राज्य सरकारने दिली. विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांतून १९७३–७४ मध्ये एकूण १६,०७९ विद्यार्थी शिकत होते. विद्यापीठाने अलीकडे त्रिवर्षीय समाकलित पदवी अभ्याक्रम सुरू केला. काही विषयांत षण्मासिक परीक्षापद्धती सुरू केली आहे.

देशपांडे, सु. र.