नासिक शहर : महाराष्ट्रातील नासिक जिल्ह्याचे ठाणे. लोकसंख्या १,७६,०९१ (१९७१). जवळची भगूर, देवळाली कॅँटोनमेंट, नासिकरोड–देवळाली ही स्वतंत्र गावे मिळून बृहन् नासिकची एकूण लोकसंख्या २,७१,६८१ (१९७१). नासिक मुंबईच्या ईशान्येस १८५ किमी. व नासिकरोड रेल्वे स्थानकापासून ८ किमी. वर गोदावरीच्या काठी वसले आहे. सरासरी वार्षिक पर्जन्य ६९·७ सेंमी. व वार्षिक सरासरी कमाल व किमान तपमान अनुक्रमे ३१·१°से. व १६·९°से. असते. प्रत्यक्ष कमाल व किमान तपमान अनुक्रमे ४६·७°से. व ०·६°से. पर्यंत गेल्याची नोंद आहे. नासिक शहर गोदावरीच्या दोन्ही तीरांवर पसरले असून त्याचे परंपरेने डाव्या तीरावरील जुने नासिक किंवा पंचवटी, उजव्या तीरावरील मध्य नासिक किंवा मुसलमान नासिक आणि त्याच्या पश्चिमेचे पेशव्यांनी वसविलेले मराठा नासिक असे तीन भाग आहेत. मध्य नासिक हाच शहराचा मुख्य भाग असून तो खरे पाहता प्राचीन आहे. मुसलमानांनी त्यास गुलशनाबाद (गुलाबाचे शहर) असे नाव दिले होते. सध्या डाव्या तीरावरील पंचवटी, त्याजवळील तपोवन, त्याच्या समोर उजव्या तीरावर नवे नासिक व त्याच्या दक्षिणेस जुने नासिक असे भाग ओळखले जातात. मध्य प्रदेशातील भारहूत आणि नासिकजवळील पांडव लेणी येथील इ. स. पू. सु. २०० च्या शिलालेखांत नासिकचा उल्लेख सापडतो.
लक्ष्मणाने येथे शूर्णणखेचे नाक-कान कापले त्यावरून किंवा नासिक नवटेकावर वसवले, या रूढ वाक्प्रचाराप्रमाणे नऊ टेकांवरून किंवा टेकडीच्या शिखांवरून नवशिख व मग त्यावरून नासिक असे नाव पडले असावे. ही नऊ शिखरे स्वतंत्र नसून ती एकाच पठारी भागाचे फाटे आहेत. त्यांमधील सखल भाग भरून काढल्याने ती आज स्वतंत्रपणे लक्षात येत नाहीत. तरी जुनी गढी, नवी गढी, जोगवाडा टेक किंवा जोगी डोंगर, पठाणपुरी टेक किंवा पूर्व कोकणी टेक, म्हसरूळ टेक, डिंगरआळी टेक, महालक्ष्मी डोंगर किंवा सोनार आळी टेक, गणपती डोंगर व त्याच्या उत्तरेचे स्वतंत्र चित्रघंटा टेक अशी नऊ टेके किंवा शिखरे उल्लेखिली जातात. त्यांवर नवदुर्गांची अधिष्ठाने आहेत. गोदावरी नागमोडी वळणाने गावातून वायव्य-आग्नेय दिशेने वाहते. नदीचे पात्र जास्तीत जास्त १८२·८८ मी. रुंद आहे. पुराच्या वेळी पात्र दुथडी भरून वाहते अन्य वेळी पाणी थोडे असते. गंगापूर धरणामुळे मात्र पाणी वर्षभर असते. गोदावरीस येथे नागझरी, सरस्वती, अरुणा व वाघाडी किंवा वरुणा हे छोटे प्रवाह मिळतात. त्यांवरील पुलांमुळे शहराचे भाग जोडले गेले आहेत. गोदावरीच्या दोन्ही तीरांवर शहर असले, तरी उजव्या तीरावरच त्याचा जास्त विस्तार होत आहे. येथील नगरपालिकेची स्थापना १८६४ मध्ये झाली व १८७४ मध्ये तिचा दर्जा वाढविण्यात आला. नगरपलिकेने गोदावरीवर व गावातून जाणाऱ्या तिच्या उपनद्यांवर एकूण ९ पूल व सांडवे बांधले असून त्यांपैकी गोदावरीवरील कन्नमवार पूल हा सर्वांत मोठा पूल असून मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग या पुलावरून मालेगावकडे जातो. शहराला तटबंदी कधीही नव्हती पण शहर शोभिवंत करण्यासाठी पूर्वी भगूर वेस, भडक वेस, दरबार वेस, काझीपूरा वेस, त्रिंबक वेस, दिल्ली वेस, नाव वेस, किंवा नावदरवाजा, आश्रा वेस व केतकी वेस अशा वेशी पंचवटी व मध्य नासिक येथे होत्या तर मराठा नासिकमध्ये हत्ती वेस, मल्हार वेस व सतीवेस अशा तीन वेशी होत्या. भगूर वेस सोडली तर इतर वेशी आज शिल्लक नाहीत, पण त्या ठिकाणांची नावे मात्र प्रचलित आहेत. देशपांडे रस्ता हा गावातील प्रमुख रस्ता आहे. गावात ७४ किमी. लांबीचे रस्ते आहेत. त्यांपैकी ५० किमी. सिमेंटचे व उरलेल्यांपैकी काही डांबरी आणि काही कच्चे आहेत. आग्रारोड हा राष्ट्रीय महामार्ग शहरातून जात असे, आता तो बाहेरून जातो. १८३५ पर्यंत नासिक भागात रस्त्यांचा फारसा विकास झाला नव्हता. १८४०–४५ मध्ये थळ घाटात बैलगाडी मार्ग बांधण्यात आला, त्यावेळी पंचवटीत ५०० ते ६०० बैलगाड्या उतरत. १८६१ साली मुंबई–नासिकरोड रेल्वेमार्ग पूर्ण झाला. आठवड्यातून बुधवारी आणि शनिवारी येथे बाजार भरतो. नासिकचा द्राक्षबाजार हंगामात महत्त्वाचा असतो. त्रिंबक वेस भागात महात्मा फुले मार्केट ही आधुनिक भाजी मंडई बांधण्यात आली आहे. शहरात विडी वळण्याचा उद्योग प्रमुख असून विड्या वळणाऱ्या बारा मोठ्या कारखान्यांत सु. १० हजार लोकांस रोजगार मिळाला आहे. तांब्या- पितळेच्या भांड्यांसाठीही नासिक प्रसिद्ध आहे. अनेक छोटे कारखाने नासिक, नासिकरोड यांच्या परिसरात सुरू होत आहेत. नासिक येथे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची औद्योगिक वसाहत विकसित करण्यात येत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व इतर बँका व्यापाऱ्यांच्या व नागरिकांच्या उपयोगी पडतात. नासिक हे तीर्थक्षेत्र असल्याने पूर्वी येथे मोठ्या प्रमाणात साथीचे रोग उद्भवत, पण आज साथींचे जवळजवळ निर्मूलन झाले आहे. सरकारी दोन रुग्णालये असून त्यांपैकी जिल्हा रुग्णालय सर्वांत मोठे आहे. नगरपालिकेने पाच दवाखाने चालविले असून त्यांपैकी दोन आयुर्वेदिक आहेत. आज पिण्याचे पाणी गंगापूर धरणातून घेतले जाते. १९६५ साली शहरात दहा माध्यमिक शाळा व एक सरकारी तंत्र शाळा होती तसेच शासकीय तंत्रनिकेतन, हंसराज प्रागजी ठाकरसी महाविद्यालय, भिकुसा यमासा क्षत्रिय वाणिज्य महाविद्यालय या उच्च शिक्षणाच्या संस्था येथे आहेत. वाणिज्य व्यवस्थापनाचे पदव्युत्तर शिक्षणकेंद्रही या ठिकाणी आहे. येथील भोसला मिलिटरी स्कूल व पोलीस प्रशिक्षण विद्यालय प्रसिद्ध आहेत. गावात अनेक सार्वजनिक संस्था लोकोपयोगी कामे करीत आहेत. त्यांत क्षयरोगनिवारण संस्था, कुष्ठरोगनिवारण मंडळ, डांग सेवा मंडळ, गुलालवाडी व्यायामशाळा, सार्वजनिक वाचनालये, कलानिकेतन, गांधर्व महाविद्यालय, गाडगे महाराज धर्मशाळा, शीख गुरुद्वारा, अनेक शिक्षणसंस्था, महिलामंडळे यांचा समावेश होतो. येथे मध्यवर्ती कारागृह व इतर शासकीय कार्यालये आहेत. येथील शिवाजी उद्यान टुमदार आहे.
नासिक शहर पत्रकारितेसाठी प्रसिद्ध आहे. येथून तीन दैनिके निघतात. गावकरी हे महाराष्ट्रातील प्रमुख दैनिक येथे प्रसिद्ध होते. रसरंग हे प्रमुख साप्ताहिक, शिवाय आयुर्वेद पत्रिका, होमिओदूत, आदिवासी सुधारक, वनश्री ही मासिके व अमृत आणि श्रीयुत ही मराठी संकलन मासिके येथून प्रसिद्ध होतात. शाहजहानच्या काळातील पंडित विद्यानिधी कवींद्राचार्य सरस्वती, कथाकल्पतरु रचणारा कृष्ण याज्ञवल्की, कवी रंगनाथ, मध्वमुनी व त्याचा शिष्य अमृतराय हे नासिकचेच असल्यामुळे नासिकला अभिमानास्पद वाङ्मयपरंपरा आहे.
नासिक हे भारतातील प्रमुख पाच तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. त्याला पश्चिम काशी असेही म्हणतात. नासिकलाच पद्मनगर, त्रिकंटक आणि जनस्थान अशीही नावे होती. आंध्रभृत्य, शक, आभीर इत्यादींच्या सत्तांनंतर सहाव्या शतकात चालुक्यांच्या आणि नंतर चौदाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत देवगिरीकर यादवांच्या अधिकारात नासिक होते. त्यानंतर बहामनी सुलतानाकडे व सतराव्या शतकात मोगलांकडे नासिकचा प्रदेश गेला. १७४७ मध्ये मराठ्यांनी मोगलांकडून नासिक पूर्णतः घेतले. पेशवाईत नासिक हे महत्त्वाचे गाव होते. तेथे माधवराव पेशव्यांच्या मातुःश्रींनी काही काळ वास्तव केले होते व राधोबादादा आनंदवल्ली (आधीचे चौंधास) या ठिकाणी राहत असत. त्यामुळे येथे मराठ्यांनी अनेक मंदिरे बांधली आहेत. येथे लहानमोठी सु. २०० मंदिरे आहेत. अकराव्या शतकात चंद्रप्रभस्वामी या जैनांच्या आठव्या तीर्थंकराचे मंदिर अंजनेरी येथे नासिकजवळ होते. १६८० मध्ये औरंगजेबाच्या सुभेदाराने २५ मंदिरे उद्ध्वस्त केली. पंचवटीतील श्रीराम मंदिर, नारोशंकर मंदिर व सुंदरनारायण मंदिर ही मंदिरे प्रेक्षणीय व प्रसिद्ध आहेत. श्रीराम किंवा काळाराम मंदिर हे प. भारतातील एक सुंदर मंदिर आहे. त्याचा १७८२ मध्ये सरदार रंगराव ओढेकरांनी जीर्णोद्धार केला. मेष आणि तूळ संक्रमणाच्या वेळी सूर्योदयाबरोबर सूर्यकिरणे रामाच्या मुखावर पडतात. नारोशंकर किंवा रामेश्वर मंदिर कलापूर्ण नक्षीकामासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिरात वसईच्या किल्ल्यात मिळालेली चार टन वजनाची व सु. दोन मी. घेराची प्रचंड घंटा असून ती नारोशंकराची घंटा म्हणून प्रसिद्ध आहे. तिचा गजर ४ किमी. पर्यंत ऐकू जातो. नदीच्या उजव्या तीरावर सुंदरनारायणाचे मंदिर आहे. विषुवदिनी (२२ सप्टेंबर व २१ मार्च) सूर्याचे किरण मंदिरातील मूर्तीवर पडतात. या मंदिराच्या समोरच कपालेश्वराचे मंदिर आहे. यांशिवाय बालाजी, गोराराम, नीलकंठेश्वर, मुरलीधर, तिळभांडेश्वर, भद्रकाली इ. मंदिरे आहेत. गोदावरीच्या पात्रात सुंदरनारायण मंदिरापासून मुक्तेश्वर मठापर्यंतच्या भागात अनेक पवित्र कुंडे आहेत. लक्ष्मणकुंड, धनुष्यकुंड, रामकुंड, सीताकुंड, अहल्याकुंड, शारंगपाणीकुंड, दुतोंड्या मारुतीकुंड व नीलकंठेश्वर आणि गोराराम मंदिराच्या समोर सर्वांत मोठे दशाश्वमेघकुंड आहे. या कुंडात, विशेषत: सिंहस्थ पर्वात, स्नान करणे पुण्यकारक समजतात. पंचवटीचा भाग अत्यंत प्रसन्न असून तो फार पवित्र मानला जातो. नासिकला वर्षभर भाविकांची गर्दी असते. गोवर्धन-गंगापूर ते नासिकपर्यंत गोदावरीमध्ये अकरा तीर्थे आहेत. यांशिवाय गावात जुनी गढी, जामा मशीद, दर्गा, पेशव्यांचे वाडे व नारोशंकर राजा बहादूर यांचा सु. २३० वर्षांपूर्वीचा वाडा या वास्तू प्रेक्षणीय आहेत. पेशव्यांचे वाडे आज मोडकळीस आले असून एकच वाडा थोडाबहुत शाबूत आहे. त्यात पोलीस ठाणे आणि सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय आहे. शहराजवळच चांभार लेणी, पांडव लेणी, तपोवन, गंगापूर धरण तसेच २९ किमी. दूर त्र्यंबकेश्वर, नासिकरोड येथील मुक्तिधाम ही प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. नदीकाठी यशवंतराव महाराज पटांगण हे नेहमीचे सभास्थान, म. गांधी स्मारक आणि तेथील ज्योत ही प्रसिद्ध आहेत.
डिसूझा, आ. रे.
रामायणात उल्लेखिलेल्या पंचवटीचा प्रदेश म्हणजेच सध्याच्या नासिकचा असे समजतात. येथील पुरातत्त्वीय टेकाड मातीची गढी या नावाने प्रसिद्ध असून या स्थळाचे उत्खनन १९५०–५१ साली करण्यात आले. त्यात प्राचीन वस्त्यांचे चार कालखंड निश्चित करता आले. सर्वांत प्राचीन वस्ती इ. स. पू. पहिल्या सहस्रकाच्या सुरुवातीस झाली. येथे वस्ती करणारे लोक ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे होते. त्यानंतरची वस्ती इ. स. पू. तिसऱ्या-दुसऱ्या शतकांतील असून मौर्य व सातवाहन काळातील मृत्पात्रे, विटांच्या वास्तूंचे अवशेष, सांडपाण्याचे कूप, मणी, सातवाहन राजांची नाणी, पाटे-वरवंटे व जनावरांची हाडे येथील थरांत सापडली. तिसरी वस्ती इसवी सनाच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या शतकांत झाली. या कालखंडातील वास्तू, अलंकार व इतर बाबी दुसऱ्या वस्तीप्रमाणेच आढळून आल्या परंतु या काळात तांबड्या झिलईची रोमन बनावटीची मृत्पात्रे व रोमन काचेचे मणी तसेच इतर विदेशी वस्तू व्यापारसंपर्काने लोकांच्या वापरात आल्याचा पुरावा मिळाला. शेवटची वस्ती मध्ययुगात झाली, हे या वस्तीच्या अवशेषांबरोबर सापडलेल्या मुसलमान-मराठा नाण्यांवरून स्पष्ट झाले. नासिकच्या परिसरात अश्मयुगीन मानव वास्तव्य करीत असावा, हे गंगावाडी येथे सापडलेल्या प्राचीनतम अश्मयुगीन हत्यारांवरून सिद्ध झाले. येथून नजीकच असणाऱ्या डोंगरात सातवाहन काळात बौद्ध गुंफाही खोदविण्यात आल्या परंतु रामायणकालीन पुरावा मात्र काहीही मिळाला नाही.
मराठेशाहीत हे शहर पुन्हा भरभराटीस आले. या काळातील वास्तुशिल्प, विशेषत: काष्ठशिल्पाचे उत्कृष्ट नमुने उपलब्ध झाले आहेत. त्यांवर गुजरात व दिल्ली येथील वास्तुसंप्रदायांची छाप दिसते.
देव, शां. भा.
संदर्भ : Sankalia, H. D. Deo, S. B. Report on the Excavations at Nasik and Jorwe, Poona, 1955.
“