नासिक जिल्हा : महाराष्ट्र राज्याचा वायव्येकडील जिल्हा. विस्तार १९°३६′ उ. ते २०°५२′ उ. व ७३°१६′ पू. ते ७४°५६′ पू. यांदरम्यान. क्षेत्रफळ १५,५८२ चौ. किमी. लोकसंख्या २३,६९,२२१ (१९७१). राज्यातील क्षेत्राच्या ५·०८% क्षेत्र आणि लोकसंख्या ४·७% लोकसंख्या या जिल्ह्यात असून नासिक शहर हे जिल्ह्याचे ठाणे आहे. या जिल्ह्याच्या वायव्येस गुजरात राज्याचे डांग व सुरत जिल्हे आणि उत्तरेस धुळे, ईशान्येस जळगाव, पूर्वेस औरंगाबाद, दक्षिणेस अहमदनगर व पश्चिमेस ठाणे हे महाराष्ट्राचे जिल्हे आहेत. बागलाण, मालेगाव, सुरगाणा, कळवण, पेठ, दिंडोरी, चांदवड, नांदगाव, नासिक, निफाड, येवले, इगतपुरी व सिन्नर हे नासिक जिल्ह्याचे तालुके होत. जिल्ह्यात २० शहरे आणि १,६२८ वस्तीची आणि ४ ओसाड गावे आहेत.
भूवर्णन : नासिक जिल्हा दख्खन पठारावरील, सह्याद्रीच्या पूर्व उतारावरील जिल्हा आहे. या जिल्ह्यात पश्चिमवाहिनी तापी व पूर्ववाहिनी गोदावरी या नद्यांच्या खोऱ्यांचा भाग येत असल्याने या जिल्ह्याच्या उत्तरेस दख्खन पठाराच्या भूस्तररचनेत महत्त्वपूर्ण बदल होतात. सह्याद्रीची प्रमुख रांग जिल्ह्याच्या पश्चिम भागातून दक्षिणोत्तर दिशेने जाते व या रांगेच्या तीन शाखा या जिल्ह्यात पश्चिम–पूर्व दिशेने जातात. अगदी उत्तर भागात पश्चिमेस १,३०० मी. पासून पूर्वेस ६५० मी. पर्यंत उंचीची सेलबारी डोंगररांग असून, तिच्यातील मंगीतुंगी डोंगराची उंची १,३३१ मी. पर्यंत आहे. त्यांच्या पूर्वेस सेलबारी व हिंदबारी खिंडी व थेरमाळ आणि गाळणा किल्ले आहेत. गाळण्याच्या टापूत दक्षिणोत्तर रस्त्यावर खिंड आहे. याच्या दक्षिणेस १,६१३ मी. पर्यंत उंचीची घोलबारी डोंगररांग आहे. या रांगेतच घोलबारी खिंड व साल्हेर किल्ला आहे. या रांगेच्या दक्षिणेस जिल्ह्याच्या मध्यातून जाऊन तापी व गोदावरी यांची खोरी अलग करणारी सातमाळा किंवा चांदवड वा अजिंठा डोंगररांग आहे. ही रांग प्रथम पूर्वेस, त्यानंतर आग्नेयीस व शेवटी ईशान्येस पसरते. तिची सरासरी उंची १,१०० ते १,३५० मी. असून धोडप, सप्तशृंरगीसारखी काही शिखरे १,४०० मी. पेक्षा उंच आहेत. अचल व जावाता हे किल्ले या रांगेमध्ये असून डोंगरमाथे अरुंद व सपाट आहेत. या रांगेच्या दक्षिणेकडील छोट्या रांगेत, आलंदी व बाणगंगा नद्यांदरम्यान रामशेज डोंगर आहे. त्याच्या पूर्वेस एका शंकु–टेकडीत चांभार लेणी नावाची जैन लेणी आहेत. सातमाळेच्या दक्षिणेस त्रिंबक–अंजनेरी डोंगररांग असून, भास्करगडाच्या पूर्वेस हरीश किल्ला आहे. आणखी पूर्वेस तीन अलग टेकड्या आहेत, त्यांस त्रिरश्मी म्हणतात. त्यांतील अगदी पूर्वेची टेकडी त्रिशीर्ष नावाची असून तेथे पांडव लेणी आहेत. त्रिंबक डोंगररांगेतच गंगाद्वार येथे गोदावरीचा उगम आहे. डोंगरपायथ्याशी त्र्यंबकेश्वराचे मंदिर आहे. अंजनेरी डोंगररांग बरीच उंच व खडकाळ आहे. त्रिशूळ ही त्या रांगेची शाखा विशेष प्रसिद्ध आहे. तिच्या पूर्व भागातच घारगड व शिव डोंगर आणि बहुला किल्ला आहेत. या डोंगरांतील एका खिंडीतून मुंबई–आग्रा महामार्ग जातो. जिल्ह्याच्या आणि इगतपुरी तालुक्याच्या अगदी दक्षिण टोकाशी पश्चिम–पूर्व पसरणाऱ्या उपशाखेमध्येच कळसूबाई (१,६४६ मी.) हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. या रांगेत १,५०० मी. पेक्षा उंच अशी अनेक शिखरे आहेत. कळसूबाईच्या उत्तरेस इगतपुरीजवळच्या खिंडीवर झुकलेला एक प्रचंड कडा आहे. या डोंगराळ प्रदेशात मदनगड–बितनगड, अलंग–कुलंग, रौलिया–जौलिया, अंकाई–टंकाई, औंढा–पट्टा, साल्हेर–मुल्हेर, मंगिया–तुंगिया, इ. अनेक जोडकिल्ले मोक्याच्या जागी बांधलेले आढळतात. जिल्ह्यात सु. ३८ डोंगरी किल्ले असून त्यांपैकी २३ सह्याद्रीत आणि १५ सातमाळा रांगेत आहेत.
सह्याद्रीच्या पश्चिमेस वाहणाऱ्या, तापीच्या खोऱ्यातील व गोदावरी खोऱ्यातील नद्या असे नद्यांचे तीन प्रमुख भाग आहेत. कोकणात किंवा सह्याद्रीच्या पश्चिम उतारावरून वाहणाऱ्या नद्यांत चोंदी, कावेरी, सासू किंवा तान, मान किंवा बामती, नार, पार, बारीक, दमणगंगा, वाल, वैतरणा व भीमा या प्रमुख नद्या आहेत. त्यांपैकी काही नद्या जिल्ह्यांच्या किंवा राज्याच्या सीमेवरून काही अंतर वाहतात. त्या तीव्र उताराच्या आणि बऱ्याच लहान आहेत. वैतरणा नदीने दारणेच्या खोऱ्यात नदी अपहरण केले असल्याची शक्यता आहे.
तापीच्या खोऱ्यातून ईशान्य दिशेस वाहणाऱ्या नद्यांत गिरणा व बोरी या नद्या प्रमुख आहेत व त्या स्वतंत्रपणे तापीस मिळतात. गिरणा नदी सह्याद्रीमध्ये हातगडपासून ८ किमी. नैऋत्येस, चेराई गावाच्या दक्षिणेस उगम पावते व कळवण, सटाणा व मालेगाव तालुक्यांतून वाहत जाऊन जळगाव जिल्ह्यात शिरते.नासिकजिल्ह्यात गिरणेस तांबडी, पुनंद, आराम, मोसम वपांझण या प्रमुख उपनद्या मिळतात. मन्याड ही गिरणेची उपनदी या जिल्ह्यात उगम पावते आणि गिरणेस जळगाव जिल्ह्यात मिळते. पांझण आणि मन्याड या खोल, अरुंद दऱ्यांतून व उंच दरडींमधून वाहत असल्यामुळे जलसिंचनास फारशा उपयुक्त नाहीत परंतु गिरणा व तिच्या बाकीच्या उपनद्या मात्र त्या दृष्टीने चांगल्या उपयोगी पडतात.
या जिल्ह्यात गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वांत मोठी नदी, नासिकपासून जवळच गंगाद्वार (त्र्यंबकेश्वर) येथे उगम पावते. तिला १४ किमी. वर किकवी मिळते. काश्यपी (कास)–गोदावरी संगमापासून जवळच गंगापूर धरण बांधले आहे व तेथून दहा किमी. अंतरावर नासिक शहर आहे. जलालपूरजवळ आलंदी नदी गोदावरीस मिळाल्यानंतर काही अंतरावर गोदावरी अरुंद, खडकाळ पात्रातून जाऊन सु. १० मी. खोल उडी घेते व तोच दूधस्थळी धबधबा होय. नासिक शहरात प्रवेश करण्यापूर्वी ती सु. दोन मी. ची छोटीशी उडी घेते. तिच्या काठी अनेक देवळे असून पात्रात अनेक कुंडले बांधलेली आहेत. नासिक व निफाड या दोन तालुक्यांतील गोदावरीचा ९६ किमी. प्रवाह या जिल्ह्यातून वाहतो. दारणा ही गोदावरीची या जिल्ह्यातील प्रमुख उपनदी होय. ती इगतपुरीच्या आग्नेयीस १३ किमी. वर सह्याद्रीमध्ये उगम पावते. दारणेवर नांदगावजवळ धरण बांधण्यात आले आहे व त्यामुळे लेक बीले हा जलाशय निर्माण झाला आहे. दारणेस वाकी, उंदुलोह व वालदेवी या प्रमुख उपनद्या मिळतात व त्यांसह दारणा निफाड तालुक्यात गोदावरीस मिळते. या पूर्ववाहिनी नद्या बऱ्याच उथळ असून वर्षातून सहा ते आठ महिने कोरड्या असतात. दारणेशिवाय गोदावरीस या जिल्ह्यात देव, झाम, बाणगंगा, काडवा व गुई या प्रमुख नद्या मिळतात. गोदावरी व तिच्या उपनद्या यांचा जिल्ह्याला सिंचनाच्या दृष्टीने बराच उपयोग होतो.
नद्यांकाठच्या सपाट प्रदेशातील मृदा काळी, खोल, गाळपेराची व सुपीक आहे. डोंगरउतारावर व पठारावर कठीण, उथळ, तांबडी मृदा व काही भागांत लालसर, काळी, कोरळ मृदा आहे. डोंगराळ भागात हलकी, दगडगोट्यांनी व चुनखडीने भरलेली मृदा आहे. चुनखडी व बांधकामास उपयोगी बेसाल्ट दगड यांशिवाय अन्य खनिजे या जिल्ह्यात सापडत नाहीत. सुरगाणा तालुक्यात सापडणारे लोहखनिज आर्थिक दृष्ट्या उपयुक्त नाही.
या जिल्ह्यात देशावरील भागात जून ते सप्टेंबर पावसाळी, तर इतर महिन्यांत उष्ण, कोरडे हवामान आढळते. जिल्ह्यात सरासरी १०३ सेंमी. पाऊस पडतो. पश्चिमेस पेठ येथे २३५ सेंमी. तर इगतपुरीला ३३४ सेंमी. पर्यंत पाऊस पडतो. पूर्वेस पर्जन्यछायेच्या प्रदेशात तो कमी पडतो. सटाणा येथे ४८ सेंमी. तर दिंडोरी येथे ७५ सेंमी. पाऊस पडतो. मे, ऑक्टोंबर व नोव्हेंबरमध्ये गडगडाटी आरोह पर्जन्य पडतो, तर जून ते सप्टेंबर या काळात नैऋत्य मान्सूनचा पाऊस पडतो. महाराष्ट्राच्या या भागातील अन्य जिल्ह्यांप्रमाणेच नासिक जिल्ह्यातही पावसाचे मान ५०% पर्यंत काही वेळा कमीजास्त होत असल्याचे दिसते. त्यामुळे काही भागांत तीव्र दुष्काळ पडतात. मे महिन्यात तपमान सर्वोच्च असते. मालेगाव येथे दैनिक सरासरी कमाल तपमान ४०·६°से. पर्यंत आढळते. जानेवारीत नासिक येथे दैनिक सरासरी किमान तापमान १०·१°सें. आढळते. आजवरचे प्रत्यक्ष कमाल तपमान ४६·७°से. तर किमान तपमान ०·१°से. मालेगाव येथे नोंदविलेले आहे. पश्चिमेस पेठ व सुरगाणा तालुके व नासिक आणि दिंडोरी तालुक्यांचा अगदी वायव्य भाग येथील हवामान कोकणातल्याप्रमाणे जास्त पावसाचे व उन्हाळ्यात उष्ण, दमट आणि असह्य असते. पावसाळ्याशिवाय इतर काळात येथे पाण्याचे दुर्भिक्ष असते. हिवाळा अल्पकाळ परंतु साधारण तीव्र असतो. उत्तर भारतात हिवाळ्यात पश्चिमेकडून येणाऱ्या आवर्तांमुळे या जिल्ह्यात जेव्हा थंडीची लाट येते, तेव्हा तपमान ०°सें. पर्यंत उतरून दहिवरामुळे पिकांचे, विशेषतः द्राक्षपिकांचे, मोठे नुकसान होते.
जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रापैकी २२·१३% भागावर जंगले असून त्यांचे क्षेत्रफळ ३,४४६·२८ चौ. किमी. आहे. त्यांपैकी २,९२०·०७ चौ. किमी. जंगल राखीव असून, २४५·४५ चौ. किमी. जंगल संरक्षित आहे. सुमारे ९२८·८८ चौ. किमी. जंगल हे पश्चिमेच्या तळघाट प्रदेशात असून उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. या भागात पाऊस भरपूर व प्रदेश दुर्गम असल्यामुळे लोकसंख्या विरळ आहे. त्यामुळे जंगले अधिक प्रमाणात वाढली आहेत व टिकून आहेत. साग ही प्रमुख महत्त्वाची वनस्पती असून सालई, ऐन, बांबू, हळदू, कळंब, शिसवी, खैर, तिवस, हिरडा, बाभूळ, बिबळा, धावडा, आंबा, जांभूळ, मोहवा ह्या महत्त्वाच्या अन्य वनस्पती आहेत. सह्याद्रीच्या पूर्व उतारावरील भागात साद, सादडा (ऐन), काकड, सालई, मोदल, ह्या प्रमुख वनस्पती आहेत. येथील जंगल विरळ व विखुरलेले आहे. बऱ्याच क्षेत्रात चराऊ गवत आहे. पूर्वेकडील जास्त वस्तीच्या प्रदेशात खुरटी झुडुपे, काटेरी झाडे असून सालई, धावडा आणि बाभूळ ही इंधनोपयोगी महत्त्वाची झाडे आहेत. काही भागांत अंजन, खैर व तुरळक ठिकाणी चंदनाचीही झाडे आहेत. कमी पावसामुळे तसेच मनुष्य व जनावरे यांच्या अतिक्रमणामुळे पूर्वेकडील जंगल निकृष्ट बनले आहे. १९७३–७४ साली इमारती लाकूड ६३,३४,८२१ रु. सरपणाचे लाकूड ९,४८,२०१ रु. बांबू २,३५३ रु. गवत व कुरणे २,९४,८९५ रु. आणि इतर ८,७२,८९५ रु. असे वनोत्पादन मिळाले. रोशा गवत, हिरडे व विडीची पाने ही महत्त्वाची अन्य उत्पादने आहेत.
वाघ, चित्ता, रानडुक्कर, अस्वल, सांबर यांसारखे हिंस्त्र प्राणी, तसेच नीलगाय, चितळ, भेकर इ. प्राणी १८८० पूर्वी विपुल होते पण जंगले विरळ झाल्याने व बेबंद शिकारीमुळे आज बिबळ्या, लांडगा, खोकड, तरस, सांबर, माकड, मुंगूस, धार्डिया (भुंकणारे हरिण), रानडुक्कर, कोल्हा हेच प्राणी मुख्यतः आढळतात. काळवीट, चिंकारा, चौशिंगा व नीलगाय हे क्वचित आढळतात. गोदावरी, गिरणा, दारणा या प्रमुख नद्यांतून व त्यांच्या उपनद्यांतून थोडीबहुत मासेमारी चालत असून दरवर्षी सरासरी ४५ टन मासे सापडतात. त्यांत लोचेस, कॅटफिश, नाइफफिश, स्नेकहेडेड फिश, गोबी हे प्रमुख प्रकार असून त्यांची काही स्थानिक नावे चेला, पाल, मुरी, मगर, सिंगी, शिंगाडा, चाबर, मरळ धोक, खराबी, वाम, अशी आहेत. धरणांच्या जलाशयांत व लहानमोठ्या तलावांत माशांची पैदास करण्याचे प्रयत्न चालू आहेत. नेहमीच्या कावळा, चिमणी, पोपट, मैना, सुतार, मोर, कोकिळा, घुबड, खंड्या, पिंगळा, टिटवी, ससाणा, इ. शिवाय लावा, भाटतीतर, बगळा, बदकाच्या जातीचे पक्षी व हिरवी कबुतरे हे वैशिष्ट्यपूर्ण पक्षी आहेत. नाग, मण्यार, घोणस, फुरसे इ. विषारी व अनेक बिनविषारी साप आहेत.
आर्थिक स्थिती : शेती हा जिल्ह्यातील प्रमुख व्यवसाय आहे. एकूण ८,९८,००० कामगारांपैकी ६,४७,००० शेतकरी व शेतमजूर आहेत म्हणजे कामगारांपैकी ७२% कामगार शेतीवर आहेत. जिल्ह्यातील पेरणीयोग्य क्षेत्रांपैकी ५९·२१% क्षेत्रात शेती होती. १९७२–७३ साली पेरणीखालील निव्वळ क्षेत्र ८,०१,४२८ हेक्टर होते, तर १९७१–७२ साली ते ८,६९,३९६ हे. होते. १९७२–७३ साली दुबार पिकाचे क्षेत्र ३०,९६२ हे. होते. त्यापूर्वीच्या वर्षी हेच क्षेत्र ४८ हजार हे. पेक्षाही जास्त होते. १९७२ सालच्या अवर्षणामुळे त्या वर्षी एकूण क्षेत्रात बरीच घट झालेली दिसते. ८०% जमीन अन्नपिकांसाठी वापरली जाते. बाजरी हे पिक सर्वांत महत्त्वाचे असून, जवळजवळ ३६% क्षेत्र या पिकाखाली असून १९७१–७२ साली २,६०,२४३ हे. मधून ३१,२०० मे. टन इतके उत्पादन झाले. त्याखालोखाल १,०३,२५३ हे. ज्वारीखाली, ९८,१४२ हे. गव्हाखाली व ३४,६८६ हे. तांदळाखाली असे प्रमुख पिकांखालील क्षेत्र होते. नाचणी, वरी, मका इ. इतर धान्यपिकांखाली ५७,४२३ हे. क्षेत्र होते. १९७१–७२ साली तांदळाचे उत्पादन २९,५०० मे. टन, गव्हाचे ४१,२०० मे. टन व एकूण सर्व धान्यांचे उत्पादन १,५६,००० मे. टन झाले.जिल्ह्याच्या थळ घाट या पश्चिमेच्या भागात तांदूळ व नाचणी ही पिके महत्त्वाची आहेत तर मध्य भागात नासिक, कळवण, बागलाणचा पूर्व भाग, सिन्नर व निफाडच्या पश्चिम भागात बाजरी महत्त्वाचे पीक आहे. पूर्वेकडील सुपीक जमिनीच्या भागात ज्वारी हे महत्त्वाचे पीक असून जलसिंचन उपलब्ध असणाऱ्या भागात गहू हे पीक महत्त्वाचे आहे. कांदा हे महत्त्वाचे रोखीचे पीक असून ५,००० हे. जमिनीत हे पीक होते. राज्यातील ३६% कांदा या जिल्ह्यात पिकतो. १९७१–७२ साली इतर पिकांमध्ये उसाखाली १३,८८३ हे. कडधान्यांखाली ८५,८८५ हे. भुईमुगाखाली ४६,४५९ हे. कापसाखाली ८,३९० हे. व फळबागांखाली २७,२४६ हे. क्षेत्र होते. राज्यातील २६% द्राक्षे ह्या जिल्ह्यात पिकतात. पर्जन्यमान व जमिनीचा प्रकार यांनुसार पिकांचे प्रकार बदलतात. पश्चिमेस तांदूळ, नाचणी मध्यभागात बाजरी, कडधान्ये, तेलबिया, तर पूर्वेस सुपीक प्रदेशात कापूस, ज्वारी, गहू, ऊस व फळबागा यांचे प्रमाण जास्त आहे. कांदा, द्राक्षे, ऊस आणि भाजीपाला यांसाठी हा जिल्हा प्रसिद्ध आहे. भारताच्या अन्नमहामंडळाचे मोठे साठा केंद्र मनमाड येथे आहे तसेच केंद्रीय गहू संशोधन केंद्र निफाड तालुक्यात कुंदेवाडी येथे आहे. जलसिंचनाची सोय १९७१– ७२ साली निव्वळ ७९,७५२ हे. जमिनीस उपलब्ध होती. त्यांपैकी ७०% ओलित विहिरींच्या पाण्याने व २५% ओलित कालव्यांच्या पाण्याने होत असे. उपसाजलसिंचन योजनेचा फारसा विकास या जिल्ह्यात अद्याप झालेला नाही पण पाण्याची एंजिने अहमदनगर जिल्ह्याखालोखाल या जिल्ह्यात आहेत.
गंगापूर प्रकल्प–पहिला व दुसरा टप्पा–पूर्ण झाला आहे. त्यापासून ७६२ हे. कायम व ४,९७७ हे. हंगामी पाणीपुरवठा होतो. हे धरण गोदावरीवर आहे. अपर गोदावरी हा प्रचंड प्रकल्प असून त्यात कळवण नदीवर वाघाडी, काडवा नदीवर करंजवन व पालखेड आणि अनदा नदीवर ओझरखेड हे चार उपप्रकल्प आहेत. प्रकल्प पूर्ण होताच ४४,२७३ हे. जमीन ओलिताखाली येईल. सध्या वाघाडी धरणातून काही जमिनीस पाणी मिळते. गिरणा प्रकल्प १९७० साली पूर्ण झाला असून एकूण ५५,५४६ हे. जमिनीस पाणी मिळेल. सध्या १,६५० हे. जमिनीस कायम पाणी आणि २२,४०० हे. जमिनीस हंगामी पाणी उपलब्ध आहे. याशिवाय दरसवाडी, चणकापूर, भोजापूर, दारणा, मोसम व केळझर हे मध्यम प्रकल्प पूर्ण होत आले आहेत.
जिल्ह्यात १९७२ सली १४,२१,०७८ इतके पशुधन होते. त्यात बैल ३,५७,६८० गाई २,५७,८१६ वासरे १,८०,०३३ रेडे ११,४३६ म्हशी ५५,१६० पारडी ३,७५६ मेंढ्या १,३८,८७१ शेळ्या ३,७२,०१८ घोडे ३,३०८ व अन्य पशुसंपत्ती १७,००० होती. कोंबड्या ४,८२,८७२ होत्या. राज्यात पशुसंपत्तीमध्ये अहमदनगर आणि चंद्रपूर जिल्ह्यानंतर नासिक जिल्ह्याचा क्रमांक लागतो. जिल्ह्यात जनावरांचे दवाखाने, रुग्णालये मिळून १७ आहेत.
उद्योगधंदे : जिल्ह्यात नोंदविलेले उद्योग ३९४ होते (१९७२) व त्यांत १९,६७२ लोकांस रोजगार उपलब्ध होता. उद्योगधंद्यात ११% कामगार (घरगुती उद्योग धरून) गुंतलेले आहेत. जिल्ह्यात मालेगाव व येवले ही हातमाग कापडउद्योग केंद्रे असून तेथे सुती आणि रेशमी कापड, लुगडी, जरीच्या पैठण्या, पितांबर इ. विणले जातात. नासिक शहराजवळ ओझर येथे ‘हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेड’ (एच्. ए. एल्.) कंपनीचा ‘मिग’लढाऊ विमानांचा कारखाना आहे. शिवाय ओझरजवळच किर्लोस्कर कंपनीचा ट्रॅक्टरचा कारखाना आहे. पिंपळगाव बसवंतजवळ द्राक्षापासून ‘पिबोला’पेये बनविण्याचा कारखाना आहे. नासिकरोड येथे ‘गव्हर्मेंट सिक्युरिटी प्रेस’हा सरकारी कागदी चलन व दस्तऐवज छापखाना आणि गांधीनगर येथे मध्यवर्ती सरकारचा छापखाना आहे. विड्या वळण्याचा कुटीरोद्योगही महत्त्वाचा असून त्यात सु.७·००० लोकांस रोजगार मिळत असे. नासिक, मालेगाव व मनमाड येथील औद्योगिक वसाहती वेगाने वाढत आहेत. साखर कारखाने हा वाढता उद्योग असून रावळगाव येथे खाजगी, तर दाभाडी व निफाड येथे सहकारी साखर कारखाने आहेत. शिवाय मायको बॉश, एशियन डिहायड्रेशन प्रा. लि. (कांदा निर्जलीकरण कारखाना), मोटवाणे इलेक्ट्रिक इंडिया प्रा. लि., बाहको तापरिया टूल्स लि., ॲग्रिकल्चरल डिस्क्स (इं.) लि., व्हिस्कॉस्ट फोर्ज प्रा. लि., गॅब्रिएल्स इंडिया लि., कॉसमॉस इंडिया रबर वर्क्स, सिएट टायर्स ऑफ इंडिया लि. हे प्रमुख कारखाने नासिक व नासिकरोड परिसरांत आहेत. ठेंगोडे येथे सहकारी सूतगिरणी सुरू करण्यात आली आहे. तांब्या–पितळेच्या भांड्यांसाठी नासिक जिल्हा प्रसिद्ध आहे. रेल्वेमार्ग, पाणीपुरवठा सुधारणा यांमुळे नासिक जिल्ह्यात औद्योगिक विकास वेगाने होत आहे. नासिकजवळ सातपूर येथे औद्योगिक विकास क्षेत्र वाढत आहे. देवळाली येथे दोन महत्त्वाचे संरक्षण विभाग आहेत. नासिकजवळ एकलहरे येथे औष्णिक वीज केंद्र असून वीज उत्पादन २८० मेवॉ. आहे. शिवाय वैतरणा जलवीज केंद्रातून ८० मेवॉ. वीज निर्माण होते. १९७४–७५ पर्यंत सर्व शहरांस व २७३ गावांस आणि ३३,६०७ शेती–पंपांस वीज पुरविण्यात आली. एकूण खपलेल्या विजेपैकी ४९% उद्योगधंद्यांसाठी व २५% शेतीसाठी वापरली गेली.
जिल्ह्यातून मध्य रेल्वेचा २५८ किमी. चा प्रमुख मार्ग जातो. मनमाड हे प्रमुख रेल्वे प्रस्थानक असून तेथून दौंडकडे व हैदराबादकडे लोहमार्ग जातात. मुंबई–हावडा, मुंबई–पठाणकोट, मुंबई–नागपूर हे लोहमार्ग या जिल्ह्यातून जातात.
या जिल्ह्यात रस्त्यांची एकूण लांबी ७,९९६·५७ किमी. असून त्यांपैकी ९५४·५७ किमी. रस्ते राज्य सरकारच्या बांधकाम खात्याकडे व ६,७४२ किमी. रस्ते जिल्हा परिषदेकडे आहेत. यात २४१·७१ लांबीचे राष्ट्रीय महामार्ग (मुंबई–आग्रारोड नं. ३), ७०५·३५ किमी. राज्यमार्ग महत्त्वाचे आहेत. ७९ किमी. रस्ते सिमेंटचे, ८२३ किमी. डांबरी, ९३५ किमी. खडीचे व इतर रस्ते कच्चे आहेत. यांशिवाय ४४५·८७ किमी. रस्ते नगरपालिकांचे आहेत व त्यांपैकी २०० किमी. रस्ते सिमेंटचे किंवा डांबरी आहेत. मुंबई–आग्रा रस्ता व नासिक–पुणे रस्ता हे प्रमुख रस्ते आहेत.
आंतरराज्य वाहतुकीची मक्तेदारी राज्यमार्ग–परिवहन महामंडळाकडेच आहे. १९७२–७३ साली जिल्ह्यात ४१४ मार्गांवर वाहतूक चाले त्यांची एकूण लांबी १९,३०१ किमी. होती. त्यासाठी ३३२ बसगाड्या वापरल्या जात व दररोज सरासरी १,२०,७५७ प्रवासी प्रवास करीत असत. नासिक येथे सर्व सोईंनी युक्त बसस्थानक असून इतरत्र २१ ठिकाणी बसथांबे आहेत. १९७२–७३ साली जिल्ह्यात ४८३ डाकघरे व ५७ तारघरे, ७६,७५९ रेडिओ व ४,७३८ दूरध्वनी होते. मार्च १९७४ पर्यंत १,१८४ गावांस सार्वजनिक रेडिओ पुरविले असून त्यांचा ९ लाखांहून अधिक लोकांस लाभ होतो. जिल्ह्यात १९७३–७४ साली १२२ छापखाने होते. ४ मराठी दैनिके, १ उर्दू दैनिक, २१ मराठी साप्ताहिके, १० उर्दू साप्ताहिके, ३१ अन्यभाषिक साप्ताहिके व ८ मराठी मासिके होती. त्यांपैकी ३ दैनिके, १४ मराठी साप्ताहिके व ७ मराठी मासिके नासिक शहरातून, तर उर्दू नियतकालिके मालेगावाला प्रसिद्ध होत असत. गावकरी हे प्रसिद्ध दैनिक नासिक व मालेगाव येथे प्रसिद्ध होते. नागरिक, जागृति, दिनकर, रसरंग ही मराठी व हमसब, आवामे आवाज ही उर्दू साप्ताहिके आणि अमृत, श्रीयुत ही मराठी मासिके प्रसिद्ध आहेत.
लोक व समाजजीवन : १९७१ साली एकूण लोकसंख्या २३,६९,२२१ होती आणि मुंबई व पुणे यांच्या खालोखाल लोकसंख्येत हा तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा होता. सुमारे ३८% लोक कामगार होते. जिल्ह्यात २० नगरपालिका व १,६२८ खेडी होती. एकूण संख्येपैकी १६,९०,७४९ (७१·३६%) लोकसंख्या ग्रामीण व ६,७८,००० (२८·६४%) नागरी होती. प्रमुख शहरांत मालेगाव १,९१,८४७ नासिक १,७६,०९१ नासिकरोड (देवळाली) ५५,४३६ देवळाली कॅंटोनमेंट ३०,६१८ मनमाड २९,५५१ येवले २४,५३३ ओझर २१,२६० सिन्नर २०,२१८ ही प्रमुख शहरे होती. १९६१ मध्ये जिल्ह्यातील ८७·७% लोक मराठी भाषिक असून त्याखालोखाल उर्दू व हिंदी भाषिक होते. शिवाय अल्प प्रमाणात गुजराती, कानडी, तमिळ, तेलुगू, पंजाबी व इतर भाषा बोलणारे लोक होते.
एकूण लोकसंख्येमध्ये १९७१ साली २०,००,९०० हिंदू २,०८,९०० मुस्लिम १,२०,९०० बौद्ध २१,५०० जैन, १२,००० ख्रिस्ती व ४,१०० शीख होते. अनुसूचित जातींची व जमातींची एकत्रित लोकसंख्या ६,५७,३०० होती. पैकी अनुसूचित जातींची एकूण लोकसंख्या केवळ ९६,०९७ इतकीच होती, तर अनुसूचित जमातींची एकूण लोकसंख्या ५,६१,२०० होती, म्हणजेच जिल्ह्यातील २३·३% लोकसंख्या आदिवासींची होती. पेठ तालुक्यात आदिवासींची संख्या ७७,८०० होती. त्याखालोखाल सुरगाणा, दिंडोरी, नासिक या तालुक्यांत आदिवासी जास्त होते, तर येवले तालुक्यात ते सर्वांत कमी (८,२००) होते. नांदगाव, चांदवड, सिन्नर या अन्य तालुक्यांत त्यांची संख्या कमी होती. आदिवासींमध्ये महादेव कोळी संख्येने सर्वांत जास्त होते व त्याखालोखाल कोकणा, भिल्ल संख्येने जास्त होते. एकूण आदिवासींपैकी ९०% आदिवासी महादेव कोळी, कोकणा, भिल्ल हेच होते. शिवाय बारली, ठाकूर, गोंड, काथोडी हे आदिवासी काही प्रमाणात आहेत. आदिवासींचे वैशाखात ‘अरवाजा’, आश्विनात ‘वाघ वारशी’व फाल्गुनात ‘शिमगा’हे महत्त्वाचे सण आहेत.
नासिक येथे जिल्हा रुग्णालय आणि हॅरिस जनरल हॉस्पिटल आहे. १९७३–७४ मध्ये जिल्ह्यात २ रुग्णालये, २८ दवाखाने, १३ प्रसूतिगृहे, ६३ आरोग्यकेंद्रे, १८ प्राथमिक आरोग्यकेंद्रे, ९८ डॉक्टर, १० वैद्य व ४३७ परिचारिका होत्या. रुग्णालये व दवाखाने मिळून ६०५ रुग्णशय्या होत्या. १९७३–७४ मध्ये जिल्ह्यात जन्म व मृत्यू यांचे हजारी प्रमाण अनुक्रमे २०·२९ व ८·९८ होते. ३१,७२५ संततिप्रतिबंधक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. श्वसनेंद्रियांचे रोग, आमांश, हगवण, क्षय, हिवताप, कुष्ठरोग, कर्करोग, न्यूमोनिया, मुदतीचा ताप यांचे प्राबल्य असून देवी, पटकी, हिवताप यांच्या निर्मूलनाच्या योजना आहेत.
जिल्ह्याची सरासरी साक्षरता ३६% होती. साक्षरता प्रमाण पुरुषांचे ४८·४५% तर स्त्रियांचे २३·३७% होते. १९७३ साली जिल्ह्यात एकूण २,२५२ प्राथमिक शिक्षणसंस्था होत्या. त्यांत ३,१९,७६६ विद्यार्थी व सु. १०,००० शिक्षक माध्यमिक शाळांची संख्या २५३ होती व त्यांत ९७,०९५ विद्यार्थी व सु. ४,००० शिक्षक होते. उच्च शिक्षणाच्या संस्था २२ होत्या व विद्यार्थ्यांची संख्या १२,०१६ व शिक्षकांची संख्या सु. ४०० होती. जिल्ह्यात ५ शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालये आहेत. नासिक हे शिक्षणाचे प्रमुख केंद्र असून त्याखालोखाल मालेगाव हे शहर महत्त्वाचे आहे. मागासवर्गीय व अनुसूचित जातिजमातींच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती देण्यात येतात. जिल्ह्यात १९७२–७३ मध्ये सर्व प्रकारच्या मिळून १,९६३ सहकारी संस्था होत्या. त्यांचे एकूण अडीच लाख सभासद होते व एकूण भांडवल २९·७४ कोटी रु. होते. शेतकी पत सहकारी संस्थांकडून १३·४६ कोटी रु. कर्ज दिले गेले. एकूण १५९ बॅंकांपैकी २२ अर्बन बॅँका होत्या.
जिल्ह्यात १९७४ मार्चअखेर १,६२८ गावांसाठी १,१२५ ग्रामपंचायती होत्या. तसेच देवळाली कॅंटोनमेंट बोर्ड व १२ नगरपालिका नागरी स्थानिक स्वराज्याची कामे करीत होत्या. जिल्हा परिषद व पंचायत समित्या जिल्हा व गट विभाग स्तरांवर निर्वाचित सदस्यांच्या व जिल्हाधिकारी, तहसिलदार, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी इ. शासकीय अधिकाऱ्यांच्या साहाय्याने कारभार करतात. जिल्हाधिकारी सामान्य प्रशासन, कायदा व सुव्यवस्था, महसूल, पुरवठा यांचा कराभार पाहतो आणि न्यायदानाशिवाय राज्यशासनाने सुरू केलेल्या बाबींवर देखरेख ठेवतो. नासिक येथे पोलिस प्रशिक्षण केंद्र व मध्यवर्ती कारागृह आहे.
जिल्ह्यात अनेक शिक्षणसंस्था, व्यायामशाळा, सार्वजनिक वाचनालये, नासिक येथील वसंत व्याख्यानमाला, गांधर्वसंगीत महाविद्यालय, व्यंकटेश बालाजी संस्थान, डांग सेवा मंडळ, भोसला मिलिटरी स्कूल, पुणे विद्यार्थी गृहाने चावविलेली क्षयरोग निवारण संस्था, अभिनव भारत स्मारक, कलानिकेतन, गाडगे महाराज धर्मशाळा, बॉइज टाउन, नासिक जिल्हा कुष्ठरोग निवारण मंडळ, त्र्यंबकेश्वरची संस्कृत पाठशाला, अनेक महिला मंडळे, येवल्याची गोशाळा आणि पांजरपोळ, निफाडचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण साहाय्यक मंडळ इ. सार्वजनिक सेवासंस्था आहेत.
कुस्ती, कबड्डी, खोखो इ. खेळ जिल्ह्यात लोकप्रिय आहेत. महाविद्यालयांतून क्रिकेट, फुटबॉल इ. पाश्चात्य क्रीडाप्रकारही आले आहेत. सामान्य माणसाचे करमणुकीचे साधन तमाशा व सिनेमा हेच आहे. जिल्ह्यात १९७४–७५ मध्ये एकूण ३० चित्रपटगृहे, १६ फिरती चित्रपटगृहे व ६ अर्धफिरती चित्रपटगृहे होती. पैकी १३ चित्रपटगृहे नासिकमध्ये, ६ मालेगावमध्ये व ४ नांदगावमध्ये होती.
जिल्ह्यात अनेक प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. त्यांत साल्हेर, पट्टा, चांदवड इ. किल्ले, पांडव लेणी, चांभार लेणी, पंचवटी, नासिकमधील अनेक मंदिरे, पेशवेवाडा व सार्वजनिक वाचनालये, म. गांधी स्मारक, बारा ज्योतिर्लिंगीपैकी एक त्र्यंबकेश्वर, त्याजवळील ब्रह्मगिरी, गंगाद्वार व निवृत्तिनाथांची समाधी, समर्थ रामदास स्वामींचे तपश्चर्या स्थान टाकळी व तेथील त्यांचा मठ व मारुती, दूधस्थळी धबधबा, गंगापूर धरण, सप्तशृंगीगड, कळसूबाई शिखर, चांदवडचा रंगमहाल, अंकाईची लेणी, सिन्नरचे हेमाडपंती मंदिर, नासिकरोड येथील मुक्तिधाम ही लक्षणीय आहेत.
डिसूझा, आ. रे.
“