नाविक अभियांत्रिकी : ही यांत्रिक अभियांत्रिकीची (यंत्रांची योजना, रचना व वापर करण्याच्या शास्त्राची) एक स्वतंत्र शाखा आहे. या शाखेच्या विशेष शिक्षणात (१) जहाजांचे बांधकाम, (२) जहाजावरील यंत्रसामग्री आणि (३) जहाजावरील इतर सर्व व्यवस्थेसंबंधीची सामग्री अशा तीन विषयांचा विविध स्वरूंपातील अभ्यासक्रम अंतर्भूत असतो.

जहाजांचा अभ्यास करताना नाविक वास्तुशिल्प (जहाजाचा दर्शनी आकार व त्याच्या कायेच्या बांधणीचा तपशीलवार विचार करणारे शास्त्र) आणि जहाज बांधणीच्या तंत्राचा अभ्यास करावा लागतो. या विषयांचा अभ्यास करण्यासाठी भारतात खरगपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत पदवीस्तरावरील अभ्यासक्रमाची सोय आहे.

जहाजाच्या यंत्रसामग्रीत जहाज चालविण्यास आवश्यक असलेली मुख्य एंजिने, त्यांना साहाय्यक अशी इतर यंत्रे, जहाजाच्या नित्य व्यवहारासाठी (उदा., तेल वाहून नेण्याची व्यवस्था, विद्युत् निर्मिती व वितरण इत्यादींसाठी) लागणारी यंत्रसामग्री, कर्मचारी व उतारू यांच्या सुखसोयीसाठी (उदा., वातानुकूलन, प्रशीतन, स्वच्छता इत्यादींसाठी) आवश्यक अशी यंत्रसामग्री, मालाची चढ-उतार करण्यास आणि आगबोट नांगरण्यास किंवा बंदरात बांधून ठेवण्यास लागणारी गच्चीवरील (डेकवरील) यंत्रसामग्री आणि लहान प्रमाणावर दुरुस्ती करण्यास उपयोगी पडेल अशी कर्मशालेतील यंत्रसामग्री यांचा समावेश होतो [⟶ जहाज प्रचालन जहाजाचे एंजिन जहाजातील यंत्रसामग्री]. इतर व्यवस्थांमध्ये प्राणरक्षक साहित्य, अग्निप्रतिबंधक व अग्निशामक साहित्य इत्यादींचा सामावेश होतो. वरील सर्व विषयांतील यंत्रांचा व साधनांचा अभ्यास करताना त्यांचे अभिकल्प (योजना वा आराखडा), रचना, निर्मिती, वापर, अनुरक्षण (वंगण, साफसफाई इ. दैनंदिन काळजी), दुरुस्ती आणि परीक्षण यांचा विचार होतो. नाविक अभियंत्याच्या दृष्टीने यातील वापर, अनुरक्षण, दुरुस्ती व परीक्षण यांना अधिक महत्त्व असते. जहाजाचा प्रवास चालू असताना बाहेरच्या लोकांची मदत मिळण्याची शक्यता नसल्यामुळे यंत्रांचा योग्य वापर आणि त्यांच्या स्थिती-गतीची नोंद ठेवल्याने त्यांचे योजनापूर्वक अनुरक्षण करता येते. अनुरक्षण करताना यंत्राच्या प्रत्येक भागाचे परीक्षण करून आणि त्यांची नोंद ठेवून कमीत कमी व योग्य दुरुस्ती योग्य वेळी केल्यास यंत्राचे आयुष्य व त्याची कार्यक्षमता वाढते. नाविक अभियंत्याचे शिक्षण आणि अनुभव वरील दृष्टीकोनातून होत असल्यामुळे अन्य क्षेत्रांतही त्याला अनुरक्षक अभियंता म्हणून उत्तम प्रकारे काम करता येते. या क्षेत्रातील सर्वोच्च परीक्षेच्या अभ्यासक्रमात अभिकल्पावर भर दिलेला असल्यामुळे ही परीक्षा उत्तीर्ण झालेले अभियंते उच्चतर जबाबदारी पार पाडू शकतात.

अभ्यासक्रम : एंजिनाचे आणि यंत्रांचे कार्य नीट समजण्यासाठी मूलभूत सैद्धांतिक ज्ञानाचीही आवश्यक्यता असल्यामुळे त्याचाही अंतर्भाव या क्षेत्रातील विविध स्तरांवरील अभ्यासक्रमात करण्यात आलेला आहे. स्वतःच्या हाताने काम करण्याची सवय आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असल्यामुळे या क्षेत्रातील प्राथमिक शिक्षण आणि पुढे द्याव्या लागणाऱ्या परिवहन मंत्रालयाच्या परीक्षांना बसण्याची पात्रताही प्रत्यक्ष कामाच्या अनुभवावरच आधारित आहेत. या क्षेत्रातील परीक्षा कोणत्याही विद्यापीठातर्फे होत नसून त्या परिवहन मंत्रालयातर्फे होतात व त्यांना राष्ट्रकुलातील (कॉमनवेल्थमधील) इतर राष्ट्रांच्या संबंधित खात्यांची मान्यता आहे. त्यामुळे एका राष्ट्रातील नाविक अभियंते दुसऱ्या राष्ट्राच्या जहाजावर काम करू शकतात.

भारतात या क्षेत्रातील प्राथमिक शिक्षण देणारी संस्था डायरेक्टर ऑफ मरीन एंजिनिअरिंग ट्रेनिंग (डी. एम. ई. टी.) या नावाने ओळखली जाते. कोणत्याही विद्यापीठाची प्रथम वर्ष विज्ञान किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्याच स्तरावरील लेखी प्रवेश परीक्षा आणि नंतर मुलाखत यांच्या आधारे प्रवेश दिला जातो. डी. एम. ई. टी. मधील अभ्यासक्रमात मूलतत्त्वे, तंत्र आणि प्रात्यक्षिके असे तीन विभाग पाडले आहेत. मूलतत्त्वांमध्ये गणित, शास्त्र आणि अभियांत्रिकीमधील मूलभूत सैद्धांतिक विषयांचा समावेश होतो. तंत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रांची व साहित्याची रचना, बांधणी, वापर इ. विषय येतात. प्रात्यक्षिकामध्ये प्रयोगशाळेतील प्रयोग, कारखान्यातील काम आणि परीक्षणाचे प्रत्यक्ष काम यांचा समावेश होतो. एकूण चार वर्षांच्या अभ्यासक्रमातील तीन वर्षे जवळजवळ पूर्ण वेळ कारखान्यातील कामात घालवावी लागतात.

परिवहन मंत्रालयातर्फे होणाऱ्या परीक्षा ‘द्वितीय वर्ग अभियंता’आणि ‘प्रथम वर्ग अभियंता’अशा नावांनी ओळखल्या जातात. प्रत्येक परीक्षा अशा दोन भागांत घेण्यात येते. या परीक्षा वाफ एंजिन (स्टीम) व अंतर्ज्वलन एंजिन (एंजिनातील सिलिंडरात इंधन जाळून चालक प्रेरणा उत्पन्न करण्याची व्यवस्था असलेले एंजिन, मोटार) अशा जहाजाच्या मुख्य (चालक पंखा चालविणाऱ्या) एंजिनाप्रमाणे विभागलेल्या आहेत. द्वितीय वर्ग भागाच्या परीक्षेस अनुप्रयुक्त यामिकी (प्रेरणांचा वस्तूवर होणारा परिणाम आणि त्यामुळे निर्माण होणारी गती यांच्या व्यावहारिक उपयोगाच्या दृष्टीने अभ्यास करणारे शास्त्र), उष्णता आणि ऊष्मीय एंजिन (उष्णतेचा उपयोग करून यांत्रिक शक्ती उत्पन्न करणारे एंजिन), गणित व परिमाणित आरेखन (प्रमाणबद्ध आकृत्या काढणे) असे चार विषय आहेत. प्रथम वर्ग भागाच्या परीक्षेस अनुप्रयुक्त यामिकी व उष्णता आणि ऊष्मीय एंजिन हे दोनच विषय आहेत.

द्वितीय आणि प्रथम वर्ग भागाच्या परीक्षांस अभियांत्रिकी ज्ञान, विद्युत् शास्त्र व नाविक वास्तुशिल्प हे विषय आहेत. अभियांत्रिकी ज्ञान या विषयाच्या दोन लेखी व नंतर तोंडी अशा परीक्षा असतात. पहिली लेखी परीक्षा सर्व विद्यार्थ्यांसाठी असते. त्यात जहाजाची साहाय्यक यंत्रसामग्री, अग्निप्रतिबंधक व्यवस्था, कायद्यातील तरतुदी, जाहाजावरील कामकाज व व्यवस्थापन वगैरेंसंबंधी प्रश्न असतात. दुसऱ्या लेखी परीक्षेत वाफ एंजिन व अंतर्ज्वलन एंजिन यांपैकी एका प्रकारच्या मुख्य एंजिनासंबंधी प्रश्न असतात.

काही समस्या : स्वयंचलित यंत्रसामग्रीचा वापर दिवसेंदिवस सर्वच क्षेत्रांत वाढत असून त्यामुळे मानवी शक्तीचा उपयोग कमी करण्याकडे कल वाढत आहे. स्वयंचलित यंत्रांचे जाळे, त्यांचे परस्परसंबंध, दोष निदान, दुरुस्ती, स्वयंचलित यंत्रे मानवी नियंत्रणाने चालविणे इत्यादींचे ज्ञान असणे आता नाविक अभियंत्याला आवश्यक भासू लागले आहे. त्यानुसार परीक्षांच्या अभ्यासक्रमात योग्य ते बदल होत आहेत. तसेच कर्मचाऱ्यांची संख्या किमान ठेवून जास्तीत जास्त कार्यक्षमतेने यंत्रसामग्रीचा वापर करता येईल असा स्वयंचलित यंत्रसामग्रीचा अभिकल्प करण्याची प्रवृत्ती वाढत आहे.


अणुशक्ती विकासाचा परिणाम नाविक अभियांत्रिकीच्या चालू व्यवसायावर होईल अशी एक गैरसमजूत होती. अणुशक्तीमुळे फक्त वाफ निर्माण करणाऱ्या बाष्पित्रात (बॉयलरमध्ये) आणि त्याला लागणाऱ्या यंत्रसामग्रीत बदल झालेला आहे. त्या वाफेचा उपयोग करण्याच्या पद्धतीवर त्याचा परिणाम झालेला नाही. पाण्यावरून प्रवास करणाऱ्या जहाजांत आता पाण्याच्या पातळीपेक्षा थोड्या उंचावरून जाणाऱ्या ⇨ वाततल्पयानांची (हॉव्हर क्राफ्ट्सची) भर पडली आहे. ही याने त्यांच्या तळाशी निर्माण होणाऱ्या हवेच्या गादीवरून सरकत जातात. त्यामुळे त्यांचा वेगही जास्त असतो. वेगात असताना ज्यांचा सर्व मुख्य भाग पाण्याच्या पृष्ठाच्या वर उचलला जातो अशा जलपर्णी नौकाही प्रचारात आल्या आहेत. सध्या तरी ही वाहने प्रवासी वाहतुकीकरिता वापरली जात असून आर्थिक दृष्ट्या ती नेहमीच्या जहाजांची बरोबरी करू शकलेली नाहीत. त्यांच्या यंत्रसामग्रीत थोडा फरक असला, तरी एकूण व्यवस्था नेहमीच्या जहाजासारखीच असल्यामुळे त्यांना नाविक अभियंत्याची गरज लागतेच.

नौदलातील शिक्षण : संरक्षण खात्याच्या नौदलातही नाविक अभियंते असतात. त्यांच्या प्राथमिक शिक्षणाची सोय लोणावळा येथील नेव्हल एंजिनिअरिंग कॉलेजामध्ये आहे. यातून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अधिकारी स्तरावर नौदलात जातात. तेथील अनुभवानंतर त्यांना चढत्या पायरीने दर्जा मिळत जातो. संरक्षण खात्यामार्फत वेळोवेळी त्यांच्या परीक्षाही होतात. लेफ्टनंटचा दर्जा मिळविलेले अधिकारी विशिष्ट अनुभव असल्यास परिवहन मंत्रालयाच्या सेवा प्रमाणपत्रास पात्र ठरतात. ही सेवा प्रमाणपत्रे परीक्षा दिल्याशिवाय मिळू शकतात व त्यांची किंमत परीक्षा देऊन मिळालेल्या प्रमाणपत्रांसारखीच असते.

नौदलातील (पेटी) अधिकाऱ्यांच्या स्तरावरील लोकांची शिक्षणाची सोय लोणावळा येथील आय. एन. एस. शिवाजी येथे आहे. येथून चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या उमेदवारास एंजिन रूम आर्टिफिसर (ई. आर. ए.) अशी संज्ञा आहे. त्यातही वर्गवारी असते आणि अनुभवाने व वेगवेगळ्या विषयांच्या परीक्षा देऊन वरचा वर्ग मिळविता येतो. विशिष्ट अटींवर त्यांना अधिकाऱ्याचा दर्जा मिळण्याचीही सोय संरक्षण खात्यात आहे. थोड्या फार अनुभवानंतर हे ई. आर. ए. परिवहन मंत्रालयाच्या द्वितीय वर्ग परीक्षेस बसू शकतात. त्यांना सेवा प्रमाणपत्र मिळण्याची सोय नाही. मुंबई येथील लालबहादुर शास्त्री नॉटिकल अँड एंजिनिअरिंग कॉलेजात परिवहन मंत्रालयाच्या परीक्षांना बसणाऱ्या अभियंत्यांना तसेच उमेदवारी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिक्षण देण्यात येते.

भारताबाहेरील शिक्षण : भारतामध्ये चालू असलेली शिक्षण पद्धती मूलतः इंग्रजी पद्धतीनुसार असल्यामुळे भारतातील आणि राष्ट्रकुलातील इतर देशांत असलेल्या शिक्षण पद्धती सारख्या आहेत. यूरोपातील काही देशांत जहाजाच्या एंजिनाच्या अश्वशक्तीवरून स्तर ठरवून वेगवेगळी प्रमाणपत्रे देण्यात येतात. अमेरिकेतही त्याच धर्तीवर नाविक अभियंत्याचा दर्जा ठरविला जातो. अमेरिकेतील काही विद्यापीठांत नाविक अभियांत्रिकी हा पदवीस्तरावरचा अभ्यासक्रम आहे परंतु या अभ्यासक्रमात अनुरक्षणापेक्षा अभिकल्पावर भर असल्यामुळे प्रत्यक्ष जहाजावर काम करणारे अभियंते यातून तयार होत नाहीत.

नाविक अभियांत्रिकीतील सर्वोच्च परीक्षा (एक्स्ट्राॅ फर्स्ट क्लास एंजिनिअर) ही इंग्लंडच्या परिवहन मंत्रालयातर्फे घेतली जाते. ही परीक्षासुद्धा दोन भागांत विभाजित असून प्रत्येकात चार विषय आहेत. भागात यंत्रशास्त्र, पदार्थांचे बल, ऊष्मा एंजिन आणि ऊष्मागतिकी (उष्णता आणि यांत्रिक व इतर ऊर्जा यांच्यातील संबंधांचे गणितीय विवरण करणारे शास्त्र) असे चार विषय आहेत. भागात अभियांत्रिकी ज्ञान, विद्युत् शास्त्र आणि नाविक वास्तुशिल्प, अभिकल्प व आरेखन आणि निबंध असे विषय आहेत. 

लंडन येथील इन्स्टिट्यूट ऑफ मरीन एंजिनिअर्स यासारख्या संस्था या क्षेत्रातील अद्ययावत ज्ञानावर व प्रश्नांवर विचारविनिमय करीत असतात. प्रथम वर्गाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना या संस्थेचा सहसदस्य होता येते. शिवाय त्या दर्जाची परीक्षा देऊन इतरांनाही सदस्य होता येते. या संस्थेचे सहसदस्य आणि खास सदस्य असणाऱ्यांना अधिकृत अभियंता म्हणून मान्यता मिळते. याच प्रकारच्या संस्था इतर काही देशांतही आहेत.

जोशी, प. वा. तांबवेकर, अ. श्री.