नालडियार : तमिळ भाषेतील नीतिपर पद्यांचा एक संग्रह. ‘नालडि’ म्हणजे चार ओळींचे पद्य. चार-चार ओळींच्या ४०० पद्यांचा हा संग्रह इ. स. तिसऱ्या-चौथ्या शतकांत रचला गेला असावा, असे काही अभ्यासक मानतात. अनेक जैन यतींनी वेण्बा छंदात रचलेली ही नीतिपर पद्ये आहेत. विविध विषयांनुसार प्रत्येकी दहा पद्ये असलेल्या चाळीस प्रकरणांत हा संग्रह विभागला आहे. ग्रंथाची सुरुवात एका प्रार्थनापद्याने होते. धर्म, अर्थ व काम ह्या तीन पुरुषार्थांचा उपदेश करणे, हा ह्या संग्रहाचा उद्देश आहे. चौथा मोक्ष हा पुरुषार्थ वाणी व मन यांच्या पलीकडचा असल्याने त्याबाबत पद्ये दिलेली नाहीत. पद्मनर नावाच्या कवीने यांतील पद्यांचे संकलन व मांडणी करून तो सध्याच्या स्वरूपात प्रथम तयार केल्याचे दिसते. आठव्या शतकाच्या सुमारास पांड्य राजाने दुष्काळ पडला असता जैन यतींना आश्रय देऊन त्यांचे रक्षण केले, याबाबतची कृतज्ञता म्हणून त्यांनी ही पद्ये रचल्याचे सांगतात. वज्रनंदी राजाच्या आश्रयास असलेल्या कवींनी ही पद्ये रचली, असेही एक मत आहे. वज्रनंदी हा आठव्या शतकातील एका संघम्चा संस्थापक होता.

अनेक नीतिकल्पनांना यात सुंदर काव्यरूप दिलेले आढळते. हा संग्रह त्यातील ओजस्वी शैलीसाठी विशेष प्रसिद्ध आहे. त्यातील नीतितत्त्वे सार्वत्रिक स्वरूपाची असून ती सर्वांनाच प्रभावित करतात. ती अर्थसधन तर आहेतच पण सर्वांना आकलनसुलभही आहेत. तमिळमधील वेण्बा छंदास एक प्रकारची स्वाभाविक सहजसुंदर लय आहे. विविध दृष्टांतांद्वारे वर्ण्यविषयाचे जिवंत चित्र कवींनी साकार केले आहे. काही पद्यांतून सूक्ष्म असा विनोदही आढळतो. ज्ञानाचे महत्त्व स्त्रियांचे पातिव्रत्य व शील सौंदर्य, संपत्ती व तारुण्य यांची क्षणभंगुरता नीतिमत्ता व वैराग्याचा पुरस्कार इत्यादींचे वर्णन यात आढळते. तिरुक्कुरळमधील काही शब्द व कल्पनांचा यातील काही कवींनी आपल्या पद्यांत वापर केला. तिरुक्कुरळमध्ये संस्कृत शब्दांचा वापर कटाक्षपूर्वक टाळलेला आहे तथापि नालडियारमध्ये संस्कृत शब्दांचा वापर कटाक्षपूर्वक टाळलेला आहे तथापि नालडियारमध्ये अल्पसा वापर आढळतो. तमिळ भाषेतील नीतिपर ग्रंथांत नालडियारचे स्थान तिरुक्कुरळच्या खालोखाल मानले जाते.

वरदराजन्, मु. (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)