नारा : जपानच्या दक्षिण होन्शू प्रांतातील नारा जिल्ह्याचे मुख्य ठाणे व सर्वांत मोठे शहर. हे नारा खोऱ्याच्या ईशान्य कोपऱ्यातील डोंगरी भागात, ओसाकाच्या पूर्वेस ४० किमी. आहे. लोकसंख्या २,५७,४८२ (१९७५). सातव्या शतकात हे स्थळ हैजो म्हणून प्रसिद्ध होते. नारा सृष्टिसौंदर्याने नटलेल्या प्रदेशात असून याच्या पूर्वेस कासूगा, मीकासा व पश्चिमेस इकोमा आणि कोंगोडोजी पर्वत आहेत. प्राचीन काळचे धार्मिक व सांस्कृतिक केंद्र म्हणून जपानी जीवनात नाराचे स्थान अनन्यसाधारण आहे. ७०६ मध्य राजाज्ञेने या शहराची स्थापना करण्यात आली व ७१०–८४ दरम्यान जपानची राजधानीच येथे असल्याने याचे महत्त्व वाढले. या शहराची रचना चीनच्या थांगकालीन चांगान शहराच्या धर्तीची आहे. जपानमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार सुरू झाला तो येथूनच. साहजिकच जपानमधील प्राचीनतम बुद्धमंदिरे नारा येथेच आहेत. अलीकडील काळात नाराचे औद्योगिक, व्यापारी व शैक्षणिक दृष्ट्या महत्त्व वाढले असले, किंवा जिल्ह्याच्या शासकीय कचेऱ्यांमुळे राजकीय दृष्ट्याही याला महत्त्व असले, तरी लाखो हौशी प्रवाशांना येथील प्राचीन अवशेषांचे, प्राचीन जपानच्या सांस्कृतिक जीवनाचा आणि शिल्पादी कलांचा प्रत्यक्ष परिचय होतो, म्हणून आकर्षण वाटते.
जपानी वास्तुकलेच्या इतिहासात इ. स. ६४५ ते ७९३ हा काळ ‘नारा कालखंड’ म्हणूनच ओळखला जातो. त्या काळात चीनमध्ये थांग राजघराण्याने शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित केली होती. त्यामुळे तेथे झालेल्या कलेच्या विकासाचे पडसाद जपानमध्येही उमटले. नारा शहर हे त्या काळात जपानची राजधानी होते. तेथे कलाविकासाने शिखर गाठले. सम्राट शोमूच्या काळात (कार. ७२४ ते ७४८) उभारले गेलेले तोडाइजी मंदिर तसेच होर्यूजी मंदिर हे जपानी वास्तुकलेचे अप्रतिम नमुने आहेत. तोडाइजी मंदिर हे जपानमधील सर्वांत मोठे मंदिर असून हे नारा शहराच्या पूर्वेला टेकडीत कोरलेले आहे. यामधील बुद्धाची प्रतिमा काशाची असून तिची उंची १७ मी. व वजन ३८० टन आहे. या मंदिराला दुहेरी पॅगोडे असून ते सात मजली उंच आहेत. मंदिराच्या उंच अशा महादक्षिण वेशीतून आत गेल्यावर भव्य दालने आहेत. मंदिराच्या दरवाज्यात पिळदार शरीरयष्टीच्या, भयावह चर्येच्या द्वारपाल-मूर्ती आहेत तर मुख्य मंदिरातील मूर्ती म्हणजे शांती, पावित्र्य व प्रसन्नता यांचा संगम आहे. महाबुद्ध—सभागाराची भव्यता नेत्रदीपक आहे.
तोडाइजी, होर्यूजी आणि नारा परिसरातील इतर शिल्पाकृती पाहिल्यावर जपानी वास्तुकलेवर व मूर्तिकलेवर बुद्धपरंपरेचा किती प्रभाव होता, ते दिसून येते. गंभीरता व उदात्तता ही या कलासंस्कारांची वैशिष्ट्ये होती, तर मानवी आकृतीच्या अवयवांना आदर्श रूप देण्याची प्रवृत्ती तेथे प्रकर्षाने होती. नारा कालखंडातील जपानी कलेच्या आविष्कारात एक प्रकारचे चैतन्य व डौलदारपणा आला. नारा परिसरात धातु- शिल्पे निर्माण केली जात असता, देशातील ब्राँझ, तांबे हे धातू संपुष्टात आले होते. एकंदरीने हा कालखंड म्हणजे जपानी कलेचा उत्कर्षबिंदू होता. भव्यता व आदर्शरूपता हे त्या शिल्पांमधील समान गुणधर्म होते. हळूहळू या परंपरेमध्ये अधिकाधिक वास्तवता येत गेली. बाराशे वर्षांपूर्वीच्या जपानी कलावैभवाचे हे प्रदर्शन आपल्याला आजही नारा शहराच्या परिसरात पहावयास सापडते.
नारा येथील तोडाइजी मंदिर, कासूगा देवालय, ‘शोसोईन’ हा सम्राट शोमूचा खजिना याकुशिजी आणि होर्यूजी मंदिर व उपवन ही पाहिल्याशिवाय जपानच्या प्रवासाची सांगता होत नाही, असे सर्वत्र मानले जाते.
शोसोइनच्या खजिन्यात बुद्धकालीन गृहसजावटीचे सामान, हस्तलिखिते, दस्तऐवज, लेखनसाहित्य, शस्त्रास्त्रे, वाद्ये, प्राचीन वस्त्राभरणे, औषधे, खेळणी, प्राचीन काचकाम इत्यादींचा अनमोल संग्रह आहे.
याकुशिजी मंदिर सम्राट तेम्मूने बांधण्यास सुरुवात केली व त्याच्या पत्नीने ते पूर्ण केले. यात याकुशी न्योरॉई ही सोन्याची व ब्राँझची मौल्यवान बुद्धमूर्ती आहे.
जपानमधील प्राचीनतम मंदिर व जगातील प्राचीनतम लाकडी इमारत अशी होर्यूजी मंदिराची ख्याती आहे. हे हिनोकी या जपानी सायप्रस लाकडाचे असून यात प्राचीन जपानी कलावशेषांचा अनमोल संग्रह आहे.
नारा उपवनाने सु. ५ चौ. किमी. क्षेत्र व्यापले असून त्यातील इतस्ततः मुक्तसंचार करणारी हरिणे, वृक्षराजी, सरोवरे आणि प्राचीन कलावशेषांचे इंपीरिअल म्यूझीयम हे वस्तुसंग्रहालय ही प्रमुख आकर्षणे होत.
ओक, द. ह.तावडे, मो. द.
“