नाताळ–१ : ब्राझीलमधील रीओ ग्रांदे द नॉर्ते राज्याची राजधानी व बंदर. लोकसंख्या ३,४३,६७९ (१९७५ अंदाज). हे रेसीफेच्या उत्तरेस २१७ किमी. आणि फॉर्तलेझच्या आग्नेयीस ४१८ किमी.वर, पुतेंगी नदीकाठी वसले असून रेसीफे व मासेओशी लोहमार्गाने जोडलेले आहे. शहराच्या नैर्ऋत्येस १३ किमी.वर असलेला, पर्नमीरीनचा विमानतळ हवाई मार्गांचे केंद्र आहे. इ. स. १५९९ मध्ये फ्रेंचांनी हे वसविले व त्याला शहराचे स्वरूप १६११ मध्ये प्राप्त झाले. १६३३–५४ मध्ये हे डचांच्या ताब्यात होते. येथे सुती कापडउद्योग व मीठ शुद्ध करणे हे प्रमुख उद्योग आहेत. साखर, कापूस, मीठ, चामडी इत्यादींची येथून निर्यात होते.
लिमये, दि. ह.