नाथद्वार : राजस्थान राज्याच्या उदयपूर जिल्ह्यातील नाथद्वार या तालुक्याचे मुख्य ठिकाण व हिंदूंचे एक पवित्र क्षेत्र. लोकसंख्या १८,८९३ (१९७१). हे बनास नदीच्या उजव्या काठावर उदयपूर–अजमीर या राष्ट्रीय महामार्गावर, उदयपूरच्या उत्तर ईशान्येस सु. ४० किमी. आहे. येथील श्रीकृष्णाचे मंदिर प्रसिद्ध असून त्यातील कृष्णमूर्ती इ. स. पू. बाराव्या शतकातील असावी असे म्हणतात. प्रथम ती मथुरा येथे व नंतर गोवर्धन पर्वतावर होती. पण औरंगजेबाच्या काळात (सतरावे शतक) ती राजस्थानमध्ये हलविण्यात आली. येथील देवस्थान श्रीमंत आहे. हे मंदिर वल्लभ संप्रदायाचे एक श्रद्धास्थान असून त्याचे पौरोहित्यही वल्लभ संप्रदायाकडेच आहे. शहराला नगरपालिका आहे. हे मका, बार्ली, इतर धान्ये व जवाहीर इत्यादींचे व्यापारी केंद्र आहे.
दातार, नीला
“