नाणेघाट : पुणे व ठाणे जिल्ह्यांच्या सीमेवरील जुना घाट. हा घाट जुन्नर तालुक्यात पुण्यापासून सु. ९० किमी.वर असून सु. ५ किमी. लांब व ८६० मी. उंच आहे. सु. दोन हजार वर्षांपूर्वी सातवाहनांच्या अमदानीत हा घाट तयार करण्यात आला. या घाटाविषयी अनेक दंतकथा प्रचलित आहेत. नाना नावाच्या ठेकेदाराने हा घाट बांधला म्हणून यास नाना घाट असेही म्हणतात. हा घाट जीवधन किल्ल्याच्या पायथ्याशी असून जुन्नर-मुरबाड रस्ता या घाटातून जातो. जीवधन किल्ल्यावरून या घाटावर नियंत्रण ठेवता येत असे. पूर्वी हा घाट (ख्रि. पू. सु. १०० वर्षे) देश व कोकण यांच्यामधील मुख्य व्यापारमार्गांपैकी एक होता. या घाटातून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असे म्हणून टॉलेमीने यास ‘नानगुण’ नदी असे म्हटले आहे. येथील लेण्यांत सातवाहन राजांच्या मूर्ती व प्राचीन शिलालेख पुष्कळ आहेत. शिलालेखांत पहिल्या आणि दुसऱ्या शतकांतील सातवाहन राजांची, राण्यांची व त्यांनी दिलेल्या देणग्यांची वर्णने आहेत. जुन्नर व ठाणे जिल्हा यांमधील दळणवळण सोयीचे व्हावे, म्हणून ट्रॅम-रस्ता तयार करण्याचा ‘द नाणेघाट फ्यूनिक्युलर ट्रॅम वे’ कंपनीचा प्रयत्न असफल झाला.
कांबळे, य. रा.
“