नागार्जुनकोंडा : आंध्र प्रदेश राज्यातील बौद्ध अवशेषांचे एक प्रसिद्ध स्थळ. गुंतूर जिल्ह्यात माचेर्ला गावाच्या वायव्येस सु. २४किमी.वर कृष्णा नदीच्या दक्षिणकाठी ते वसले आहे. नागार्जुनकोंडा हा नल्लमलई पर्वतराजीचाच एक भाग असून या भागाजवळच्या सपाट प्रदेशातून कृष्णा नदी वाहते. कृष्णेच्या खोऱ्यात व डोंगरावरील पठारावर विस्तृत प्रमाणात अवशेष मिळाले. हे सर्व अवशेष विजयपुरी, श्रीपर्वत व नागार्जुनकोंडा अशा तीन ठिकाणी विखुरलेले आहेत. विजयपुरीच्या पूर्वेला श्रीपर्वत नावाचा डोंगर आहे. या डोंगरावर बौद्ध आचार्य नागार्जुन एका विहारात राहात असे आणि तेथेच त्याला निर्वाण प्राप्त झाले, अशी पारंपरिक कथा तिबेटी वाङ्‌मयात आढळते. हे मत अनेक विद्वानही ग्राह्य मानतात. या आचार्याच्या नावावरूनच नागार्जुन हे नाव यास मिळाले असावे.

स्तूपावशेष, नागार्जुनकोंडा.

येथील अवशेषांचा प्रथम शोध सुरपुरजा वेंकटरमय्या या एका शिक्षकास १९२६साली लागला. त्यानंतर रंगस्वामी सरस्वती या पुरालिपिवेत्याने तेथील अवशेषांची प्राथमिक पाहणी केली आणि त्यानंतर लाँगहर्स्ट या पुरातत्त्ववेत्त्याने १९२७—३१दरम्यान तेथे विस्तृत प्रमाणात उत्खनन केले. त्यानंतर १९३८—४०मध्ये व पुढे १९५४—६१मध्ये भारत सरकारच्या पुरातत्त्वीय विभागातर्फे तेथे उत्खनने झाली. उत्खननांत विविध कालखंडांतील अवशेष मिळाले. त्यांत अश्मयुग, नवाश्मयुग, महाश्मयुग आणि इ. स. पू. तिसरे शतक ते इ. स. चे तिसरे शतक यांदरम्यानचे इक्ष्वाकू राजांच्या कारकीर्दीतील अवशेष असून सुरुवातीच्या उत्खननांत छोटेमोठे स्तूप, चैत्य, विहार, राजप्रासाद, मंडप व शेकडो शिलालेख उपलब्ध झाले. शिलालेख बहुतेक इ. स. २००—३००या काळातील असून त्यांपैकी बहुसंख्य इक्ष्वाकू राजेराण्यांचे आहेत. इक्ष्वाकू राजे जरी वैदिक धर्माचे होते, तरी त्यांचा बौद्ध धर्माला उदार आश्रय होता. त्यामुळे अवशेषांत अश्वमेध यज्ञाच्या कुंडाबरोबरच असंख्य बौद्ध स्तूप, चैत्य व विहार यांच्या वास्तू आढळल्या. या स्थळाजवळच विजयपुरी नावाची नगरी होती. ती इक्ष्वाकू राजांची राजधानी असावी. विजयपुरी त्यावेळी एक भरभराटलेले व्यापारी शहर व बंदर होते. त्याचा व्यापार भारतातील इतर शहरांशी तसेच परदेशांशीही असावा. मीगॅस्थीनीझ, प्लिनी, टॉलेमी वगैरे परकीय लेखक तसेच पेरिप्लस ऑफ द एरीथ्रीअन सीचा लेखक हे वारंवार आंध्र प्रदेशाच्या सुबत्तेचा उल्लेख करतात. शिवाय येथे रोमन बनावटीची अनेक नाणी सापडली. नागार्जुनकोंडा हे एक प्रसिद्ध विद्यापीठ होते व तेथे अनेक प्रदेशांतून विद्यार्थी अध्ययनासाठी येत.

नंतरच्या उत्खननांत प्रामुख्याने प्राचीनतम अश्मयुगाची हत्यारे नवाश्मयुगातील दफने व मानवी सांगाडे महाश्मयुगातील दफने व विविध प्रकारची मृत्पात्रे आणि इक्ष्वाकुकालीन स्तूप, विहार, प्रासाद तसेच नगररचना, जलनिकास पद्धती, स्नानगृहे, घाट, मंदिरे, असंख्य शिल्पे इ. अवशेष मिळाले. ऐतिहासिक काळातील या नगराची रचना भुईकोट किल्ल्याप्रमाणे होती आणि नगराभोवती प्राकार होता. प्रकाराभोवती तीन मी. खोल आणि २३मी. रुंद खंदक होता. प्राकार सुरुवातीस मातीचा होता नंतर तो विटांनी बांधण्यात आला असावा. प्राकाराच्या पूर्वेस व पश्चिमेस दोन प्रवेशद्वारे होती व आत अनेक स्तूप असून त्यांची बांधणी चक्राकार पायावर केली होती. याशिवाय अनेक विहार होते. सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण वास्तू म्हणजे येथील प्रेक्षागृह. ते विटांनी बांधलेले असून ९६मी. लांब व ८०मी. रुंद अशा आयताकार आराखड्याचे होते. याशिवाय हारिती, शिव, कार्तिकेय यांची मंडपयुक्त मंदिरे व कूर्माकार बांधणीच्या अश्वमेधातील अवभृथ स्नानाकरिता तयार केलेल्या पुष्करिणी आढळतात. विहारांमध्ये अनेक लहान-लहान खोल्या असून प्रत्येक खोलीला स्वतंत्र स्नानगृह व मुतारी असून सांडपाण्याचा निचरा व्हावा, म्हणून पूतिकुंडांची व्यवस्था केलेली दिसते. या प्रदेशातील सर्वांत भव्य स्तूपाचा उल्लेख शिलालेखात महाचैत्य असा केला आहे. त्याच्या अंतर्भागात चांदीचा एक लहान स्तूप असून त्यात सुवर्णपेटिकेत बुद्धाच्या अस्थींचा एक तुकडा ठेवला होता. त्यामुळे त्यास धातुगर्भ मानतात. सध्या हा बुद्ध-धातू सारनाथ येथील मूलगंध कुटीविहारात ठेवला आहे. या स्तूपाच्या पूर्वेस अपरमहाविनसेलिय नावाचा एक विहार होता. त्यात मंडप, चैत्यगृह व चैत्यगृहाभोवती प्रांगण, सभोवार विटांची भिंत व बाजूला खोल्या होत्या. याशिवाय संघाराम विहार, सिंहल विहार, शांतिश्री चैत्यगृह, बोधिश्री चैत्यगृह, स्वस्तिक स्तूप इ. अनेक बौद्ध वास्तू होत्या. त्याच्या भग्नावशेषांत अनेक पाषाण व संगमरवरी स्तंभ तसेच शिलालेख उपलब्ध झाले. त्यांवर सुंदर शिल्पाकृती खोदलेल्या असून यांतील बहुतेक शिल्पाकृती श्रीपर्वत डोंगरावरील संग्रहालयात ठेवल्या आहेत.

शिल्पाकृतींत बुद्धाच्या जीवनातील विविध प्रसंगांचे तसेच जातक कथांतील चित्रण असून प्रतीकात्मक व मानवी रूपांत येथे बुद्धाचे दर्शन घडते. महाचैत्याचे पाच स्तंभ बुद्धाच्या जीवनातील पाच प्रसंगानी अलंकृत केले असून त्यांत जन्म, महाबिनीश्क्रमन, सम्यकसंबोधी, धर्मचक्रप्रवर्तन व महापरिनिर्वाण या पाच अवस्थांचे चित्रण आहे. याशिवाय कमळावर उभा असलेला बुद्ध, हारिती, शालभंजिका, प्रणयी युगुले इत्यादींच्या मूर्ती चित्तवेधक असून जातककथांतील बुद्धाची यशोधरा-राहुल भेट, मायाचे स्वप्न, सिद्धार्थाचा जन्म, मारकथा, शक्राची इंद्रसभेला भेट, अजातशत्रूची भेट, मांधाताची शक्ती वगैरे काही दृश्ये रेखीव, हृदयस्पर्शी व वास्तववादी वाटतात. यांतील बहुतेक विषय बुद्धाच्या जीवनाशी निगडित असले आणि अमरावती येथे आढळत असले तरी नागार्जुनकोंडाचे असे काहीतरी वैशिष्ट्य त्यात आढळते. अमरावती शिल्पशैली ही येथे अधिक प्रगत अवस्थेत दिसते. ही सर्व शिल्पे पूर्णतः भारतीय असली, तरी त्यांवर काही प्रमाणात सिथियन छटा असावी, असे तज्ञांचे मत आहे. कारण एका स्तंभावरील शिल्पात टोपी व कोट धारण केलेला एक सैनिक दिसतो.

शिल्पांशिवाय तोटीची भांडी, मातीच्या बाहुल्या, अश्वमेध यज्ञकुंड, इक्ष्वाकूंची नाणी, पूर्ण घट इ. अवशेषही येथे मिळाले. नागार्जुनसागर नावाचे प्रचंड धरण या स्थानाजवळ बांधण्यात आले असून त्यामुळे निर्माण झालेल्या जलाशयात येथील अनेक वास्तू पाण्याखाली गेल्या. ज्या काही वस्तू आणि वास्तू हलविणे शक्य होते, तेवढ्या श्रीपर्वतावर नव्याने उभारण्यात आलेल्या पुरातत्त्वीय वस्तुसंग्रहालयात हलविण्यात आल्या आहेत. जलाशयात बुडालेल्या काही वास्तूंच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत.

संदर्भ : 1. Archaeological Survey of India, Indian Archaeology : A Review, 1954-61, New Delhi, 1962.

           2. Vijayatunga, J. Nagarjunakonda, New Delhi, 1956.

           3. Vimalaksha, Sumedha, Nagarjunakonda, Guntur, 1965.

 

देशपांडे, सु. र.