नागार्जुन विद्यापीठ : आंध्र प्रदेश राज्यातील एक विद्यापीठ. आंध्र विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासकेंद्राचेच रूपांतर या विद्यापीठात झाले आणि नागार्जुनसागर या ठिकाणी १९ ऑगस्ट १९७६ रोजी या विद्यापीठाची स्थापना झाली. विद्यापीठाचे स्वरूप अध्यापनात्मक व संलग्नक असून सुरुवातीला विद्यापीठाच्या २० किमी. त्रिज्येच्या परिसरातील सु. २७ महाविद्यालये त्यास नजीकच्या काळात संलग्न करण्यात येतील. विद्यापीठाचे संविधान व प्रशासनव्यवस्था आंध्र विद्यापीठाप्रमाणेच असून अद्यापि हे विद्यापीठ प्राथमिक अवस्थेत आहे. विद्यापीठाचा सर्व खर्च विद्यापीठ अनुदान आयोग व राज्य सरकार यांमार्फत चालतो. सध्या विद्यापीठात दहा अध्यापन विभाग आहेत : पुरातत्त्वविद्या, अर्थशास्त्र, इंग्रजी भाषा व साहित्य, गणित, तेलुगू भाषा व साहित्य, वाणिज्य, भौतिकी, रसायनशास्त्र, वनस्पतिविज्ञान आणि प्राणिविज्ञान. या विभागांतून संशोधनही चालते.
देशपांडे, सु. र.