नागफणा : (फणी निवडुंग, फड्या निवडुंग, सामार क. मुळ्ळुगळ्ळी सं. कंथारी, विदर गु. थोर हाथलो इ. प्रिकली पीमर लॅ. ऑपन्शिया डायलेनाय कुल-कॅक्टेसी). हे परिचित काटेरी क्षुप (झुडूप) मूळचे अमेरिकेच्या रुक्ष प्रदेशातील (ग्वातेमाला, मेक्सिको) असून अठराव्या शतकाच्या मध्यास द. भारतात यूरोपीय प्रवाशांनी आणले असावे तेथून ते भारतात इतरत्र पसरले. हे सु. दोन मी. उंच असून मुख्य खोड व फांद्या पेरेदार, सपाट पानांसारख्या (पर्णकांड, पर्णक्षोड) पण पर्णहीन, मांसल व गर्द हिरव्या असून त्यांवर निळसर छटा असते. प्रत्येक चपट्या कांड्याचा आकार खाली निमुळता व टोकास गोलसर असून त्यावर पिवळसर किंवा शिंगासारख्या फिकट रंगाच्या ४–६ काट्यांचे पुंजके असतात. सर्वांत मोठा काटा २·५–३·८ सेंमी. लांब असून सर्वच काटे काहीसे वाकलेले असतात. येथे हिरव्या पानांच्या अभावी त्यांचे कार्य कांड्यांकडे असते [→ खोड]. याची फुले सुबक, पिवळी पण तळाशी नारिंगी असून ती खोडाच्या किंवा फांद्यांच्या कडेने येतात. त्यांची संरचना व इतर सामान्य लक्षणे ⇨ कॅक्टेसी कुलात (नागफणा कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. मृदुफळ काटेरी, गर्द लालसर जांभळे, तळाशी अरुंद, मध्ये फुगीर व टोकास अरुंद पण सपाट व खाचदार असते. बिया काळ्या व अनेक असतात.

नागफणा : (१) फुलांफळांसह फांदी, (२) फूल, (३) फळ, (४) फळाचा उभा छेद, (५) बी.

नागफण्याचे कांडे जमिनीवर पडल्यावर पानफुटीचा पानाप्रमाणे त्याच्या कडेने नवीन कांडी वाढून नवीन वनस्पती तयार होते. लागवड सोपी असून कसल्याही रुक्ष जमिनीत ही झाडे फोफावतात व काटेरी आवरणामुळे त्यांचे संरक्षणही होते. शेताभोवती त्यांचे कुंपण घालतात. यामुळेच प्रथम यांचा प्रसार सर्वत्र झाला. याच्या वंशातील (ऑपन्शिया) तीन-चार जाती भारतातील भिन्न भागांत पसरल्या असून त्यांनी उपयुक्त शेतजमिनीवर बरेच आक्रमण केले आहे. त्यांचा नाश करण्याचे अनेक उपाय केले गेले यांमध्ये तांबड्या रंगाच्या उत्पादनाकरिता आणलेल्या ⇨ कोचिनियल कीटकांनी त्यांवर निर्वाह करून अनेकांचा संहार केला.

यूरोपीय प्रवाशांनी जहाजावर या मांसल वनस्पतीचा उपयोग वातपित्तव्याधीवर (स्कर्व्हीवर) केला. भारतात या जातीचा उपयोग प्रथम काटे जाळून टाकून नंतर कांडी ६% सरकीबरोबर जनावरांना चारा म्हणून देण्यास केला होता. त्यापासून काही अपाय झाला नाही उलट हा प्रयोग समाधानकारक ठरला. याची फळे खाद्य व शर्करायुक्त असल्याने त्यांच्यापासून औद्योगिक अल्कोहॉल काढण्याचे यशस्वी प्रयत्न झाले. या वनस्पतीपासून जाडाभरडा धागा काढून तो कागदनिर्मितीत वापरण्याचे प्रयोग केले गेले पण ते फायदेशीर ठरले नाहीत. तसेच यापासून चांगले कंपोस्ट खत तयार करता येते, असा अनुभव नमूद आहे. पक्व फळांपासून केलेल्या सरबताचा यशस्वी उपयोग कफोत्सारक (कफ पाडणारे) औषध बनविण्यास केला गेला आहे. ते दमा व माकड (डांग्या) खोकला यांवर गुणकारी आहे. खोडाच्या व फांद्यांच्या चोथ्याचे पोटीस दाह होणाऱ्या भागावर बांधतात. गळू पिकण्यात व नारूच्या फोडांवर गरम कांड्यांनी शेक देतात. नेत्रविकारांवर (डोळे येणे) कांड्यांचा लगदा लावतात. फळ प्रशीतक (थंडावा देणारे) असून परम्यात उपयुक्त असते.

पहा : कॅक्टेसी निवडुंग.

वर्तक, वा. द.