नक्षत्र : आकाशात लहानमोठे तारे दिसतात, त्यांना सर्वसाधारणपणे नक्षत्र असे म्हणतात. ऋग्वेद आणि अथर्वसंहिता यांत असे संबोधल्याचे उल्लेख आले आहेत परंतु अधिक शास्त्रीय दृष्ट्या चंद्रमार्गावरील ताऱ्यांना वा ताऱ्यांच्या गटांना नक्षत्रे असे समजण्यात येते. चंद्र, सूर्य, बुधादि ग्रह हे कमीअधिक प्रमाणात याच एका ग्रहपथामधून भ्रमण करीत असल्याने ग्रहपथातीलच तारकांकडे प्रथम लक्ष वेधले जाणे, हे स्वाभाविक आहे. त्यामुळे ग्रहांचे स्थान आकाशात दाखविणे सुलभ झाले किंबहुना त्यामुळेच नक्षत्रांची आवश्यकता भासली असावी. चंद्राला पृथ्वीभोवतील प्रदक्षिणेमध्ये एका ताऱ्यापासून निघून पुन्हा त्याच ताऱ्यापाशी येण्यास सु. २७/ दिवस लागतात, म्हणून २७ क्वचित २८ नक्षत्रांची संख्या ठरविण्यात आली असावी. ग्रहपथाचे विभाग पाडण्याच्या राशी [→ राशिचक्र] व नक्षत्रे या दोन पद्धती आहेत. त्यांपैकी सध्याची रूढ नक्षत्र-पद्धती स्वतंत्रपणे भारतीय असावी, असा बहुतेक विद्वानांचा कयास आहे. हिंदूंप्रमाणे प्राचीन काळी चिनी व अरबी लोकांत नक्षत्र-पद्धती होती. या पद्धतीचे भारतीय पद्धतीशी साम्यही आहे. कोणते तारे कोणत्या नक्षत्रात आहेत त्यातही काही साम्य आहे  पण वेधांच्या दृष्टीने भिन्न योगतारे (त्या त्या नक्षत्रातील सर्वांत ठळक तारे) चिनी लोकांनी निवडले. विशेषतः विषुववृत्ताच्या आसपासचे २४ तारे त्यांनी इ. स. पू. २३०० च्या सुमारास ठरविले. विषुववृत्ताचे सान्निध्य हा त्यांच्या निवडीचा प्रमुख निकष होता, त्यांना ते ‘सियू’ म्हणतात. या चोविसात मागाहून विशाखा, श्रवण व भरणी यांतील चार तारे घातले. म्हणून चिनी नक्षत्रेही २४ ची २८ झाली. चिनी पद्धतीत ग्रहपथातील राशींना अगदीच भिन्न नावे असून कुंभ राशीपासून सुरुवात व क्रम सूर्यगतीच्या उलटा आहे : उंदीर (कुंभ), बैल (मकर), वाघ (धनु), ससा (वृश्चिक), राक्षस (तुला), सर्प (कन्या), अश्व (सिंह), एडका (कर्क), माकड (मिथुन), कोंबडा (वृषभ), श्वान (मेष), वराह (मीन). अरबांमध्ये नक्षत्रवाचक ‘मंझिल’ हा शब्द आहे. यावरून नैर्ऋत्य आशियातील लोकांत नक्षत्रपद्धती असावी व ती खाल्डियनांनी काढली असावी, असे ए. वेबर यांनी म्हटले आहे. पारशांच्या पेहलवी भाषेतील बुंदाहिश्न (इ. स. सु. नववे शतक) या ग्रंथाच्या दुसऱ्या भागात नक्षत्रे २८ असल्याचे म्हटले असून त्यांची नावेही दिलेली आहेत परंतु भारतीयांना वैदिक काळातही नक्षत्रे चांगली ठाऊक होती. यावरून अरबी, चिनी व भारतीय या पद्धती स्वतंत्र असाव्यात असा निष्कर्ष निघतो.

व्युत्पत्ती: नक्षत्रा या शब्दाच्या अनेक व्युत्पत्त्या सांगितल्या जातात. क्षत्र = बलवान “न क्षत्राणि” ती नक्षत्रे. यज्ञ केल्यामुळे करणारा विशिष्ट लोकाला जातो नक्ष् = जाणे यापासून व्युत्पत्ती तैत्तिरीय ब्राह्मणात व निरूक्तात सांगितली आहे. पाणिनी यांनी दिलेली नक्षत्रांचा व्युत्पत्ती ‘न क्षरन्ति’ – जी झडत नाहीत, पडत नाहीत, क्षय अगर नाश पावत नाहीत ती, अशी आहे. नक्षत्रे ही देवांची मंदिरे होत. नक्षत्रे ही पृथ्वीची म्हणजेच पृथ्वीवरील पदार्थांची चित्रे होत, असे उल्लेख वेदांत आहेत. चंद्राच्या उत्पत्तीच्या वेळी जे तुषार म्हणजे अश्रू उडाले ती नक्षत्रे बनली. चंद्राच्या प्रकाशामुळे नक्षत्रे प्रकाशित होतात असे शतपथ ब्राह्मणात सांगितले आहे. वायुपुराणात सूर्यापासून नक्षत्रांची उत्पत्ती झाल्याचे सांगितले आहे. वेदांग ज्योतिषात खगोलशास्त्र दृष्ट्या नक्षत्रांचा विचार केलेला दिसतो. तारका ज्या अर्थी त्या तरल्या त्या तारका असाही कोटिक्रम केलेला आढळतो. नक्षत्रं, ऋक्षं, भं, तारा, तारका, उडु, दाक्षायिण्यः असा अमरकोशात उल्लेख आहे.

संख्या व नावे: अगदी वैदिक काळापासून भारतीय आर्यांनी नक्षत्रांची नावे निश्चित केली होती. भारतीय नक्षत्रांची नावे, क्रम व तारे यांसंबंधीची माहिती कोष्टक क्र. २ मध्ये दिली आहे. काही विद्वानांच्या मते प्रथम नक्षत्रे २४ असावीत परंतु पुढे फल्गुनी, आषाढा व भाद्रपदा यांचे पूर्वा व उत्तरा असे दोन दोन विभाग पाडून चंद्राच्या भ्रमणकालास अनुलक्षून संख्या २७ केली गेली. प्रत्येक नक्षत्राचे चार विभाग कल्पिलेले असतात, त्यांना चरण किंवा पाद म्हणतात. जेव्हा या नक्षत्रमालिकेत अभिजित घालण्यात येते तेव्हा पूर्वाषाढाचा शेवटचा एक चरण व श्रवणाचा आरंभीचा एक चरण अशी जागा मुद्दाम करून देण्यात आलेली आढळते (२१ व्या उत्तराषाढा नक्षत्राचा चौथी चरण व २२ व्या श्रवण नक्षत्राचा /१५ भाग मिळून १९ दंडाइतक्या काळास अभिजित नक्षत्र असाही उल्लेख आढळतो). तैत्तिरीय ब्राह्मणात नक्षत्रांचे दोन विभाग मानले आहेत. ‘कृत्तिका प्रथमम् । विशाखे उत्तमम् । तानि देवनक्षत्राणि । अनुराधा प्रथमम् । अपभरणी उत्तमम् । तानि यमनक्षत्राणि।’ सूर्य देवनक्षत्रांतून जाताना उत्तरायण असते व यमनक्षत्रांतून जाताना तो दक्षिणायनात असतो. यावरून तैत्तिरीय ब्राह्मणाचा काळ विद्वानांनी काढला आहे.

काही नक्षत्रांचा उल्लेख प्राचीन वाङ्‌मयात निरनिराळ्या नावांनी आला आहे. जसे : अश्वयुजौ = अश्विनी  अपभरणी = भरणी इन्वका = मृग बाहू = आर्द्रा तिष्य = पुष्य आश्रेषा = आश्लेषा = सार्प अघा = मघा अर्जुनी = फल्गुनी (दोन्ही) निष्ट्या = स्वाती राधा = विशाखा श्रविष्ठा = धनिष्ठा शतभिषक = शततारका प्रौष्ठपदा = भाद्रपदा (दोन्ही). नक्षत्रांच्या उल्लेखाच्या वेळी प्राचीन संस्कृत वाङ्‌मयात नक्षत्रांच्या लिंगात व वचनात फरक आढळतो. काही नक्षत्रे पुल्लिंगी तर काही स्त्रीलिंगी तर काही थोडीच नपुंसकलिंगीसुद्धा आहेत. काही एकवचनी, काही द्विवचनी तर काही बहुवचनी असे उल्लेख आहेत. वचनांबाबत असे म्हणता येईल की, एकवचनी नक्षत्रे आहेत त्यांत एकच तारा उदा., आर्द्रा द्विवचनी उल्लेख आहेत त्यांत दोन तारे असावेत उदा., अश्वयुजौ (अश्विनी) आणि बहुवचनी उल्लेख आहे त्या नक्षत्रांत दोनहून अधिक तारे असावेत उदा., कृत्तिका, मघा. भिन्नलिंगी उल्लेख का आला हे सांगता येत नाही. प्रत्येक नक्षत्रात किती तारे आहेत हे कोष्टकावरून समजते.

नक्षत्रांना नावे कशी पडली असावीत, हे ठरविणे कठीण आहे परंतु पृथ्वीची म्हणजे पृथ्वीवरील वस्तूंची चित्रे ती नक्षत्रे ही सांगितलेली एक व्युत्पत्ती पाहिली असता आकृतीवरून काही नक्षत्रांना नावे पडली असण्याचा संभव आहे (उदा., मृग, हस्त). इतरही कारणांवरून ती पडली असावीत. पुनर्वसू, चित्रा, रेवती हे अगोदर प्रचारात असलेले शब्द नक्षत्रांना दिले असावेत. पुनर्वसू याचा अर्थ पुनःपुनर्वस्तारौ स्तोतृणामाच्छादयितारौ (देवौ) असा सायणांनी दिला आहे. ‘चित्रामघा’ याचा अर्थ ‘विचित्रधना’ असा आहे. रेवती म्हणजे धनवती असा अर्थ आहे. ही व अशी नावे त्या त्या नक्षत्राचे दर्शनीयत्व, धनदातृत्व इ. प्रत्यक्ष, कल्पित वा अनुभूत गुणांवरून ठेवली असावीत, असे अनुमान निघते.

काही नक्षत्रकथा: काही नक्षत्रांना त्यांच्या क्रमाला व आकाराला कथात्मक संदर्भ जोडण्यात आले आहेत. अशा पौराणिक कथा भारतीय व पाश्चात्य नक्षत्रांच्या नावांबद्दल रूढ आहेत.

२७ नक्षत्रे या दक्षाच्या कन्या असून त्या त्याने चंद्राला दिल्या म्हणून त्या चंद्रपत्नी झाल्या. चंद्र दररोज एकेकीच्या घरी वास करून त्यांचा उपभोग घेतो, अशी कल्पना पुराणात आहे. रोहिणीच्या मागे मृग लागला आहे आणि त्याच्यामागे व्याध लागलेला आहे व त्याने मारलेला त्रिकांडबाण तीन ताऱ्यांच्या स्वरूपात आहे. अशा कथारूप दृश्यात ही सारी नक्षत्रे अगर तारे आकाशात दिसतात. हस्त, चित्रा, स्वाती (निष्ट्या), विशाखा व अनुराधा ही पाच नक्षत्रे मिळून नक्षत्रीय प्रजापतीची आकृती मानली आहे. हस्त हा त्याचा हात, स्वाती हे हृदय, विशाखा या मांड्या, अनुराधा ही उभे राहण्याची जागा असे वर्णन तैत्तिरीय ब्राह्मणात आले आहे. देवदानवांच्या युद्धात ज्या नक्षत्रावर देवांना विजय मिळाला ते अभिजित असा वेदामध्ये उल्लेख आलेला आहे. अशा कथा बऱ्याच आहेत. पाश्चात्य नक्षत्रांच्या नावांचे भारतात रूपांतर झाल्यानंतर त्यांच्याही कथा त्या त्या नक्षत्रावर आधारलेल्या आहेत (ज्या नक्षत्रांसंबंधी स्वतंत्र नोंदी दिलेल्या आहेत त्यांतील काही नोंदीत अशा कथा थोडक्यात सांगितलेल्या आहेत). अशाच मूळच्या ग्रीक पुराणांतील कथा पाश्चात्त्य नक्षत्रांच्या नावांच्यामागे आहेत. सप्तर्षी याचे पाश्चात्त्य नाव ग्रेट बेअर, अर्सा मेजर किंवा प्लाऊ असे आहे. अर्सा किंवा बेअर म्हणजे अस्वल. त्याला अनुसरून बृहद्ऋक्ष (ऋक्ष = अस्वल) असे योजिले असले, तरी ऋक्ष याचा अर्थ ऋषी असाही आहे. त्यामुळे बृहद्ऋक्ष हे दोन्ही अर्थांनी सार्थ झाले. यामागची ग्रीक कथा अशी आहे. ज्यूपिटर हा देव असून त्याचे कॅलिस्टो नावाच्या सुंदरीवर प्रेम बसले. हे सहन न झाल्यामुळे ज्यूपिटरची पत्नी जूनो हिने मत्सराने कॅलिस्टोचे अस्वलात रूपांतर केले. ती त्या रूपात फिरत असता तिचा मुलगा अर्कास तिला भेटला. कॅलिस्टो प्रेमाने त्याच्याजवळ गेली पण अर्कासने अस्वली रूपात तिला ओळखले नाही. तो तिला ठार करणार हे ओळखून ज्यूपिटरने दोघांना पकडून आकाशात भिरकावले. खेचल्यामुळे त्यांच्या शेपट्या लांबल्या. हेच ते आकाशातील बृहद्ऋक्ष व लघुऋक्ष. जूनोला हेही पसंत पडले नाही. तिने समुद्र देवतांकडून एक वर मिळविला. तेव्हापासून यूरोपीय भागात ही नक्षत्रे क्षितिजाखाली कधीच जात नाहीत.

अशीच इथिओपियाच्या सीफियस राजाची कथाही प्रसिद्ध आहे. अँड्रोमेडा ही या राजाची सुस्वरूप कन्या होती. तिची आई कॅसिओपिया ही अतिशय गर्विष्ठ होती. तिने एकदा मत्स्यकन्यांचा निष्कारण अवमान केला. त्यामुळे नेपच्यून या जलदेवतेचा रोष झाला. अँड्रोमेडाला बळी देण्यानेच तो शांत होणार होता. राजाने अँड्रोमेडाला बळी देण्याचे ठरविले. जलराक्षसाकडून ती खाल्ली जावी म्हणून समुद्राकाठी एका खडकाला साखळदंडाने तिला बांधून ठेवले. पुढे पर्सियस या शूर योद्ध्याने तिची सुटका करून तिच्याशी लग्न केले. या सर्वांना ग्रीकांनी आकाशात स्थान दिले. अशा रीतीने किंबहुना सर्व आकाशच अशा कथाचित्रांनी, वस्तुचित्रांनी सुरेखपणे चित्रित झाले आहे.


आ.१. भारतीय नक्षत्रे

नक्षत्रांविषयी तीन कल्पना: नक्षत्रे हे ग्रहपथावरील टप्पे अशी एक महत्त्वाची कल्पना. म्हणजे अमुक ग्रह सध्या कोणत्या ताऱ्यापाशी आहे अशा खुणेने ग्रहांचे स्थान या कल्पनेवरून सांगता येते. ही कल्पना फार प्राचीन काळची असून तीमुळे कालमापनास बरीच मदत झाली. मग या मार्गावरची चित्रा-स्वातीसारखी एकेकटा तारा असलेली किंवा आश्लेषा, मघा यांसारखे ताऱ्यांचे गट म्हणजे नक्षत्र असा अर्थ रूढ झाला परंतु पुढे अडचण भासू लागली. नक्षत्रे म्हणून मानण्यात आलेले तारे किंवा ताऱ्यांचे गट सारख्या अंतरावर नाहीत. म्हणून पुढे पूर्वीच्या कल्पनेत विशेष बाध न आणता ग्रहपथाचे सारखे २७ भाग केले गेले. यात पूर्वीचे तारकात्मक नक्षत्र जसेच्या तसे बसेलच असे नाही पण गणिताच्या सोयीसाठी सारख्या लांबीच्या विभागांची जी नक्षत्रे मानली ती विभागात्मक नक्षत्रे होत. एक विभागात्मक नक्षत्र म्हणजे ३६०/२७ = १३° १/३ = १३° २० कला म्हणजेच ८०० कलांचे होते. ही कोनात्मक रचनासुद्धा इ.स. पू. सु. १४०० पासून रूढ आहे. याचा अर्थ विभागात्मक नक्षत्र म्हणजे ग्रहपथात अंतर मोजण्याचे एक माप असा होतो. ग्रहपथाबाहेरच्या ताऱ्यांचा समावेश करण्यासाठी क्षेत्रात्मक कल्पना आली. ग्रहपथाच्या २७ समान विभागांच्या रेषा ध्रुवबिंदूंपर्यंत दोन्ही बाजूंस वाढविल्या म्हणजे भोपळ्याच्या अंगावर ज्याप्रमाणे फोडी दर्शविणाऱ्या वळ्या असतात तशा खगोलाच्या २७ पाकळ्या पडतात. या प्रत्येक पाकळीस एकेक नक्षत्र म्हटले, हीच क्षेत्रात्मक नक्षत्रे होत. या सोयीमुळे आकाशातील कोणताही तारा कोणत्या नक्षत्रात आहे हे सांगणे सुलभ झाले. अशा नक्षत्रांचा स्पष्ट उल्लेख कोणत्या ग्रंथात नसला, तरी ती अशी मानण्याचा प्रघात होता असे बाळशास्त्री जांभेकर (१८१२-४६) म्हणतात. ‘आकाशातल्या सप्तर्षींना गती आहे व ते परीक्षित राजाच्या वेळी मघा नक्षत्रात होते’ या पौराणिक ग्रंथातील विधानावरून मघा नक्षत्र हे क्षेत्रात्मक नक्षत्रच असले पाहिजे असे दिसते. मध्यंतरी तारात्मक नक्षत्रेच पण त्यांतील आसपासचे भाग लहान असतील ती अर्धभोग, जरा मोठी होती ती समभोग व फार मोठी असतील ती दीडभोग असे मानण्याची पद्धत होती. याप्रमाणे भरणी, आर्द्रा, आश्लेषा, स्वाती, ज्येष्ठा व शततारका ही अर्धभोग  रोहिणी, पुनर्वसू, उत्तराभाद्रपदा, उत्तराफाल्गुनी, उत्तराषाढा आणि विशाखा ही दीडभोग आणि बाकीची समभोग असे उल्लेख आहेत. अशी विभागात्मक नक्षत्रे आता रूढ नाहीत.


विभागात्मक नक्षत्रांचा राशीबरोबरचा संबंध सव्वादोन नक्षत्रे म्हणजे एक रास असा ठरतो. एका नक्षत्राचे चार भाग पाडतात. प्रत्येक भागास चरण किंवा पाद असे म्हणतात. अश्विनी, भरणी व कृत्तिकेचा एक पाद म्हणजे मेष रास कृत्तिकेचे उरलेले तीन पाद, रोहिणी व मृगाचे पहिले दोन पाद, याप्रमाणे नक्षत्रांची राशींत विभागणी होते. म्हणजे एकेका राशीत कोणत्यातरी सलग नक्षत्रांचे नऊनऊ पाद येतात.

प्रत्येक नक्षत्राची धार्मिक किंवा यज्ञसंस्थेच्या दृष्टीने देवता मानण्यात आली आहे. या देवतांच्या बाबतीत थोडेफार मतभेद आढळतात. प्रत्येक नक्षत्राला त्यातील एक ठळक तारा योगतारा म्हणून मानला जातो. योगतारा कोणता याबाबतीतही बरेच भेद आढळतात. कोष्टक क्र.२ मध्ये एक पद्धत दिली आहे. एच्.टी. कोलब्रुक यांनी हे योगतारे निश्चित करण्याबाबत बरेच काम केलेले आहे.

याशिवाय बृहत्संहितेत नक्षत्रांचे त्यांच्या गुणांवरून ध्रुव, तीक्ष्ण, चर, मृदु, लघु, उग्र व मृदुतीक्ष्ण असे ७ गट पाडले आहेत. यांशिवाय अधोमुख, ऊर्ध्वमुख, तिर्यङ्‌मुख, अंध, मंदाक्ष, मध्याक्ष व सुलोचन असेही नक्षत्रांचे प्रकार मानले आहेत.

आ.२. उत्तर खगोलातील तारकासमूह


नक्षत्र:पंचांगाचे एक अंग: नक्षत्र हे पंचांगाच्या पाच अंगांपैकी एक महत्त्वाचे अंग आहे. चंद्र आकाशात कोणत्या विभागात आहे हे या अंगावरून समजते. पंचांगात ही नक्षत्रे दिलेली असतात. विभागात्मक एक नक्षत्र ओलांडण्यास चंद्राला अंदाजे एक दिवस लागतो. त्यामुळे दररोज वेगवेगळे नक्षत्र असते. सूर्योदयापासून त्याचा अवधी घटकापळात पंचांगात दिलेला असतो. या नक्षत्राला दिन नक्षत्र असेही म्हणतात. धर्मकार्यार्थ नक्षत्रे शुभ-अशुभ अशी मानली जातात. चंद्र ज्या नक्षत्रात (व चरणात) असताना व्यक्तीचा जन्म झालेला असतो, ते त्या व्यक्तीचे जन्मनक्षत्र समजले जाते. चांगलावाईट मुहूर्त याच दैनिक नक्षत्रावरून पाहतात. सूर्याला एक विभागात्मक नक्षत्र ओलांडण्यास तेरा अथवा चौदा दिवस लागतात. साधारणपणे मृग ते हस्त या नऊ नक्षत्रांत सूर्य असताना पाऊस पडतो, यांनी पावसाची नक्षत्रे म्हणतात. ‘सत्ताविसातून नऊ वजा केले तर शून्य येते’ हा व्यवहारातील वाक्‌प्रचार सर्वांच्या परिचयाचा आहे. सर्व ग्रहांचे स्थान पंचांगात नक्षत्रांच्या संदर्भाने दिलेले असते. फार प्राचीन काळी नक्षत्रे २४ असल्याचा जो उल्लेख आहे, तो कदाचित प्रत्येक महिन्यात सूर्याची दोन नक्षत्रे यावरून असू शकेल परंतु सूर्य ज्या नक्षत्रात असेल ते दिसत नाही, चंद्राच्या सन्निध असणारे दिसते म्हणून २७ ही संख्या रूढ झाली असावी.

नक्षत्रांवरूनच चैत्रादि महिन्यांची नावे पडली आहेत. उदा., चैत्र महिन्याच्या पौर्णिमेस चंद्र चित्रा नक्षत्रात असतो, म्हणून तो चैत्र महिना, कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेस चंद्र कृत्तिका नक्षत्रात असतो म्हणून तो कार्तिक महिना वगैरे. काही देशांत मेष, वृषभ या ग्रहपथावरील नक्षत्रांवरून (राशींवरून) महिन्यांची नावे पडली आहेत.

सूर्य ज्या राशिविभागात असेल ते त्या महिन्याचे नाव असते. अर्थात हे सौर महिने होत.

आ.३. दक्षिण खगोलातील तारकासमूह


पाश्चात्त्य नक्षत्रे: भारतीय नक्षत्रे आणि पाश्चात्त्यांनी कल्पिलेली नक्षत्रे यांत फार मोठा फरक आहे. ताऱ्यांच्या समूहांची काल्पनिक दृष्ट्या विशिष्ट आकृती दिसते, त्या आकृतीला व तीत अंतर्भूत झालेल्या ताऱ्यांच्या गटांना नक्षत्र मानले गेले. या आकृती प्राण्यांच्या, पदार्थांच्या, पौराणिक व्यक्तींविषयक कथांच्या अशा आधाराने कल्पिल्या होत्या. उदा., मेष, वृषभ अशी ग्रहपथीय नक्षत्रे बृहदृक्ष, ड्रॅको अशी प्राण्यांची नावे असलेली नक्षत्रे  कॅसिओपिया, हर्क्युलस, अँड्रोमेडा अशी व्यक्तींच्या नावांची नक्षत्रे  कुंभ, तूळ अशी पदार्थवाचक नक्षत्रे व अगदी अलीकडे दक्षिण ध्रुवाजवळची कर्कट (कर्काटक), रेखाटणी, षडंश अशी नौकानयनास उपयुक्त साधनांची नावे असलेली नक्षत्रे.

पाश्चात्त्य नक्षत्रपद्धतीचा उगम मेसोपोटेमियामधील युक्रेटिस नदीच्या खोऱ्याच्या आसपास असला पाहिजे. कारण तेथील प्राण्यांचीच नावे नक्षत्रांना देण्यात आली. त्यांत हत्ती, वाघ, सुसर, गेंडा असे प्राणी नाहीत, हे या संदर्भात लक्षात घेण्याजोगे आहे.

आ. ४. खगोलीय विषुववृत्ताच्या आसपासचे तारकासमूह

आ. ४. खगोलीय विषुववृत्ताच्या आसपासचे तारकासमूह


ग्रीक संस्कृतीच्याही पूर्वी सुमेरियन सांस्कृतिक ग्रंथात आकाशाचे उत्तरेकडील १२, दक्षिणेकडील १२ आणि ग्रहपथावरील १२ असे ३६ विभाग मानल्याचे दिसते. इ. स. पू. १२९ च्या सुमारास पहिली पाश्चात्त्य नक्षत्रांची यादी हिपार्कस यांची आढळते. टॉलेमी यांच्या Almagest या ग्रंथात (इ. स. सु.१५०) ४८ नक्षत्रे दिलेली आढळतात. यांमध्ये उत्तर गोलार्धात दिसणाऱ्या नक्षत्रांचा समावेश असणे साहजिक आहे. दक्षिणेकडील निनावी राहिलेल्या आकाशाच्या भागाचा मध्यबिंदू मात्र दक्षिण ध्रूवबिंदू नाही. त्यामुळे ⇨ संपातचलनाचा परिणाम होऊन त्या वेळच्या व आताच्या दक्षिण ध्रुवबिंदूत फरक पडला आहे. त्यावरून नक्षत्रांची नावे रूढ झाल्याचा काळ इ. स. पू. २७०० असा असावा.

इ. स. १६०३ मध्ये योहान बायर यांनी दक्षिणेकडील १३ नवीन नक्षत्रांची भर घातली, १६९० मध्ये जे. हेव्हेलिउस यांनी आणखी ९ वाढविली आणि १७६३ मध्ये एन्.एल्. द लाकाय यांनी नवीन १४ घातली. आर्गो (नौका) हे नक्षत्र फार मोठे झाले म्हणून त्याचे व्हेला (नौकाशीर्ष), पपिस (नौपार्श्व), कॅरिना (नौकातल) व पिक्सिस (होकायंत्र) असे चार विभाग करण्यात आले, त्यामुळे सध्याची मान्य संख्या ८८ आहे. १९२२ मध्ये इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन (आयएयू) या संस्थेने या यादीला अधिकृत मान्यता दिली. त्यांना तीन अक्षरी संक्षिप्त संज्ञा ठरवून दिल्या. बेल्जियमच्या ज्योतिषविषयक राष्ट्रीय समितीने रेखीव मर्यादा असलेला नकाशासंग्रह (ॲटलास) तयार करावा असे सुचविले. १९२५ मध्ये ही सूचना आयएयूने मान्य केली व सर्व आकाशाचा रेखीव मर्यादा असलेल्या नक्षत्रांचा नकाशा आएयूने १९३० मध्ये प्रसिद्ध केला. आता या नक्षत्रांच्या मर्यादारेषा क्रांतिवृत्ते (पूर्वपश्चिम रेषा) आणि होरावृत्ते (उत्तरदक्षिण रेषा) यांनी बनलेल्या आहेत [→ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति]. जुन्या पद्धतीस थोडे जुळवून घेण्याकरिता व सोयीसाठी सर्व नक्षत्रांचे आकार आणि क्षेत्रे समान नाहीत. ८८ पैकी आयनिक वृत्तावरील (सूर्याच्या वार्षिक भासमान गतीच्या मार्गावरील क्रांतिवृत्तावरील) १२, उत्तर ध्रुवाशेजारी ८, दक्षिण ध्रुवाशेजारी २५ आणि आयनिक वृत्त व ध्रुव यांच्यामधील ४३ अशी आहेत. आता कोणतीही खस्थ ज्योती कोणत्या नक्षत्रात आहे, हे ठरविता येते. यापुढे नवीन खस्थ ज्योतींचे शोध लागले, तरीही त्यांचा समावेश ८८ पैकी कोणत्या करी एका नक्षत्रात करता येईल.

कोष्टक क्र. १. पाश्चात्त्य नक्षत्रे (तारकासमूह)

अ. क्र.

नक्षत्र

पाश्चात्त्य नाव

ठिकाण

अरुंधती केश*

कोमा बेरनाइसेस

अलगर्द*

हायड्रस

अश्मंत*

फोर्‌नॅक्स

अष्टक

ऑक्टन्स

असिदंष्ट्र*

डोराडो

उच्चैःश्रवा*

पेगॅसस

उत्तर मुकुट

कॉरोना बोरिॲलिस

कन्या*

व्हर्गो

ग्र

कपोत

एपस

१०

करभ

कॅमेलोपार्डस

११

कर्क*

कॅन्सर

ग्र

१२

कर्काटक

सर्सिनस

१३

कारंडव

तुकाना

१४

कालिय*

ड्रॅको

१५

कुंभ*

ॲक्वॅरियस 

ग्र

१६

गरुड*

ॲक्विला 

१७

गवय

लिंक्स

१८

चषक

क्रेटर

१९

चित्रफलक*

पिक्टर

२०

जंबूक

व्हल्पेक्युला

२१

जटायू

फिनिक्स

२२

जाल

रेटिक्युलम

२३

टंक

सीलम

२४

तिमि*

डेल्फिनस

२५

तिमिंगिल

सेटस

२६

तूळ*

लिब्रा

ग्र

२७

त्रिकुट

मेन्सा

२८

त्रिकोण*

ट्रायांग्युलम

२९

दक्षिण त्रिकोण

ट्रायांग्युलम ऑस्ट्रॅली

३०

दक्षिण मत्स्य

पिसीज ऑस्ट्रायनस

३१

दक्षिण मुकुट

कॉरोना ऑस्ट्रॅलिस

३२

दूरदर्शक

टेलिस्कोपियम

३३

देवयानी*

अँड्रोमेडा

३४

धनु*

सॅजिटॅरियस

ग्र

३५

ध्रुवमत्स्य

अर्सा मायनर

३६

नरतुरंग*

सेंटॉरस

३७

नौकातल

कॅरिना

३८

नौकाशीर्ष

व्हेला

३९

नौपार्श्व*

पपिस

४०

पारावत

कलुंबा

४१

पीठ

एरा

४२

फलक

स्कूटम

४३

बक

ग्रुस

४४

बृहल्लुब्धक

कॅनिस मेजर

४५

भुजंग

सर्पेन्स

४६

भुजंगधारी*

ऑफियुचस

ग्र

४७

भूतप*

बूटीज

४८

मकर*

कॅप्रिकॉर्नस

ग्र

४९

मक्षिका

मुस्का

५०

मिथुन*

जेमिनी

ग्र

५१

मीन*

पिसीज

ग्र

५२

मृगशीर्ष*

ओरायन

५३

मेष*

एरिज

ग्र

५४

यम

इंडस

५५

यमुना

इरिडानस

५६

ययाती

पर्सीयस

५७

रेखाटणी

नॉर्मा

५८

लघुलुब्धक

कॅनिस मायनर

५९

लघुसिंह

लिओ मायनर

६०

लध्वश्व*

इक्व्युलियस

६१

वाताकर्ष

अँटलिया

६२

वायुभक्षक

शॅमिलिऑन

कोष्टक क्र. १ पाश्चात्त्य नक्षत्रे (तारकासमूह) पुढे चालू

अ. क्र.

नक्षत्र

पाश्चात्त्य नाव

ठिकाण

६३

वासुकी*

हायड्रा

६४

वीणा

लायरा

६५

वृक*

लूपस

६६

वृश्चिक*

स्कॉर्पियस

ग्र

६७

वृषपर्वा

सीफियस

६८

वृषभ*

टॉरस

ग्र

६९

शफरी

व्होलॅन्स

७०

शर

सॅजिट्टा

७१

शर्मिष्ठा

कॅसिओपिया

७२

शशक

लेपस

७३

शिखाबल

पॅव्हो

७४

शिल्पागार

स्कल्प्टर

७५

शृंगाश्व

मोनोसेरॉस

७६

शौरी*

हर्क्युलस

७७

श्यामशबल

केनीझ व्हीनॅटिसाय

७८

षडंश

सेक्स्टन्स

७९

सप्तर्षि

अर्सा मेजर

८०

सरठ

लॅसर्टा

८१

सारथी

ऑरिगा

८२

सिंह*

लिओ

ग्र

८३

सूक्ष्मदर्शी

मायक्रोस्कोपियम

८४

स्वस्तिक*

क्रक्स

८५

हंस*

सिग्नस

८६

हस्त* (ध्वाक्ष)

कोव्हर्स

८७

होकायंत्र

पिक्सिस

८८

होरायंत्र

होरोलोजियम

[उ = ग्रहपथाच्या उत्तरेस, ग्र = ग्रहपथाजवळ, द = ग्रहपथाच्या दक्षिणेस * अशी खूण असलेल्या नक्षत्रांवर स्वतंत्र नोंदी आहेत  यांशिवाय ‘बृहल्लुब्धक व लघुलुब्धुक’ आणि ‘सप्तर्षि व ध्रुवमत्स्य’ अशाही स्वतंत्र नोंदी आहेत].


कोष्टक क्र. २. भारतीय नक्षत्रे

अ. क्र.

नक्षत्र

ताऱ्यांची संख्या

देवता

आकृती

योगतारा

अश्विनी

२, ३

अश्विन

अश्वमुख

मेषेतील बीटा

भरणी

यम

योनी

मेषेतील ३५, ४१

कृत्तिकापुंज (कृत्तिका)

अग्नी

वस्तरा

वृषभातील ईटा (अल्सायनी)

रोहिणी

प्रजापती

शकट

वृषभातील आल्फा (आल्डेबरन)

मृगशीर्ष (मृग)

सोम

हरणाचे डोके

मृगातील लॅम्डा

आर्द्रा

रुद्र

मणी

मिथुनातील गॅमा (ॲल्हेना) किंवा मृगातील आल्फा (बेटलज्यूझ)

पुनर्वसू

२, ४

अदिती

घर

मिथुनातील आल्फा (पॉलक्स)

पुष्य

३, १

बृहस्पती

शकट

कर्कातील डेल्टा (प्रीसेपी)

आश्लेषा

५, ६

सर्प

चक्र

वासुकीतील वा हायड्रातील झीटा

१०

मघा

५, ६

पितृ

शाला

सिंहातील आल्फा (रीगलस)

११

पूर्वा

अर्यमा

पलंग

सिंहातील  डेल्टा

१२

उत्तरा

भग

शय्या

सिंहातील बीटा (डेनेबोला)

१३

हस्त

सविता

हाताचा पंजा

हस्तातील गॅमा वा डेल्टा

१४

चित्रा

त्वष्टा

मोती

कन्येतील आल्फा (स्पायका)

१५

स्वाती

वायू

पोवळे

भूतपातील आल्फा (आर्क्टुरस)

१६

विशाखा

२, ४

इंद्राग्नी

तोरण

तूळेतील आल्फा

१७

अनुराधा

३, ४

मित्र

पूजा, बली

वृश्चिकातील डेल्टा

१८

ज्येष्ठा

इंद्र

कुंडल

वृश्चिकातील आल्फा (अँटारेझ)

१९

मूळ

११

निऋती

सिंहपुच्छ

वृश्चिकातील लॅम्डा

२०

पूर्वाषाढा

३, ४

आप

शय्या

धनूतील डेल्टा

२१

उत्तराषाढा

२, ४

विश्वेदेव

हस्तिदंत

धनूतील सिग्मा (नंकी)

२२

अभिजित

ब्रह्मा

शृंगाटक

वीणेतील आल्फा (व्हीगा)

२३

श्रवण

विष्णू

त्रिविक्रम

गरुडातील आल्फा (अल्टेर)

२४

धनिष्ठा

४, ५

वसू

मृदंग (मर्दल)

धनिष्ठा वा तिमितील आल्फा

२५

शततारका

१००

इंद्र, वरुण

वर्तुळ

कुंभेतील लॅम्डा

२६

पूर्वाभाद्रपदा

अज एकपाद

यम, मंचक

उच्चैःश्रवातील आल्फा

२७

उत्तराभाद्रपदा

अहिर्बुघ्नीय

पलंग

उच्चैःश्रवातील गॅमा

२८

रेवती

३२

पूषा

मृदंग

मीनेतील झीटा

[या सर्व नक्षत्रांवर स्वतंत्र नोंदी आहेत काही योगताऱ्यांची व्यावहारिक पाश्चात्त्य नावे कंसात दिली आहेत].

सध्या जे अधिकृत नकाशे आहेत, त्यांतील परिस्थिती १ जानेवारी १८७५ ची आहे. यांतील तारे आणि सीमारेषा यांच्या सापेक्ष स्थितीत काहीही बदल होणार नाही  परंतु परांचन [→ संपातचलन] व त्यासारख्या इतर बाबींमुळे सीमारेषांच्या होरा आणि क्रांती यांमध्ये हळूहळू बदल होईल.

बाळशास्त्री जांभेकर यांनी परिश्रमपूर्वक सर्व पाश्चात्त्य नक्षत्रांना ग्रीक व भारतीय पुराणांतील व्यक्तिविशेषांचे व कथांचे सादृश्य लक्षात घेऊन अनुरूप व संस्कृतनिष्ठ नावे दिली आहेत. ती आता रूढ झाली आहेत. सर्व ८८ नक्षत्रांची लॅटिन अकारविल्हे नावे, संक्षिप्त नावे, भारतीय नावे आणि ती कोठे आहेत तो गोलार्ध किंवा ग्रहपथ हे सर्व कोष्टक क्र.१ मध्ये दिले आहे.

मोठ्या ताऱ्यांना व्यक्तिशः नावे असली, तरी आता ठाऊक झालेल्या ताऱ्यांची संख्या खूपच वाढल्यामुळे, नावे देण्याचा शास्त्रीय पद्धत आता वेगळी ठरली आहे. योहान बायर यांनी १६०३ मध्ये ही पद्धती सुचविली. नक्षत्रांतील ताऱ्यांना त्यांच्या दीप्तीच्या अनुक्रमाने (अपवाद सोडून) α,β, γ, δ,… अशी नावे देण्यात येतात. काहींना a, b, c,… ही रोमन अक्षरेही देण्यात येतात. कमी पडतील तेव्हा आकडेही देण्यात येतात. या अक्षरांच्या अगर आकड्यांनंतर तो ज्या नक्षत्रात असेल त्याचे लॅटिन षष्ठ्यन्त रूप किंवा संक्षिप्त रूप ठेवण्यात येते. आल्फा कॅरिनी म्हणजे कॅरिना नक्षत्रातील सर्वांत तेजस्वी कॅनोपस (अगस्ती) हा तारा. अशा रीतीने ही पद्धती सर्वसमावेशक झाली आहे. नक्षत्रांचे जे नकाशे सोबत दिले आहेत त्यांमध्ये याच पद्धतीचा अवलंब केलेला आहे.

दूरदर्शकाच्या उपयोगाने ज्ञात ताऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली. टॉलेमी यांच्या Almagest मध्ये फक्त १,०२८ ताऱ्यांची जंत्री आहे. आता १०० कोटींच्या आसपास तारे छायाचित्रण पद्धतीमुळे दृष्टिपथात येतात. नव्या नकाशाच्या योजनेमुळे सर्वांच्या अंतर्भावाची सोय झाली आहे.

पहा : ज्योतिषशास्त्र तारा.

संदर्भ : 1. Baker, R. H. Introducing Constellations, New York, 1957.

            2. Mayall,  R. N. Mayall, M. L. Beginner’s Guide to the Stars, New York, 1960.

            3. Menzel, D. H. A Field Guide to the Stars and Planets, New York, 1964.

            4. Olcott, W. Olcott’s Field Book of the Skies, 1954.

            5. Rey, H. A. Find the Constellations, New York. 1957.

            ६. केळकर, दा. ग. आकाशाचे देखावे, पुणे, १९२७.

            ७. जोशी, महादेवशास्त्री, नक्षत्रलोक, पुणे, १९५७.

            ८. ढवळे, त्र्यं. गो. नक्षत्रदर्शन, पुणे, १९५५.

पंत, मा. भ. कोळेकर, वा. मो.