नवानगर संस्थान: ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील पूर्वीच्या काठेवाडातील (सौराष्ट्र) एक संस्थान. क्षेत्रफळ सु. ९,७०० चौ. किमी. लोकसंख्या सु. ४ लाख (१९४१). वार्षिक उत्पन्न सु. १ कोटी. संस्थानात तीन शहरे व ६६६ खेडी होती. उत्तरेस कच्छचे रण, पूर्वेस मोरवी-राजकोट-ध्रोल-गोंडल ही संस्थाने, दक्षिणेस काठेवाडचा सोरठ विभाग आणि पश्चिमेस अरबी समुद्र यांनी सीमित असलेल्या संस्थानाला सु. १६५ किमी. समुद्रकिनारा लाभलेला होता. समुद्रात मोती मिळत. जाडेजा राजपुतांपैकी जाम रावळने १५३५–३७ च्या दरम्यान सोराठवर स्वारी करून जोडिया, अमरन व खंभालिया परगणे जिंकले व संस्थानाची स्थापना केली (१५४०). त्यानेच त्या वेळी हे शहर वसवले. त्याला हार्दोल्जी, रावोजी व मोडजी हे तीन भाऊ होते. हार्दोल्जीने ध्रोल संस्थान स्थापन केले. या ध्रोल संस्थानामधूनच पुढे राजकोट निर्माण झाले. १५९१ मध्ये संस्थान मोगलांच्या मांडलिकीत आले. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात अंतःकलहाचा फायदा घेऊन सोरठच्या मोगल फौजदाराने संस्थान खालसा करून त्याचे नाव इस्लामनगर ठेवले. ते १६७३ मध्ये अंशतः आणि १७०९ मध्ये पूर्णतः पुन्हा जामसाहेबाच्या ताब्यात आले. १७३६ मध्ये जामसाहेबाने गुजरातचा मोगल सुभेदार सरबुलंदखान याला आपली मुलगी देऊन गादी टिकवली. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात दिवाण मेगमण खवासचे वर्चस्व होते ते त्याच्या मृत्युपर्यंत टिकले (१८००). १८१२ मध्ये संस्थान इंग्रजांच्या मांडलिकीत आले. त्यांच्याशी झालेल्या तहान्वये मुलींची भ्रूणहत्या थांबली. संस्थानला दत्तकाचा अधिकार व हाताखालच्या संस्थानिकांना न्याय देणे व शिक्षा फर्माविणे यांचा अधिकार होता. संस्थान इंग्रजांना अर्धा लाख रु. आणि जुनागढ–बडोदा मिळून ७०,००० रु. खंडणी देई. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व विसाव्या शतकात आरोग्य, शिक्षण, रेल्वे, नगरपालिका अशा अनेक क्षेत्रांत सुधारणा झाल्या. शिक्षण मोफत देण्याची व्यवस्था संस्थानने केली. पहिल्या महायुद्धात या संस्थानाने ब्रिटिशांना सर्वतोपरी सहकार्य दिले. संस्थानाची सु. ३०० जहाजे होती व जोडिया, सलाया आणि बेडी या बंदरांतून चालणाऱ्या व्यापारामुळे उत्पन्न वाढले. संस्थानिकांना जामसाहेब ही उपाधी व १४ तोफांची सलामी होती. पैकी दिलिपसिंगजी व रणजितसिंगजी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाव कमावले. संस्थानाचे स्वतःचे सैन्य घोडदळ–३७७, पायदळ–२३८ होते. संस्थानात प्रजामंडळ होते व जामसाहेब नरेंद्र मंडळात प्रामुख्याने भाग घेत. त्यांच्याच पुढाकाराने संस्थान १९४८ मध्ये सौराष्ट्र संघात विलीन झाले व जामसाहेब राजप्रमुख झाले. १ मे १९६० पासून ते गुजरात राज्यात समाविष्ट करण्यात आले.
कुलकर्णी, ना. ह.