नव–हेगेल मत: (नीओ-हेगेलिॲनिझम). हेगेलचे तात्त्विक दर्शन हे आधुनिक तत्त्वज्ञानाच्या इतिहासातील एक अत्यंत प्रभावी दर्शन आहे. ⇨ लूडविग फॉइरबाख (१८०४–७२), डी. एफ्. श्ट्रॉउस (१८०८–७४), ब्रूनो बौअर (१८०९–८२) इ. जर्मन धर्मशास्त्रज्ञांच्या विचारपद्धतीवर हेगेलच्या तत्त्वज्ञानाचा खोल परिणाम आढळून येतो. ‘जे सत् असते ते विवेकानुसारी असते’ असा हेगेलचा सिद्धांत आहे. ह्या सिद्धांताचा अर्थ कसा लावायचा ह्या मुद्यावरून हेगेलच्या अनुयायांत डावे हेगेलवादी व उजवे हेगेलवादी असे दोन पंथ निर्माण झाले. डाव्या हेगेलवाद्यांचे म्हणणे असे, की जे अस्तित्वात आहे पण विवेकानुसारी नाही, ते अस्तित्वात असले तरी असत् असते व म्हणून विवेकानुसारी स्वरूप प्राप्त होईपर्यंत ते परिवर्तन पावत असते. तेव्हा अस्तित्वाच्या परिवर्तनशीलतेवर व सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याच्या कृतीवर डाव्या हेगेलवाद्यांचा भर होता. उजवे हेगेलवादी असे मानत, की जे अस्तित्वात आहे ते सत् असल्यामुळे विवेकानुसारी असले पाहिजे आणि जे अस्तित्वात आहे त्याच्या स्वरूपात अंतर्भूत असलेली विवेकशीलता आपण समजून घेतली पाहिजे. कार्ल मार्क्स (१८१८–८३) हा डावा हेगेलवादी होता, तर १८४० च्या सुमारास जर्मनीतील तत्त्वज्ञानाचे अनेक प्राध्यापक उजवे हेगेलवादी होते. फ्रान्स, इटली, डेन्मार्क, पोलंड, अमेरिका इ. देशांतील तत्त्ववेत्त्यांवरही हेगेलच्या दर्शनाचा प्रभाव पडला होता.

पण ज्यांना ‘नव-हेगेल पंथ’ म्हणून ओळखण्यात येते असे तात्त्विक पंथ ग्रेट ब्रिटन आणि इटली या देशांत निर्माण झाले. ग्रेट ब्रिटनमध्ये जे. एच्. स्टर्लिंग ह्या तत्त्ववेत्त्याने द सिक्रेट ऑफ हेगेल (म. शी. हेगेलचे गुह्य) ह्या १८६५ मध्ये प्रसिद्ध केलेल्या ग्रंथाद्वारा हेगेलच्या तत्त्वज्ञानाचा इंग्रजी भाषिकांना परिचय करून दिला. ⇨ टीएच्ग्रीन (१८३६–८२) आणि एडवर्ड केअर्ड (१८३५–१९०८) ह्या तत्त्ववेत्त्यांनी कांट व हेगेल ह्यांच्या सिद्धांतांचे विवरण करणारे लिखाण केले आणि विशेषतः ग्रीनने ह्या सिद्धांतांवर आधारलेल्या दृष्टिकोनातून नीतिशास्त्र व राज्यशास्त्र ह्या तत्त्वज्ञानाच्या शाखांतील मूलभूत समस्यांचे विवेचन केले. हे तत्त्ववेत्ते कांटच्या तत्त्वज्ञानाकडे हेगेलच्या दृष्टिकोनातून पाहत, असे म्हणता येईल. हेगेलचे सर्व सिद्धांत शिष्यत्वाच्या भूमिकेतून ते स्वीकारीत नसत, तर हेगेलच्या काही मूलभूत सिद्धांतांचा आधार घेऊन ज्ञानमीमांसा, तत्त्वमीमांसा, नीतिशास्त्र इ. विचारक्षेत्रांतील समस्यांचे स्वतंत्रपणे विवेचन करण्याचे काम त्यांनी पार पाडले. विशेषतः ग्रेट ब्रिटनमध्ये रूढ असलेल्या ज्ञानमीमांसेतील अनुभववादी, वेदनवादी परंपरेवर आणि नीतिशास्त्रातील सुखवादी, व्यक्तीवादी परंपरेवर त्यांनी टीका केली. अनुभवाची संकल्पनांच्या साहाय्याने व्यवस्था लावून त्याला अर्थ देण्याचे जे कार्य ज्ञाता करतो त्याच्यावर तसेच जिच्यात सहभागी होऊन व्यक्ती स्वतःच्या जीवनाला अर्थ देऊ शकते त्या सामाजिक व्यवस्थेवर त्यांनी भर दिला. लॉर्ड हॉल्डेन, जे. एस्. हॉल्डेन, अँड्रयू प्रिंगल-पॅटिसन, डी. जी. रिची, सर हेन्‍री जोन्स आणि ⇨ बर्नार्ड बोझांकेट हे ह्या नव-हेगेलवादी पंथाचे इतर नामवंत अनुयायी होत. ⇨ एफ्. एच्. ब्रॅड्ली (१८४६–१९२४) हा ह्या पंथातील सर्वश्रेष्ठ आणि सर्वांत मौलिक असा विचारवंत होय. ⇨ जे. एम्. . मक्टॅगर्ट (१८६६–१९२५) ह्या हेगेलवरील प्रसिद्ध भाष्यकाराचाही ह्या पंथात अंतर्भाव केला पाहिजे.

इटालियन नव-हेगेल पंथाचे ⇨ बेनीदेत्तो क्रोचे (१८६६–१९५२) आणि ⇨ जोव्हान्नी जेंतीले (१८७५– १९४४) हे अध्वर्यू होते. क्रोचेने विशेषतः सौंदर्यशास्त्र आणि इतिहासाचे तत्त्वज्ञान ह्या क्षेत्रांत महत्त्वाची भर घातली. ⇨ आर्. जी. कॉलिंगवुड (१८८९–१९४३) ह्या इंग्लिश तत्त्ववेत्त्यावर त्यांच्या विचाराचा मोठा पगडा आहे. जेंतीलेने इटलीतील फॅसिस्ट राजवटीचे हेगेलच्या दृष्टिकोनातून समर्थन करण्याचा प्रयत्न केला. क्रोचे फॅसिझमचा प्रखर विरोधक होता.

आजही अमेरिकेत आणि यूरोपमध्ये, विशेषतः पूर्व यूरोपमध्ये, हेगेलच्या सिद्धांतांचा अभ्यास आणि चिकित्सा मार्क्सवाद आणि अस्तित्ववाद यांच्या संदर्भात जोमदारपणे चालू आहे.

पहा : हेगेल, जॉर्ज व्हिल्हेल्म फ्रीड्रिख.

संदर्भ : 1. Haldar, Hiralal, Neo-Hegelianism, London, 1927.

            2. Marcuse, Herbert, Reason and Revolution : Hegel and the Rise of Social Theory, New       York, 1954.

रेगे, मे. पुं.