सामान्यीकरण : (जनरलायझेशन). एक मानसशास्त्रीय संज्ञा. व्यापकीकरण हे तिचे पर्यायी नाव. सामान्यीकरण ही एक प्रक्रिया आहे. एका विशिष्ट उद्दीपकाला जो प्रतिसाद वर्तनाच्या रुपाने मिळतो, तसाच प्रतिसाद वेगळ्या व काही सारखेपणा असलेल्या उद्दीपकाला मिळतो, हे या प्रक्रियेचे वैशिष्ट्य आहे. उदा., एका विशिष्ट जातीचा कुत्रा ज्याला चावला आहे, असे लहान मूल सर्व जातींच्या मोठ्या कुत्र्यांना घाबरण्याची प्रवृत्ती दर्शविते. कुठेतरी रव्याचा लाडू खाऊन आजारी पडलेल्या माणसाला इतर प्रकारचे लाडू पाहिल्यावर मळमळू लागते. आईचा आवाज ऐकल्यावर आश्वस्त होणाऱ्या मुलाला तिच्या आवाजाशी साम्य असलेल्या स्त्रियांचे आवाज ऐकून दिलासा वाटतो. एखाद्या माणसाला खूप आवडलेले आणि नेहमी पियानोवर वाजताना ऐकलेले गाणे त्याने व्हायोलिन वा गिटार अशा वेगळ्या वाद्यांवर वाजलेले ऐकले तरी त्याला आनंदच वाटतो.

अभिसंधानाच्या (कंडिशनिंग) प्रयोगात सामान्यीकरणाचा प्रत्यय येतो. ४,००० हर्ट्‌झ क्षमतेचा आवाज ऐकल्यानंतर समोर अन्न येते हा अनुभव एखाद्या कुत्र्याला पुनःपुन्हा दिल्यानंतर त्या विशिष्ट क्षमतेचा आवाज आणि तो ऐकल्याबरोबर पुढे येणारे अन्न ह्यांचे परस्परसाहचर्य त्या कुत्र्याच्या लक्षात येते. म्हणजेच एका विशिष्ट उद्दीपकाला विशिष्ट प्रतिसाद देण्याचे प्रशिक्षण त्या कुत्र्याला मिळते. त्यानंतर केलेल्या प्रयोगात २,००० ते ६,००० हर्ट्‌झच्या क्षमतेचे आवाज त्या कुत्र्याला ऐकविले जातात परंतुर् हर्ट्‌झची संख्या कमीजास्त झाली, तरी अन्नाच्या अपेक्षेने त्या कुत्र्याच्या तोंडात लाळ निर्माण होतेच. मात्र मूळच्या उद्दीपकाला (४,००० हर्ट्‌झ) मिळणारा प्रतिसाद सर्वांत जास्त लाळ निर्माण होण्याचा असतो. तसेच ह्या क्षमतेच्या उद्दीपकांहून वेगळ्या–म्हणजे कमीजास्त क्षमतेच्या– उद्दीपकांना मिळणाऱ्या प्रतिसादात लाळेचे प्रमाण कमी कमी होत जाते तथापि ह्या प्रयोगांत सामान्यीकरणाचा घटक आहेच.

सामान्यीकरणाचे अनुभव दैनंदिन जीवनात अनेकदा येतात. एखाद्या लहान मुलाला सदऱ्याचे बटन कसे लावावे हे शिकविल्यानंतर ते मूल त्याच्या पोषाखात जेथे जेथे बटन लावायला लागते तेथे तेथे ते लावते. पुस्तक वाचायला शिकलेला माणूस मासिक, वर्तमानपत्र, रस्त्यावर लावलेल्या वाहतुकीच्या संबंधातल्या सूचनाही वाचू शकतो. तसेच ग्रं थालय, घर, कामाची जागा अशा वेगवेगळ्या ठिकाणीही वाचन करू शकतो. ह्याचाच अर्थ, वाचनाची वेगवेगळी सामग्री आणि निरनिराळी ठिकाणे ह्यांच्या संदर्भांत वाचनाच्या वर्तनाचे सामान्यीकरण होते.

माणसांना अनुकूलनासाठी सामान्यीकरण आवश्यक असते तथापि अशीही उदाहरणे आढळतात, की तेथे सामान्यीकरण अनुकूल ठरत नाही. अशा वेळी माणसांना वेगळे उद्दीपक आणि वेगळी परिस्थिती लक्षात घेऊन वेगळ्या प्रकारचे वर्तन शिकावे लागते. म्हणजेच त्यांना तारतम्य ( डिस्क्रिमिनेशन ) वापरावे लागते. दोन किंवा अधिक उद्दीपकांमधला फरक लक्षात घेऊन आपल्याला लाभदायक असा उद्दीपक कोणता, हे ओळखणे शिकावे लागते. म्हणजेच उद्दीपकांमधला भेद कळावा लागतो. पशुपक्षीही ह्याला अपवाद नाहीत. समजा, रंगारंगांतला भेद एका कबुतराला शिकवायचा आहे. त्यासाठी करावयाचा प्रयोग असा असेल : काही दिवस हिरव्या प्रकाशाने प्रकाशित झालेली बशी आणि काही दिवस लाल प्रकाशाने उजळलेली बशी, अशा दोन वेगवेगळ्या बश्या आलटूनपालटून त्या कबुतरासमोर ठेवायच्या. हिरव्या बशीवर त्या पक्ष्याने चोच मारली, की खाणे पुढे ठेवायचे पण लाल बशीवर त्याने चोच मारली, तर ती बशी रिकामीच ठेवायची. हळूहळू फक्त हिरवी बशी दिसल्यानंतरच कबुतर चोच मारील.

दैनंदिन जीवनातील यशस्वी वर्तनासाठी सामान्यीकरण आणि तारतम्य ह्या दोन्ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. उदा., संकल्पनानिर्मिती ह्या दोन्ही प्रक्रियांवर अवलंबून असते. जेव्हा लहान मूल एखाद्या नावाचा अर्थ शिकून घेते, तेव्हा ते नाव वस्तूंच्या एका विशिष्ट वर्गाशी निगडित आहे, हेही ते शिकते. उदा., ‘कुत्रा’ हा शब्द ते शिकते, तेव्हा ते नाव एका विशिष्ट कुत्र्याचे नसून ते इतर कुत्र्यांना–म्हणजे कुत्र्यांच्या वर्गाला– लावता येते, हेही ते शिकते. येथे त्या मुलाच्या मनात सामान्यीकरणाची प्रक्रिया चालू असते पण ही प्रक्रिया अधिक ताणून सगळ्याच चतुष्पाद प्राण्यांना जर ते ‘कुत्रे’ म्हणू लागले आणि वडील माणसे त्याची चूक दाखवू लागली, तर कोणते प्राणी कुत्रे आहेत आणि कोणते कुत्रे नाहीत हे त्याला कळते. येथे तारतम्याची प्रक्रिया कार्यरत होते. यशस्वी होण्यासाठी सर्व ज्ञानसंपादनात सामान्यीकरण आणि तारतम्य हे दोन घटक असलेच पाहिजेत. उद्दीपक आणि परिस्थिती प्रत्येक परिस्थितीत सारखीच नसते पण सामान्यीकरणावाचून प्रत्येक उद्दीपक आणि प्रत्येक परिस्थिती ही अभिनवच वाटेल आणि अशा प्रत्येक नव्या परिस्थितीला आणि नव्या उद्दीपकाला योग्य असा प्रतिसाद प्रत्येक व्यक्तीला शिकून घ्यावा लागेल. उदा., प्रत्येक वेळी वेगळ्या वाक्यात वापरल्या गेलेल्या एकाच शब्दाचा अर्थ पुनःपुन्हा शिकून घेण्यात जाणारा वेळ आणि करावा लागणारा प्रयत्न केवढा असेल, याची कल्पनाच करावी लागेल. शिकून घेतलेले ज्ञान सामान्यीकरणामुळे नवनव्या परिस्थितींमध्ये वापरता येते आणि वेगाने बदलत जाणाऱ्या जगात व्यक्तीला कार्यक्षमतेने वागणे शक्य करते.

औद्योगिक क्षेत्रात उत्पादनाचे गुणवत्ता-नियंत्रण करताना तारतम्याचे ज्ञान उपयुक्त ठरते. सदोष आणि निर्दोष उत्पादन कोणते, हे पाहिल्याबरोबर ओळखता आले पाहिजे. हे काम कंटाळवाणे आणि दमणूक करणारे ठरु शकते आणि थकव्याचा उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. ह्या कामासाठी पशुपक्ष्यांना प्रशिक्षण देण्याचे प्रयोग झालेले आहेत. विशिष्ट औषधी गोळ्यांचा आकार, आकृती (चौकोनी, गोल इ.), रंग ह्यांच्या आधारे सदोष गोळ्या आणि निर्दोष गोळ्या ह्यांच्यात भेद करण्याचे प्रशिक्षण कबुतरांना दिल्याची आणि ह्या कबुतरांनी त्यांना दिलेली कामगिरी पूर्ण करण्यात ९९% यश मिळविल्याची नोंद आहे.

संदर्भ : 1. Baldwin, John D. Baldwin, Janice I. Behaviour Principlesin Everyday Life, New Jersey, 1986.

2. Martin, Garry Pear, Joseph, Modification : What it is and How to do it, New Jersey, 1995.

3. Miller, L. Keith, Principles of Everyday Behaviour Analysis, Monterey (Calif.), 1980.

कुलकर्णी, अ. र.